You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ही कवटी मानवजातीची अनेक रहस्यं उलगडून दाखवू शकते, असं काय आहे यात?
मानवजातीच्या सर्वांत जुन्या पूर्वजांचे जीवाश्म आधी वाटलं होतं त्यापेक्षा खूपच जुने आहेत असं नवं संशोधनातून समोर आलं आहे.
या जीवाश्मांमध्ये गुहेत राहणाऱ्या एका महिलेचे जीवाश्म आहे. तिला संशोकांनी सौ प्लेस असं नाव दिलंय.
मानवजातीचा उगम समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतल्या गुहांमध्ये या महिलेचे जीवाश्म जवळपास हजार वर्षं दबले होते.
आधुनिक चाचण्यांनुसार या पृथ्वीवर सर्वांत पहिले मानव 34 ते 37 लाख वर्षांपूर्वी वावरत होते.
पण या नव्या अभ्यासामुळे मानवजातीच्या इतिहासाचं नवं पर्व लिहिलं जाईल असं संशोधक म्हणत आहेत.
याचा अर्थ असा की आपले पूर्वज आजच्या मानवामध्ये उत्क्रांत होण्याचे अनेक मार्ग असतील जे आधी आपल्याला माहितीही नव्हते.
अनेक वर्षं संशोधकांना वाटत होतं की अॅस्ट्रोलोफिथिकस आफ्रिकन्स प्रजाती 26 लाख वर्षांपेक्षा जास्त जुनी नाही. या प्रजातीचे जीवाश्म दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गजवळच्या स्टेर्कफोंटीन गुहांमध्ये सापडले होते.
या भूगर्भात दडलेल्या गुहांमध्ये पुथ्वीवरच्या सर्वात पहिल्या मानवांचे सर्वाधिक जीवाश्म सापडलेले आहेत. इथेच 1947 साली एक जवळपास पूर्ण आकाराची कवटी सापडली. ही कवटी महिलेची होती आणि या महिलेला संशोधकांनी टोपणनाव दिलं, 'सौ प्लेस'.
अमेरिकेतल्या स्मिथसोनियन संग्रहालायाच्या मते अॅस्ट्रोलोफिथिकस आफ्रिकन्स प्रजाती दोन पायांवर चालत असली तरी आजच्या मानवाच्या तुलनेत त्यांची उंची कमी होती. पुरुषांची सरासरी उंची 4 फूट 6 इंच होती तर महिलांची सरासरी उंची 3 फूट 9 इंच होती.
पण आता रेडिओअॅक्टिव्ह डेटिंग या नव्या चाचणीनुसार सौ. प्लेस आणि तिच्याबरोबर सापडलेल्या इतर जीवाश्मांचं वय आधी वाटलं त्यापेक्षा 10 लाख वर्षांहून जास्त असू शकतं असं समोर आलं आहे.
या नव्या पद्धतीत संशोधक जीवाश्मांचा अभ्यास करताना एका दुर्मीळ आयसोटोपचा शोध घेतात जो फक्त त्या दगडांमध्ये सापडतो जे दगड कॉस्मिक रेजच्या संपर्कात आले होते.
अॅस्ट्रोलोफिथिकस आफ्रिकन्स ही मानव-माकड यांच्या मधली प्रजाती आजच्या मानवाचे खरे पूर्वज असू शकत नाही असं तज्ज्ञांना वाटायचं. कारण ही प्रजाती पृथ्वीवर साधारण 22 लाख वर्षांपूर्वी वावरत होती आणि तोवर होमो जेनस, आजच्या मानवाच्या उक्रांतीच्या टप्प्यातले सुरुवातीचे पूर्वज, पृथ्वीवर वावरत होते.
पण आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार अॅस्ट्रोलोफिथिकस आफ्रिकन्स आणि होमो जेनस यांच्या वयात 1 लाख वर्षांचा फरक आहे. त्यामुळे सौ प्लेस आणि तिची प्रजाती मानवी उत्क्रांतीचा भाग असू शकते अशी शक्यता आहे.
म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ही प्रजाती, मानव उत्क्रांत झाले त्या माकडांच्या प्रजातीसोबतच पृथ्वीवर वावरत होती. या माकडांच्या प्रजातीचा एक जीवाश्म संशोधकांना सापडला होता, तिचं नाव ल्यूसी. ल्यूसीचं वय साधारण 32 लाख वर्षं असावं असा संशोकांचा अंदाज आहे. ल्यूसीच्या प्रजातीपासून आजचा मानव उत्क्रांत झाला असं समजतात.
पण आता या नव्या टाईमलाईनचा विचार केला तर या दोन प्रजाती एकाच वेळेस पृथ्वीवर होत्या, त्यांच्यात संबंध आले असतील आणि त्यांनी एकत्र येऊन प्रजननही केलं असेल अशी शक्यता संशोधकांना वाटते.
त्यामुळे आपलं आजवरचं जे उत्क्रांतबद्दलचं ज्ञान होतं, ते अजून गुंतागुंतीचं होतं कारण उत्क्रांतीची प्रक्रिया एकरेषीय नव्हती हे सिद्ध होतं.
या अभ्यासाचा भाग असलेल्या फ्रेंच वैज्ञानिक लॉरेन्ट ब्रक्सल्स म्हणतात की, "याचा अर्थ असा आहे आपली उत्क्रांती एका सरळसोट झाडासारखी नाही, तर जमिनीला लागून वाढणाऱ्या आणि सर्वदूर पसरणाऱ्या झुडपासारखी झाली आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)