कॉलेजमध्ये अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण होत असल्याचा विद्यार्थिंनीचा आरोप

कलाक्षेत्र फाऊंडेशन

फोटो स्रोत, KALAKSHETRA FOUNDATION

    • Author, मुरलीधरन काशीविश्वनाथन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, तमीळ सेवा

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील कलाशाखेचं एक सुप्रसिद्ध कॉलेज गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

या शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी आपल्याच शिक्षकांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शिवाय, कॉलेज व्यवस्थापन या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चेन्नईतील 'कलाक्षेत्र फाऊंडेशन' येथील महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र राहिलेलं आहे. याठिकाणी भरतनाट्यम, कथक्कली यांसारख्या नृत्यांच्या विषयात चार वर्षांच्या पदवीसह डिप्लोमा आणि गीत-संगीत यांचंही शिक्षण दिलं जातं.

1936 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला 1993 मध्ये देशातील प्रमुख संस्थांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. या संस्थेनी देशाला अनेक नामवंत कलाकार दिले आहेत.

मात्र, आता या संस्थेतील शिक्षकांवरच येथील विद्यार्थिनींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने गदारोळ माजला आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही क्लोझ्ड ग्रुपवर याविषयी तक्रारींची चर्चा झाली. मात्र, त्यावेळी माध्यमांशी बोलण्यासाठी कुणीच समोर आला नाही.

अनीता रत्नम यांच्यासारख्या काही प्रथितयश डान्सर्सनी सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

विद्यार्थिनी

फोटो स्रोत, Getty Images

या आरोपांनुसार, कलाक्षेत्र विद्यालयात काम करत असलेले चार पुरुष शिक्षक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करत आहेत. व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

21 मार्च रोजी राष्ट्रीय महिला आयोगानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तामिळनाडू पोलीस महासंचालकांना या प्रकरणी तपास करण्याची सूचना केली होती. महिला आयोगाने याबाबत त्यांना नोटीसही पाठवून दिलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

यानंतर कलाक्षेत्र फाऊंडेशनने केंद्र सरकारच्या माध्यमातून एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं.

कलाक्षेत्रने म्हटलं, “या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.”

मात्र, संस्थेने तक्रारी फेटाळून लावताना म्हटलं की गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक आणि कलाक्षेत्र फाऊंडेशनला बदनाम करण्यात येत आहे. कलाक्षेत्रच्या अंतर्गत तपास समितीने (ICC) या प्रकरणाची दखल स्वतःहून घेत याचा तपास केला. मात्र, अडीच महिन्यांच्या तपासानंतर या तक्रारी बिनबुडाच्या असल्याचं निष्पन्न झालं आहे.”

यानंतर, राष्ट्रीय महिला आयोगाने 25 मार्च रोजी सांगितलं की अंतर्गत तपास समितीने या प्रकरणाचा तपास केला असता पीडित विद्यार्थिनीने ही घटना फेटाळून लावली आहे. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

कलाक्षेत्र फाऊंडेशन

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी गुरुवारी कलाक्षेत्र महाविद्यालयाचा दौरा केला. त्यांनीही या प्रकरणाचा आढावा घेतला.

मात्र, आपल्याला रेखा शर्मा यांच्याशी मोकळेपणाने बोलू दिलं गेलं नाही. तपास हा सार्वजनिकरित्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

रेखा शर्मा यांच्या दौऱ्यानंतर गुरुवारी (30 मार्च) विद्यार्थिनींनी याठिकाणी निषेध आंदोलन केलं.

कलाक्षेत्र व्यवस्थापनाने सुरुवातीला महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये जाण्याची परवानगी दिली नाही.

पण काही वेळाने परवानगी मिळाली त्यावेळी विद्यार्थिनींनी काही शिक्षकांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप केले.

परिसरात पोलीस बंदोबस्त

विद्यार्थिनींचं निषेध आंदोलन जोर पकडत अताना कलाक्षेत्र व्यवस्थापनाने महाविद्यालय काही दिवस बंद राहील, अशी घोषणा केली.

महाविद्यालय 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगत व्यवस्थापनाने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांना दोन दिवसांत खोल्या रिकाम्या करण्याची सूचनाही केली.

शिवाय, या काळात नियोजित परीक्षाही नंतर घेण्यात येतील, असं महाविद्यालयाने म्हटलं.

दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली असून रात्रीसुद्धा ते आपलं आंदोलन सुरू ठेवणार आहेत.

यानंतर, चेन्नईमधील जिल्हा प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनीही या प्रकरणाची माहिती घेतली आहे.

संस्थेच्या संचालक रेवती रामचंद्रन या विद्यार्थ्यांसमोर गेल्या त्यावेळी माध्यमांनी त्यांना विविध प्रश्न विचारले.

कलाक्षेत्र फाऊंडेशन

रेवती म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आमच्या दृष्टीने पहिलं प्राधान्य आहे. आम्ही या प्रकरणात विद्यार्थिनींच्या तक्रारींबाबत चौकशी करू. आम्ही याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चाही करणार आहोत.”

अडीच महिने तपास करूनही कोणतीही कारवाई न केल्याबाबत प्रश्नाचं रेवती रामचंद्रन यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. यानंतर त्या महाविद्यालयाबाहेर निघून गेल्या.

‘अद्याप लेखी तक्रार मिळाली नाही’

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विद्यार्थिनी रात्री दोन वाजेपर्यंत आंदोलनस्थळी होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलनास येणार असल्याचं सांगून त्या आपापल्या खोल्यांमध्ये गेल्या. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी त्या आंदोलन करण्यासाठी हजर झाल्या.

तामिळनाडूच्या विधानसभेतही शुक्रवारी या मुद्द्यावर चर्चा झाली.

एस. एस. बालाजी, टी. वेलमुरूगन आणि के. सेव्वापेरून्तगई यांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देताना मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटलं, “पोलिसांना अद्याप या प्रकरणात लेखी तक्रार मिळालेली नाही.”

ते म्हणाले, “निषेध आंदोलन सुरू असल्याने कॉलेज बंद करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामं करण्यास सांगितलं आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जात आहेत. एक महिला पोलीस निरीक्षक आणि पोलीस बल त्याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे.”

स्टॅलिन पुढे म्हणाले, “या प्रकरणातील दोषींना माफ केलं जाणार नाही. प्रकरणाचा सखोल तपास करून कठोर कारवाई करण्यात येईल.”

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रेम आनंद सिन्हा माध्यमांशी बोलताना म्हणाले, “या संदर्भात अद्याप कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर त्या दिशेने योग्य ती कारवाई केली जाईल.”

मात्र, लोकांनी सोशल मीडियावर याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

कलाक्षेत्र फाऊंडेशन

पीडितांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न

दरम्यान, तामिळनाडू महिला आयोगाच्या अध्यक्षा ए. एस. कुमारी यांनीही कलाक्षेत्र महाविद्यालयाचा दौरा केला. सरकारला या प्रकरणाचा अहवाल सोपवणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

विद्यार्थिनींच्या आरोपांनुसार लैंगिक शोषणामध्ये चार जण सहभागी आहेत. 2008 पासून या प्रकरणी वारंवार तक्रारी दाखल करण्यात आल्या, पण तरीही कॉलेज व्यवस्थापनाकडून हा प्रकार रोखण्यासाठी कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत.

केरळमधून आलेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाने म्हटलं, “सुरुवातीला प्रवेश घेतेवेळी आम्ही याठिकाणी आलो होते. पण त्यानंतर आम्ही पुन्हा याठिकाणी येऊ शकलो नाही. कोर्स संपल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यासाठी आम्हाला ऑडिटोरियममध्ये जाण्याची परवानी मिळेल. पण इतर परिसरात जाण्याची, किंवा कुणाशी बोलण्याचीही परवानगी आम्हाला नाही. आमच्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून शांत राहण्यास भाग पाडलं जातं.”

1936 साली रुक्मिणीदेवी अरुंडेल आणि जॉर्ज अरुँडेल यांनी अड्यार येथे थिओसॉफिकल सोसायटीच्या परिसरात कलाक्षेत्र फाऊंडेशनची स्थापना केली होती.

त्यानंतर 1962 मध्ये महाविद्यालय थिरूवनमयूरला हलवण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)