हॉलमार्क नसलेल्या जुन्या दागिन्यांचं काय होणार? वाचा- नवे नियम

woman weating Gold jewellery

फोटो स्रोत, ANI

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(सोन्याचे दागिने केवळ अलंकार म्हणूनच घेतले जात नाहीत तर गुंतवणूक म्हणून देखील त्याकडे पाहिले जातं. त्यामुळे तुमच्यापैकी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सोनं असण्याची शक्यता आहे.)

तुमच्याकडे सोन्याचे दागिने आहेत का? किंवा तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात का? मग हा लेख नीट वाचा.

कारण सोन्याच्या हॉलमार्क दागिन्यांविषयीच्या नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या खरेदी-विक्रीवर होऊ शकतो.

या नियमानुसार एक एप्रिल 2023 पासून सोन्याची विक्री करणारे दुकानदार नवीन पद्धतीचा सहा आकडी हॉलमार्क नसलेले दागिने विकू शकणार नाहीत.

पण हॉलमार्क म्हणजे काय असतं, दागिन्यांच्या बाबतीत हॉलमार्कचं महत्त्व काय आहे आणि हॉलमार्क सिस्टिममध्ये काय बदल होतो आहे, जाणून घेऊया.

हॉलमार्क म्हणजे काय?

तुम्ही सोन्याचे दागिने विकत घेता, तेव्हा त्यावर कुठेतरी अगदी बारीक आकारात काही आकडे आणि अक्षरं लिहिली असतात. हाच तो हॉलमार्क.

हा दागिन्यांचा एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे UID किंवा HUID असतो.

सोन्याला उष्णता दिली की त्याला हवा तो आकार देता येतो. त्याचे दागिने बनवता येतात.

पण हा धातू तसा नाजूक. त्यामुळे दागिने वाकण्याची किंवा तुटण्याची भीती असते.

त्यामुळेच दागिने घडवताना त्यात थोडं तांबं मिसळलं जातं. जितकं तांबं जास्त, तितकी सोन्याची शुद्धता म्हणजे कॅरेटस कमी होतात.

खरंतर किती प्रमाणात तांबं मिसळायचं हे प्रमाणही ठरलेलं आहे.

पण, अनेकदा लबाडी होते. आणि म्हणूनच दागिन्यात किती प्रमाणात सोनं आहे हे तपासणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी हॉलमार्कची मदत होते.

दागिन्यांवर हॉलमार्क का गरजेचा?

हॉलमार्क हे भारतात दिलं जाणारं एक प्रकारचं प्रमाणपत्र आहे. या नंबरमुळे सोनं किती शुद्ध आहे आणि ते कुणी प्रमाणित केलं आहे हे समजतं.

Gold earing in a woman's hand

फोटो स्रोत, ANI

सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि ते जेवढी किंमत मोजतात तेवढ्या शुद्धतेचं सोनं त्यांना मिळतंय याची खात्री हॉलमार्कमुळे पटते.

भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस अर्थात BIS नं 2000 साली सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगची योजना सुरू केली.

BIS ही संस्था भारतातली राष्ट्रीय मानक संस्था आहे.

म्हणजे देशात कुठल्याही वस्तू, उत्पादने, सेवा यांचं मानकीकरण करणं, त्यांच्या अचूकतेविषयी शहानिशा करणं अशी कामं ही संस्था करते.

हॉलमार्किंग योजनेनुसार सोन्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांना हॉलमार्क असलेले दागिने विकण्यासाठी नोंदणी करावी लागते.

Gold Hallmark benefits

ज्वेलर्स आपल्याकडच्या सरकारच्या अधिकृत हॉलमार्किंग सेंटरमध्ये या दागिन्यांवर हॉलमार्किंग करून घेतात.

हॉलमार्कमुळे ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता कमी होते आणि फसवणूक झालीच तर दाद मागणं सोपं जातं.

6 Digit हॉलमार्क काय आहे?

याआधी भारतात चार आकडी हॉलमार्कचा वापर व्हायचा. यात ब्युरो ऑफ स्टँडर्डसचा लोगो, दागिन्याच्या शुद्धतेची माहिती म्हणजे कॅरेट, शुद्धता तपासणाऱ्या केंद्राचा लोगो आणि सोनाराचा स्वतःचा लोगो यांचा समावेश असायचा.

पण जुलै 2021 पासून BIS नं नवा 6 Digit म्हणजे सहा आकडी हॉलमार्कची पद्धत आणली.

हा नियम तेव्हा लगेच अंमलात आणणं शक्य नव्हतं. त्यासाठी ज्वेलर्सना दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. पण काही सोनार सहा आकडी तर काहीजण चार आकडी हॉलमार्क असलेले दागिने विकत होते, ज्यामुळे ग्राहकांचा गोंधळही उडायचा.

त्यामुळेच आता 1 एप्रिल 2023 पासून नवा हॉलमार्क बंधनकारक करण्यात आला आहे. कुठलेही ज्वेलर्स हॉलमार्क नसलेले किंवा केवळ चार आकडी हॉलमार्क असलेले दागिने विकू शकणार नाहीत.

असा असेल सहा आकडी हॉलमार्क.

फोटो स्रोत, BIS

फोटो कॅप्शन, असा असेल सहा आकडी हॉलमार्क.

HUID नावानं ओळखला जाणाऱ्या नव्या हॉलमार्कमध्ये BIS चा लोगो, दागिन्याच्या शुद्धतेची माहिती आणि प्रत्येक दागिन्याचा एक विशिष्ठ सहा आकडी कोड यांचा समावेश असतो.

तुम्ही BIS Care app वर हा HUID पडताळून पाहू शकता. थोडक्यात, भारतात यापुढे तयार केल्या जाणाऱ्या सोन्याच्या प्रत्येक दागिने आणि वस्तूची अशी पडताळणी करता येणं शक्य होणार आहे.

हॉलमार्क नसलेल्या जुन्या सोन्याचं काय करायचं?

तुमच्याकडे जर असे हॉलमार्क नसलेले दागिने असतील किंवा चार आकडी हॉलमार्क असलेले दागिने असतील तर काळजी करू नका. कारण ग्राहकांकडे असलेल्या चार आकडी हॉलमार्कवाल्या दगिन्यांची शुद्धताही ग्राह्य धरली जाईल, असं BIS नं जाहीर केलं आहे.

हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांविषयी तुमच्याकडे दोन पर्याय असतील. BIS कडे नोंदणी असलेल्या सोनाराकडे जाऊन दागिन्यांवर हॉलमार्क करून घेणं किंवा दुसरं म्हणजे BIS च्या अधिकृत हॉलमार्किंग सेंटरमध्ये जाऊन दागिन्यांची पडताळणी करणं. या केंद्रांची यादी BIS च्या वेबसाईटवर दिली आहे.

BISनं यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाच जारी केल्या आहेत. त्यानुसार ग्राहक एका वेळी 10 दागिने किंवा वस्तू हॉलमार्किंगसाठी घेऊन जाऊ शकतात. ग्राहकाच्या उपस्थितीत त्याचं वजन केलं जातं आणि त्यांना एक सीरियल नंबर दिला जातो.

सोन्याची शुद्धता तपासण्याच्या दोन पद्धती आहेत. XRF पद्धत आणि सोनं वितळून त्याची पारख करण्याची पद्धत. XRF पद्धतीत एका एक्सरे फ्लुरोसन्स मशीनद्वारा सोन्याची तपासणी केली जाते, पण केवळ त्याआधारे सर्टिफिकेट देता येत नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)