वेदोक्त-पुराणोक्त वादाचा निषेध, काळाराम मंदिरात आव्हाडांनी ठेवली संविधानाची प्रत

जितेंद्र आव्हाड

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -

1. वेदोक्त-पुराणोक्त वादाचा निषेध, काळाराम मंदिरात आव्हाडांनी ठेवली संविधानाची प्रत

संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंना नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचा आरोप होत आहे.

या प्रकाराला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे.

संबंधित प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आव्हाड यांनी काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या चरणी संविधानाची प्रत ठेवली.

सनातन धर्म कुठून आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. शिवाय, सध्या धर्मा-धर्मात, जाती-जातीत कटूता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.

2. राहुल गांधी हेच देशात नवी क्रांती घडवू शकतात, तुरुंगाबाहेर येताच नवज्योत सिंग सिद्धूंचं वक्तव्य

राहुल गांधी हेच देशाची नवी क्रांती घडवू शकतात अशा आशयाचे विधान, तुरुंगाबाहेर येताच माजी क्रिकेटपटू आणि माजी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी केले.

“ज्या ज्या वेळी हुकूमशाहीचा उदय झाला, तेव्हा क्रांती घडली आहे. अशा स्थितीत राहुल गांधी हे एक क्रांती घडवण्याच्या उद्देशाने आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत,” असं वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धू

फोटो स्रोत, Getty Images

नवज्योत सिंग सिद्धू हे काल (1 एप्रिल) एका वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आले. एका 34 वर्षे जुन्या खटल्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावलेली होती.

तुरुंगाबाहेर आल्यानंतर सिद्धू म्हणाले, “लोकशाही नावाची कोणतीही गोष्ट देशात शिल्लक राहिलेली नाही. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे.”

“अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. सरकारला आता सत्य ऐकावंसं वाटत नाही. सरकारी संस्था सध्या केंद्राच्या गुलाम बनल्या आहेत. सरकारला सत्य ऐकू गेलं पाहिजे आणि राहुल गांधीच देशात क्रांती घडवू शकतात,” नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.

3. पती भिकारी असला तरी पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी त्याचीच - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

"पत्नीची देखभाल करणं हे पतीचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. पती प्रोफेशनल भिकारी असला तरी स्वतःची देखभाल करु शकत नसलेल्या पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्याची आहे," असं पंजाब आणि हरयाणाच्या उच्च न्यायालयाने म्हटलं आहे

न्यायालय आदेश

फोटो स्रोत, Getty Images

न्यायमूर्ती एचएस मदान यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या प्रकरणात पतीची याचिका फेटाळताना वरील बाब नमूद केली.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या विरोधात पतीने हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. घटस्फोट प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत पत्नीला मिळणारी मासिक पोटगी थांबवावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

परंतु, परंतु न्यायमूर्ती एचएस मदान यांनी सदर पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.

यावेळी न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं की, "प्रोफेशनल भिकारी असलेला पतीवर देखील स्वतःची देखभाल करू शकत नसलेल्या पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. पत्नीला उत्पन्नाचे कोणते साधन मिळाले आहे किंवा तिच्याकडे पुरेशी संपत्ती आहे, हे याचिकाकर्त्या पतीला सिद्ध करता आलं नाही." ही बातमी एबीपी माझाने दिली.

4. मुंबईत 12 एप्रिल रोजी ख्रिश्चन समाजबांधवांची निषेध रॅली

राज्यात ख्रिश्चन समुदायावर अन्याय होत असून त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी 12 एप्रिल निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती समस्त ख्रिस्ती समाजाने दिली.

गेल्या काही दिवसांपासून देशात आणि विशेषतः राज्यात ख्रिश्चन समुदायातील व्यक्ती, कर्मचारी, चर्च आणि संस्थांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

सदर रॅली शांततामय मार्गानं काढण्यात येईल. त्यासाठी मुंबईसह राज्यभरातील ख्रिश्चन समुदायाच्या नागरिकांना आमंत्रित करण्यात आलं आहे, असं आयोजकांनी सांगितलं.

‘आता नाही तर कधीच नाही,’ हे ब्रीदवाक्य घेऊन सदर रॅली पार पडणार आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

5. महाविकास आघाडीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची पहिली एकत्रित सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, TWITTER/SHIV SENA

शिवसेनेसह (उद्धव ठाकरे गट) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यभरात एकत्रित सभा घेणार असून त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरापासून केली जात आहे.

आज (2 एप्रिल) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे.

दरम्यान या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शहरभरात होर्डिंग आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.

दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांची शहरातच सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमध्ये हिंसेचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या शहरातील घडामोडींकडे लक्ष असणार आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)