You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसीची मोदींवरची डॉक्युमेंट्री युट्यूब, ट्विटरवरून काढण्याचे सरकारचे आदेश
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेल्या आढावा.
1. बीबीसीची मोदींवरची डॉक्युमेंट्री युट्यूब, ट्विटरवरून काढण्याचे सरकारचे आदेश
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार केंद्र सरकारने युट्यूब आणि ट्विटरला बीबीसीची डॉक्युमेंट्री इंडिया- द मोदी क्वेश्चन ही शेअर केलेली लिंक हटवण्याचे आदेश दिले आहेत.
वर्तमानपत्राने अधिकाऱ्यांच्या हवाला देत सांगितलं की या माहितीपटामुळे भारताचं सार्वभौमत्व दुबळं असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
या माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बाधा येऊ शकत असल्याची भीतीही त्यांनी वर्तवली आहे.
या वृत्तपत्राच्या मते केंद्रीय माहिती आणि प्रसार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी युट्यूबच्या माहितीपटाच्या पहिल्या एपिसोडची लिंक ब्लॉक करायला सांगितलं. तसंच ही लिंक शेअर करणारे 50 पेक्षा अधिक ट्विट हटवण्यासही सांगितलं आहे.
हा निर्णय म्हणजे सेन्सरशिप असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी ट्विट करून ही सेन्सरशिप असल्याचं सांगितलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही ट्वीट केलं आहे. महुआ मोईत्रा यांनी ट्विट केलं आहे की हा माहितीपट कोणी पाहू नये असंच सरकारला वाटतं.
बीबीसीने मोदींवर दोन भागाचा माहितीपट तयार केला आहे. पहिल्या भागाचं नाव आहे इंडिया:द मोदी क्वेश्चन, या माहितीपटाचा पहिला एपिसोड 17 जानेवारीला ब्रिटनमध्ये प्रसारित झाला आहे. दुसरा भाग 24 तारखेला प्रसारित होणार आहे.
पहिल्या भागात मोदींची सुरुवातीची राजकीय कारकीर्द दाखवली आहे. त्यात ते भाजपमध्ये मध्ये विविध पदं भूषवत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले दाखवण्यात आले आहेत.
2.गुहागरमध्ये एकाच सरणावर मुलगी-जावई आणि दोन नातवांना मुखाग्नी दिल्याची हृदयद्रावक घटना
कोकणात गुहागर तालुक्यातल्या हेदवी येथे आजीच्या वर्षश्राध्दाला येत असताना मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एक अख्खं कुटुंब संपलं.
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव रोपोली येथे झालेल्या या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला होता. यात पंडित कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा समावेश होता. या चौघांनाही एकाच सरणावरती अग्नी देण्याची वेळ हेदवी येथील रघुनाथ सखाराम जाधव यांच्या कुटुंबावर आली.
महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.
या अपघातात रघुनाथ जाधव यांची मुलगी, जावई आणि दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. तर, एका सरणावर त्यांना त्यांच्या मुलाला अग्नी द्यावा लागला. शेवंती सखाराम जाधव या 103 वर्षांच्या आजी यांचा गेल्यावर्षी मृत्यू झाला होता, त्या आजीच्या वर्षश्राद्धला सगळे येत होते.
शुक्रवारी (20 जानेवारी) पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात या पाच जणांना मृत्यूने गाठले. यामध्ये नीलेश पंडित (वय 45), त्यांची पत्नी नंदिनी (वय 35), मुलगी मुद्रा (वय 12) आणि मुलगा भव्य (वय 4) यांचा मृत्यू झाला होता. नीलेश पंडित हे हेदवी गावचे जावई असून, भादगाव जवळ डावखोल (तालुका गुहागर) हे त्यांचे मूळ गाव आहे.
गावात घरचे कोणी नसल्याने त्यांच्यावरही हेदवी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
3. नाकावाटे दिली जाणारी लस 26 जानेवारीला सामान्यांसाठी बाजारात येणार
भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली iNCOVACC ही नाकावाटे देण्यात येणारी लस 26 जानेवारीला बाजारात येणार आहे.
कंपनीचे चेअरमन कृष्णा इला यांनी ही माहिती दिली आहे. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदुस्तान टाइम्स ने ही बातमी दिली आहे.
डिसेंबर मध्ये सरकारने या लशीची घोषणा केली होती. सरकारी रुग्णालयात ही लस 325 रुपयाला तर खासगी रुग्णालयात ही लस 800 रुपयांना मिळणार आहे.
4. 'मी मुसलमान पण माझ्या तालमीचं नाव छत्रपती शिवराय संकुल, कुस्तीला जातीय रंग देऊ नका'- अस्लम काझी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभूत झालेल्या सिकंदर शेखची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. सिकंदरचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता त्यामध्ये पंचांनी दिलेल्या निर्णयावरून वाद झाला. यावर महाराष्ट्रातून अनेक कुस्ती शौकिनांनी नाराजी व्यक्त करत सिकंदरवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडियावरही सिकंदरच्या समर्थनार्थ अनेक स्टेटस झळकताना दिसले. अशातच यावर कुस्ती सम्राट म्हणून ओळखले जाणारे अस्लम काझी यांनी पक्षपात झाल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी कुस्तीला जातीय रंग देऊ नका असं सुनावलं आहे.
झी 24 तास ने ही बातमी दिली आहे,
मी स्वत: मुसलमान असून गेल्या 20 वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे. मला ज्याने तालीम बांधून दिली तो व्यक्ती मारवाडी समाजाचा आणि माझ्या तालमीचं नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कारण इथे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असतो. कुस्ती हा कोणत्या जातीचा खेळ नाही त्यामुळे अशा प्रकरणांना जातीय रंग देऊ नका, असं आवाहन अस्लम काझी यांनी केलं आहे.
5. आसाममध्ये मदरशांची संख्या कमी करणार- हेमंत बिस्वा सर्मा
आसाममध्ये मदरशांची संख्या कमी करण्याचा सरकार विचार करत आहे असं वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी केलं आहे. तसंच मदरशांसाठी नोंदणी पद्धत लागू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे ते म्हणाले.
एनडीटीव्ही ने ही बातमी दिली आहे.
आम्हाला तिथे नियमित शिक्षणाची पद्धत सुरू करायची असल्याचंही ते म्हणाले. यासाठी ते अल्पसंख्याक समुदायाशी ते चर्चा करत आहेत.
आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत म्हणाले की, छोट्या मदरशांना मोठ्या मदरशांमध्ये आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यादिशेने सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)