You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींनी ज्यांचा उल्लेख केला ते 'पसमांदा मुस्लीम' नेमके कोण आहेत?
- Author, फैसल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
तसं बघायला गेलं तर 'पसमांदा मुस्लिम' हा काही नवा शब्द नाहीये. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका परिषदेत 'पसमांदा मुस्लिम'चा उल्लेख केला आणि या 'पसमांदा' शब्दाच्या सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भाबद्दल पुन्हा उत्सुकता निर्माण झाली.
मंगळवारी (17 जानेवारी) पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना 'मतांची चिंता न करता' समाजातील सर्व घटकांशी संवेदनशीलतेने संबंध ठेवण्याचं आवाहन केलंय. यात त्यांनी बोहरा, पसमांदा मुस्लिम आणि इतरही जाती धर्मांचा उल्लेख केल्याचं म्हटलं जातंय.
पसमांदा हा फारसी शब्द असून, जे मागे राहिलेत असा त्याचा अर्थ होतो.
साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर असे मुस्लिम लोक जे समुदायातील इतर वर्गांच्या तुलनेत पिछाडलेले आहेत. हा पसमांदा समाज मागे राहण्यामागे जातिव्यवस्था हे एक कारण सांगितलं जातं.
अगदी सुरुवातीच्या काळात पसमांदा शब्दाचा वापर एका वर्गासाठी करण्यात आला होता.मात्र त्यानंतर वर्षानुवर्षे हा शब्द मुस्लिमांमधील इतर मागास जाती, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वापरात आला.
माजी राज्यसभा खासदार आणि पत्रकार अली अन्वर अन्सारी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, बाबरी मशीद पाडल्यानंतर धर्माभोवती फिरत असलेलं राजकारण बघून ते खूप दुःखी होते. त्यामुळे मुस्लिमांमधील जातीवर्गांची ओळख पुढे करून धर्माधारित राजकारणाला चॅलेंज करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं.
यासाठी अली अन्वर अन्सारी यांनी 'रिसर्च आणि फील्ड स्टडी' करून 1990 साली एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं नाव होतं 'मुसावत की जंग' (समानतेची लढाई).
भारतीय मुस्लिमांमध्ये जातिव्यवस्था अस्तित्वात आहे का?
मुस्लिम समाजातील एक वर्ग जाती-आधारित भेदभाव नाकारताना म्हणतो की, "समानतेवर विश्वास असणारा धर्म अशी इस्लामची ओळख आहे. मात्र या धर्मातही जातिव्यवस्थेची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत."
इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम धर्मातील जातिव्यवस्था हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेशी जोडून पाहता येणार नाही असं सिल्व्हिया वाटुक सारख्या समाजशास्त्रज्ञांनी नमूद केलंय.
म्हणजेच मुस्लिम धर्मात जी जातीची उतरंड आहे त्या पद्धतीची उतरंड हिंदू धर्मात पाहायला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जातिव्यवस्थेची ही प्रथा फक्त दक्षिण आशियातील मुस्लिमांपुरती मर्यादित आहे.
त्यामागचं कारण असं सांगितलं जातं की, मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या इतर धर्मियांमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणावर होते. ज्यांनी इस्लाम स्वीकारला ते येताना आपल्या रूढी परंपरा देखील सोबत घेऊन आले.
पसमांदा वापरात येण्यापूर्वीचा शब्द
मुस्लिमांमध्ये जातीवादाचा मुद्दा ब्रिटिशांनी निर्माण केल्याचा तर्क काही ठिकाणी दिला जातो. असा ही एक तर्क दिला जातो की, ब्रिटिश सरकारने 'सरकारी' मुस्लिमांसोबत संगनमत करून ही योजना अस्तित्वात आणली जेणेकरून धर्म जातिव्यवस्थेच्या आधारावर विभक्त करता येईल.
हिंदू धर्मातील काही लोक जातिव्यवस्थेसाठी जो तर्क देतात त्याच प्रकारातला हा एक तर्क म्हणावा लागेल.
पूर्वी भारतातील मुस्लिम धर्मियांमधील जातिव्यवस्थेचं वर्णन करण्यासाठी अश्रफ, अजलाफ आणि अरझल हे शब्द वापरले जायचे.
सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इम्तियाज अहमद यामागचं स्पष्टीकरण देताना सांगतात की, "ज्यांचे पूर्वज अरब, इराण आणि अफगाणिस्तानशी संबंधित होते असे लोक म्हणजे अश्रफ. हा वर्ग उच्च गटात मोडायचा. यात उच्चवर्णीय हिंदूंचा देखील समावेश होता, ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता."
म्हणजेच अश्रफ वर्ग हा उच्चवर्णीय हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमधील उच्चभ्रू लोकांचं प्रतिनिधित्व करतो. यामध्ये सय्यद, शेख, मुघल, पठाण, मुस्लिम राजपूत, तागा किंवा त्यागी मुस्लिम, चौधरी मुस्लिम, ग्रहे किंवा गौर मुस्लिम यांचा समावेश होतो.
हिंदू धर्मीयांमधील खालच्या जातीतून ज्या लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला त्यांना अजलाफ म्हटलं जायचं. यामध्ये धोबी, शिंपी, न्हावी, विणकर, तेली, भिस्ती, रंगारी लोकांचा समावेश होता. अजलाफ मुस्लिमांमध्ये अन्सारी, मन्सूरी, कासगर, राईन, गुजर, बुनकर, गुर्जर, घोसी, कुरेशी, इद्रीसी, नाईक, फकीर, सैफी, अल्वी, सलमानी अशा जाती आहेत.
आणि शेवटी ज्या दलितांनी इस्लाम स्वीकारला होता त्यांना अरझल म्हटलं जातं.
लोकसंख्या
जाती-आधारित जनगणना झाली नसल्यामुळे पसमांदा समुदायाची लोकसंख्या किती आहे याची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र 1931 च्या जनगणनेच्या आधारावर बघायला गेलं तर पसमांदा समाजाशी संबंधित लोकांचा दावा आहे की एकूण मुस्लिम समाजापैकी त्यांची लोकसंख्या 80-85 टक्के पर्यंत असावी.
अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्राचे प्राध्यापक खालिद अनीस अन्सारी सांगतात की, फाळणीच्या वेळी जे स्थलांतरित झाले त्यामध्ये अश्रफ मुस्लिमांचा मोठा वर्ग होता. त्याच्या तुलनेत मागासलेल्यांची लोकसंख्या आणखी वाढली असेल.
भारतात ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापूर्वी मुस्लिम सत्तांमध्ये त्यावेळच्या नोकऱ्यांपासून जमिनी देण्यापर्यंत सर्वच बाबतीत अश्रफांना प्राधान्य दिलं जायचं.
मंडल कमिशनने कमीत कमी 82 असे वर्ग शोधून काढले होते ज्यांना मागास मुस्लिमांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं होतं.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन (NSSO) नुसार, मुस्लिमांमधील ओबीसी लोकसंख्या 40.7 टक्के आहे, जी देशातील एकूण मागास समुदायाच्या 15.7 टक्के आहे.
सच्चर कमिशनने म्हटलं होतं की, सरकारकडून त्यांना जे लाभ मिळायला हवेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. हिंदूमधील मागास-दलितांना आरक्षणाचा लाभ ज्यापद्धतीने मिळतोय तसा मुस्लिमांमधील मागास समुदायातील लोकांना मिळत नाहीये.
अली अन्वर हे पसमांदा मुस्लिम महाज नामक संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. ही संघटना एकप्रकारे दबावगट म्हणून काम करते.
पसमांदा समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इतर अनेक संघटना कार्यरत आहेत. यात ऑल इंडिया बॅकवर्ड मुस्लिम मोर्चा, पसमांदा फ्रंट, पसमांदा समाज अशा संघटना कार्यरत आहेत.
एससी-एसटीच्या धर्तीवर दलित मुस्लिमांना आरक्षण द्यावं अशी या संघटनांची मागणी आहे.
पसमांदा मूव्हमेंट नवी नाहीये. यासंदर्भात स्वातंत्र्यापूर्व काळातही बोललं जायचं. मात्र आता दक्षिणेपासून पूर्वेकडील राज्यांमध्ये या संबंधी आवाज उठवला जातोय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)