You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘माझ्या मुलीला ताप आला, दवाखान्यात जायला रस्ता नसल्याने अर्ध्यातच तिचा जीव गेला’
- Author, विजय राऊत
- Role, बीबीसीसाठी
- Reporting from, पालघरहून
“माझ्या मुलीला अचानक ताप आला, तिला दवाखान्यासाठी नेताना पाहिलं तर बंधारा फुटला होता. वरून पाणीही वाहत होतं. रस्ता नसल्यामुळे अर्ध्यातच तिचा जीव गेला.”
म्हसेपाडा येथील रहिवासी नितीन चव्हाण हे आपल्यावर आलेल्या संकटाबाबत हतबलतेनं सांगत होते. आपण आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी काहीच करू न शकल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं.
रस्ता नाही म्हणून वेळेत उपचार न मिळाल्याने नितीन यांच्या दीड महिन्यांच्या मुलीचा जीव गेला. पालघर जिल्ह्यातील म्हसेपाडा गावचा संपर्क दरवेळी पावसाळ्याच्या दिवसांत तुटतो.
आदिवासींच्या विकासासाठी 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन स्वतंत्र आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली.
मात्र, आजही पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गावपाडे समस्यांच्या विळख्यात अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळते.
पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर विक्रमगड तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा म्हसेपाडा दरवर्षी पावसाळ्यात चार महिने रस्त्याअभावी मरणयातना भोगत आहे.
गारगाई आणि पिंजाळ नदीच्या संगमावर वसलेल्या या पाड्यात 290 लोकांची वस्ती आहे. या पाड्यात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही.
पाड्यातून गाव गाठण्यासाठी ग्रामस्थांना नदी आणि जंगलातून वाट काढत गाव गाठावे लागते. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते.
लोकांना गारगाई नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर फळीच्या सहाय्याने नदी ओलांडावी लागते.
तर नदीला पूर येऊन बंधाऱ्याच्या वरून पाणी वाहत असेल, तर टायर ट्युबच्या साहाय्याने नदी ओलांडावी लागते. दुसरीकडे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेवरून जायचे असल्यास 4 किलोमीटर पायी चालून वाडा तालुक्यातील टोपले पाडा हे गाव गाठावे लागते.
शाळकरी मुले, रुग्ण, गरोदर महिला या सर्वांनाच अशा पद्धतीने चालत प्रवास करावा लागतो.
म्हसेपाडा येथील रहिवासी चारुशिला ठाकरे सांगतात, “गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एक एका गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करायचं होतं. चालताना थकवा येत असल्याने तिला अनेक ठिकाणी बसवत बसवत न्यावं लागलं.
त्यामध्ये तिला पोहोचण्यासाठी बराच उशीर झाला. एक महिलेची तर नदीतच होडीमध्ये डिलिव्हरी झाली. पण बाळ नेता नेता खूप विलंब झाला.”
"गावातील या परिस्थितीमुळे येथील मुलामुलींशी लग्न करण्यासाठी बाहेरच्या गावातून कोणीही तयार होत नाही," असंही गावकऱ्यांनी सांगितलं.
येथील रहिवासी दामू ठोकरे यांनी सांगितलं, आमच्या वस्तीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून गेल्या चार ते पाच वर्षात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातही विशेषतः गरोदर महिलांना नेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यांना ट्युबमधून पाण्यातून नेता येत नाही. म्हणून ते जाण्यापेक्षा घरीच राहते, असं म्हणतात,
चंद्रकांत ठाकरे म्हणाले, “शालेय विद्यार्थ्यांना आम्ही सकाळी ट्यूबवरून नेतो. पुन्हा संध्याकाळी त्यांना घरी नेण्यासाठी आम्ही तिथे थांबतो. पूर आला तर आम्ही मुलांना शाळेलाच पाठवत नाही."
म्हसेपाडा येथील रहिवासी नितीन चव्हाण यांची दीड महिन्याची मुलगी लावण्या हिला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे कुटुंबीयांनी मुलीला तत्काळ उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. रात्रीची वेळ आणि मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे नदी ओलांडणे अशक्य होते.
अशा स्थितीत कुटुंबीयांनी जंगलाच्या वाटेवरून वाडा तालुक्यातील टोपलेपाडा गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच चिमुकलीचा हालचाल बंद झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची शंका कुटुंबियांच्या मनात उपस्थित झाली. त्यामुळे ते बाळाला घेऊन रात्री पुन्हा घराकडे परतले.
शेवटचा प्रयत्न म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी नदीचा पूर ओसरल्यावर बंधाऱ्यावरून फळीच्या साहाय्याने नदी ओलांडून मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला घेऊन गेले असता रात्री उशिरा मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
माझ्यावर आलेली वेळ कुणावर येऊ नये यामुळे शासनाने लक्ष देऊन येथे उपाययोजना करावी, अशी मागणी मृत बाळाचे वडील नितीन चव्हाण यांनी केली आहे.
अशा प्रकारे चार वर्षांत 8 जणांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
येथील मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निशिगंध टोपले यांच्याशीही बीबीसीने चर्चा केली.
म्हसेपाडा गावाला आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांबाबत डॉ. टोपले यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, “मलवाडा आणि गारगाव केंद्रांची मिळून दोन आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. मलवाडा केंद्राचं आरोग्य पथक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस, तर गारगावचं पथक मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस भेट देऊन गावातील आरोग्य तपासणी करेल.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)