You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युरिन इन्फेक्शन म्हणजे काय? युरिन इन्फेक्शन झालं हे कसं ओळखायचं?
- Author, क्रिस्टिन रो
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मेलिसा वैरिमू ही नैरोबीत व्हीडिओ एडिटर आहे. तिला वयाच्या 21 व्या वर्षी युरिन इन्फेक्शन म्हणजे मूत्रसंसर्ग व्हायला सुरुवात झाली. तिला वारंवार लघवीला जावं लागायचं, जेव्हा ती जायची तेव्हा जळजळ व्हायची, तिच्या पाठीत वेदना व्हायच्या.
युरिन कल्चर टेस्ट केली तेव्हा तिला मूत्रसंसर्ग (Urinary Tract Infection) झाल्याचं निदान झालं. “असं काही असतं याची मला तेव्हापर्यंत कल्पनाही नव्हती.” ती सांगते.
तिला सात दिवसांसाठी अँटिबायोटिक्स देण्यात आले आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र तिला लक्षणं जाणवतच राहिली. कधीकधी फार तीव्र व्हायची. आता तिला पाठीत आणि पोटात वेदना व्हायच्या. तिला सतत थकल्यासारखं व्हायचं. तरी तिला पडूनही बरं वाटायचं नाही.
“जेव्हा लघवीला जायचे तेव्हा काहीतरी टोचल्यासारखं वाटायचं.” ती सांगते. त्यामुळे ती सतत जागी असायचीय. त्यामुळे तिचा थकवा आणखीच तीव्र झाला. या सगळ्याचा तिच्या कामावरही परिणाम व्हायला सुरुवात झाली.
वैरिमूच्या मते डॉक्टरांनी तिचं ऐकलं नाही. डॉक्टरांनी तिला सांगितलं की सेक्स केल्यामुळे असं झालं असेल. मात्र ती तेव्हा सेक्स करत नव्हती. बहुदा डॉक्टरांना तिला औषधं देण्याची घाई झाली होती. एकदा अँटिबायोटिक्समुळे तिला फिटसुद्धा आली होती.
वैरिमूला तिच्यावर उपचार करणाऱ्या सर्व सहा डॉक्टरांबद्दल सहानुभूती आहे. त्यांना मूत्रसंसर्गावर कोणतेच नीट उपचार माहिती नव्हते. त्यामुळे तिने स्वत:च तिच्या लक्षणांबद्दल माहिती शोधायला सुरुवात केली. तिच्यासारखीच लक्षणं असलेल्या लोकांना तिने शोधलं. यातून तिला Live UTI Free या गटाबद्दल माहिती मिळाली. आता ती तिथे काम करते.
वैरिमूने तिच्या आहारात बदल केला आणि या आजाराला बाजूला ठेवण्यासाठी तिने बरेच उपाय केले. आता चार वर्षानंतरही तिला त्रास होतोच . पण ती आता तिच्या लक्षणाचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन करू शकते.
ती अनेक डॉक्टरांकडे गेली तरी तिला कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. तिला अल्पकाळासाठी उपचार दिले. वैरिमू आणि तिच्यासारख्या लोकांना गुंतागुंतीचा संसर्ग होतोय आणि त्यांना मिळणाऱ्या उपचारांचा काहीही फायदा होत नाहीये. अमेरिकेतच अशा 250,000 केसेस आहेत.
अनेक रुग्ण, डॉक्टर, संशोधक याच कारणामुळे वैतागलेले असतात. तरीही ही परिस्थिती कधीतरी बदलेल अशी त्यांना आशा आहे.
कमी समज
मूत्रसंसर्गाच्या लक्षणांमध्ये लघवी करताना जळजळ, लघवीला जाण्याची तीव्र भावना, लघवीत रक्त, मळकट रंगांची लघवी, दुर्गंधीयुक्त लघवी, पाठ आणि कंबरदुखी, ताप, हुडहुडी भरणं अशा लक्षणांचा समावेश होतो.
E.coli या बॅक्टेरियामुळे बहुतांशवेळा मूत्रसंसर्ग होतो. याशिवायसुद्धा अनेक बॅक्टेरियामुळे हा संसर्ग होतो. पण त्यावर जास्त संशोधन झालेलं नाही. तसंच E.Coli च्या दुर्मिळ प्रजातींवरसुद्धा संशोधन झालेलं नाही असं जेनिफर रॉन म्हणाले. ते युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मध्ये प्राध्यापक आहेतक.
मूत्रसंसर्गामुळे स्त्रियांमध्ये Cystitis हा रोग होतो. त्यात मूत्राशयाची जळजळ होते असं तज्ज्ञ सांगतात. मूत्रसंसर्गाचे अनेक प्रकार आहे पण जळजळ हा सामान्यत: आढळणारा प्रकार आहे.
मूत्रसंसर्ग स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. अर्ध्याअधिक स्त्रियांना एकदातरी संसर्ग होतो. तरुणपणी स्त्रियांना हा आजार मोठ्या प्रमाणात होतो. नियमित शरीरसंबंध ठेवणाऱ्या आणि आणि रजोनिवृतीनंतर स्त्रियांना हा आजार मोठ्या प्रमाणावर होतो. जेनेटिक्स, हॉर्मोन आणि शरीररचना यांचा एकत्रितपणे मेळ जुळून येतो. स्त्रियांचा मूत्रमार्ग पुरुषांपेक्षा छोटा असतो. त्यामुळे बॅक्टेरिया तिथे सहज जाऊ शकतात. मूत्रसंसर्ग हा संसर्गजन्य रोग नाही. मात्र सेक्स करताना जीवाणू एकाककडून दुसऱ्याकडे जाऊ शकतात.
पुरुषांना उतारवयात या संसर्गाचा त्रास जास्त प्रमाणात होतो. वृद्धाश्रमात मूत्रसंसर्ग अगदी नियमितपणे होणारा संसर्ग आहे. जागतिक पातळीवर बोलायचं झालं तर 15 कोटी लोकांना जगभरात याचा त्रास होतो. आता पुढे पुढे जसं लोकांचं वय होईल तसातसा आजार आणखी वाढत जाईल. याच संसर्गामुळे अनेक म्हातारी माणसं रुग्णालयात दाखल होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
मूत्रसंसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात आढळतो त्यामुळे डॉक्टर ती एक नेहमीची बाब म्हणून सोडून देतात. म्हणून या आजाराची तीव्रता आणखी वाढली आहे. एका अंदाजानुसार वैरिमूसारख्या 25 टक्के लोकांना एकदा तरी किंवा वारंवार हा संसर्ग होतो. सहा महिन्यात दोनदा किंवा वर्षातून तीनदा हा संसर्ग होतो. काहींना आणखी होतो.
वारंवार होणाऱ्या संसर्गाबरोबर सातत्याने होणाऱ्या संसर्गाबाबतही आता जागरुकता वाढायला लागली आहे. त्याला Long term किंवा Embedded UTI असं म्हणतात. काही लोकांना सतत लक्षणं आठवतात. तरीही या स्थितीबद्दल फारसं लक्ष दिलं जात नाही.
बरेचदा अगदी स्पष्ट लक्षणं दिसत असतानाही मूत्रसंसर्गाचे अनेक प्रकार दिसत नाही. मूत्रसंसर्गाचं निदान करण्यासाठी Dipstick testing चा वापर करतात. तसंच लघवी करताना मधल्या युरिनचं परीक्षण करतात. मात्र त्या तितक्याशा विश्वासार्ह नाहीत. त्याचवेळी नवीन पद्धतीच्या Molecular Tests खूप नाजूक असतात. म्हणजे एखादा जीवाणू नसेल तरी तो तिथे आढळतो. या चाचण्या महाग असतात.
तज्ज्ञांच्या मते मूत्रचाचणी अतिशय स्वस्त असते. अगदी चिप्सच्या पाकिटाची जितकी किंमत असते तितकीच याची किंमत असते. मूत्रसंसर्ग शोधण्यासाठी 1950 मध्ये कल्चर टेस्ट आणण्यात आली. ही टेस्ट एका गरोदर स्त्रीवर करण्यात आली होती. तिला किडनीशी निगडीत संसर्ग झाला होता. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर वेगळ्या भागासाठी असणारी ही चाचणी वेगळ्याच भागासाठी वापरली जाते.
“जर तुम्ही कल्चरच्या मदतीने रोगाचं निदान करत असाल तर तुम्हाला अर्ध्याअधिक संसर्गाचे प्रकार कळणारच नाहीत,” तज्ज्ञ सांगतात.
चाचण्यांचा विचार केला तर मूत्रसंसर्गाबद्दलच्या चाचण्यांचं ज्ञान अद्यापही अतिशय कमी आहे. मूत्राशय निर्जंतुक असतं असं डॉक्टरांना शिकवलं जातं. मात्र या संकल्पनेमुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे. मूत्र किंवा युरिन निर्जंतुक नाही असं सांगतात.
संशोधकांना चाचण्या पुरेशा नाही याची कल्पना नाही तरीही प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग झालेला नाही असं कॅरलिन अँड्रू म्हणाल्या. त्या मूत्रसंसर्गाबद्दल अधिकाधिक जागरुकता पसरवत आहेत. इतर अनेक लोकांसारखा अँड्र्यू यांना संसर्ग झाला आणि बराच काळ त्याचं नीट निदान झालेलं नाही. एकदा त्या प्रवासाला जात असताना त्यांना लघवीची तीव्र भावना झाली. तरीही त्यांना कुठेही योग्य जागा मिळाली नाही. त्यांना मग जळजळ झाली. नंतर “मी पंधरा मिनिटं लघवी करत होते.” त्यांची संसर्गचाचणी निगेटिव्ह आली. त्यांना Interstitial Cystitis चं निदान झालं. या रोगासाठीचे उपचार अतिशय वेदनादायी होते आणि त्यामुळे गोष्टी आणखीच बिकट झाली.
जेव्हा त्यांनी पुढच्या वर्षी तज्ज्ञांना दाखवलं तेव्हा त्यांनी योग्य उपचार मिळाले. “चला कोणीतरी माझं ऐकलं.” हा संसर्ग जाण्यासाठी त्यांना चार वर्षं लागले.
चाचण्यांपेक्षा लक्षणांवर आधारित उपचार त्यांना मिळाले असते तर अधिक फायदा मिळाला असता असं त्यांन वाटतं. तज्ज्ञांच्या मते एकदा संसर्ग झाला की पुढच्यावेळी लक्षणांवरून त्या रुग्णाला कळतंच. “आपण स्त्रियांची लक्षणं जास्त गांभीर्याने घ्यायला हवी” असं तज्ज्ञ म्हणतात.
दुर्लक्ष आणि कलंक
तज्ज्ञांच्या मूत्रसंसर्ग हा स्त्रियांचा रोग आहे असा समज आसपास पसरला आहे. असं तज्ज्ञ म्हणतात.
“अजूनही हा एक लाजिरवाणा प्रकार असल्याचं मानण्यात येतं.” अँड्र्यू म्हणतात. काही समाजात मूत्रसंसर्ग होणं हे अप्रस्तुत मानलं जातं. काही जणांना तर लक्षणं सांगतानाही लाज वाटते. वैरिमूच्या मते आफ्रिकन देशात अजूनही या आजाराबद्दल फारसं बोललं जात नाही.
काही लोकांच्या संसर्गाचं निदान योग्य पद्धतीने न झाल्याचाही अनुभव आला आहे. काहींना ओरडा खावा लागला आहे. काहींना असं सांगितलं जातं की सगळी लक्षणं त्यांच्या डोक्यात आहे. काहींवर डॉक्टर ओरडले सुद्धा आहेत.
काही तज्ज्ञांच्या मते हा फारसा गंभीर आजारच नाही. कारण मूत्रसंसर्ग जीवघेणा नसतो. त्याच्याकडे इतर रोगांसारखं लक्ष दिलं जात नाही. मात्र संसर्ग गंभीर झाला तर किडनी खराब होऊन मृत्यू होऊ शकतो. “जर संसर्गावर योग्य उपचार केले नाहीत तर लोकांना त्याचं गांभीर्य कळणार नाही.” तज्ज्ञ म्हणतात.
हा संसर्ग फक्त गंभीरच नसतो तर त्याचा परिणाम वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही होतो. अँड्र्यू यांच्यावर उपचार करण्याआधी त्यांना सतत वेदना सहन करत रहावं लागलं. काही लोकांना तर इतका त्रास होतो की मूत्राशयच काढून टाका अशी मागणी त्यांनी केली.
प्रौढ व्यक्तींमध्येच या संसर्गाच्या केसेस इतक्या आव्हानात्मक असतात, जेव्हा लहान मुलांवर उपचार केले जातात तेव्हा अडचणी जास्त असतात. उदा. लहान मुलांमध्ये लक्षणं आणखी किचकट असतात. त्यामुळे ज्या सँपलमध्ये जीवाणू आढळत नाही ती जास्त आव्हानात्मक असतात. अगदी तीन वर्षांच्या मुलामध्येसुद्धा संसर्ग झालेला दिसतो.
औषधोपचार
ज्यांच्या संसर्गाचं योग्य पद्धतीने निदान झालं आहे, त्यावरचे उपचार अनेक प्रकारचे होऊ शकतात. केनियामध्ये वैरूमूला भारंभार अँटिबायोटिक्स दिले होते. युकेमध्ये स्त्रियांना तीन दिवसांचा कोर्स देतात. पुरुषांमध्ये होणारा संसर्गच गुंतागुंतीचा असल्याने त्यांना सात दिवसांचा कोर्स दिला जातो. हा भेदगभाव काही लोकांसाठी तापदायक आहे.
रॉन यांच्यामते तीन दिवस हा स्टँडर्ड पिरेड आहे. काही महिलांसाठी तितकंही पुरेसं नसतं. जीवाणूंकडून होणारा प्रतिरोध म्हणजे Antimicrobial resistance हाही एक महत्त्वाचा विषय आहे.
मूत्रसंसर्गाचं योग्य निदान होण्यासाठी उपचारपद्धतीत सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. अँटिबायोटिकाचा परिणाम टिकवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या औषधांमध्येच संशोधन केलं जात आहे.
अँटिबायोटिक्सला पर्याय शोधणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरत आहे. काही स्त्रियांना योनीमार्गावाटे इस्ट्रोजेन देण्याच्या उपचारपद्धतीवरही संशोधन केलं जात आहे.
मूत्रसंसर्गासाठी काही लशींवर युकेमध्ये संशोधन सुरू आहे.
त्याचवेळी मूत्रविकारांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जेणेकरून लाखो बायकांना या त्रासापासून लवकरात लवकर सुटका मिळेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)