You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युरिन इन्फेक्शन थांबवण्यासाठी 5 उपाय
तुम्ही महिला असाल तर गेल्या वर्षभरात एकदातरी याचा त्रास झाला असेलच. किंवा तुम्ही पुरुष असाल तर तुमची पत्नी, मैत्रिण, मुलगी, बहिण, आई यांच्यापैकी कोणालातरी याचा त्रास झाला असेलच.
युरिन इन्फेक्शन म्हणजे मूत्रसंसर्गाच्या त्रासाने विव्हळणारे रुग्ण प्रत्येकाने पाहिले असतील. 30 टक्के महिलांना याचा पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागतो.
जर आकडेवारी पाहिली तर हा त्रास महिलांना जास्त होत असल्याचं दिसतं. प्रत्येक तीन महिलांमध्ये एकीला याचा त्रास वयाच्या 21 व्या वर्षीच सुरू झाल्याचं दिसून येतं.
मूत्राशय किंवा मूत्रनलिका किंवा या दोन्हींना संसर्ग होणं अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे. यात वेदनाही होतात.
यामुळे मूत्रपिंडात (किडनीत) गुंतागुंत तयार होऊ शकते. परंतु मूत्रसंसर्ग रोखता येईल का? तर याचं उत्तर हो असं आहे. बॅक्टेरियापासून दूर राहाण्यासाठी कोणते 5 उपाय करता येतील ते येथे पाहू.
1. स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर जननेंद्रिय असे स्वच्छ करा..
मलमूत्रामध्ये आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त प्रमाणात जंतू असतात.
डॉ. फर्नांडो सिमाल या स्पॅनिश सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजिस्टच्या तज्ज्ञ सांगतात, अनेक महिला लघुशंकेनंतर मागून पुढच्या दिशेने स्वच्छता करतात पण पुढून सुरू करुन मागच्या दिशेने स्वच्छ करा असा आम्ही सल्ला देतो.
2. भरपूर पाणी प्या आणि लघुशंकेच्यावेळेस मूत्राशय पूर्ण रिकामे होऊ द्या
भरपूर पाणी प्या असं सांगितलं जातं पण ते कोणीही फारसं पाळलेलं दिसत नाही. आपण जितकं पाणी पिऊ तितकं लघवीला जायला लागून शरीरातले जंतू बाहेर जातील असं सिमाल सांगतात.
परंतु लघवीची भावना झाल्यावर तुम्ही बाथरुममध्ये गेलंच पाहिजे. भरलेल्या मूत्रपिंडासह बसून राहाणं योग्य नाही असंही त्या बजावतात.
3. सेक्सनंतर तात्काळ लघवी करणे
हे खरंय का? हो खरंय. जरी तुम्हाला तसं आवडत नसलं तरी महिलांनी सेक्सनंतर लघवी करायला जावं असं सुचवलं गेलं आहे.
संभोग आणि मूत्रनलिकेत संसर्ग होणं यांचा सहसबंध आहे तसेच जंतू एकीकडून दुसरीकडे जातात यामुळे लघवी करायला जावं असं सुचवलं जातं.
4. स्वच्छता राखा पण मंत्रचळ नको
स्वच्छतेला अनन्यसाधाराण महत्त्व आहे पण मंत्रचळ लागल्यासारखं वागू नका.
अतिरेकी स्वच्छतेमुळे जंतूंचा बॅलन्स बिघडतो.
5) बेरी फळं
बेरीवर्गातली क्रॅनबेरीसारखी फळं खायला सांगितलं जातं. सिमाल सांगतात, क्रॅनबेरीसारखी फळं मूत्राशयातले जंतू मारण्यास उपयोगी ठरतात
सिमाल सांगतात, काही लोकांच्या उपचारात अमेरिकन क्रॅनबेरीच्या कॅप्सुल्सचा समावेश केल्यानंतर त्यांच्यात सुधारणा झाल्याचं दिसून आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)