अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या वणव्यात 11 जणांचा मृत्यू, धगधगणाऱ्या आगीचं नेमकं कारण काय?

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पसरलेल्या वणव्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. लॉस एंजेलिस काऊंटीच्या मेडिकल एक्झामिनरनी या आकडेवारीला दुजोरा दिला आहे.

ही आग सध्या लॉस एंजेलिसमध्ये 14 हजार एकरच्या परिसरामध्ये पसरलेली आहे.

या दरम्यान, लवकरच पदावरुन पायउतार होणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अशी घोषणा केली आहे की, सरकार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पुढील सहा महिन्यांकरिता 'जीवन आणि मालमत्तेचं संरक्षण' करण्यासाठीचा सर्व खर्च उचलेल.

लॉस एंजेलिस काऊंटीचे मेडिकल एक्झामिनर यांनी सांगितलं आहे की, या आगीमुळे मृत्यू झालेल्यांची सध्या ओळख पटवली जात आहे.

त्यांनी एक निवेदन प्रसारित केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, "मृतांची ओळख पटवण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात. कारण, सध्या तरी भीषण आगीमुळे तसेच सुरक्षेच्या कारणास्तव ज्या ठिकाणी हे मृत्यू झाले आहेत, त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एक्झामिनर पोहचण्यास असमर्थ आहेत."

सोबतच, मृतांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

याआधी पॅलिसेड्समध्ये लागलेल्या आगीमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ईटनमध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातील जंगलांमध्ये पसरलेली आग भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे.

या आगीचं क्षेत्र सातत्यानं वाढतच चाललं आहे. आतापर्यंत कमीत कमी सहा जंगले या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला इटलीचा दौरा रद्द केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावरुन लवकरच पायउतार होणाऱ्या जो बायडन यांचा हा शेवटचा परराष्ट्र दौरा होता.

आगीचे तीव्र लोट आता अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या लॉस एंजेलिसमधील जवळपास सर्व परिसरामध्ये पसरले आहेत. या आगीमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 लाखाहून अधिक लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे.

जोरदार वाहणारं वारं आणि कोरड्या वातावरणामुळे मदत आणि बचाव कार्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत. बहुतांश ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं आहे.

या आगीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची ऑस्कर नामांकनांची घोषणादेखील दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहेत. यापूर्वी ही घोषणा 17 जानेवारी रोजी होणार होती, परंतु आता 19 जानेवारी रोजी अकादमी पुरस्कार नामांकनांबाबतची माहिती दिली जाईल.

भीषण आग

जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी सर्वांत आधी पॅसिफीक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर उत्तर-पश्चिम लॉस एंजेलिसमध्ये येतो.

मात्र, फक्त 10 एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच 2900 एकरच्या परिसरामध्ये पसरली. आता शहरभर आकाशात धुराचे लोट जमा झाले.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असूनही सद्यस्थितीत ही आग 14 हजार एकरमध्ये पसरलेली आहे. कॅलिफोर्नियाच्या इतिहासामध्ये ही आग आतापर्यंतची सर्वांत विनाशकारी आग मानली जात आहे.

लॉस एंजेलिस फायर डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी म्हटलं आहे की, या भीषण आगीमुळे इथे राहणारा जवळपास प्रत्येक रहिवासी धोक्यात आहे.

आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलाला अतिरिक्त उपकरणं उपलब्ध करून देण्याच्या सूचना राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन लष्कराला दिल्या आहेत.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, "या आगीला सामोरं जाण्याकरिता आम्ही काहीही करण्यासाठी तयार आहोत. लोकांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल. मात्र, त्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल. आम्ही हे काम करत आहोत."

"आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलालाही आता पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. लोकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आग विझवण्यासाठी पाण्याचा अतिवापर करण्यात आल्यास लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो."

लॉस एंजेलिस काउंटीचे अग्निशमन प्रमुख अँथनी मारोन यांनीदेखील हे मान्य केलं आहे की, काउंटी आणि त्याचे 24 विभाग या प्रकारच्या भीषण आगीच्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी तयार नव्हते. त्यांची क्षमता केवळ एक किंवा दोन मोठ्या आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याइतपतच होती.

हॉलिवूडपर्यंत पोहोचली आग

ही आग आता कॅलिफोर्नियामधून हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. हॉलिवूडमधील अनेक फिल्म स्टार्सची घरेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नेस्तनाबूत झाली आहेत.

कॅलिफोर्निया फायर सर्व्हीसच्या एका बटालियनचे प्रमुख डेव्हीन अकुना यांनी बीबीसीच्या टुडे प्रोग्राममध्ये सांगितलं की, हॉलिवूड हिल्सपर्यंत आग अत्यंत तीव्र गतीनं पसरत आहे आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न जवळपास अपुरे पडत आहेत.

त्यांनी म्हटलं, "मंगळवारी (7 जानेवारी) सकाळपासूनच हवा 60 ते 100 मैल प्रति तास वेगाने वाहत होती. मात्र रात्री हवेचा वेग फारच वाढला होता. सध्या हवेचा वेग 30 मैल प्रति तासापर्यंत कमी झाला आहे. मात्र, तरीही चिंताजनक परिस्थिती आहे. कारण इथे असलेले अनेक भाग धोकादायक आहेत."

या आगीमध्ये बिली क्रिस्टल आणि पॅरिस हिल्टन या सेलिब्रिटींची घरे जळून खाक झाली आहेत.

अभिनेता बिली क्रिस्टल यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ते आणि त्यांची पत्नी हे दोघेही पॅसिफिक पॅलिसेड्समधील त्यांच्या घराचं नुकसान झाल्यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. 1995 पासून ते इथे राहत होते.

अभिनेते बिली क्रिस्टल हे ऑस्करच्या माजी होस्टपैकी एक आहेत.

आतापर्यंत या आगीमुळे 1 हजारहून अधिक इमारती जळून पूर्णपणे खाक झाल्या आहेत.

अभिनेते जेम्स वूड हे सीएनएनशी बोलताना अक्षरश: रडू लागले.

अमेरिकन बिझनेसवुमन पॅरिस हिल्टननंही मालिबू येथील घर आगीमुळे गमावल्याचं सांगितलं.

तिनं इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, "आपल्या कुटुंबासमवेत बसून बातम्या पाहत असताना मालिबूमधील स्वतःचं घर जमीनदोस्त होताना लाईव्ह टीव्हीवर पाहिलं. असं कुणासोबतही कधीही घडू नये. हे तेच घर आहे जिथे आमच्या अनेक मौल्यवान आठवणी तयार झाल्या. या आगीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करते."

बुधवारी (8 जानेवारी) अकादमी अवॉर्ड्सचे सीईओ बिल क्रॅमर यांनी एक निवेदन जाहीर केलं आहे. "संपूर्ण दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळं त्रस्त झालेल्या लोकांप्रती आम्ही आमच्या संवेदना व्यक्त करतो. आमचे अनेक सदस्य आणि इंडस्ट्रीमधील सहकारी लॉस एंजेलिसमध्येच राहतात आणि काम करतात. आम्ही तुमच्यासोबत आहोत."

कोनान ओ'ब्रायन 2025 चा ऑस्कर समारंभ होस्ट करणार आहेत. हा समारंभ 2 मार्च रोजी हॉलिवूड बुलीवर्डच्या डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.

लॉस एंजेलिसमधील जंगलं आगीने का धगधगत आहेत?

बीबीसीचे पर्यावरण प्रतिनिधी मॅट मॅकग्राथ यांनी एका रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, जोरदार वाहणारी हवा आणि पावसाचा अभाव या दोन मुख्य कारणांमुळे दक्षिण कॅलिफोर्निया आगीच्या विळख्यात सापडलं आहे.

मात्र, हवामान बदल हा घटकदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावताना दिसत आहे. त्यामुळेच, या प्रकारच्या भीषण आगी लागण्याची शक्यता वाढत आहे.

या रिपोर्टमध्ये मॅट मॅकग्राथ यांनी सांगितलंय की, कॅलिफोर्नियामधील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कारण अलीकडच्या काही महिन्यांत इथे पाऊस पडलेला नाही. त्यानंतर हवामानही उष्ण राहिलेलं आहे.

या हंगामात सामान्यतः दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जोरदार वारे वाहतात. त्याला सांता ऐना विंड्स म्हणतात. परंतु कोरड्या परिस्थितीसह, यामुळे भीषण आग लागण्याचा धोका अधिक वाढतो.

हे कोरडे वारे दक्षिण कॅलिफोर्नियाच्या आतील भागातून किनाऱ्याकडे 60 ते 70 मैल प्रति तास (100-110 किलोमीटर प्रति तास) वेगाने वाहतात. मात्र, एका दशकानंतरही या महिन्यात वारे अत्यंत धोकादायक पातळीवर वाहत आहेत.

या वाऱ्यामुळे जमीन कोरडी पडली आहे. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, या आगीच्या सुरुवातीला जोरदार वारे वाहतील आणि शेवटी कोरडे वारे वाहतील. म्हणजेच ही आग आणखी काही काळ सुरू राहू शकते.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीची व्याप्तीही पसरत आहे. यापूर्वी जेव्हा आगीच्या घटना घडल्या होत्या, तेव्हा त्यापैकी बहुतांश घटना डोंगराळ भागात होत्या. मात्र, यावेळी ही आग झपाट्याने खाली दरीकडे आणि वस्तीच्या दिशेने पसरत आहे.

दोन वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेला दशकभराचा दुष्काळ संपला आहे. यानंतर पावसामुळे झाडे-झुडपे झपाट्यानं वाढली आहेत. आग वेगानं पसरण्याचं हेदेखील एक प्रमुख कारण आहे.

हवामान संशोधक डॅनियल स्वेन यांनी सोशल मीडियावरील आपल्या एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, "रहिवासी भागात आग लागण्याची शक्यता जास्त आहे. या भागात वीज पूर्णपणे बंद करणं देखील कठीण आहे. जिथं आग फारच सामान्य गोष्ट आहे, तिथल्या लोकांना अशाप्रकारे वीजपुरवठा बंद होण्याची सवय आहे. तिथे याबाबतची तयारी झालेली असते. मात्र, यावेळी मोठी आव्हानं समोर आहेत.

कॅलिफोर्नियातल्या आगीशी ग्लोबल वॉर्मिंगचा काय संबंध?

2024 हे आजवर नोंदवलं गेलेलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. 1850 मध्ये रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून गेल्या पावणे दोनशे वर्षांमधलं हे सर्वात उष्ण आहे. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या उपक्रमानं ही माहिती जाहीर केली आहे.

तसंच औद्योगिक क्रांतीपूर्वी जागतिक सरासरी तापमान जेवढं होतं त्यापेक्षा 1.5 अंश सेल्सियसनं जास्त तापमान नोंदवणारं हे पहिलंच वर्ष ठरलं आहे.

पॅरिस करारानुसार जगाचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा 2 अंशांपेक्षा खाली ठेवायचं आणि ही वाढ 1.5 अंशांवर जाऊ द्यायची नाही, असं सर्व देशांनी एकत्र येऊन ठरवलं होतं. 1.5 अंशांची ती मर्यादा आता पहिल्यांदा मोडली गेली आहे.

याचं प्रतिबिंब कॅलिफोर्नियात दिसून आलं. तिथे गेल्या वर्षी उन्हाळा अतिशय उष्ण होता. पावसानं दडी मारल्यानं वातावरण शुष्क आणि पाण्याची कमतरता अशी स्थिती निर्माण झाली. त्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वाऱ्यांमुळे वणवे पेटण्यास आणि ते पसरण्यास पोषक स्थिती निर्माण झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)