AI ची लहान बाळाशी का होते तुलना? सुपर AI आलं तर त्याला माणसासारख्या भावना असतील?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द सध्या सतत कानावर पडत असतो. चॅट जीपीटी, नॅनो बनाना, सिरी, अलेक्सा हे शब्दही ऐकले असतील.
या टेक्नॉलॉजीचा रोजच्या आयुष्यात कसा प्रभाव पडतोय, नोकऱ्यांवर कसा परिणाम होतोय, जगात कसे वेगवेगळे प्रयोग होतायत हे सगळं कानावर येत असताना, हे सगळं काय चाललंय, AI ची संकल्पना काय आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हे असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे कम्प्युटर्सना प्रचंड मोठा डेटा प्रोसेस करता येतो, त्याचा अभ्यास, पृथ्थकरण करता येतं.
त्यात काही पॅटर्न्स आहेत का ते शोधता येतं आणि या माहितीचं काय करायचं याबद्दल तुम्ही दिलेली सूचना कॉम्प्युटर पाळू शकतो.
म्हणजे एकप्रकारे हा माणसाने तयार केलेला एक स्मार्ट मदतनीस आहे. मशीन किंवा कम्प्युटर, जो विचार केल्यासारखा वागू शकतो, शिकू शकतो आणि प्रश्नं सोडवू शकतो.
पण आपल्याला माहिती आहे की, कॉम्प्युटर्स विचार करू शकत नाहीत, त्यांना भावना नाहीत आणि योग्य-अयोग्य ठरवू शकत नाहीत.
पण तंत्रज्ञांनी आता अशा सिस्टिम्स विकसित केल्या आहेत ज्यासाठी एरवी मानवी मेंदूचा वापर करावा लागला असता.
या सिस्टीम्स मानवी मेंदू कसा वागेल त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात, पण त्यांचा वेग भन्नाट असतो.
हे एआय किती जुनं आहे?
ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा पुष्कळ जुनं आहे. जॉन मॅकार्थी हे अमेरिकन कम्प्युटर सायंटिस्ट होते आणि त्यांनी 1955 मध्ये 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' ही संज्ञा वापरली आणि 1956 साली डार्टमथ कॉलेजमध्ये एआय रिसर्च कॉन्फरन्सचं आयोजनही केलं होतं.
अॅलन ट्युरिंग यांचं 1950 च्या दशकातलं कम्पुटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स हे संशोधन आणि मशीन किती हुशार आहे हे जोखणारी ट्युरिंग टेस्ट हा AIचा पाया होता.

फोटो स्रोत, Getty Images
आर्टिफिशिअल न्युरल नेटवर्कच्या संकल्पनेत एआयची पाळंमुळं आहेत.
एआयचे गॉडफादर म्हटले जाणारे जेफ्री हिंटन 77 वर्षांचे आहेत, 2024 चं भौतिकशास्त्राचं नोबेल त्यांना मिळालंय.
गेली 50 वर्षं त्यांनी डिप लर्निंग, न्युरल नेटवर्क्सबद्दल केलेल्या संशोधनावरच पुढे चॅटजीपीटी, गुगल जेमिनी विकसित करण्यात आलंय.
जेफ्री हिंटन आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर इथे पहा.
पण मग एआय शिकतं कसं?
तर आपण लहान बाळांना एखादी नवीन गोष्ट जशी शिकवतो, जवळपास तसंच. म्हणजे हा भू-भू आहे आणि ही माऊ आहे असं आपण बाळाला फोटो किंवा हे प्राणी दाखवून सांगतो. म्हणजे भू-भू आणि माऊ हा डेटा आहे आणि या दोन प्राण्यांमध्ये काय फरक आहे हे आपण बाळाला सांगतो.
असाच मोठ्या प्रमाणातला डेटा म्हणजे माहिती आणि उदाहरणं देऊन एआयला शिकवलं जातं. याला म्हणतात मशीन लर्निंग. जिथे कम्प्युटर्सना डेटा दिला जातो. तो काय आहे हे कधीकधी सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
अल्गोरिदमच्या मदतीनं त्या डेटामधले पॅटर्न्स शोधायला शिकवलं जातं. म्हणजे पुढच्या वेळी अशा माहिती समोर आल्यानंतर ही AI प्रणाली शिकलेल्या गोष्टींचा वापर करून नवीन डेटाचं विश्लेषण करू शकते, अर्थ लावू शकते.
वर आपण एक शब्द वापरला न्यूरल नेटवर्क. हे आहे मानवी मेंदूच्या धर्तीवर उभारण्यात आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल.

फोटो स्रोत, Getty Images
हे असतं न्यूरॉन्सचं एक जाळं जे प्रश्न कसे सोडवायचे हे सतत शिकत असतं.
ज्यावेळी योग्य उत्तर सापडतं, तेव्हा त्याची नोंद केली जाते. ज्यावेळी योग्य मार्ग सापडत नाही, तेव्हा कनेक्शन्स बदलतात आणि नवीन मार्ग शोधला जातो.
अशा प्रकारे हे न्यूरल नेटवर्क चुकांमधून सतत सुधारणा करत राहतं.
मग चॅटबॉट्स काय आहेत?
चॅटबॉट्स हे बोलणाऱ्या पोपटासारखे आहेत. जसे काही पोपट कानावर पडलेली वाक्यं जशीच्या बोलून दाखवतात, तसे चॅटबॉट्स पूर्वीच्या डेटामधून मिळालेली माहिती तुमच्या प्रश्नांनुसार तुमच्या समोर आणून ठेवतात किंवा तुम्हाला बोलून दाखवतात.
चॅटबॉट या शब्दाचा अर्थ होतो प्रोग्राम वापरणाऱ्या व्यक्तीशी मानवी संवादाप्रमाणे संभाषण करणारा कम्प्युटर प्रोग्राम.

फोटो स्रोत, Getty Images
जेमिनी, चॅटजीपीटी हे चॅटबॉट्स आहेत. तुम्ही तुमच्या फोनमधला सिरी-अलेक्साशी बोलत असाल, तर त्या देखील प्रगत चॅटबॉट्स आहेत.
पण मग या बॉट्सना लिहीता कसं येतं? AI च्या या प्रकाराला म्हटलं जातं लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs). या AIला भरपूर मजकूर देऊन शिकवलं जातं.
शब्द, वाक्यं, संज्ञा, व्याकरण अशा गोष्टी या ट्रेनिंग डेटामध्ये असतात. म्हणूनच या बॉटला तुमचा प्रश्न वाचून त्याचं उत्तर लेखी देता येतं.
AI चे प्रकार कोणते आहेत?
तर AIच्या क्षमतेनुसार त्याचे प्रकार पडतात.
नॅरो AI म्हणजे एखादं विशिष्ट प्रकारचं काम करण्यासाठी तयार करण्यात आलेलं मॉडेल.
एआयचा हाच प्रकार सध्या अस्तित्वात आहे. बाकी प्रकार कागदावर किंवा संशोधन टप्प्यात आहेत.
या नॅरो एआयमध्ये काय काय येतं, तर गॅरी कॅस्परॉव्हना बुद्धीबळात हरवणारा डिप ब्लू सुपरकम्प्युटर AI होता.
नेटफ्लिक्सवर तुम्हाला रेकमेंडशन्स नॅरो एआयच देतं. चॅट जीपीटी, जेमिनी, सिरी, अलेक्सा सगळे याच प्रकारात येतात. अगदी चालकविरहित कारसुद्धा.

फोटो स्रोत, Getty Images
जनरल AI आणि स्ट्राँग AI सध्या ही एक संकल्पना आहे. आधी शिकलेल्या गोष्टी आणि कौशल्यं वापरून भविष्यात माणसाची गरज न लागता काही नवीन कामं पूर्ण करता येणारं एआय मॉडेल तयार करण्याचा हा प्रयत्न आहे.
सुपर AI ही पण एक संकल्पना आहे.
अतिबुद्धिमान AI जर ही कल्पना प्रत्यक्षात आली तर एआयचं हे मॉडेल विचार करू शकेल शिवाय कारणमीमांसा करणं, शिकणं, निर्णय घेणं हे सगळं त्याला जमेल.
कदाचित या टप्प्यावर AI भावना समजतील आणि असतील तसेच गोष्टी अनुभवताही येतील आणि स्वतःच्या गरजा आणि धारणाही असतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












