कोंबडीनं दिलं निळ्या रंगाचं अंडं, काय आहे रहस्य? डॉक्टर करत आहेत तपासणी

फोटो स्रोत, Syed Noor
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बेंगळुरूहून, बीबीसी हिंदीसाठी
ज्याप्रमाणे एखाद्या घरातील सदस्य बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे कर्नाटकातील एका गावात पशुवैद्यकीय डॉक्टरांची एक टीम कोंबडी अंडी घालण्याची वाट पाहत बसलेली असते.
पशुवैद्यकीय डॉक्टरांची एक टीम कोंबडी अंडं घालण्याची वाट पाहत बसलेले आहेत, हे ऐकायला थोडं विचित्र नक्कीच वाटेल. पण ही कोंबडी देखील साधीसुधी नाही.
या कोंबडीनं चक्क 'निळं अंडं' दिल्यानं तिच्या मालकालाही आश्चर्याचा धक्का बसला होता. होय. हे थोडं विचित्र आहे, पण तिनं चक्क निळ्या रंगाचं अंडं दिलं.
बांधकाम उद्योगात काम करणारे सय्यद नूर यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "मी दोन वर्षांपूर्वी ते लहान पिल्लू असताना विकत घेतलं होतं. शनिवारी, या कोंबडीनं एक पांढरं अंडं दिलं, जसे की, ती गेल्या दोन वर्षांपासून दररोज असं अंडं देत आहे. सोमवारी, मात्र या कोंबडीनं एक निळं अंडं दिलं आहे."
पक्ष्याची एखादी जात निळी अंडी घालते का?
असील जातीच्या (आशियाई जातीच्या) सामान्य कोंबड्या सतत 10 दिवस अंडी घालतात. त्यानंतर, त्या सुमारे पंधरा दिवस अंडी घालत नाहीत.
मात्र, नूर यांचा असा दावा आहे की, त्यांची कोंबडी "गेल्या दोन वर्षांपासून दररोज एक अंडं घालत आहे."
या निळ्या रंगाच्या अंड्याची बातमी परिसरात पसरू लागली आणि त्यानंतर दावणगिरी जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातील नेल्लोर गावात सय्यद नूर यांच्या घरी ते अंडं पाहण्यासाठी अनेक लोक येऊ लागले.
मोहम्मद नदीम फिरोज हे बिदर जिल्ह्यातील कर्नाटक पशुवैद्यकीय, प्राणी आणि मत्स्यव्यवसाय विद्यापीठात कुक्कुटपालन विज्ञानाचे माजी प्राध्यापक आहेत.
त्यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे."

फोटो स्रोत, Syed Noor
त्यांचा यावर विश्वास न बसण्याचं प्रमुख कारण म्हणजे या अंड्याचा रंग नेहमीसारखा पांढरा किंवा तपकिरीही नाही. या अंड्याचा रंग काळाही नाही.
कारण, मध्य प्रदेशातील जंगलात आढळणाऱ्या कडकनाथ जातीच्या काळ्या कोंबड्या काळ्या रंगाचं अंडं घालतात.
प्राध्यापक नदीम फिरोज स्पष्ट करतात की, साधारणपणे कोंबड्यांच्या चार जाती असतात.
आशियाई जाती (जसे की भारतात लोकप्रिय असलेल्या असील जातीच्या कोंबड्या), इंग्रजी जाती (ज्यांना कॉर्निश म्हणतात), मध्य पूर्व जाती (ज्यांना लेयर्स म्हणतात, कारण या कोंबड्या पांढरी अंडी देतात) आणि अमेरिकन जाती. अशा चार प्रमुख जाती आहेत.
"मैनेसारखे सुमारे 10 ते 15 पक्षी निळ्या रंगाची अंडी देतात," असं दावणगिरी जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातील पशूसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. अशोक कुमार जीबी म्हणतात.
ते सांगतात, "पण हे निळं अंडं एक दुर्मिळच प्रकरण आहे. भारतात तर ते फारच असामान्य आहे."
डॉक्टरांकडून तपासणी सुरू
डॉ. अशोक यांनी याबाबत म्हटलं की, "या जातीची कोंबडी वर्षाला 100 ते 126 अंडी घालते. या कोंबड्या 10 दिवस सतत दररोज एक अंडं घालतात आणि पुढील पंधरा दिवस अंडी घालत नाहीत. त्यानंतर 15 दिवस दररोज एक अंडं घालतात."
"आम्ही या कोंबडीवर लक्ष ठेवत आहोत. त्याबाबतचा अहवाल आम्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवू.
शरीरातील यकृत बिलिव्हर्डिन नावाचे पित्त रंगद्रव्य स्रावित करते. त्याचा मोठ्या प्रमाणात स्राव होऊन ते अंड्याच्या कवचावर जमा झाले असेल," अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

फोटो स्रोत, Syed Noor
"पण निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा तपासणी करावी लागेल. तसंच त्यासाठी कोंबडीनं आपल्यासमोर अंडी घालणं गरजेचं आहे.
त्यानंतरच आपण एखाद्या बाबीवर शिक्कामोर्तब करू शकतो. तसंच रक्त आणि कवच चाचणीसाठी पाठवू शकतो. अंड्याचे कवच कशामुळं निळं झालं, हे शोधावं लागेल," संही त्यांनी सांगितलं.
डॉ. अशोक म्हणाले की, "आम्ही संबंधित डॉक्टरांना या कोंबडीवर निगराणी ठेवायला सांगितलं आहे. पण ती जेव्हा निळं अंडं देईल तेव्हाच आम्ही तपास करू शकू."
हे अंडं निळं का आहे? याचं उत्तर मिळेपर्यंत सय्यद नूर ते फ्रिजमध्येच ठेवणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











