राफेल नदाल : 'भित्र्या मांजरा'सारखा असलेला राफा कसा बनला टेनिसमधला जगज्जेता 'चित्ता'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जोनाथन जुरेज्को
- Role, बीबीसी स्पोर्ट
स्पेनमधल्या एका टेनिस कोर्टवर टोनी नदाल यांनी त्यांच्या तीनवर्षीय पुतण्याकडे एक बॉल फाटकावला आणि त्या बॉलला परत टोलवण्यासाठी त्या चिमुरड्याने घेतलेला स्टान्स बघूनच त्यांना कळलं होतं की पाणी काहीतरी वेगळं आहे.
स्पेनच्या मॅलोर्का बेटावरच्या मॅनकोर टेनिस क्लबमध्ये टोनी नदाल यांनी शेकडो लहान मुलांना टेनिसचं प्रशिक्षण दिलं होतं. स्वतः टोनी हे स्पेनमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमधले नामांकित खेळाडू राहिलेले होते.
टोनी नदाल यांनी बीबीसी स्पोर्टला सांगितलं की, "मी राफेलकडे बॉल टोलवला तेव्हा त्याने बॉल त्याच्यापर्यंत पोहोचण्याची वाट न बघतो तो त्या बॉलच्या दिशेने झेपावला."
टोनी पुढे सांगतात, "की जेव्हाही मी एखाद्या मुलाकडे बॉल टाकायचे तेव्हा ते बाळ आपल्या जागी उभं राहून बॉल जवळ येईल याची वाट पाहायचं, पण माझा पुतण्या वेगळा होता. तो आपल्या इवल्याशा पावलांनी बॉलकडे झेपावला ही माझ्यासाठी विशेष बाब होती."
टोनी नदाल यांचा अंदाज चुकला नाही आणि त्यानंतरच्या काळात टोनी नदाल यांनी एक माणूस आणि खेळाडू म्हणून घडवलेला राफेल नदाल हा टेनिसच्या सार्वकालीन इतिहासातला महान खेळाडू होऊन बसला.
38 वर्षांच्या राफेल नदालने त्याच्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्याचे प्रशिक्षक आणि काका असलेल्या टोनी नदाल यांचा विश्वास सार्थ ठरवला.

फोटो स्रोत, Getty Images
टेनिसच्या इतिहासात केवळ एकाच खेळाडूला नदालने जिंकलेल्या एकेरी ग्रँडस्लॅम स्पर्धांची बरोबरी करता आलेली आहे.
2020 साली फ्रेंच ओपन जिंकून राफेल नदालने रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली होती. मात्र त्यानंतरच्या वर्षी सर्बियाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन ओपन स्पर्धा जिंकून नदाल आणि फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली.
2022 साली नदालने ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन जिंकून या दोन्ही खेळाडूंना मागे टाकलं आणि त्यानंतरच्या वर्षात जोकोविचने नदालला मागे टाकून त्याच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा आकडा 24वर नेऊन पोहोचवला.
संपूर्ण टेनिस जगतात 'अंकल टोनी' म्हणून परिचित असणाऱ्या टोनी नदाल यांची नदालला साथ लाभली नसती तर, आज नदालने टेनिसमध्ये जे यश मिळवलं आहे, ते मिळवलं असतं का याबाबत अनेक लोक शंका व्यक्त करतात.


टोनी नदाल यांनी राफेलला घडवताना दिलेल्या कठोर प्रशिक्षणाच्या अनेक कहाण्या टेनिसमध्ये चर्चिल्या जातात. राफेल नदालच्या बहिणीने लहानपणीच्या राफेलबद्दल सांगताना म्हटलंय की राफेल लहानपणी एखाद्या 'भित्र्या मांजरासारखा' होता आणि टोनी नदाल यांनी दिलेल्या प्रशिक्षणाशिवाय या मांजराचं टेनिस कोर्टावरच्या 'धसमुसळ्या आणि आक्रमक चित्त्यामध्ये' रूपांतर होणं जवळपास अशक्यच होतं.
टेनिस खेळाडूंच्या मागच्या पिढीतला सगळ्यात आक्रमक आणि विजयाची कधीच न मिटणारी भूक असणारा खेळाडू म्हणून राफेल नदालला ओळखलं जातं.
मॅलोर्का बेटावरच्या मॅनाकोर टेनिस क्लब आणि रोलँड गॅरोस या दोन्ही जागांमध्ये फारसं साधर्म्य नाहीये.
मॅनकोर हे मॅलोर्का बेटावरचं एक पारंपरिक गाव आहे आणि त्या गावातला टेनिस क्लब देखील तसाच आहे. या क्लबमध्ये एक मध्यम आकाराचं क्लबहाऊस, काही क्ले कोर्ट्स (मातीचे टेनिस कोर्ट) आणि एक टुमदार रेस्टॉरंट देखील आहे.
राफेल नदालने जेव्हा या मॅनाकोर टेनिस क्लबमध्ये पहिलं पाऊल टाकलं त्यावेळी टोनी नदाल हे त्यांच्या वयाच्या तिशीत होते. आता ते 63 वर्षांचे आहेत.
टोनी नदाल यांच्याकडे टेनिस शिकायला आलेल्या एका मोठ्या बॅचमध्ये राफेल नदालसुद्धा होता. सुरुवातीच्या दिवसांमध्ये राफेलला इतर मुलांपेक्षा वेगळी वागणूक आणि कठोर प्रशिक्षण मिळत होतं, पण तो केवळ टोनी नदाल यांचा पुतण्या आहे म्हणून तसं होत नव्हतं.
लहानपणीच्या राफेलबद्दल सांगताना अंकल टोनी म्हणतात की त्यांच्या कठोर प्रशिक्षणामुळे लहानगा राफेल अनेकदा रागवायचा. टोनी म्हणतात की, "मला त्याची खूप काळजी होती आणि म्हणूनच माझ्या त्याच्याकडून खूप अपेक्षा देखील होत्या."
राफेल नदालच्या बालपणीची आठवण सांगताना त्याची आई अॅना मारिया म्हणतात की, दिवसभर कठोर सराव केल्यानंतर राफेल रडवेला होऊन घरी परतायचा पण त्याला नेमका कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय हे मात्र कधी सांगायचा नाही.
एकदा राफेलने त्याच्या आईला सांगितलं होतं की अंकल टोनी त्याला 'मम्माज बॉय'(आईचा लाडका) म्हणाले होते. त्यावरून अॅना मारिया यांना त्यांच्या दिराला जाब देखील विचारायचा होता. मात्र नदालने त्यांना तसं करू दिलं नाही, त्याला परिस्थिती चिघळवायची नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
अंकल टोनीबद्दल सांगताना नदाल म्हणाला होता की, ते अनेकदा त्याच्यावर ओरडायचे, त्यांची त्याला प्रचंड भीती वाटायची. जर एखाद्या दिवशी अंकल टोनी आणि राफेल असे दोघेच सराव करत असतील तर भीतीने राफेलच्या पोटात गोळा उठायचा.
सराव करता करता राफेलचं लक्ष भरकटलं तर अंकल टोनी त्याला पुन्हा कोर्टवर आणण्यासाठी बॉलने मारत असत.
सराव संपल्यानंतर टोनी नदाल राफेलला संपूर्ण कोर्टवर पसरलेले बॉल गोळा करायला आणि कोर्टवर जमा झालेली लाल धूळ झाडायला लावत असत. इतर मुलं सराव संपल्यानंतर घरी निघून जात आणि लहानगा राफेल मात्र ही सगळी कामं करत असायचा. एवढंच काय तर चुकून राफेल त्याची पाण्याची बाटली विसरून आला तर मॅलोर्काच्या तळपत्या उन्हात त्याला संपूर्ण दिवसभर पाणी न पिता सराव करावा लागे.
2011 साली नदालने त्याच्या आत्मचरित्रात उल्लेख केलेल्या या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्याचं सांगितलं. टोनी बीबीसी स्पोर्टला म्हणाले की, "माझा कष्टावर विश्वास आहे आणि हे कठोर परिश्रम करण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूंवर देखील माझा विश्वास आहे."
"मला यापेक्षा वेगळा जगण्याचा मार्ग समजतच नाही आणि माझ्या मते प्रत्येकाला स्वतःच या जगातलं स्थान ठाऊक असायलाच हवं. आणि म्हणूनच मला राफेल आवडतो, त्याला त्याचं स्थान नीट माहिती होतं."

फोटो स्रोत, Getty Images
राफेल नदालने वयाच्या 11व्या वर्षी स्पेनमध्ये झालेली अंडर-12 नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली आणि त्या विजयानंतर अंकल टोनी पुन्हा एकदा कठोर झाले. ही स्पर्धा जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या एका छोटेखानी पार्टीत टोनी नदाल यांनी यापूर्वी ती स्पर्धा जिंकलेल्या 25 जणांचा उल्लेख केला.
ही नावं मिळवण्यासाठी त्यांनी स्वतः पत्रकार असल्याचं भासवून स्पॅनिश टेनिस फेडरेशनला कॉल केला होता. ही नावं सांगितल्यानंतर त्या पार्टीत आलेल्या सगळ्यांचाच मूड खराब झाला होता.
राफेलला या विजेत्यांपैकी पाचच जणांची नावं माहिती होती. या पाच जणांनी पुढे जाऊन पूर्णवेळ टेनिस खेळलं होतं. टोनी नदाल यांनी ही नावं सांगितली कारण विजयाच्या आनंदात असणाऱ्या नदालला त्यांना ही आठवण करून द्यायची होती की त्याच्याकडेही मोठा टेनिस खेळाडू होण्याची तेवढीच कमी संधी आहे.
आणखीन एक असंच उदाहरण म्हणजे 14 वर्षांचा असताना नदाल दक्षिण आफ्रिकेत झालेली एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून परतला होता. पहिल्यांदाच एखादी टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी तो एवढा दूर गेला होता.
दक्षिण आफ्रिकेतले वेगळी संस्कृती, हत्ती, सिंह यासारख्या जंगली प्राणी बघून 14 वर्षांच्या नदालला त्यावेळी खूप आनंद झाला होता आणि त्यात तिथे झालेली स्पर्धा देखील त्याने जिंकली होती.
दक्षिण आफ्रिकेत विजयी होऊन परतल्यानंतर तो आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका पार्टीबद्दल नदालने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे. त्या पार्टीत त्याच्या स्वागतासाठी लावलेल्या एका बॅनरचा उल्लेख या पुस्तकात आहे. नदालचं अभिनंदन करण्यासाठी लावलेला तो बॅनर त्याने कधी बघितलाच नाही.
टोनी नदाल यांनी भिंतीवर लावलेला तो बॅनर काढून टाकला, पार्टी आयोजित केलेल्या नातेवाईकांना चांगलंच खडसावलं आणि नदालला त्या पार्टीला जाऊच दिलं नाही आणि त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता राफेलला सरावासाठी कोर्टवर येण्यास सांगितलं.
टोनी म्हणाले की, "मला त्यावेळी नदालला याची आठवण करून देणं गरजेचं होतं की त्याने त्या वयात मिळवलेलं यश हे त्याच्या भविष्यकाळातील प्रदीर्घ कारकिर्दीसाठी तितकंसं महत्त्वाचं नाहीये."
"मला त्याच्या अपेक्षा कमी करायच्या होत्या. त्याची भूक जिवंत ठेवायची होती. मला त्याला हे सांगायचं होतं की त्याच्या यशाची एक पहिली पायरी आहे आणि त्याला प्रगती करायची असेल तर कठोर परिश्रम करणं चालूच ठेवलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
राफेलचे वडील सेबॅस्टियन यांना अनेकदा असं वाटायचं की त्यांचा लहान भाऊ त्यांच्या मुलाकडून जास्तच मेहनत करून तर घेत नाहीये ना. त्यांच्या पत्नीला देखील याबाबत साशंकता होती.
नदालच्या निकटवर्तीयांना सोडून इतर लोक जेव्हा या पद्धतीकडे पाहतील किंवा त्याच मूल्यांकन करतील तेव्हा त्यांनाही ही मेहनत कदाचित अमानवी वाटू शकते. खेळातील सुधारित आणि आधुनिक सरावाच्या पद्धती माहिती असणाऱ्यांना देखील ती चुकीची वाटू शकते.
टोनी नदाल यांच्या मनात राफेलच्या भविष्याबाबत असणाऱ्या असुरक्षिततेचा उल्लेख राफेलच्या आत्मचरित्रात आहे. टोनी म्हणतात की, "त्यांना त्यांच्या पुतन्याकडून सर्वोत्तम यशाची अपेक्षा होती."
ते पुढे म्हणतात की, "मी त्याच्याकडून कष्ट करून घ्यायचो पण मी कठोर नव्हतो. मी दूरगामी परिणामांचा विचार करून ते करत होतो."
टोनी यांच्या मते कुटुंबातही याबाबत फारसे मतभेद नव्हते. सेबॅस्टियन आणि अॅना मारिया हेदेखील त्यांच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टोनी नदाल यांनी दिलेलं योगदान नाकारत नाहीत.
कदाचित यामुळेच राफेल 14 वर्षांचा असताना त्याला मिळालेली टेनिस स्कॉलरशिप त्यांनी नाकारली होती. कारण ती मिळवण्यासाठी त्याला बार्सिलोनाला जावं लागणार होतं.
जॉन कार्लीन या ब्रिटिश लेखकाने लिहिलेल्या 'राफा : माय स्टोरी' या पुस्तकात नदाल म्हणाला आहे की, "मला त्यावेळी घर सोडून जायचं नव्हतं आणि मी गेलो नाही याचा मला आनंद आहे."
"अंकल टोनी अनेकदा मला त्रासदायक वाटत असले तरी मला माहिती होतं की हे सगळं माझ्या भल्यासाठीच सुरु आहे. अनेकदा मला त्यांचा राग यायचा पण ते बरोबर होते."

फोटो स्रोत, Getty Images
मॅनकोर टेनिस क्लबच्या लोगोमध्ये एका आक्रमक बैलाची दोन शिंगं दाखवणाऱ्या दोन तळपणाऱ्या विजा आहेत. मात्र लहानपणापासूनच राफेलच्या मनात असणारी अंधाराची भीती ही त्याच्या कुटुंबीयांना मजेशीर गोष्ट वाटते. ते सांगतात की अजूनही राफेलला अंधार आवडत नाही, त्याला अजूनही लाईट सुरू ठेवून किंवा टीव्ही सुरु ठेवून झोपायची सवय आहे आणि बाहेर ढगांचा गडगडाट होत असताना तो अजूनही पांघरुणात लपून बसतो.
राफेल नदाल ज्या आक्रमक खेळासाठी, दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी आणि कधीही हार न मानण्याच्या प्रवृत्तीसाठी ओळखला जातो तो खेळ हा अंकल टोनी यांनीच घडवला आहे. त्याच्या या प्रतिमेसाठीसुद्धा तेच जबाबदार आहेत.
टोनी नदाल म्हणतात की, "त्याचा प्रशिक्षक म्हणून मला त्याचं व्यक्तिमत्व सुदृढ करायचं होतं. त्याच्या तांत्रिक बाबींवर काम करणं तेवढं अवघड नव्हतं."
राफेल नदालच्या तरुणपणी अंकल टोनी यांनी त्याला दिलेल्या कठोर प्रशिक्षणातच राफेलने जिंकलेल्या 22 ग्रँड स्लॅम, 36 मास्टर्स स्पर्धांचं गमक सापडतं. नदालने टेनिस कोर्टवर मिळवलेल्या प्रत्येक यशामागे त्या दोघांची कठोर मेहनत आहे हे कुणीही नाकारणार नाही.
टोनी नदाल यांच्यासोबत केलेल्या कठोर प्रशिक्षण आणि सरावातूनच नदाल ज्या चिवटपणासाठी ओळखला जातो तो चिवट खेळ करू शकला. नदालला टेनिस कोर्टवर कधीही हार न मानणारा खेळाडू म्हणून जे ओळखलं जातं त्यातही टोनी नदाल यांचं योगदान मोठं आहे.
टेनिसच्या गेममध्ये पहिल्या गुणापासून ते विसाव्या गुणापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा संयम नदालच्या खेळात यावा यासाठी अंकल टोनी यांनी एक विशेष क्लुप्ती वापरली. लहानपणी राफेलसोबत मॅच खेळताना टोनी नदाल त्याला 19 गुण मिळू द्यायचे आणि विसाव्या आणि निर्णायक गुणासाठी राफेलला बराच वेळ झुंजवत ठेवायचे.
शारीरिक अडचणीवर मात करून टेनिस मॅच जिंकण्याची सवय टोनी नदाल यांनी लावली. स्पेनमध्ये झालेल्या अंडर-14 राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना नदालची एक करंगळी तुटलेली होती, मात्र तरीही राफेलने त्याला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करून, किंवा त्या सहन करून त्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि तो त्या स्पर्धेचा विजेतासुद्धा ठरला.

फोटो स्रोत, Getty Images
टेनिस कोर्टवर प्रचंड दबावाखाली खेळण्याची आणि मॅच सुरू असताना आलेली एखादी अडचण सोडवण्याची क्षमता देखील राफेलने त्याच्या काकांकडूनच शिकलेली होती. राफेल म्हणतो की, "माझ्या बालपणी मला वाटायचं की माझ्या जादूगार काकांना सगळंच माहिती होतं आणि ते सतत माझ्या चुकांचं विश्लेषण करत असायचे."
नदालने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयांमध्ये त्याचे हे सगळे गुण ठळकपणे दिसत होते. उदाहरणार्थ 2008 साली पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी झालेल्या नदालने मातब्बर रॉजर फेडररचा सामना करताना पाच सेटपर्यंत खेळ करून ती स्पर्धा जिंकली होती. किंवा मग 2019 साली डॅनियल मेदेव्हदेवचा पराभव करताना देखील नदालने असाच अविस्मरणीय खेळ केला होता.
टोनी नदाल यांनी राफेलच्या मनावर एक वाक्य कोरलं होतं, "प्रत्येक पॉईंट हा तुझा शेवटचा पॉईंट आहे असं समजूनच प्रतिस्पर्ध्याशी झुंज कर."
नदालने त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्याच्यापेक्षा तरुण असणाऱ्या अनेक खेळाडूं टेनिस कोर्टवर धूळ चारली. त्याकाळात त्याच्या शारीरिक अडचणी या त्या तरुणतुर्क खेळाडूंपेक्षा कितीतरी जास्त होत्या आणि यावरूनच नदालच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची ताकद आपल्याला कळू शकते.
टेनिस कोर्टवरचं नदालचं वर्चस्व, त्याचा सफाईदार तांत्रिक खेळ, प्रतिस्पर्धी खेळाडूला प्रत्युत्तर देण्यास अशक्यप्राय वाटणारी त्याची सर्व्हिस, फोरहँड आणि बॅकहँडच्या फटक्यांवर त्याने मिळवलेले पॉईंट्स, कोर्टवरची त्याची चतुराई आणि नेटजवळचा वेगवान खेळ हे त्याच्या अत्युच्च खेळाची आणि कौशल्यांची प्रचिती देतात.
टोनी या सगळ्या गोष्टींचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत.
ते म्हणतात की, "मी त्याला टेनिस खेळाप्रती असणारी प्रतिबद्धता दिली, त्याचा मेंदू खेळाच्या बाबतीत नेहमी जागा राहावा यासाठी प्रयत्न केले, कधीही पराभव न स्वीकारण्याची वृत्ती घडवली. सतत सुधारणा करत राहिली पाहिजे हा सगळ्या महत्त्वाचा मंत्र मी त्याला दिला. मी त्याला नेहमी सांगायचो की तुझा खेळ सुधारला पाहिजे पण त्याच्याकडे असणारी नैसर्गिक क्षमता नसती तर एवढी सुधारणा करणं शक्य झालं नसतं हेही तेवढंच खरं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
नदालचा प्रशिक्षक होण्यासाठी तो दोन कारणांनी योग्य होते असं टोनी विनोदाने सांगतात.
ते म्हणतात की, "पहिलं कारण म्हणजे मी त्याचा काका आहे त्यामुळे एखाद्या जवळच्या नातेवाईकाला तुमच्यापासून दूर करणं सोपं नसतं आणि त्याकाळी मी त्याच्यासाठीच सगळ्यात स्वस्त प्रशिक्षक होतो, मी त्याला परवडणारा होतो."
राफेल नदालने जिंकलेल्या 22 पैकी 16 ग्रँडस्लॅम स्पर्धा या टोनी नदाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकल्या आहेत. 2017 मध्ये अंकल टोनी यांनी नदालच्या प्रशिक्षक पदावरून निवृत्ती घेतली.
टोनी यांनी सांगितलेल्या आणि त्यांच्याबाबत लिहिलेल्या प्रसंगांवरून ते एक अत्यंत कठोर आणि क्रूर प्रशिक्षक होते अशी अनेकांची धारणा होऊ शकते मात्र ते योग्य ठरणार नाही.
त्यांच्या नात्यातील 'जादू' नदालने अनेकवेळा सांगितली आहे. नदालने त्याच्या पुस्तकात लिहिलंय की, "माझं बालपण खूप आनंदात गेलं. इतर खेळाडूंची जशी संघर्षमय सुरुवात असते, लहानपणीच्या करुण कहाण्या असतात तसं माझ्याबाबतीत घडलं नाही."
त्यामुळे काका पुतण्याच्या या जोडीत कधी दुरावा आला नाही. खरंतर स्पेनच्या मॅलोर्का बेटांवर राहणाऱ्या नदाल कुटुंबात देखील कधी अंतर आलं नाही. अंकल टोनी देखील म्हणतात की एखाद्या काका आणि पुतण्याचं जसं नातं असतं तसंच आमचंही होतं.
2017 साली नदालने त्याची 10वी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली तेव्हा प्रशिक्षक म्हणून शेवटच्या सामन्यात उपस्थित असणारे अंकल टोनी यांनीच नदालला फ्रेंच ओपनचा चषक दिला होता. या विजयानंतर त्यांनी मारलेली मिठी या दोघांच्या नात्याबाबत खूप कहाणी सांगून गेली.
टोनी म्हणतात की, "लहानपणीच राफेल माझ्यासोबत येऊन टेनिस खेळू लागला तेव्हा जर कुणी मला विचारलं असतं की हा मुलगा 22 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकेल का? तर मला ते अशक्यप्राय वाटलं असतं. मात्र आता दरवर्षी ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नदालकडे बघून मला ही स्पर्धाच सोपी वाटायला लागली."
टोनी म्हणाले की, "आम्ही हे सिद्ध केलं की मॅनकोरमधून आलेला एक सामान्य लहान मुलगा सातत्य, त्याग आणि मेहनतीच्या जोरावर त्याला हवं ते मिळवू शकतो, त्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











