राफेल नदालची दुखापतीमुळे विम्बल्डन मधून माघार, चाहतेही हळहळले

नदाल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राफाल नदालने दुखापतीमुळे विम्बल्डनमधून माघार घेतली आहे. निक कायरोगिऑस च्या विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यातून त्याने माघार घेतली,

36 वर्षीय नादाल ने उपांत्यपूर्व फेरीत खेळल्यानंतरच उपचार सुरू केले होते. हा सामना खेळताना त्याने वेदना सहन करत पाच सेट जिंकले. मात्र त्यानंतर त्याने माघार घेतली.

"मी माझ्या करिअरमध्ये अनेकदा या वेदनेशी झगडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती चिघळणार याची मला खात्री होती" नादाल म्हणाला.

कायरोगिओस आता झोकोविक किंवा नॉरी यांच्यामधील विजेत्याशी अंतिम सामन्यात लढत देईल.

त्याच्या पोटाच्या स्नायूत दुखापत झाल्याचं सांगितलं. त्यामुळे पुढच्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं.

मी पूर्ण दिवस हा निर्णय घ्यायचा की नाही हा विचार करत होतो असं त्याने पत्रकारांना सांगितलं. आता पुढे खेळण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. हे सांगायला मला फार वाईट वाटतंय असं नादालने पत्रकारांना सांगितलं.

विम्बलडन दरम्यान नादालचं हे दुखणं उफाळून आलं होतं. उपांत्यपूर्व सामन्यात ते प्रकर्षाने दिसलं.

नादालचा नाद नाही!

राफेल नदाल हा सहा अक्षररुपी अवलिया म्हणजे मानवी शरीरातून काय चमत्कार घडू शकतो याचा जिवंत दाखला आहे. युद्ध पाहिलेल्या माणसाच्या शरीरावर कसे वार असतात तसं राफेल नदालचं शरीर आहे. अनेक अवयवांच्या दुखापतींनी त्याला वेढलंय पण जेतेपदाचा किल्ला सर करण्यासाठी हा माणूस जे करतो ते अचंबित करणारं आहे.

सामान्य माणसं निराश होतात, खचून जातात. मिलेनियल्सच्या भाषेत सांगायचं तर लो वगैरे वाटतं. राफेल नदालही आपल्यासारख्याच अडथळ्यांना सामोरा जातो. पण त्यातून सावरत तो गरुडभरारी घेतो. विजिगीषु हा शब्द मराठीत निर्मिला गेला तेव्हा नदाल नसेल पण या शब्दाचं मानवी रुप म्हणून नदालला दाखवता येऊ शकतं.

तुम्ही नदालचा खेळ पाहिलात तर तुम्हाला आपसूकच आत्मविश्वासपूर्ण वाटायला लागतं. नदाल ज्या क्षणातून पुनरागमन करतो ते पाहिलं तर तुम्हाला घाऊक ऊर्जा मिळेल. तुम्ही सातत्याने नदालला पाहत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात समस्यांना संकटांना शरण जाणार नाहीत.

नदाल नुसतं खेळत नाही, तो स्फुल्लिंग चेतवतो. तो जगायला बळ देतो. सगळं जग विरोधात गेलं तरी मी उभा राहेन ही भावना तेवत ठेवतो. सगळ्या बाजूंनी कोंडी झालेय, अडचणी संपायचं नावच घेत नाहीयेत, ठप्पच होऊन गेलंय असं वाटत असेल तर राफाचं स्मरण करा आणि कामाला लागा. अंगावर आलं तर शिंगावर घेणारा नदाल तुमच्यात भिनला तर तुमच्या आयुष्यातलं ग्रँड स्लॅम नावावर असेल.

या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारची संध्याकाळ नदालच्या नावावर कोरून गेली होती. नदालने ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावत कारकीर्दीतल्या विक्रमी 21व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई केली. लाल मातीचा बादशहाने भौतिक गोष्टींना पुरुन उरत अविश्वसनीय मैफलीत जेतेपद साकारलं. हयातभर खेळून असंख्य खेळाडूंना एकही ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावता येत नाही. नदालच्या नावावर 21 आहेत. रक्ताचं पाणी करून मिळवली आहेत. धाकदपटशा, सेटिंग, जुगाड, झोल करून नाही. अपार कष्ट आहेत.

35व्या वर्षी 5 तास आणि 24 मिनिटांची मॅच आणि समोर 10 वर्षांहून लहान वयाचा दमदार प्रतिस्पर्धी. वर्षातली पहिलीवहिली ग्रँड स्लॅम स्पर्धेची फायनल. पहिला आणि दुसरा सेट डॅनियल मेदव्हेदेव्हने जिंकत विजयाचा जणू पाया रचला होता. तिसऱ्या सेटमध्येही मेदव्हेदेव्हने 3-2 आगेकूच केली होती. 15-20 मिनिटात नदालचा फडशा पडणार हे जवळपास ठरलं होतं.

राफेल नदाल, ऑस्ट्रेलियन ओपन, टेनिस, स्पेन

फोटो स्रोत, Mark Metcalfe

फोटो कॅप्शन, राफेल नदाल जेतेपदाचा आनंद साजरा करताना

नदालरुपी रणगाड्याने परतायचं ठरवलं आणि नंतर जे घडलं ते अद्भुत सदरात मोडणारं होतं. भात्यातले सगळे फटके बाहेर निघाले. पल्लेदार रॅली सुरू झाल्या. समोरच्याला निरुत्तर करणारे डावपेच मांडले गेले. नदाल मशीन होऊन खेळतो. तो थकतच नाही, त्याच्या हालचाली मंदावत नाहीत. त्याचं डोकं आणखी तीक्ष्णपणे काम करू लागतं. त्याच्या डोळ्यात सावज गट्टम करण्याची भूक दिसते. मॅचच्या पूर्वार्धात हाच विजेता वाटणारा मेदव्हेदेव्ह नदालरुपी मशीनसमोर केविलवाणा वाटू लागतो. यादरम्यान नदालची आन्हिकं बदलत नाहीत.

एनर्जी ड्रिंकच्या बाटल्या ठराविक रेषेत, कोनात मांडलेल्या असतात. त्या प्रत्येकवेळी नदाल तशाच ठेवतो. घामाने शरीराला चिकटणारी शॉर्ट्स तो अडजस्ट करतो. लोक काय म्हणतील याचा तो विचार करत नाही. त्याच्या बहुतांश बोटांना लावण्यात आलेल्या पट्ट्या नीट करतो. त्याची रॅकेट तलवारीसारखी भासते, त्याचे पाय हरणाच्या पायांसारखे पळतात. नदाल 'गेम' करत नाही, तो गेम जिंकतो. सकाळी झोप झाल्यावर अंथरुणांच्या घड्या घालून रचाव्यात तशी तो गेम्सची चळत मांडत जातो. गेम पॉइंट, सेटपॉइंट, मॅचपॉइंट हे संक्रमण आपल्यासमोर घडतं पण ते कसं होऊन गेलं ते सांगता मात्र येत नाही.

जिंकल्यावरच त्या विद्युत लोळाला शांतता लाभते. भरून पावल्यागत तो उभा राहतो. तो जे बोलतो त्यातून या अवलियाचं मन कळतं. शिखर सर केल्यावर तुमच्या मनाचं क्षितिज मोठं व्हायला हवं. नदालच्या बोलण्यातून पराक्रमाचा उन्माद बाहेर पडत नाही. तो पराक्रम करण्यासाठी कशाचं बलिदान दिलं याबद्दल सांगतो. जीव तोडून खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करतो. बढाया नाही, आत्मस्तुती नाही, माज नाही. जेतपदाचं काम आटोपलाय, आता मी तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे अशा पद्धतीने तो वावरतो. जिंकण्यासाठीच खेळावं पण ते करताना कडवटपणा, विखार, मत्सर असू नये याकडे नदालचं बारीक लक्ष असतं.

राफेल नदाल, ऑस्ट्रेलियन ओपन, टेनिस, स्पेन

फोटो स्रोत, Daniel Pockett

फोटो कॅप्शन, राफेल नदाल जिंकल्यानंतर भावुक झाला होता.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पायाला झालेल्या दुखापतीमुळे नदाल पुन्हा टेनिस खेळेल का यावरच प्रश्नचिन्ह होतं. Mueller-Weiss syndrome नावाचा आजार नदालच्या पायाला झाला. खेळण्यासाठी अत्यावश्यक अशा पायालाच गंभीर दुखापत झाल्याने आणि हालचालींवर मर्यादा येणार असल्याने नदालने एकाक्षणी निवृत्तीचा विचार केला होता.

हे कमी की काय म्हणून गेले दोन वर्ष जगाला ग्रासलेल्या कोरोनाने नदालला गाठलं. कोरोना झाल्यावर शरीरात काय बदल होतात हे आता आपण सगळेच जाणतो. नदाल हे वेगळंच रसायन असल्याचं कोरोनालाही जाणवलं असेल. कारण कोरोना झाल्यावर माणूस शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो. नदालने या स्पर्धेच्या निमित्ताने 23 तास कोर्टवर झुंजत अशक्य वाटणारं जेतेपद नावावर केलं.

नदालच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्याच्या मनगटाला दुखापत झाली होती. खूप आधी त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. मांडीचे स्नायू, ओटीपोट, हिप अशा अनेक दुखापतींनी त्याला त्रास दिला आहे. दुसरा कोणी असता तर केव्हाच टेनिस सोडून बैठ्या कामाला लागला असता. हार मानणं नदालच्या रक्तात नाही.

राफेल नदाल, ऑस्ट्रेलियन ओपन, टेनिस, स्पेन

फोटो स्रोत, Clive Brunskill

फोटो कॅप्शन, राफेल नदाल

नदाल संपला, आता परत कोर्टवर उतरत नाही, चला आता फेअरवेलची तयारी करूया या कशानेच त्याच्या मनावर परिणाम होत नाही. त्याला टेनिस आवडतं आणि जिंकण्याची नशा त्याला बेभान करते. हे बेभान होण्यात गुणकौशल्यं तर आहेतच पण पराकोटीचा फिटनेस आणि जबरदस्त मनोधैर्य आहे. सवंग गोष्टी करून तो जिंकत नाही. मॅरेथॉन काळ लढून जिंकतो.

2003 पासून रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नंतर नोव्हाक जोकोव्हिच असं मिळून त्रिकुट बनलं. 18 वर्षात या त्रिकुटाच्या नावावर 61 ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत. ग्रँड स्लॅम जेतेपदांवर या त्रिकुटाचीच सद्दी असते. तिघांचाही खास चाहतावर्ग आहे. या त्रिकुटात नदाल मागे पडला, दुखापतींमुळे तो निवृत्ती स्वीकारेल, त्याचं वय झालं अशा चर्चा गेली काही वर्ष होत आहेत. तो येतो, जेतेपद आणि मनं पुन्हापुन्हा जिंकून घेतो.

आता विम्बलडन मध्ये अशा जेतेपदाची पायाभरणी होणार असं वाटत असतानाच नादाल ला माघार घ्यावी लागली. मात्र त्याच्या नादालपणाला कुठेही धक्का लागणार नाही हेही तितकंच खरं

नदालशाहीच्या नावानं चांगभलं!!!

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)