कोरोमंडल एक्सप्रेसला 14 वर्षांपूर्वीही झाला होता अपघात, वाचा भारतातील रेल्वे अपघातांचा इतिहास..

ओडिशाच्या बालासोरजवळ तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकून एका भीषण रेल्वे अपघाताची घटना शुक्रवारी घडली.

ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ट्वीट करून या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 261 असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय 900 जण जखमी असल्याची माहितीही समोर आली आहे.

भारतात रेल्वे अपघातांचा एक इतिहास राहिलेला आहे. जाणून घेऊ, आजवर भारतात घडलेल्या भीषण रेल्वे अपघातांबाबत –

19 ॲाक्टोबर 2018- अमृतसर ट्रेन दुर्घटना - पंजाबच्या अमृतसरमध्ये दसरा उत्सवादरम्यान रावण दहन पाहण्यासाठी ट्रॅकवर जमलेल्या गर्दीला ट्रेनने उडवलं होतं. अपघातात 59 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जखमी झाले.

22 जानेवारी 2017 – आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात हिराखंड एक्सप्रेसचे 8 डब्बे रुळावरून घसरल्याने 39 जणांचा मृत्यू झाला.

20 नोव्हेंबर 2016 – कानपूरजवळ पुखरायांमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडला होता. यामध्ये किमान 150 जणांचा मृत्यू झाला. यावेळी पटना-इंदूर एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले होते.

20 मार्च 2015 – देहरादूनवरून वाराणसीला जाणारी जनता एक्सप्रेस रुळावरून खाली आली. या अपघातात 34 जणांचा मृत्यू झाला.

4 मे 2014 – महाराष्ट्रात दिवा-सावंतवाडी पॅसेंजर रेल्वेला हा अपघात घडला. नागोठाणे आणि रोहा या स्टेशनदरम्यान रेल्वे रुळावरून खाली उतरली. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला तर 100 जण जखमी झाले.

28 डिसेंबर 2013 – बंगळुरू-नांदेड एक्सप्रेसमध्ये आग लागून 26 जण मारले गेले होते. एअर कंडिशन डब्यात लागलेल्या या आगीच्या घटनेत ही जिवितहानी झाली.

19 ऑगस्ट 2013 – याच वर्षी बिहारमधील राज्यराणी एक्सप्रेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. खडगिया जिल्ह्यात झालेल्या या घटनेत 28 जणांचा मृत्यू झाला होता.

30 जुलै 2012 – भारतीय रेल्वेच्या इतिहासात 2012 हे वर्ष अपघातांच्या बाबतीत अत्यंत वाईट ठरलं. या वर्षी सुमारे 14 अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये रेल्वे रुळावरून खाली घसरणे, समोरासमोर धडक, आग यांच्यासारख्या घटनांचा समावेश होता. 30 जुलै रोजी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या तामिळनाडू एक्सप्रेसच्या एका डब्याला नेल्लोरजवळ आग लागली. यामध्ये 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला.

7 जुलै 2011 – उत्तर प्रदेशात रेल्वे आणि बस यांच्या धडकेत 38 जणांचा मृत्यू झाला.

20 सप्टेंबर 2010 – मध्य प्रदेशात शिवपुरी येथे ग्वाल्हेर इंटरसिटी एक्सप्रेस एका मालगाडीला जाऊन धडकली. या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला, तर 160 पेक्षा जास्त जण जखमी झाले.

19 जुलै 2010 – पश्चिम बंगालमध्ये उत्तर बंग एक्सप्रेस आणि वनांचल एक्सप्रेस यांची धडक झाली. यामध्ये 62 जण मृत्युमुखी पडले. तर दीडशेपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले.

28 मे 2010 – पश्चिम बंगालमध्ये संशयित नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रुळावरून खाली आली. या घटनेत 170 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

21 ऑक्टोबर 2009 – उत्तर प्रदेशच्या मथुरा स्टेशनजवळ गोवा एक्सप्रेसने मेवाड एक्सप्रेसला मागून धडक दिली. घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला तर 23 जण जखमी झाले.

14 फेब्रुवारी 2009 – हा अपघात 14 वर्षांपूर्वी योगायोगाने रेल्वे अर्थसंकल्पाच्या दिवशीच घडला. आणखी एक योगायोग म्हणजे त्यावेळी कोरोमंडल एक्सप्रेसलाच ओडिशामध्ये हा अपघात झाला होता.

हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसचे 14 डब्बे ओडिशाच्या जाजपूर रेल्वे स्टेशनजवळ त्यावेळी घसरले होते. या घटनेत 16 जण मृत्युमुखी पडले, तर 50 जखमी झाले होते.

ऑगस्ट 2008 – सिकंदराबादवरून काकीनाडाला जाणाऱ्या गौतमी एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री आग लागली. यामध्ये 32 जण मारले गेले. तर अनेकजण जखमी झाले.

21 एप्रिल 2005 – गुजरातच्या वडोदराजवळ साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये धडक झाली. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर 78 जण जखमी झाले होते.

फेब्रुवारी 2005 – महाराष्ट्रात रेल्वे आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत 50 जण ठार झाले. याशिवाय 50 जण जखमी झाले होते.

2 जुलै 2003 – तत्कालीन आंध्र प्रदेशात (आताचं तेलंगण) वारंगल शहराजवळ झालेल्या गोवळकोंडा एक्सप्रेसला अपघात झाला होता. या अपघातात इंजिन आणि दोन डबे रस्त्यावर खाली आले. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला.

जून 2003 – महाराष्ट्रात झालेल्या रेल्वे अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता. तसंच अनेकजण जखमी झाले होते.

15 मे 2003 – पंजाबच्या लुधियानाजवळ फ्रंटियर मेलला आग लागली. यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला.

9 सप्टेंबर 2002 – हावडाहून नवी दिल्लीला जात असलेल्या राजनाधी एक्सप्रेसला अपघात झाला. यामध्ये 120 जण मृत्युमुखी पडले.

22 जून 2001 – मंगळूर-चेन्नई मेल केरळच्या कडलुंडी नदीत कोसळली. यामध्ये 59 जणांचा मृत्यू झाला.

31 मे 2001 – उत्तर प्रदेशात एका रेल्वे क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या बसला रेल्वेने बसला धडक दिली. यामध्ये 31 जण मृत्यूमुखी पडले.

2 डिसेंबर 2020 – कोलकातावरून अमृतसरला जात असलेली हावडा मेल दिल्लीच्या दिशेने जात असलेल्या एका मालगाडीला धडकली.

3 ऑगस्ट 1999 – दिल्लीला जात असलेली ब्रह्मपुत्रा मेल ही अवध-आसाम एक्सप्रेसला धडकली. या अपघातात 285 जणांना आपले प्राण गमवावे लागले. याशिवाय जखमींची संख्या होती 312.

26 नोव्हेंबर 1998 – फ्रंटियर मेल ही सियालदाह एक्सप्रेसला पंजाबच्या खन्ना शहराजवळ धकडली. 108 मृत्यू, 120 जखमी.

14 सप्टेंबर 1997 – अहमदाबाद हावडा एक्सप्रेस ही छत्तीसगढच्या बिलासपूरजवळ एका नदीत कोसळली. यामध्ये 81 मृत्यू झाले तर 100 जण जखमी झाले.

18 एप्रिल 1996 – एर्नाकुलम एक्सप्रेस ही दक्षिण केरळमध्ये एका बसला धडकली. यामध्ये 35 जणांचा मृत्यू तर 50 जखमी झाले.

20 ऑगस्ट 1995 – नवी दिल्लीच्या दिशेने जाणारी पुरुषोत्तम एक्सप्रेस ही कालिंदी एक्सप्रेसला उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जवळ धडकली. 250 मृत्यू, 250 जखमी.

21 डिसेंबर 1993 – कोटा-बिना एक्सप्रेस ही राजस्थानजवळ एका मालगाडीला धडकली. यामध्ये तब्बल 71 जण मृत्यूमुखी पडले तर अनेकजण जखमी झाले.

16 एप्रिल 1990 – पटनाजवळ रेल्वेला आग, 70 जणांचा मृत्यू.

23 फेब्रुवारी 1985 – राजनांदगाव येथे एका प्रवासी रेल्वे गाडीच्या दोन डब्यांना आग लागली. 50 जणांचा मृत्यू आणि

6 जून 1981 – बिहारमध्ये वादळामुळे रेल्वे गाडी नदीत जाऊन पडली. यामध्ये 800 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजारपेक्षाही जास्त जखमी झाले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)