भारतीय रेल्वेबद्दल गुगलवर लोक काय-काय शोधतात? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे..

    • Author, चंदन जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रेल्वे हा भारतीयांसाठी दळणवळणाचा सर्वात मोठा पर्याय आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी साधारणपणे लोक रेल्वे प्रवासाला जास्त प्राधान्य देतात.

सध्यातरी, रेल्वे प्रवासाला सर्वाधिक स्वस्त आणि सुरक्षित म्हणून पर्याय म्हणून ओळखलं जातं.

रेल्वे प्रवासाचं नियोजन रोज कोट्यवधी लोक करतात. रेल्वेचं वेळापत्रक पाहण्यासाठी, बर्थ किंवा सीट बुकिंगच्या माहितीसाठी ते IRCTC च्या वेबसाईटला भेट देतात.

भारतीय रेल्वेची वेबसाईट ही जगभरात सर्वात जास्त वर्दळ (हिट) मिळणाऱ्या वेबसाईटपैकी एक आहे. IRCTC च्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला सरासरी 12 लाख हिट मिळतात.

भारतीय रेल्वे हा जगभरात सर्वाधिक लोकांना नोकरी देणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. रेल्वेसंबंधित नोकऱ्या आणि त्याबाबतच्या बातम्या लोक गुगलवर शोधत असतात.

याशिवाय, रेल्वेबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना जाणून घ्यायच्या असतात. ही माहिती लोक विविध माध्यमातून शोधत असतात.

भारतीय नागरिक सर्वात जास्त नेमकं काय शोधतात, अशा प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया –

भारतीय रेल्वेची सुरुवात कधी झाली?

भारतात रेल्वेची सुरुवात 16 एप्रिल 1853 रोजी झाली. भारताची पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान चालवण्यात आली होती. या मार्गाची लांबी सुमारे 34 किलोमीटर इतकी होती.

भारतात सर्वात जुनी रेल्वे कोणती?

भारतात सर्वात जुनी रेल्वे ही पंजाब मेल आहे. ही रेल्वे 1912 साली सुरू झाली. त्यावेळी ही रेल्वे बलार्ज पिअर (दक्षिण मुंबई) आणि पेशावर (सध्याचं पाकिस्तान) दरम्यान चालवली जायची.

सध्या ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि फिरोजपूर कँटोनमेंट या दोन स्टेशनदरम्यान चालवली जाते.

भारतात सर्वात लांबचा प्रवास करणारी रेल्वे कोणती?

भारतात सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या रेल्वेचं नाव आहे विवेक एक्सप्रेस.

ही रेल्वे ईशान्य भारतातील राज्य आसाममधील दिब्रूगढ आणि दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूतील कन्याकुमारीदरम्यान चालवली जाते.

सुमारे 4150 किलोमीटरचा प्रवास करते. आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी ही रेल्वे एकूण 75 तासांचा वेळ घेते.

उत्पन्नाच्या दृष्टीने सर्वात मोठे पाच रेल्वे स्टेशन कोणते?

उत्पन्नाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे पाच रेल्वे स्टेशन खालील प्रमाणे – नवी दिल्ली, हावडा, चेन्नई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई आणि पटना जंक्शन.

प्रवाशांच्या संख्येचा विचार केल्यास पूर्व रेल्वे विभागातील हावडा स्टेशन सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे.

या स्टेशनवर रोज सुमारे 10 लाख लोक रेल्वे प्रवास सुरू करतात किंवा त्यांचा प्रवास या स्टेशनवर संपतो.

भारतात एकूण रेल्वे स्टेशन किती?

भारतात एकूण 8 हजार 300 रेल्वे स्थानक आहेत. या स्थानकांची संख्या सातत्याने कमी-जास्त होत राहते.

एखाद्या रेल्वे स्टेशनवर प्रवासी पुरेशा संख्येने उपलब्ध नसतील, तर ते बंदही केले जातात.

किंवा कधी-कधी नवे स्टेशन बांधण्याची मागणी केली जाते, तर कधी एखादं बंद असलेलं रेल्वे स्थानक पुन्हा सुरू करण्याची मागणी होते. अशा वेळी या संख्येत चढ-उतार पाहायला मिळतो.

भारतात कोणत्या रेल्वे स्टेशनचं नाव सर्वात मोठं सर्वात लहान?

आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूच्या सीमेवर असलेल्या वेंकटनरसिंहाराजूवरिपेटा रेल्वे स्टेशनचं नाव भारतीय रेल्वेत सर्वात लांबलचक आहे.

स्थानिक नागरिक या नावापूर्वी श्री चा वापर करतात. त्यामुळे हे नाव आणखी मोठं होतं.

तर ओडिशा राज्यातील इब (Ib) या रेल्वे स्टेशनचं नाव सर्वात लहान आहे. हे नाव येथील इब नदीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. इब नदी ओडिशातील महानदीची उपनदी आहे.

रेल्वेचा सर्वात व्यग्र मार्ग कोणता?

भारतीय रेल्वेत लांब पल्ल्याच्या मार्गांमध्ये सर्वात व्यग्र मार्ग दिल्ली ते हावडा आणि दिल्ली ते मुंबई हा आहे.

तर कमी अंतराच्या मार्गात प्रयागराज ते दीन दयाळ उपाध्याय जंक्शन हा मार्ग सर्वाधिक व्यस्त आहे.

भारतात किती रेल्वे धावतात?

भारतात सध्या 12 हजार 167 रेल्वे चालवल्या जातात. यामध्ये दररोज 2030 मेल-एक्सप्रेस आपल्या मुक्कामी पोहोचतात.

कोणती रेल्वे न थांबता सर्वाधिक अंतर कापते?

केरळमधील त्रिवेंद्रम ते राजधानी दिल्लीदरम्यान चालवली जाणारी राजधानी एक्सप्रेस एकूण 3149 किलोमीटरचा प्रवास करते.

ही रेल्वे गुजरातमधील वडोदरा ते राजस्थानातील कोटा रेल्वेस्थानकापर्यंत 528 किलोमीटरचं अंतर हे इतर कोणत्याही रेल्वे स्थानकावर न थांबता पूर्ण करते.

भारतातील सर्वात जुनं रेल्वे स्टेशन कोणतं?

तामीळनाडूची राजधानी चेन्नईमधील रोयापुरम रेल्वे स्टेशन भारतीय रेल्वेमधील सर्वात जुनं रेल्वे स्टेशन आहे.

त्याचं बांधकाम 1856 साली झालं होतं. तेव्हापासून ते आजतागायत सुरूच आहे.

भारतात कोणत्या राज्यात रेल्वे लाईन नाही?

ईशान्य भारतातील सिक्कीम राज्यात रेल्वे लाईन नाही. रेल्वेमार्ग पोहोचू न शकलेलं ते एकमेव राज्य आहे.

सध्या या परिसरात शिवोक ते रंगपो दरम्यान एक रेल्वे लाईन बनवण्यात येत आहे. त्याचं अंतर 45 किलोमीटर इतकं आहे. हा मार्ग भविष्यात सिक्कीमची राजधानी गंगटोकशी जोडण्याची भारतीय रेल्वे प्रशासनाची योजना आहे.

एका रेल्वेची किंमत किती असते?

रेल्वेच्या प्रकारानुसार तिची किंमत ठरत असते.

साधारणपणे एका मेल-एक्सप्रेस रेल्वेची किंमत ही 60 कोटींच्या घरात आहे. तर वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वेची किंमत 100 कोटींच्या आसपास आहे.

फेअरी क्विन इंजिन काय आहे?

फेअरी क्विन इंजीन हे इंजिन जगातील सर्वात जुनं इंजीन म्हणून प्रसिद्ध आहे.

ते 1855 मध्ये भारतीय रेल्वेच्या सेवेत दाखल झालं होतं. तेव्हापासून ते आजतागायत सेवेत आहे.

1908 साली हे इंजिन बंद पडलं होतं. पण 1997 मध्ये त्याची दुरुस्ती करून ते पुन्हा चालू करण्यात आलं.

आज काही निवडक ठिकाणी पर्यटनासाठीच्या रेल्वेमध्ये हे इंजिन वापरात आहे.

रेल्वेत सी. फा. चा अर्थ काय?

सी. फा. या शब्दाचा अर्थ आहे सिटी फाटक.

साधारणपणे लेव्हल क्रॉसिंग जिथे रेल्वे लाईनच्या वर किंवाखाली रेल्वे फाटक नसतं, त्याऐवजी रेल्वे फाटक असतं. त्याठिकाणी 250 मीटर आधी सी. फा. नामक बोर्ड लावला जातो.

रेल्वे चालकाला पुढे रेल्वे फाटक आहे, हे समजण्यासाठी ते लावलेलं असतं. ते दिसताच रेल्वे चालक भोंगा वाजवून रेल्वे आल्याची सूचना सर्वांना देत असतो.

इंग्रजीत हेच W/L असं लिहिलं जातं.

रेल्वेच्या RPF आणि GRP मध्ये काय फरक आहे?

RPF म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स किंवा रेल्वे सुरक्षा बल होय. ही संस्था केंद्र सरकारच्या अधीन असते. रेल्वेची संपत्ती, रेल्वे परिसरात संरक्षण करण्याची जबाबदारी या संस्थेकडे असते.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF जवानांना रेल्वे आणि रेल्वे स्टेशनवर तैनात केलं जातं.

तर, GRP म्हणजेच गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस हे राज्य सरकारच्या अखत्यारित असतात.

रेल्वे आणि रेल्वे स्टेशन परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची त्यांची जबाबदारी असते.

रेल्वे आणि रेल्वे स्टेशनमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद ही GRP कडे केली जाते.

दिल्ली ते कोलकाता रेल्वेसेवा कधी सुरू झाली?

दिल्ली आणि कोलकातादरम्यानची रेल्वेसेवा 1864 साली सुरू झाली. त्यावेळी अलाहाबाद (प्रयागराज) येथे रेल्वे मार्गात यमुना नदीचा अडसर होता. शिवाय नदीवर त्यावेळी कोणताही पुलसुद्धा नव्हता.

त्यामुळे रेल्वेचे डबे एका नावेच्या माध्यमातून नदीच्या पलिकडे नेले जायचे. यानंतर 1865 साली अलाहाबादमध्ये यमुना नदीवरील पुल बांधून तयार झाला.

भारतात रेल्वेचा पहिला कारखाना कुठे बनवण्यात आला?

भारतात रेल्वेचा पहिला कारखाना 8 फेब्रुवारी 1862 रोजी बिहारच्या जमालपूर येथे कार्यान्वित करण्यात आला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात हे ठिकाण आहे.

या कारखान्यात एके काळी 10 हजार कर्मचारी काम करायचे. इथे मालगाडीच्या डब्यांची निर्मिती आणि दुरुस्तीही केली जायची.

रेल्वे इंजिन दुरुस्तीच्या बाबतीत हा भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा कारखाना आहे.

15 जानेवारी 1935 रोजी बिहारमध्ये आलेल्या भयानक भूकंपात हा कारखाना आणि परिसरातील रेल्वे कॉलनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

या कारखान्याची दुरुस्ती करून तो पुन्हा उभा करण्यासाठी तीन वर्षे लागली.

RAC म्हणजे काय?

RAC चं पूर्ण रुप Reservation Against Cancellation असं आहे. यामध्ये प्रवाशांना केवळ बसण्यासाठी सीट उपलब्ध असते.

म्हणजे, तुमचं तिकिट RAC असल्यास तुम्ही बाजूच्या बर्थवर केवळ बसून प्रवास करू शकता.

समजा, कन्फर्म तिकिट असलेला एखादा प्रवासी प्रवास करण्यासाठी आला नाही, तर त्याची सीट ही RAC तिकिट असलेल्या प्रवाशाला दिली जाते.

रेल्वे चार्टमध्ये HO चा अर्थ काय?

भारतीय रेल्वेत रिझर्व्हेशन डब्यांमध्ये साधारणपणे काही सीट बुक केले जात नाहीत.

असे बर्थ किंवा सीट हे आणीबाणी स्थितीत प्रवास करत असलेल्या वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना दिले जातात. यामध्ये वरीष्ठ अधिकारी, न्यायाधीश, राजकीय नेते किंवा रुग्ण यांचा समावेश असतो.

रेल्वेमध्ये याला साधारणपणे इमर्जन्सी कोटा संबोधलं जातं. हा कोटा मिळवण्यासाठी आणीबाणीच्या स्थितीतील प्रवाशांना आधीच रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो.

भारतीय रेल्वेत रोज किती प्रवासी प्रवास करतात?

भारतीय रेल्वेमध्ये रोज सुमारे दोन कोटी 30 लाख प्रवासी प्रवास करतात. ही संख्या कोव्हिड साथीनंतर थोडी कमी झाली आहे.

यामध्ये सर्वात मोठा वाटा हा मुंबईत चालवल्या जाणाऱ्या उपनगरीय म्हणजेच लोकल रेल्वेचा आहे.

वंदे भारत ट्रेन कशासाठी प्रसिद्ध आहे?

वंदे भारत रेल्वे ही भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक रेल्वे आहे. ती सर्वात वेगवान रेल्वेही आहे. या रेल्वेचा वेग ताशी 160 किलोमीटर इतका आहे.

चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही रेल्वे तयार केली जाते. याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.

एखाद्या युरोपीय रेल्वेप्रमाणे दिसणारी ही रेल्वे खूपच कमी किंमतीत बनवली जाते, असा भारतीय रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.

सध्या भारतात 15 वंदे भारत रेल्वे चालवल्या जातात. वंदे भारत रेल्वे ही शताब्दी रेल्वेचा पर्याय म्हणून पाहिली जाते.

रेल्वेच्या इंजीनमध्ये सँड बॉक्स का असतं?

रेल्वेच्या इंजीनमध्ये चाकांच्या जवळ सँड बॉक्स लावलेले असतात. सँड बॉक्सचा कंट्रोल रेल्वे चालकाकडे असतो.

डोंगराळ किंवा तीव्र उतार असलेल्या भागात पावसानंतर चाक घसरण्याची शक्यता असते. अशा स्थितीत गरज भासल्यास घर्षण वाढवण्यासाठी सँड बॉक्समधील वाळू खाली टाकली जाते. यामुळे रेल्वेला ब्रेक लावून थांबवण्यासाठी किंवा चढाई करताना त्यासाठीही मदत मिळते.

कोणत्या रेल्वेप्रवासासाठी तिकिटाची आवश्यकता नाही?

पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर असलेल्या भाक्रा आणि नांगलदरम्यान एक रेल्वे चालवली जाते. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकिटाची आवश्यकता नसते.

या दोन स्थानकांमधील अंतर 13 किलोमीटर असून यामधून प्रवासी मोफत प्रवास करू शकतात.

एकाच ठिकाणी दोन स्टेशन कुठे आहेत?

महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन असल्याचं पाहायला मिळतं.

याठिकाणी रेल्वे मार्गाच्या एका बाजूला श्रीरामपूर स्टेशन आहे, तर दुसऱ्या बाजूला बेलापूर स्टेशन आहे. हे दोन्ही स्टेशन मध्य रेल्वेच्या अखत्यारित आहेत.

दोन राज्यांमध्ये असलेलं स्टेशन कोणतं?

भारतात पश्चिम रेल्वेच्या अखत्यारित असलेलं नवापूर रेल्वे स्टेशन दोन राज्यांमध्ये वसलेलं आहे.

हे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. या रेल्वे स्थानकावर इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये उद्घोषणा केली जाते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)