रिंकू सिंगचे 5 विक्रमी षटकार; कोलकाताचा अविश्वसनीय विजय

फोटो स्रोत, रिंकू सिंग, रशीद खान, गुजरात, कोलकाता
उत्कंठावर्धक सामना काय असू शकतो याचं चपखल उदाहरण ठरलेल्या सामन्यात रिंकू सिंगने शेवटच्या षटकात 29 धावांचं लक्ष्य पेललं. रिंकूने पाच चेंडूत पाच षटकार लगावत कोलकाताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
कोलकाताला विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. शेवटच्या षटकात त्यांना 29 धावांची आवश्यकता होती. गुजरात टायटन्सतर्फे यश दयाळला गोलंदाजी देण्यात आली. रिंकू सिंगचे इरादे मात्र वेगळेच होते. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिला.
पुढच्या पाच चेंडूवर रिंकूने मैदानाच्या विविध भागात षटकारांची आतषबाजी करत गुजरातचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या चेंडूवर रिंकूने षटकार लगावला आणि कोलकाताच्या खेळाडूंनी मैदानात धाव घेतली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
“मला विश्वास होता की हे मी करु शकतो. गेल्या हंगामात लखनौविरुद्ध अशीच खेळी केली होती. उमेश यादवने स्ट्राईक दिला तेही महत्त्वाचं होतं. मी फार विचार केला नाही. जसा चेंडू येईल त्याप्रमाणे मारत गेलो. यश दयाळने टाकलेला शेवटचा चेंडू चांगला होता. बॅक ऑफ द हँड चेंडू होता. चेंडू बॅटच्या मधोमध लागला. मी स्वत:वर विश्वास ठेवत षटकार लगावला”, असं रिंकू सिंगने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
“रिंकूने गेल्यावर्षीही अशाच पद्धतीची खेळी केली होती. त्यामुळे तो हे आव्हान पेलू शकतो असा विश्वास होता. गेल्या वर्षी अशा स्वरुपाच्या लढतीत आम्ही जिंकू शकलो नव्हतो. दुसऱ्या षटकारानंतर आम्हाला आणखी खात्री वाटू लागली कारण यश दयाळची गोलंदाजी स्वैर होत होती. शेवटच्या षटकात 29 धावांचं लक्ष्य 100 पैकी एखाद्या सामन्यातच पार केलं जाऊ शकतं. हा तसा सामना होता. रशीद खानच्या हॅट्ट्रिकमुळे गुजरातने सामन्यात पुनरागमन केलं होतं. रिंकूच्या खेळीबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत”, असं कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा डोंगर उभारला होता. हार्दिक पंड्या खेळत नसल्यामुळे संधी मिळालेल्या विजय शंकरने 24 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी केली. साई सुदर्शनने 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली. शुबमन गिलने 31 चेंडूत 39 धावा केल्या. कोलकातातर्फे सुनील नरिनने सर्वाधिक 3 विकेट्स टिपल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांची 28/2 अशी स्थिती होती. कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 100 धावांची भागीदारी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या नितीश राणाला अल्झारी जोसेफने बाद केलं. त्याने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली.
राणा बाद होताच वेंकटेश अय्यरने सामन्याची सूत्रं हाती घेतली. वाढत्या धावगतीचं दडपण असल्यामुळे वेंकटेशला मोठे फटके लगावणं भाग होतं. जोसेफच्या गोलंदाजीवर असाच एक वेंकटेशचा प्रयत्न गिलच्या हातात जाऊन विसावला. वेंकटेशने 40 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांसह 83 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वेंकटेश बाद झाल्यानंतरही कोलकाताकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू होते. पण यानंतर रशीद खानने हॅट्ट्रिक नोंदवत सामन्याचं पारडं पालटलं.
रशीद खानची हॅट्ट्रिक
विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्यांवर अचंबित करणारं सातत्य असलेल्या रशीद खानने आयपीएल 2023 स्पर्धेतली पहिली हॅट्ट्रिक घेतली. आंद्रे रसेल, सुनील नरिन आणि शार्दूल ठाकूर अशा वादळी खेळीसाठी प्रसिद्ध फलंदाजांना माघारी धाडत रशीदने विक्रमी हॅट्ट्रिक नोंदवली.
या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिक पंड्या खेळत नसल्याने रशीद खान गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करत आहे. रशीद खानच्या सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये कोलकाताच्या फलंदाजांनी 35 धावा लूटल्या. कोलकाताचा संघ विजयाकडे वाटचाल करतोय असं वाटत असतानाच रशीदने 17वं षटक टाकण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अवघ्या काही मिनिटात खेळाचा नूर पालटवण्याची क्षमता असलेल्या आंद्रे रसेलला रशीदने विकेटकीपर के.एस.भरतकरवी बाद केलं. रसेलने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावला. पंचांनी आऊट दिलं नाही. टायटन्स संघाने रिव्ह्यूचा निर्णय घेतला. रिप्लेत चेंडू बॅटची कड घेऊन गेल्याचं दिसलं. रशीद वि. रसेल मुकाबल्यात रशीदने बाजी मारली.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या चेंडूवर रशीदने सुनील नरिनला माघारी धाडलं. रशीदच्या फिरकीविरुद्ध स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न बदली खेळाडू जयंत यादवच्या हातात जाऊन विसावला.
तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी मागच्या सामन्यातील सामनावीर शार्दूल ठाकूर अवतरला. शार्दूलने त्या लढतीत तडाखेबंद अर्धशतक झळकावलं होतं. या सामन्यात मात्र रशीदच्या थांबून आलेल्या चेंडूचा अंदाज शार्दूलला आला नाही आणि चेंडू शार्दूलच्या पॅडवर जाऊन आदळला. पंचांनी आऊटचा कौल दिला आणि टायटन्सच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. शार्दूलने रिव्ह्यू घेतला मात्र रिप्लेतही बाद असल्याचंच स्पष्ट झालं आणि टायटन्सच्या खेळाडूंनी रशीदचं टाळ्यांच्या गजरात कौतुक केलं.
आयपीएल स्पर्धेतली ही 22वी हॅट्ट्रिक आहे. गुजरात टायटन्स संघातर्फेही ही पहिलीच हॅट्रिक आहे. रशीद खानचीही आयपीएल स्पर्धेतही ही पहिलीच हॅट्ट्रिक आहे.
18व्या षटकात शमीने केवळ 5 धावा देत कोलकातासाठी विजय कठीण केला. 19वं षटक आयर्लंडच्या जोशुआ लिट्लने टाकलं. त्याच्या षटकात कोलकाताने 14 धावा वसूल केल्या. रिंकू सिंगने या षटकात पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार आणि चौकार लगावत इरादे स्पष्ट केले होते.
मात्र तरीही शेवटच्या षटकात कोलकाताला 29 धावांची आवश्यकता होती. उमेश यादवने तत्परतेने स्ट्राईक रिंकू सिंगला दिला आणि त्याने एकामागोमाग एक 5 षटकारांची आतषबाजी करत अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला. रिंकूने 21 चेंडूत एक चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 48 धावांची संस्मरणीय खेळी केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








