You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उमेश किल्लू : धारावीतला मुलगा बनला लष्करात लेफ्टनंट, 'माझ्या चाळीसाठी अभिमानाची गोष्ट'
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कितीही कठीण परिस्थिती असो, पण तुमच्या जवळ जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही तुमचं ध्येय नक्कीच गाठू शकता असं म्हटलं जातं. पण याचं साक्षात उदाहरण उमेशच्या रूपाने पाहायला मिळालं आहे.
चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये शनिवारी (9 मार्च) उमेशने आपलं स्वप्न तर साकार केलंच पण त्याचवेळी तो अनेकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.
धारावीच्या सायन-कोळीवाडा झोपडपट्टीत जन्मलेला उमेश आता 'लेफ्टनंट उमेश किल्लू' झाला आहे.
काही दशकांपूर्वी किल्लू कुटुंब आपले नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आले होते. आज त्या सर्वांच्या कष्टाचे चीजच जणू उमेशने केले आहे.
उमेशचं स्वप्न पूर्ण होताना त्याला पाहण्यासाठी त्याचं मुंबईवरून चेन्नईला गेलं होतं. त्याची मोठी बहीण, भाऊ, मामा, काका, मावशी, आई सगळे तिथे आले होते पण आपल्या मुलाला सैन्यात अधिकारी झालेलं पाहायला त्याचे वडील दिलीराव किल्लू हे मात्र तिथे उपस्थित नव्हते.
काही महिन्यांपूर्वीच त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. 2013 ला पक्षाघाताचा झटका आल्यानंतरउमेशनेच आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलली होती.
वडिलांच्या निधनानंतरही खचून न जाता आयुष्यात अनेक संकटांशी दोन हात केलेले उमेश चेन्नईला गेले, लष्कराचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज लेफ्टनंट उमेश किल्लू बनले.
स्वप्न बघणाऱ्या पण परिस्थितीने हताश झालेल्या प्रत्येकाने लेफ्टनंट उमेश किल्लूचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जाणून घेतलाच पाहिजे.
धारावीत जन्म, शिक्षण आणि अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास
धारावीच्या झोपडपट्टीत जन्माला आलेल्या लेफ्टनंट उमेश किल्लूसाठी आयुष्य कधीच सोपं नव्हतं. उमेशचे वडील दिलीराव किल्लू हे एक पेंटर होते.
हे काम करून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैश्यातून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.
अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न केले. पण नियतीला किल्लू कुटुंबीयांचं आयुष्य आणखीन खडतर करायचं होतं.
2013 मध्ये उमेशच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आला आणि कुटुंबासाठी पैसे कमवण्याची जबाबदारी तरुण उमेशच्या खांद्यावर आली.
आपला शैक्षणिक प्रवास सांगताना लेफ्टनंट उमेश किल्लू यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "सायन कोळीवाड्यातल्या छोट्याशा खोलीत मी लहानाचा मोठा झालो.
माझ्या वडिलांनी त्याही परिस्थितीत मला बारावीपर्यंत शिकवलं आणि पुढे मग शिष्यवृत्ती मिळवून, सायबर कॅफेमध्ये पार्ट-टाइम नोकरी करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं.
आधी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीत मी शिकलो शाळेत झालं. त्यानंतर मी बी. एस्सी. आयटी केलं आणि त्यानंतर दोन वर्षांचा गॅप घेऊन माटुंग्याच्या गुरुनानक कॉलेजमधून कम्युटर सायन्समध्ये एम. एस्सी. केलं.
मी पदवीचं शिक्षण घेत असताना एनसीसी जॉईन केलं.
एनसीसी झाल्यानंतर मी सर्विस सिलेक्शन बोर्डाची तयारी करत होतो. एम. एस्सी केल्यानंतर एसएसबीच्या तांत्रिक पदांसाठी माझी निवड झाली. मी तेराव्या प्रयत्नात यशस्वी झालो.
एसएसबीची तयारी करत असताना मी टाटा कन्सल्टन्सीमध्ये नोकरी करत होतो. नोकरी करत करतच मी माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर माझी चेन्नईच्या अकादमीत निवड झाली.
माझ्या एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी मी चेन्नईला यायला निघालो. माझ्या वडिलांना माझी निवड झाल्याचं सांगितलं. चेन्नईला जाण्यासाठीचं तिकीट काढलं आणि ज्या दिवशी मला जॉईन व्हायचं होतं त्याच्या एक दिवस आधी माझ्या बाबांचा मृत्यू झाला.
वडिलांच्या मृत्यूनंतर चेन्नईला प्रशिक्षणासाठी जाणं माझ्यासाठी खूपच अवघड होतं. पण याकाळात अकादमीतल्या प्रशिक्षक आणि मित्रांनी मला खूप मदत केली.
वडिलांच्या मृत्यूचं दुःख विसरून चेन्नईच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात मला त्यांची खूप मदत झाली."
लष्करात अधिकारी होऊन मला कुटुंबाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती
धारावीजवळच्या एका चाळीत बालपण घालवलेल्या उमेशला चेन्नईच्या लष्करी प्रशिक्षण अकादमीत जाण्याचा मार्ग कसा दिसला? याबाबत बोलताना उमेश म्हणाले की, "धारावीत सैन्य आणि सैन्यात मिळणाऱ्या नोकऱ्यांची जास्त कुणाला माहिती नसते.
पण माझा चुलत भाऊ सैन्यात कारकून म्हणून काम करतो. तर मी त्याला भेटायचो तेंव्हा विचारायचो की सैन्यात कसं भरती व्हायचं? अधिकारी कसं व्हायचं?
मला खेळाची आवड होती. त्यामुळे मी अशा एका नोकरीच्या शोधात होतो जिथे माझ्या कुटुंबासोबतही मी जगू शकेन, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मला भाग घेता येईल आणि प्रतिष्ठाही मिळेल. त्यामुळे मी हीच नोकरी मिळवण्याचा निश्चय केला होता.
मला वाटतं मी ज्या परिसरात राहतो तिथला मी पहिला अधिकारी असेन. माझ्या चाळीसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
सध्या खूप बेरोजगारी आहे. माझ्याकडे बघून धारावी, सायन कोळीवाड्यातली मुलं सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित होतील असं मला वाटतं.
एवढंच सांगेन की तुम्ही गरीब असाल तरीही तुमच्याकडे जर तुमची स्वप्नं असतील तर नक्कीच ती स्वप्नं पूर्ण करण्याचा मार्गही तुम्हालाच शोधावा लागतो."
पीआरओ डिफेन्स मुंबई यांनी सोशल मीडिया एक्स वर लेफ्टनंट किल्लूच्या यशाचे कौतुक करत त्याचा परेडमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
उमेश किल्लू यांच्यासारख्या तरुणांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असून. कितीही संकटं आली तर निव्वड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं हेच लेफ्टनंट उमेश किल्लू यांच्याकडून शिकता येईल.