सलमान खानच्या मानलेल्या सयामी जुळ्या बहिणी सध्या काय करतात?

- Author, चंदनकुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, पाटणा (बिहार)
भले ही ते फोटो आज लोकांच्या लक्षात नसतील पण सबा आणि फराहच्या मनात त्या आठवणी आजही ताज्या आहेत. 17 वर्षांपूर्वी सलमान खानने पाटण्यातल्या या सयामी जुळ्या बहिणींना मुंबईत बोलावून त्यांच्याकडून राखी बांधून घेतली होती.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान बरोबर या दोघी बहिणी कॅरमबोर्ड खेळल्या होत्या. सलमान खानच्या या मानलेल्या बहिणींना त्यावेळेस मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
आज इतकी वर्षे उलटली, सगळ्या गोष्टी बदलल्या. पण सबा आणि फराहचं आयुष्य जसं होतं तसं आजही सुरूच आहे, त्यात काडीमात्र बदल झालेला नाहीये. जन्मल्यापासून आजतागायत दोन्ही बहिणी सतत आजारी पडत असतात, पण आज त्यांची विचारपूस करायला कोणी येत नाही. त्यांची खबरबात काढायला न मीडिया त्यांच्याकडे जातो न कोणी डॉक्टर.
सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून ते रात्री पलंगावर झोपेपर्यंत जे काही सामान्य माणूस अगदी सहज करतो, तसं काही या दोघींना शक्य नाहीये. जगण्याशी निगडित प्रत्येक एका गोष्टीसाठी पहिल्यांदा त्यांना त्यांच्या शरीराशी स्पर्धा करावी लागते.
दोन वेगवेगळी शरीरं, दोन आत्मा, दोन तोंड असूनही दोघी एकच आहेत. दोघीही एकाचवेळी उभ्या राहतात, एकत्र जेवतात, आणि एकत्र झोपतात. अंघोळ करताना, कपडे बदलताना, जेवण करताना त्यांना ज्या अडचणी येतात ते समजून घेणं फार अवघड आहे. साधं पाणी पिणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान असल्यासारखं आहे.
शारीरिक आव्हाने आणि आजार
सध्या बिहारमध्ये थंडी वाढलीय. आजकाल या दोघींची तब्येत नरम गरम असते. या थंडीत त्यांच्या हात-पायांचे सांधे दुखू लागलेत. यात त्यांना उठाबसायला त्रास होतोय. ना त्यांना नीट भूक लागते, ना त्यांना नीट झोप येते.
थोडं बोललं की त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो. त्या थोडं पलंगावर पडण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला फराहने पलंगावर अंग टाकलं, त्यामुळे इकडे सबाला थोडा त्रास झाला. पण सबानेही जरा कष्ट घेत पलंगावर अंग टाकलं.
एवढं सोपं काम करतानाही सबा आणि फरहाला जो त्रास होतो ते पाहणं सोपं नाही. एवढंच पाहिलं की, प्रश्न पडतो, या संपूर्ण दिवस कसा घालवत असतील. एकीला झोपावेसं वाटत असेल तर दुसरीलाही झोपावच लागतं.

एकीला बसावं वाटलं की, दुसरीला पण नाईलाजाने बसावं लागतं. एकीला टीव्ही पाहायचा असेल तर दुसरीला भिंतीकडे बघावं लागतं. अंग रेलून, किंवा झोपून टीव्ही पाहणं त्यांना शक्य नाही.
सबा सांगते की, पूर्वी त्या बराच वेळ टीव्ही पाहायच्या, पण आजकाल त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे टीव्ही समोर तासभर बसणं सुद्धा होत नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका बहिणीला वेदना होत असतील तर दुसऱ्या बहिणीलाही त्या जाणवतात. आणि लहानपणापासूनच हे त्यांच्यासोबत घडतंय.
अशी जुळी मुलं फार कमी आहेत
2005 साली सबा आणि फराह नावाच्या दोन जुळ्या मुलींना उपचारासाठी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्यावेळेस या दोघी बहिणी चर्चेत आल्या होत्या.
त्यावेळी अबुधाबीचे प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांच्या ऑपरेशनचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली होती.
या बहिणींना पाहण्यासाठी अमेरिकेचे न्यूरोसर्जन बेंजामिन केर्सन दिल्लीत आले होते. दोन बहिणींना वेगळं करणं खूप गुंतागुंतीचं होतं.
दोघींच्या बऱ्याच महत्वाच्या नसा जोडल्या गेल्या होत्या. तर सबाच्या शरीरात किडनी नव्हती. त्यामुळे तिला किडनी ट्रान्सप्लांट करणं गरजेचं होतं.

फोटो स्रोत, PRAKASH RAVI
हा ऑपरेशनचा धोका पत्करणं योग्य नसल्याचं त्यावेळेस या दोघींच्या कुटुंबियांना वाटलं.
सबाचे भाऊ मोहम्मद तमन्ना सांगतात, "या ऑपरेशनमुळे दोघींचा जीव धोक्यात आला असता. एकीच्या तर वाचण्याची 10 टक्के शक्यताही नव्हती. आम्ही आजही ऑपरेशन करायला तयार नाहीये."
डॉक्टरांच्या मते, अशा जुळ्या मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या जगण्याची शक्यता फक्त 5 ते 25 टक्के इतकीच असते.
त्यातल्या त्यात मुलींच्या जगण्याची शक्यता मुलांपेक्षा जास्त असते. अशा प्रकरणांच्या ज्या नोंदी उपलब्ध आहेत त्यानुसार, जी 600 जुळी मुलं जिवंत आहेत त्यात 70% मुली होत्या.
सर्वोच्च न्यायालयाचा आधार
सबा आणि फराह यांची गंभीर स्थिती बघून सर्वोच्च न्यायालयाने 21 ऑगस्ट 2012 रोजी चौकशीचे आदेशही दिले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांची तपासणी करण्यासाठी एम्सचं एक पथक पाटण्यात दाखल झालं होतं.
एम्सने जो अहवाल तयार केला होता तो न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर एप्रिल 2013 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने सबा-फरहा यांच्या नियमित तपासणीचे आणि देखरेखीचे आदेश दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही बहिणींच्या नियमित तपासणीचे आदेश पाटणा मेडिकल कॉलेजला देण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात राज्य सरकारला या दोघी बहिणींच्या देखभालीसाठी दरमहा पाच हजार रुपये देण्याचेही आदेश दिले होते. सरकारने ही रक्कम वाढवून 20 हजार रुपये केली होती.
सबाचे भाऊ मोहम्मद तमन्ना बीबीसीशी बोलताना सांगतात, "आम्हाला राज्य सरकारकडून दरमहा 20,000 रुपये मिळतात. त्याबाबत आमची कोणतीही तक्रार नाही. सुरुवातीला एम्सची टीम यायची, नंतर पीएमसीएचची टीम यायला लागली. पण कोविड नंतर तर त्यांनीही येणं बंद केलंय."

फोटो स्रोत, Getty Images
सबा आणि फराहच्या नियमित तपासण्यांबाबत जाणून घेण्यासाठी बीबीसीने बिहार सरकारशी संपर्क साधला.
पण चार दिवस उलटून गेले तरी सरकारकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता. शेवटी सोमवारी संध्याकाळी उशिरा पाटणा मेडिकल कॉलेजने माहिती दिली की, सबा आणि फरहाच्या तपासणीसाठी एक टीम तयार असून शुक्रवारी (9 डिसेंबर) ती तपासणीसाठी जाईल.
सबा सांगते की, पीएमसीएच टीम येत नसल्यामुळे आम्ही एम्सशीही संपर्क केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आजही सबा आणि फराहची केस लक्षात आहे. हॉस्पिटलच्या जनसंपर्क विभागाने डॉक्टरांशी बोलून घेतलं आणि माहिती देताना सांगितलं की, बऱ्याच वर्षांपूर्वी हे प्रकरण त्यांच्याकडे आलं होतं, पण नंतर हे लोक तिथे गेलेच नाहीत.
तर दुसरीकडे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एम्सचे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा सुद्धा सांगतात की, "हो, मला या दोघी बहिणी आठवतात. त्यांची केस खूपच कॉम्प्लिकेटेड होती. त्या दोघींच्याही जीवाला धोका होता म्हणून पालकांनी ऑपरेशन करायला नकार दिला."
सबा आणि फराहची स्वप्नं
देवाने सबा आणि फरहाला असं शरीर दिलंय की त्या स्वतःहून घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे ना त्या कधी शाळेत गेल्या ना कधी एखादं औपचारिक प्रशिक्षणही घेऊ शकल्या.
बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांना घरी शिकवण्याचा प्रयत्न झाला, पण तो फार काही यशस्वी झाला नाही. फराह संगते, "मला शिक्षिका व्हायचंय आणि सबाला डॉक्टर. आधी आम्ही लिहा-वाचायचो. पण आता दोन वर्ष झाली सगळंच बंद आहे. आमच्या हातापायाचं दुखणं वाढतंय."
एवढ्या सगळ्या अडचणी असूनही त्या दोघी एकसारखाच विचार करतात. सबा सांगते, "आमचं एकच स्वप्न आहे, आम्हाला मुकेश अंबानींना भेटायचं आहे. आम्ही सलमान खानला भेटलोय, पण आम्हाला त्याला पुन्हा भेटायचंय."
सबा आणि फराह यांनी दोघींचही मतदान ओळखपत्र बनवून घेण्यासाठी संघर्ष केलाय. नंतर निवडणूक आयोगानेही त्यांना वेगवेगळी ओळखपत्रं दिली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही दोघांनी वेगवेगळं मतदान केलंय. आता तर त्या दोघींनाही निवडणूक लढवायची आहे. निवडणूक जिंकून सरपंच होण्याची दोघींचाही इच्छा आहे. नुसतं निवडणूक लढवण्याचं नाव जरी घेतलं तरी दोघींच्या चेहऱ्यावर हसू येतं.
त्यांना कुठल्या गावचं सरपंच व्हायचंय हे माहीत नाही, पण एकदा तरी निवडणूक लढवून जिंकायची आहे. पण आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक आव्हान बघता निवडणूक लढवणं त्यांच्यासाठी सोपं नाहीये.
दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाला फक्त एखादा डॉक्टर हवाय जो पाटण्यात येऊन दोन्ही बहिणींची तपासणी करेल.

कुटुंबाला भविष्याची चिंता
सबा-फरहाची आई राबिया खातून आमच्याशी बोलल्या नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलींसाठीची चिंता दिसून येत होती.
तर वडील मोहम्मद शकील पाटणा स्टेशनजवळ फूड स्टॉल लावतात.
आम्ही गेलो होतो तेव्हा ते घरी नव्हते. त्यांचं नाव मोहम्मद शकील, त्यांना सात मुली आणि एक मुलगा आहे.
सबा-फरहाचे भाऊ मोहम्मद तमन्ना सांगतात, "रुटीन चेकअपसाठी दोघींना घेऊन जाणं आमच्यासाठी सोपं नाहीये. आमची अशी इच्छा आहे की, यांची नियमित तपासणी व्हावी, आणि भविष्यात त्यांना कोणतंही काम करताना अडचण येऊ नये."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








