राजकारण्यांच्या चित्रविचित्र अंधश्रद्धांचे 7 किस्से

- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एकनाथ शिंदे हे ज्योतिषाच्या भेटीला गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे हे त्यांचे आणि सरकारचे भवितव्य काय हे पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ईशानेश्वर मंदिरात गेले होते, अशी टीका त्यांच्यावर झाली.
ईशानेश्वर मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक खरात हे ज्योतिषी आहेत. त्यांच्याकडून शिंदेंनी मार्गदर्शन घेतले असे म्हटले जात आहे.
सरकार मंत्र-तंत्रात अडकले आहे अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. तर शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री ज्योतिषाला भेटण्यासाठी गेले असं म्हणणे हे अयोग्य आहे.
ईशानेश्वर येथे नवीन गोशाळेची निर्मिती होत आहे, ती पाहण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. त्यांना जर भविष्य पाहायचं असतं तर ते मुंबईला पाहता आलं नसतं का असा सवाल केसरकर यांनी केला. जर अशोक खरात हे भविष्य पाहत असतील तर त्यांना भेटणारी प्रत्येक व्यक्तीच भविष्य पाहण्यासाठी जाते असे म्हणणे दुर्दैवी आहे असं केसरकर यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंनी देखील यावर आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली, ते म्हणाले की आमचं सरकार चांगलं काम करत आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे असली टीका आमच्यावर केली जात आहे.
"जर माझ्यात आत्मविश्वास नसता, माझा आत्मविश्वास डळमळीत झाला असता तर 50 आमदार आणि 13 खासदार माझ्यासोबत आले असते का. ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना आम्ही 30 जून रोजीच दाखवला," शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंनी आपल्या बंडाची आठवण करून देत आपण उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला होता यावर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांच्या ईशानेश्वर मंदिरातील भेटीमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कडाडून टीका केल्याचे दिसत आहे. या निमित्ताने राजकारणी आणि त्यांचे भविष्य प्रेम तसेच त्यांचे बाबा प्रेम यांची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. राज्यातील तसेच देशातील काही गमतीशीर किस्से आपण त्यानिमित्ताने पाहू.
1.के. चंद्रशेखर राव आणि त्यांचे ज्योतिषशास्त्रावरचे प्रेम
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचं ज्योतिषशास्त्रावरचं, अंकशास्त्रावरचं प्रेम लपून राहिलेलं नाही. चंद्रशेखर राव यांच्या कारच क्रमांक हा 6666 असा आहे. त्यांच्या ताफ्यात याच क्रमांकाच्या अनेक गाड्या पाहायला मिळतात. के. चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले . 13 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली.
नियोजित वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता शपथविधी होणार होता. पण मुख्यमंत्र्यांनी चार मिनिटांनी नंतर शपथ घेतली. कारण, त्यांचे ज्योतिष आणि लक्ष्मी नारायण स्वामी मंदिराचे प्रमुख पुजारी लक्ष्मी धर्माचार्य यांनी सांगितलं होतं की हाच चांगला मुहूर्त आहे. या मुहूर्त राजयोगाचा मुहूर्त आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांनी त्या वेळेनुसार शपथ घेतल्याची चर्चा सुरू होती.

फोटो स्रोत, Getty Images
के. चंद्रशेखर राव यांचं ज्योतिषशास्त्र प्रेम एवढ्यावरच थांबत नाही. त्यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत त्यावर ज्योतिषशास्त्राचा प्रभाव असल्याची ओरड त्यांचे विरोधक नेहमी करताना दिसतात. त्यांच्या या हट्टापायी तेलंगणा सचिवालयाची चांगली इमारत असताना सुद्धा ते कोट्यवधी रुपये खर्चून वास्तूशास्त्राप्रमाणे नवीन इमारत बांधून घेत असल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी केली होती. चांगलं सचिवालय असताना के. चंद्रशेखर राव तिथे बसत नाहीत अशी टीका अमित शाह यांनीच केली होती. तर काही दिवसांपूर्वीच के. चंद्रशेखर राव यांनी पक्षाचे नाव तेलंगणाचे राष्ट्र समिती बदलून भारत राष्ट्र समिती केले आहे. तांत्रिकाच्याच सांगण्यावरून पक्षाचे नाव बदलल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते.
2. नरेंद्राचार्य स्वामी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट
2016 साली मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्राचार्य महाराजांची रत्नागिरी येथे भेट घेतली होती. ही भेट वादग्रस्त ठरली होती. नरेंद्राचार्यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे. राज्यघटनात्मक पदावरील व्यक्तीनेच असे वक्तव्य केल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. "आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. राजसत्तेमध्ये कुणावर तरी राज्य करतो असा भाव आहे. कुणी तरी राजा आणि कुणी तरी प्रजा असा भाव आहे. धर्मसत्तेमध्ये एकच भाव आहे आणि त्यागाचा भाव आहे," असे फडणवीस म्हणाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
नरेंद्र महाराजांचे नाव गैरव्यवहारात अडकलेले असताना त्यांना मुख्यमंत्री कसे भेटले अशी प्रतिक्रिया अंनिसच्या मुक्ता दाभोलकरांनी दिली होती. "हिंसा आणि गैरव्यवहार प्रकरणात नरेंद्र महाराजाचा नावं याआधीही पुढे आलंय. एवढंच नाहीतर या महाराजांची चमत्कार करण्याचा दावा केला होता. अशा महाराजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणे याचा खेद वाटतो," असं मुक्ता दाभोलकर म्हणाल्या होत्या.
3.फडणवीसांचे मिरची हवन
दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मिरची हवन केलं होतं असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या चेकमेट- हाऊ बीजेपी विन अॅंड लॉस्ट या पुस्तकात म्हटलं होतं. त्यानंतर फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. मध्य प्रदेशच्या नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हे हवन करून घेतले होते.
उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार या 'मिरची हवन'मुळे वाचल्याचे फडणवीसांना सांगण्यात आले होते. त्यानुसार फडणवीसांनी हे हवन केले होते.
मिरची हवन करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचं जॅकेट घातले होते, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
4. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सत्य साईबाबाचं स्वागत
हवेतून लाडू-पेढेच काय पण सोन्याचे नेकलेस काढून आपल्या भक्तांना दिल्यामुळे सत्य साईबाबांचा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी नेहमी निषेध केल्याचं दिसतं.
तामिळनाडूतील सत्य साईबाबा यांचा भक्त परिवार मोठा आहे. सचिन तेंडुलकर पासून ते शिवराज पाटील चाकूरकरांपर्यंत त्यांचे भक्त आहेत. सर्व पक्षांचे नेत्यांचा त्यांच्या भक्त मंडळीत समावेश होतो. अशोक चव्हाण हे देखील सत्यसाईबाबांचे भक्त आहेत. 2009 मध्ये ते मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर म्हणजेच शासकीय निवासस्थानी सत्य साईबाबा आले होते.

फोटो स्रोत, SaibabaofIndia
सत्य साईबाबांच्या भक्त मंडळीत विलासराव देशमुख, जयंत पाटील, डी. वाय पाटील यांचाही समावेश असल्याचे साईबाबा फाउंडेशनच्या वेबसाइटने म्हटले होते. विलासराव देशमुख हे सत्य साईबाबांचे भक्त होते आणि त्यांनी आपल्या घरी सत्य साईबाबांचे आदरातिथ्य केले होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते नरेंद्र दाभोलकर यांनी पुरस्कार नाकारला होता.
5.चंद्रास्वामी आणि देश-विदेशातले पंतप्रधान
जेव्हा ही महाराज, बुवा, बाबा यांचा विषय येतो तेव्हा चंद्रास्वामींचा विषय निघणे हे अपरिहार्य आहे. याचे कारण म्हणजे केवळ भारतालेच राजकारणी नाही तर मार्गारेट थॅचर पर्यंत त्यांची उठबस होती.
पी. व्ही. नरसिंहराव आणि चंद्रशेखर यांचे ते निकटवर्तीय होते. हिंदुस्तान टाइम्सचे संपादक रामरूप गुप्त हे ज्योतिषी होते त्यांच्याकडून चंद्रास्वामी हे मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या कुंडल्या बनवून घेत असत आणि त्यांच्याशी जवळीक साधत असत.
कुणालाशी चटकन जुळवून घेता येण्याचं कसब त्यांच्याकडे होतं त्या जोरावर ते राजकीय वर्तुळात गेले आणि बघता बघता अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर प्रभाव टाकणारे धर्मगुरू बनले.
लांब दाढी, पिवळे वस्त्र आणि रुद्राक्ष माळा यामुळे चंद्रास्वामी यांच्या व्यक्तिमत्वाकडे लोक आकर्षित होऊ लागले.
प्रसिद्ध इतिहासकार पैट्रिक फ्रेंच यांनी 'इंडिया-ए पोर्ट्रेट' यामध्ये चंद्रास्वामी यांच्याबद्दल लिहिले आहे, "ते काही सभ्य नव्हते पण त्यांच्यात दुसऱ्याला जिंकण्याचे कौशल्य होते. त्यांना इतरांच्या उणीवा कळायच्या...विशेषत: अशा लोकांच्या जे शक्तीशाली होते. अशा लोकांना पैसे आणि ताकद असल्याने लोक आपला विश्वासघात करतील अशी भीती वाटायची."

विशेष बाब म्हणजे चंद्रास्वामी यांना इंग्रजी वाचता आणि बोलता येत नव्हते. पण तरीही जगभरातील अनेक देशांच्या शक्तीशाली सत्ताधाऱ्यांवर त्यांचा प्रभाव होता. माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांनी आपल्या 'वॉकिंग विद लायन्स' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "1979-80 मध्ये पॅरिसमध्ये ते उपचार घेत होते. त्यावेळी चंद्रास्वामी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या फिजिशियनसोबत मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितले, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी ते थेट युगोस्लाव्हियाहून आले होते. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी आपलं खासगी विमान चंद्रास्वामी यांच्यासाठी पाठवलं होतं." चंद्रास्वामी यांनी मार्गारेट थॅचर या पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती, जी नंतर खरी ठरली. केवळ ब्रिटिश पंतप्रधानच नव्हे तर ब्रुनेईचे प्रमुख, बहारीनचा शासकसुद्धा चंद्रास्वामींचे भक्त झाले. एका बाजूला तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे ते अत्यंत जवळचे सल्लागार मानले जात होते आणि दुसऱ्या बाजूला राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
6.ज्योतिरादित्य शिंदेंची लिंबू मिरच्यांची माळ
आता भाजपमध्ये असलेले आणि एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या गळ्यात थेट लिंबू मिरच्यांचा हार घातला होता. त्यांच्या या कृत्याची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. आपल्या विरोधकांची नजर लागू नये म्हणून ज्योतिरादित्यांनी हे केलं होतं असं काही जण म्हणत होते तर माझ्या गळ्यात ज्यांनी जी माळा टाकली ती मी स्वीकारली असं ज्योतिरादित्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या विरोधकांनी तर असं देखील म्हटलं होतं की जेव्हा दुकान चालत नसतं तेव्हा लिंबू मिरच्यांचा हार घातला जातो सिंदियाजींनाही कुणीतरी बहुतेक हेच सांगितलेलं दिसतंय की गळ्यात लिंबू-मिरचीचा हार घाला म्हणजे तुमची राजनीती चालेल.
ज्योतिरादित्यांनीम्हटले होते की जोपर्यंत मी भाजपची सत्ता घालवणार नाही तोपर्यंत मी फुलांचा हार स्वीकारणार नाही. त्यानंतर लोक कधी मला सुताचा हार घालत आहेत, कधी लिंबू मिरचीचा हार. ते जे देत आहेत ते मी स्वीकारत आहेत.
7.'विधिमंडळाची इमारत स्मशानावर आहे'
राजस्थान विधानसभेतील आमदार किर्ती कुमारी आणि कल्याण सिंह यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर 2018 मध्ये भाजपच्या आमदारांनी ही मागणी केली होती की विधिमंडळाचे शुद्धीकरण करावे. ही इमारत स्मशानावर उभी आहे. त्यामुळे इथे भुताखेतांचा वास आहे. शुद्धीकरण केल्यानंतर असे आकस्मिक मृत्यू होणार नाहीत अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली होती. होम हवन करून शुद्धीकरण केलं आणि यथायोग्य दानधर्म केलं तर भुतं आणि आत्मे पळून जातील असं या आमदारांचं म्हणणं होतं. विधिमंडळाच्या सचिवांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते मी तर रात्रीपर्यंत इथे थांबतो मला कधी इथं भुतंखेतं जाणवली नाहीत. आमदारांची काळजी निरर्थक आहे असं तत्कालीन सचिव पृथ्वीराज म्हणाले होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निषेध

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध केला आहे. "मुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर आले असतांना मिरगांव ( सिन्नर) येथील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याची चर्चा आहे. ते खरे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहिर निषेध महाराष्ट्र अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसुन थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास आम्ही एकवीस लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे," असं चांदगुडेंनी म्हटले आहे. सध्याच्या राजकारणात थेट धर्मगुरू किंवा उपदेशक येत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. जय सिद्धेश्वर स्वामी हे संन्यासी आहेत आणि सोलापूरचे खासदार आहेत. साक्षी महाराज, साध्वी प्रग्या हे थेट राजकारणात आहेत.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








