आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिवस : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात फरक काय आहे?

ज्योतिषशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप आणि नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

भारताच्या राजधानीत मंत्री ज्योतिषशास्त्रावर भाषणं देतात यावरून समाजाची पातळी खालवल्याची दिसते, असं नाशिक इथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांनी म्हटलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांनी हे विधान केलं होतं.

नारळीकरांच्या या विधानाआधीच काही महिन्यांपूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं (IGNOU) ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर देशभरात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि ही घोषणा आता नव्या वादाचं केंद्रही बनलीय.

IGNOU च्या स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज विभागाअंतर्गत मास्टर ऑफ आर्ट्स ज्योतिष (MAJY) असा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम असेल.

IGNOU ने या अभ्यासक्रमाची घोषणा केल्यानंतर अनेकांनी टीका केली, खिल्ली उडवली, तर काहीजणांनी समर्थनही केलं होतं. .

याल विरोध किंवा समर्थन का होतंय, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय असतं, दोन्हीकडे ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास असूनही खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात नेमका फरक का, अशा प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख आज (20 मार्च) आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिवसाच्या निमित्ताने पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

IGNOU चा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे?

सर्वप्रथम आपण IGNOU नं सुरू केलेल्या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असेल ते पाहूया.

IGNOU ने 23 जून 2021 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची घोषणा केली.

ज्योतिषशास्त्र

फोटो स्रोत, Twitter

स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज विभागाअंतर्गत हा दोन वर्षांच्या कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हिंदी आणि संस्कृत भाषेत हा अभ्यासक्रम शिकवला जाईल.

कुठल्याही अधिकृत विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण झालेले विद्यार्थी ज्योतिषशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात.

वाजपेयी सरकारमध्येही झाला होता वाद

ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्यावरून पहिल्यांदाच वाद झालेला नाही. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचं केंद्रात सरकार असतानाही अशाप्रकारचा वाद झाला होता.

वाजपेयी सरकारमध्ये मुरली मनोहर जोशी हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असताना म्हणजे, 2001 साली विद्यापीठ अनुदान आयोगानं 'वैदिक ज्योतिषशास्त्र' हा अभ्यासक्रम सुरू केला होता.

त्यावेळी अनेक शास्त्रज्ञांनी या निर्णयाचा विरोध केला होता. जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनीही उघडपणे विरोध केला होता.

ज्योतिषशास्त्र हे विज्ञान असू शकत नाही आणि ते विद्यापीठांमध्ये शिकवता कामा नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली मासिकाच्या 16 जून 2001 च्या अंकात डॉ. जयंत नारळीकरांनी याबाबत लेखही लिहिला होता.

अटलबिहारी वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अटलबिहारी वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी

डॉ. जयंत नारळीकर, प्रा. यशपाल यांसह अनेक शास्त्रज्ञांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर निर्णय मागेही घेण्यात आला.

मात्र, भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये ज्योतिषशास्त्र हा विषय आजही शिकवला जातो. मग नागपूरच्या रामटेकचं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ असो किंवा अन्य.

आता इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठानं (IGNOU) ज्योतिषशास्त्राचा विषय अभ्यासक्रमात आणल्यानं पुन्हा वाद सुरू झाला आहे.

ज्योतिषांची भूमिका काय आहे?

नाशिकमधील ज्योतिषी नरेंद्र धारणे यांच्याशी बीबीसी मराठीनं बाचतीच केली.

नरेंद्र धारणे यांच्या मते, "ज्योतिषशास्त्र हे अनादी काळापासूनच शास्त्र आहे. यावर कायम टीका होत आलीय. मात्र, समाजमन बाजूनं राहिलंय. सामान्य माणसापासून मंत्र्यांपर्यंत सगळेच ज्योतिषांचा सल्ला घेत असतात. त्यामुळे IGNOU ने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे."

ज्योतिषशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

"टीका करण्यापेक्षा अभ्यासक्रम म्हणून पाहावं. ज्यांना त्यात रस असेल, तेच शिकणार आहे. शिकण्याचं कुणावर बंधन तर नाहीय ना?" असं धारणे म्हणतात.

ज्योतिषशास्त्र शिकल्यास येणाऱ्या काळात तरुणांना रोजगारही निर्माण होऊ शकतो, असंही ते म्हणतात.

"जन्माची तारीख, वेळ, ठिकाण यांवरच कुंडल्या तयार केल्या जातात. त्यावरूनच ज्योतिष सांगितलं जातं. मग यात वैज्ञानिक कसं नाही?" असा सवाल धारणे करतात.

राज्यघटनेशी, वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत - अंनिस

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं IGNOU च्या निर्णयाला विरोध केला आहे.

"एका बाजूला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तरूणार्इला सोबत घेऊन चंद्राला किंवा मंगळाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि दुसर्‍या बाजूला इग्नूसारखं नामांकित विद्यापीठ समाजातल्या काही मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी तरूणार्इला ज्योतिषाची पदवी बहाल करीत समाजाला कडक मंगळ आणि शनिच्या साडेसातीत अडकवणार आणि सोडवणार असेल, तर ही कृती संविधानविरोधी आहे," अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मांडली आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

अविनाश पाटील पुढे म्हणतात, "जागतिक पातळीवर ज्योतिष विषयाला कोणताही शास्त्रीय आणि सैद्धांतिक आधार नाही. असा आधार नसणारा गैरलागू आणि विसंगत अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करु नये."

ज्योतिषशास्त्रासारखा अभ्यासक्रम सुरू करणं म्हणजे भारतीय राज्यघटनेत नागरिक कर्तव्य असलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या जबाबदारीशी विसंगत असल्याचं मतही अविनाश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात फरक काय?

ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोन्हींमध्ये ग्रह-तारे किंवा नक्षत्र यांसारख्या घटकांचा अभ्यास होतो, मग यात नेमका फरक आहे, हे बीबीसी मराठीनं दा. कृ. सोमण यांच्याकडून जाणून घेतलं.

दा. कृ. सोमण सांगतात, "खगोलशास्त्र म्हणजे विश्वाचा अभ्यास. ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास होय. तर ज्योतिष म्हणजे, याच गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो, असा दावा करणारा विषय आहे. मात्र, खगोलशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला वाटतं, ग्रह-ताऱ्यांचा असा कुठलाही परिणाम माणसावर होत नाही.

"ग्रह-तारे माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात, ही बऱ्याच लोकांची श्रद्धा असते. मात्र, श्रद्धा हा विषय विज्ञानात बसत नाही. त्यामुळे खगोलशास्त्राप्रमाणे ग्रह-तारे माणसाच्या आयुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठासारख्या ज्या संस्था आहेत, त्यांनी ज्योतिषशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात घेता कामा नये."

ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

तर नेहरू तारांगणचे संचालक आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे हे दोन्हीतील फरक स्पष्ट करताना सांगतात, "खगोलशास्त्र वैज्ञानिक आधारावर आहे. म्हणजे, खगोल विज्ञानात ग्रहांची निरीक्षणं घेतो आणि पुढच्या स्थितीचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ, ग्रहणाचं भाकित असेल. खगोलशास्त्रात भौतिकशास्त्रातील शोध लावले जातात. अशाप्रकारे खगोलशास्त्राचा अभ्यास होतो."

"मात्र, दुसरीकडे, फलज्योतिषशास्त्रात केवळ एकेकाळी मांडून दिलेल्या नियमांद्वारे भाकितं केली जातात. याच्या पलिकडे फलज्योतिषशास्त्रात संशोधनं होतं नाहीत," असं अरविंद परांजपे सांगतात.

ज्योतिषशास्त्राला वैज्ञानिक आधार आहे का?

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे सांगतात, "फलज्योतिष म्हणजे ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवरून पुढे काय होणार हे भाकित करणं. तर फलज्योतिषाला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. हे वैज्ञानिक नाही. अनेक अनेक प्रयोगातून सिद्ध झालंय की, फलज्योतिष हे विज्ञान नाहीय. त्यामागे बरीच कारणं आहेत."

याबाबत अरविंद परांजपे हे त्यांनी केलेल्या एका प्रयोगाची आठवण करून देतात.

ते सांगतात की, आम्ही ज्योतिषांना 100 पत्रिका दिल्या. त्यातल्या 50 पत्रिका सुदृढ किंवा सामान्य मुलांच्या आहेत आणि 50 पत्रिका दिव्यांग मुलांच्या आहेत. या पत्रिका वेगळ्या करून दाखवा म्हटल्यास, त्यांना त्या जमल्या नाहीत. हा एक प्रयोग झाला. असे अनेक प्रयोग झाले, ज्यावरून सिद्ध होतं की फलज्योतिष हे विज्ञान म्हणता येणार नाही.

"गेल्या पाच-सहा हजार वर्षांच्या काळात फलज्योतिषाकडे विज्ञान म्हटलं जायचं. पण त्याचा विज्ञान म्हणून अभ्यास झालेला नव्हता. ज्यावेळी फलज्योतिष म्हणजे केवळ मांडलेले आराखडे आहेत, हे लक्षात आलं, तेव्हा त्या दोन शाखा झाल्या. आता प्रश्न येतो मग, शिकवावं का? तर फलज्योतिष हा इतिहास, समाजशास्त्राचा भाग असू शकतो, पण त्याला विज्ञान म्हणून मान्यता देणं चुकीचं ठरेल," असंही परांजपे म्हणतात.

ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

याच मताशी सहमत होत दा. कृ. सोमण सांगतात, "ज्योतिषशास्त्र हे खासगीपणे श्रद्धा म्हणून शिकवलं गेलं, तर ती गोष्ट वेगळी. पण विद्यापीठ हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारं आणि निर्माण करणारंच हवं. समाजामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यासाठी फलज्योतिष शिकवणं योग्य नाही."

"फलज्योतिष श्रद्धा, छंद, मनोरंजनाचं साधन म्हणून ठीक, पण अभ्यास म्हणून नव्हे. नवीन पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी खगोलशास्त्राचाच अभ्यास द्यायला पाहिजे," असं सोमण सांगतात.

ज्योतिषशास्त्र कालबाह्य, आता विज्ञानाशिवाय पर्याय नाही - सोमण

विज्ञानयुगाचे संदर्भ देत दा. कृ. सोमण सांगतात, "प्राचीन काळी वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता, विज्ञानाची माहिती नव्हती, तसं संशोधन नव्हतं. त्यामुळे त्यावेळी ज्योतिषावर विश्वास असणं सहाजिक आहे. माणसाचं जीवन हे ग्रहांवर अवलंबून असल्याचं वाटत होतं, हेही मान्य. पण आता माणूस मंगळावर पोहोचला, तेव्हा असं म्हणणं हे योग्य नाही.

"विज्ञानयुगास प्रारंभ होण्यापूर्वी दुर्बीण किंवा यांसारखी वैज्ञानिक साधनं नव्हती. त्यामुळे मन आणि बुद्धीच्या बळावर काही ठोकताळे बांधले जायचे. त्या काळात ठीक होतं. पण आता ते कालबाह्य झालंय."

आपल्या देशाला प्रगती करायची असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही. चमत्कारामागचं कारण समजल्यावर ते चमत्कार राहत नाही आणि विज्ञान हीच कारणं शोधत आलंय. त्यामुळे ज्योतिष हे वैज्ञानिक नाही, शिवाय ते पूर्णपणे कालबाह्य आहे," असंही मत दा. कृ. सोमण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)