पूर्ण चौकशी झाल्याशिवाय अहमदाबाद विमान अपघाताची माहिती उघड करणे दुर्दैवी, आणखी काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फारेआ मसूद
- Role, व्यापार प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील निवडक तपशील उघड होण्याबद्दल सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. अशाप्रकारे निवडक तपशील उघड करणे दुर्दैवी आणि अतिशय बेजबाबदार असल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली.
तसेच विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) नोटीस बजावत या अपघाताच्या स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद चौकशीची अपेक्षा व्यक्त केली.
हा विमान अपघात होण्यामागे वैमानिक जबाबदार असल्याच्या प्रसारमाध्यमांच्या दाव्यांना या अहवालामुळे बळ मिळालं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत गुप्तता पाळणे आवश्यक असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या अपघाताबाबत सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
याचिकाकर्त्याच्या वतीने वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली. त्यांनी कोर्टाला सांगितलं की, वैमिनिक आणि पीडितांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि प्राथमिक अहवालात दिलेल्या माहितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती.
या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, "अशाप्रकारे वेळेपूर्वीच माहिती जाहीर करणे योग्य नाही, सदर अहवाल तुकड्या-तुकड्यांमध्ये जाहीर करण्याऐवजी, नियमित तपास तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत गोपनीयता पाळली पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
गुजरातेतील अहमदाबाद येथे जूनमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट 171 च्या अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला होता.
टेकऑफनंतर काही सेकंदातच, 12 वर्षे जुन्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचे दोन्ही फ्यूएल कंट्रोल स्विच अचानक 'कट-ऑफ' स्थितीत गेले. त्यामुळे इंजिनला इंधन मिळणं थांबलं आणि संपूर्ण पॉवर बंद झाला.
या अपघाताच्या अहवालात असे नमूद करण्यात आले होते की कॉकपिटमधील व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एका पायलटने दुसऱ्याला विचारले होते, "तुम्ही इंधनपुरवठा का बंद केला?" त्यावर दुसऱ्या पायलटने उत्तर दिले होते की त्याने असे काही केले नाही.
रेकॉर्डिंगमधून नेमके कोणी काय बोलले हे स्पष्ट झालेले नाही. टेकऑफच्या वेळी को-पायलट विमान उडवत होता तर कॅप्टन निरीक्षण करत होता.
विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात गेले.
तर, अहवालातील निष्कर्षांवर सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन या विमान सुरक्षा गटाने आक्षेप घेत अपघाताच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली.

या अपघातावरुन भारताच्या हवाई क्षेत्राच्या सुरक्षिततेबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) प्रमुखांनी मात्र देशातील सुरक्षा नोंदीचे समर्थन केले असून, जुलै महिन्यात BBC ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, "भारताचे आकाश नेहमीच सुरक्षित राहिले आहे."
त्याच महिन्यात DGCA ने देशातील विमान कंपन्यांच्या वार्षिक लेखापरीक्षणाचा भाग म्हणून, मागील वर्षभरात एअर इंडियामधील 51 सुरक्षा उल्लंघने उघडकीस आणली.
विमानातील मृत्यू झालेल्या चार प्रवाशांच्या कुटुंबीयांनी विमान निर्माता कंपनी बोईंग आणि विमानाचे सुटे भाग बनवणारी कंपनी हनीवेल यांच्याविरुद्ध अमेरिकेत खटला दाखल केला. या कंपन्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
विमानाच्या डिझाइनमधील जोखीम असल्याची जाणीव असूनही कंपन्यांनी "काहीही केले नाही" असा आरोप या खटल्यात करण्यात आला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











