अहमदाबाद विमान अपघात : कॉकपिट रेकॉर्डिंगबाबत प्रश्न का उपस्थित होत आहेत?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 12 जूनला एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलायनर 787-8 विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जात होतं
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याच्या घटनेचा प्राथमिक तपास अहवाल समोर आल्यानंतर या अपघाताची चर्चा थांबेल असं वाटत होतं.

मात्र प्रत्यक्षात त्याच्या उलटं झालं आहे. या अपघाताचा 15 पानांचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर अपघाताच्या कारणांसंदर्भात आणखी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत, विविध मुद्द्यांची चर्चा होते आहे.

या अहवालाची भाषा संयमित आहे. मात्र तरीदेखील या प्राथमिक अहवालातील एका मुद्द्यानं तपास करणारे, विमान-तज्ज्ञ आणि सर्वसामान्य जनतेला हैराण केलं आहे.

या अहवालात म्हटलं आहे की विमानानं उड्डाणं केल्यानंतर काही सेकंदातच या 12 वर्षे जुन्या बोईंग 787 विमानाचे दोन्ही फ्यूल कंट्रोल स्विच अचानक 'कट ऑफ' स्थितीमध्ये गेले होते. म्हणजेच फ्यूल स्विच बंद झाले होते. त्यामुळेच विमानाच्या इंजिनांना होणारा इंधनाचा पुरवठा थांबला होता.

इंजिनला होणारा इंधनाचा पुरवठा थांबल्यामुळे विमानाला उड्डाणासाठी इंजिनातून मिळणारी पॉवर थांबली. सर्वसाधारणपणे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतरच फ्यूल कंट्रोल स्विच बंद केले जातात.

कॉकपिटमधील व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतं की एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो आहे की त्यानं "कट-ऑफ का केलं ?" त्यावर दुसरा पायलट म्हणतो की, त्यानं तसं केलेलं नाही.

मात्र या रेकॉर्डिंगमधून हे स्पष्ट होत नाही की कोणता पायलट काय म्हणाला? विमान हवेत झेपावत असताना (टेक-ऑफ) को-पायलट विमान उडवत होता आणि विमानाचा कॅप्टन त्यावर देखरेख करत होता.

नंतर फ्यूल कंट्रोल स्विचला पुन्हा उड्डाण करण्याच्या सामान्य स्थितीत आणलं गेलं. हा स्विच 'रन मोड' मध्ये येताच, इंजिनांना इंधनाचा पुरवठा सुरू झाला. ज्या वेळेस हा अपघात झाला, त्यावेळेस एका इंजिनला पुन्हा पॉवर मिळू लागली होती. मात्र दुसऱ्या इंजिनला पूर्ण पॉवर मिळू शकली नाही.

प्राथमिक अहवाल आल्यानंतर व्यक्त होतायेत विविध अंदाज

हे विमान उड्डाण केल्यानंतर एक मिनिटांहून कमी काळ हवेत होतं. या विमान अपघातात एकूण 260 जणांचा मृत्यू झाला.

विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. या अपघाताचा पूर्ण अहवाल एक वर्षात सादर होण्याची शक्यता आहे.

वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेमध्ये आलेल्या वृत्तानुसार, विमान अपघाताच्या प्राथमिक तपासातून नवीन बाबी समोर आल्यानंतर आता लक्ष कॉकपिटमधील वरिष्ठ पायलटवर केंद्रीत होतं आहे.

कोरिएल डेला सेरा या इटलीतील वृत्तपत्रानं दावा केला आहे की त्यांना सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की फर्स्ट ऑफिसरनं कॅप्टनला वारंवार विचारलं की त्यानं "इंजिन बंद का केलं?"

ग्राफिक

56 वर्षांचे सुमित सभरवाल या विमानाचे कॅप्टन होते. तर 32 वर्षांचे क्लाईव्ह कुंदर को-पायलट म्हणजे सह-वैमानिक होते. कुंदरच विमान उडवत होते.

दोन्ही पायलटना विमान उड्डाणाचा एकूण 19,000 तासांहून अधिक अनुभव होता. यातील जवळपास निम्मा अनुभव बोईंग 787 विमान उडवण्याचा होता.

या विमान अपघाताच्या आधी दोन्ही पायलट विमान उड्डाणाच्या आधी करायच्या सर्व हेल्थ चेकमध्ये पास झाले होते.

साहजिकच, विविध अंदाज आणि लीक होत असलेल्या माहितीमुळे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रस्त केलं आहे. तसंच भारतीय पायलटदेखील याबाबत नाराज आहेत.

एएआयबी आणि एएलपीए इंडियाचं काय म्हणणं आहे?

गेल्या आठवड्यात एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे एएआयबीनं एका वक्तव्यात म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील एक गट निवडक आणि अपुऱ्या वार्तांकनासह या अपघाताबाबत निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

कोणत्याही तपासाशिवाय अशाप्रकारे वार्तांकन करणं बेजबाबदार असल्याचं ब्यूरोनं म्हटलं आहे.

जेनिफर होमेंडी, अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) च्या चेअरवुमन आहेत. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे की या प्रकरणात होत असलेलं वार्तांकन घाईघाईनं करण्यात आलं आहे. ते अंदाजांवर आधारित आहे.

त्या म्हणाल्या की अशा प्रकारच्या तपासाला वेळ लागतो. एटीएसबी या अपघाताच्या तपासात सहकार्य करतं आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एअर इंडियाच्या विमानात 242 जण होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला.

विमानातील कर्मचाऱ्यांना या अपघातासाठी दोषी ठरवण्यासाठी होत असलेल्या घाईला इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशननं 'खूपच असंवेदनशील' आणि 'बेजबाबदारपणाचं' म्हटलं आहे.

असोसिएशननं आवाहन केलं आहे की जोपर्यंत संपूर्ण अहवाल येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाबाबत संयम बाळगला पाहिजे.

एअरलाईन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एएलपीए इंडिया) प्रमुख सॅम थॉमस यांनी बीसीसीला सांगितलं, "अंदाज लावणं, पारदर्शकतेवर वरचढ झालं आहे."

विमानाच्या देखभालीचं रेकॉर्ड आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरच्या डेटाबरोबर इतर कागदपत्रांचा देखील तपास झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

प्राथमिक अहवालात असलेलं कॉकपिट रेकॉर्डिंग हा वादाचा छोटासा भाग आहे.

संपूर्ण संभाषणाची ट्रान्सक्रिप्ट अंतिम अहवालात येण्याची आशा आहे. ज्यामुळे वस्तुस्थितीचं अधिक योग्य प्रकारे आकलन करता येईल.

तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विमान अपघातचा तपास करणाऱ्या कॅनडातील एका तज्ज्ञानं (ज्यांना त्यांचं नाव उघड करायचं नाही) सांगितलं की अहवालात नोंदवण्यात आलेलं संभाषण अनेक शक्यतांकडे इशारा करते.

ते म्हणतात की, "उदाहरणार्थ जर पायलट 'बी'नं कळत-नकळत तो स्विच हाताळला असेल, तर असं लक्षात येऊ शकतं की नंतर त्यांनी असं केल्याचं का नाकारलं."

"मात्र जर पायलट 'ए'नं मुद्दाम आणि विचारपूर्वक स्विच हाताळला असेल, तर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचा तपास नक्की होईल आणि तपासाचं लक्ष इतरत्र वळवून अपघाताची जबाबदारी स्वत:वर येणं टाळता यावं, या हेतूनं त्यांनी हा प्रश्न विचारला असेल, याची शक्यता आहे."

"इथपर्यंत, एएआयबीला हे माहीत जरी झालं की कोण, काय म्हणत होतं, तरीदेखील याचं स्पष्ट उत्तर मिळणार नाही की फ्यूल कोणी बंद केलं?"

"कदाचित आपल्याला हे कळणारच नाही की यासाठी नेमकं कोण जबाबदार होतं."

तपास अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की असं जरी वाटत असलं की इंधनाचे स्विच हातांनी बंद करण्यात आले, तरी देखील अजूनही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचवण्याआधी प्रत्येक शक्यता लक्षात घेणं आवश्यक आहे.

काही पायलटना वाटतं की जर, इंजिनाची स्थिती आणि कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या विमानाच्या फुल ऑथोरिटी डिजिटिल इंजिन कंट्रोल (एफएडीइसी) सिस्टमला सेन्सरकडून चुकीची माहिती मिळाली, तर तांत्रिकदृष्ट्या ही सिस्टम स्वत:च इंजिन बंद करू शकते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एएआयबीच्या अहवालात विमानाचा 'रॅट' सक्रिय असल्याचं दाखवणारा फोटो देण्यात आला आहे, याचं काम इंजिन बंद झाल्यानंतर आपत्कालीन स्थितीत हायड्रॉलिक पॉवर द्यायचं असतं.

अर्थात, "तुम्ही इंधन बंद का केलं?" ही प्रतिक्रिया पायलटनं आश्चर्यानं दिली तेव्हा फ्यूल स्विच आधीच कट-ऑफ मोडवर गेले होते. (प्राथमिक अहवालात तसंच नोंदवण्यात आलं आहे).

अशा परिस्थितीत हा सिद्धांत चुकीचा ठरतो. अंतिम अहवालात संभाषणाच्या टाईम-स्टॅम्पसह संपूर्ण माहिती आणि इंजिनाच्या डेटाचं सखोल विश्लेषण असेल, जेणेकरून परिस्थिती अधिक स्पष्टपणे समोर येईल, अशी आशा आहे.

कोण काय म्हटलं यावर जास्त अंदाज बांधले जात नाहियेत. तर यावर अधिक अंदाज बांधले जात आहेत की काय म्हटलं गेलं नाही.

प्राथमिक अहवालात कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) मधील संपूर्ण संभाषण देण्यात आलेलं नाही. फक्त शेवटच्या क्षणांमधील फक्त एक महत्त्वाचं वाक्य देण्यात आलं आहे.

याप्रकारे संभाषणाचा फक्त एकच भाग समोर आणल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तपास करणाऱ्या टीमला हे माहीत होतं की आवाज कोणाचे होते, मात्र संवेदनशील बाबीमुळे संपूर्ण संभाषण उघड करण्यात आलं नाही?

किंवा टीमला अद्याप या गोष्टीची पूर्ण खात्री नाही की आवाज कोणाचे होते आणि कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी त्यांना आणखी तपास करण्याची आवश्यकता आहे?

ग्राफिक

अमेरिकन एजन्सीचे (एनटीएसबी) माजी व्यवस्थापकीय संचालक पीटर गोएल्ज यांना वाटतं की एएआयबीनं पायलटच्या नावासह व्हॉईस रेकॉर्डरची संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट उघड करायला हवी.

ते म्हणतात, "जर टेक-ऑफच्या वेळेस काही बिघाड होण्यास सुरुवात झाली होती, तर त्याची नोंद फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये (एफडीआर) झाली असती."

"असं होऊ शकतं की जर फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टममध्ये अलर्टदेखील जारी झाला असता, तर असा अलर्ट क्रूच्या नक्कीच लक्षात आला असता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, क्रू याबद्दल बोललंही असतं."

तपास अधिकारी लोकांना आवाहन करत आहेत की त्यांनी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याची घाई करू नये.

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीतील विमान अपघात तज्ज्ञ आणि माजी तपास अधिकारी शॉन प्रुचनिकी यांनी बीबीसीला सांगितलं, "आपल्याला सतर्क राहावं लागेल. कारण जर स्विच बंद असल्याचं आढळलं आहे, तर असं मानणं सोपं आहे की हे मुद्दाम झालं असेल."

"उदाहरणार्थ पायलटची चूक, आत्महत्या किंवा इतर काही कारणामुळे. मात्र आपल्याकडे मर्यादित माहिती आहे. अशा परिस्थितीत या दिशेनं विचार करणं धोकादायक ठरू शकतं," प्रुचनिकी असं पुढे सांगतात.

'ठोस निष्कर्षावर पोहोचणं घाईचं ठरेल'

तर दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या शक्यतांवर देखील चर्चा होते आहे.

भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये इंडियन एक्सप्रेससह काही वृत्तपत्रांनी विमानाच्या मागील भागातील संभाव्य इलेक्ट्रिकल फायर हा तपासाचा महत्त्वाचा पैलू असल्याचं म्हटलं आहे.

अर्थात प्राथमिक अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं आहे की दोन्ही फ्यूल स्विच 'कट-ऑफ' पोझिशनमध्ये नेण्यात आले होते, त्यामुळे इंजिन बंद झालं. रेकॉर्डर डेटातून ही गोष्ट सिद्ध होते.

एका स्वतंत्र तपासकर्त्यानं सांगितलं की जर विमानाच्या मागच्या बाजूस आग जरी लागली असेल, तरी ती बहुधा विमान कोसळल्यानंतरच लागली असेल. पसरलेलं इंधन किंवा बॅटरींना झालेलं नुकसान हे त्यामागचं कारण असू शकतं.

कार्ड

गेल्या आठवड्यात एएआयबीचे प्रमुख जीव्हीजी युगंधर यांनी भर देत सांगितलं की "काय घडलं" हे सांगणं हाच प्राथमिक अहवालाचा उद्देश आहे.

ते म्हणाले, "आताच एखाद्या ठोस निष्कर्षावर पोहोचणं घाईचं ठरेल." त्यांनी हेदेखील स्पष्ट केलं की तपास सुरू आहे आणि अंतिम अहवालात "मुख्य कारणं आणि सूचना" स्पष्ट करण्यात येतील.

त्याचबरोबर त्यांनी ग्वाही दिली की 'तांत्रिक किंवा जनहिताशी निगडीत' मुद्द्यांवर जसजशी माहिती समोर येईल तसतशी ती लोकांना दिली जाईल.

तपासाचा सारांश सांगताना, शॉन प्रुचनिकी म्हणाले की हा सर्व तपास दोन शक्यतांवर केंद्रीत आहे. ते म्हणजे एकतर ही मुद्दाम करण्यात आलेली कृती होती किंवा ती भ्रमाची स्थिती होती किंवा ऑटोमेशनशी निगडित एखादी समस्या होती.

ते असंही म्हणाले की, "या अहवालात घाईघाईनं, एखाद्या मानवी चुकीला किंवा हेतूला दोष दिलेला नाही. हे मुद्दाम करण्यात आलं होतं, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही."

म्हणजेच स्पष्ट शब्दात सांगायचं तर, अपघाताबाबत कोणताही निर्णायक पुरावा नाही. फक्त अस्वस्थ होत वाट पाहत राहणं एवढंच आहे. कदाचित शेवटी सर्व उत्तरं देखील मिळणार नाहीत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.