महाराष्ट्रातील 'या' शाळांमध्ये पहिलीपासून लैंगिक शिक्षण कसं दिलं जातंय?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"वर्गातले विद्यार्थी जोड्या लावायचे. पण त्यांना प्रत्युत्तर देण्याची ताकद मिळाली. स्वत: सांगायची ताकद मिळाली. न घाबरता. मी एवढंच बोलले होते की, वयात येताना प्रत्येकाच्या होतात भावना त्या असतील. पण माझं काही असं नाहीय. मी फ्रेंडच मानते."

साताऱ्यातील फलटणच्या कमला निंबकर बालभवनमधली इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी सांगत होती. ही विद्यार्थिनी ठामपणे 'नाही' म्हणायला शिकलीय. ही ताकद 'सहज' या अभ्यासक्रमामुळे आपल्याला मिळाल्याचंही ती सांगते.

'सहज' म्हणजे 'सन्मान, हक्क आणि जबाबदारी'.

प्रयास आरोग्य गटातर्फे पहिली इयत्तेपासून लैंगिकतेविषयी शिक्षण दिलं जात आहे. त्या उपक्रमाचं हे नाव.

शिक्षण कसं होतं?

इयत्ता तिसरीचा वर्ग. मुलांना 'प्रयास'च्या ताई वाढ होण्याच्या टप्प्यांबद्दल सांगत असतात.

बाळ असताना काय करता येत होतं, यावरून सुरु झालेली चर्चा म्हातारपणातल्या आजी आजोबांच्या वयापर्यंत पोहोचते. बोलतानाच मग बाळ असण्याच्या आधी आम्ही काय होतो? असा प्रश्न मुलं विचारतात आणि उत्तरही देतात. यावरून मग संवादाचा पुढचा टप्पा आखला जातो.

तर दुसरीच्या वर्गात कुटुंब म्हणजे काय यावर चर्चा सुरु असते. वेगवेगळ्या प्रकारची कुटुंब कशी असू शकतात? यापासून ते कुटुंबात खाण्या पिण्याच्या वेगवेगळ्या सवयी कशा असू शकतात? यापर्यंत चर्चा येते.

लहान वर्गांमध्ये जितकी सहज चर्चा तितकीच मोठ्या वर्गात चालते. पण विषय मात्र जास्त गंभीर होत जातात.

आठवीच्या मुलांना मासिक पाळीबद्दल शिकवताना मुलं आणि मुलींना एकाच वेळी एकाच वर्गात शिकवलं जातं. आणि त्या सगळ्यांनाच मासिक पाळीत वापराच्या साधनांबद्दल बोलतानाच मेन्स्ट्र्अल कपही हाताळायला दिला जातो. मग त्यात अगदी हा दांडा कशासाठी आहे? तो कसा वापरला जातो? याचा संवाद मोकळेपणाने होतो.

हा 'सहज संवाद'च सहज अभ्यासक्रमाचा पाया आहे. पण पहिलीपासून हे का शिकवायचं? याबद्दल बोलताना 'प्रयास' आरोग्य गटाच्या सल्लागार मैत्रेयी कुलकर्णी सांगतात, "खरं म्हणजे अगदी लहानपणापासून मूल वाढत असताना त्याच्या आयुष्यामध्ये लैंगिकता ही असतेच. घरामध्ये आपल्याशी कोण कसं बोलतंय? आपल्याला कोण कसं असायला सांगतंय? मुलगा म्हणून मुलगी म्हणून कशा पद्धतीने आपल्याकडून अपेक्षा केल्या जात आहेत? एकमेकांशी वागताना कसं वागायचं? मला नाही म्हणता येतं का? मला दुसऱ्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती सांगता येते का? वेगवेगळ्या प्रकारचे लोक, कुटुंब, चालीरिती आपण आजूबाजूला बघत असतो. त्याकडे कसं बघायचं हे मूल लहानपणापासून बघत असतं आणि शिकत असतं. त्यामुळे हे लैंगिकतेपासून वेगळं नाहीय."

मुलांच्या वयानुसार संवाद साधत जेंडर, कुटुंब, LGBTQIA+ समुदायाबद्दल साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं जातं. नातेसंबंधांमध्ये एकमेकांचा आदर करणं, संमती म्हणजे काय आणि निकोप संवाद कसा असावा याविषयीच्या मूल्यांवर भर दिला जातो.

अभ्यासक्रमात नेमकं काय आहे, हे मांडताना 'प्रयास' आरोग्य गटाचे समन्वयक शिरीष दरक सांगतात, "काही महत्वाच्या थिम्स आहेत. मुलांना कुटुंबातील विविधता, जेंडर मधील विविधता समजणं, मुलगा म्हणजे काय, मुलगी म्हणजे काय, समाजाने यासाठी काय रचना निर्माण करुन ठेवल्या आहेत ते समजणं, नातेसंबंध, मग ते मैत्रीतले असो किंवा घरातले इतर लोकांबद्दलचे किंवा पुढे जाऊन रोमॅंटिक नाती निर्माण होणं चांगलं नातं म्हणजे काय याबद्दलची समज निर्माण होणं, शरीराबद्दलची जी वैज्ञानिक माहीती आहे ती मिळणं, स्व-प्रतिमा निर्माण होणं त्यातनं माझं शरीर, मी कसा दिसतो, दिसते याबद्दलचं बोलणं असणं अशा आठ थिम्सवर 'सहज' करिक्युलम पहिली ते दहावी दरम्यान बिल्ड होत जातं."

शाळांचा अनुभव

सुरुवातीला प्रयासच्या प्रशिक्षकांनी हे वर्ग घ्यायचे आणि पुढे शाळेतल्याच शिक्षकांनी हा संवाद पुढे न्यायचा असा यामागचा विचार.

फलटणच्या कमला निंबकर बालभवन मध्ये सुरुवातीला 'प्रयास'तर्फे आणि आता शिक्षकांतर्फे हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

शाळेत हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना प्रगत शिक्षण संस्थेच्या समन्वयक मधुरा राजवंशी म्हणाल्या, "लैंगिकता शिक्षण याबाबत आपल्याकडे नेहमी खूप संकूचित पद्धतीने विचार केला जातो. म्हणजे मासिक पाळी बद्दल जुजबी माहिती देणं आणि प्रजननाबद्दल सांगणं असं बहुतांश ठिकाणी त्याचं स्वरूप असतं."

"त्याचा हेतू असा असतो की धोक्यांपासून मुलांना दूर ठेवायचं. वाईट गोष्टी सांगायच्या म्हणजे हे केलं तर हे होईल प्रेग्नंसी होईल वगैरे. काय करु नये हे सांगायला लैंगिकता शिक्षण असं काहीतरी झालेलं आहे. पण ही इतकी व्यापक संकल्पना आहे, हे जेव्हा आम्हांला कळलं तेव्हा आम्ही विचार केला की द्यायलाच हवं."

पहिलीपासून शिक्षणाबाबत शाळेची भुमिका मांडताना त्यांनी या वयोगटात मुलांच्या डोक्यात काहीच नसतं ही बाब मांडली. त्या म्हणाल्या, "पहिली दुसरीच्या मुलांना काहीही टॅबू नसतात. त्यांना ही अजून कल्पनाच नाहीये की याच्यामध्ये काहीतरी लपवण्यासारखं आहे."

अर्थात ज्या सहजतेने पहिली दुसरीच्या मुलांकडून हे शिक्षण स्विकारलं जातं तितकं मोठ्या मुलांकडून होत नसल्याचं त्या नोंदवतात. या शाळेत हे प्रशिक्षण सुरु केल्यानंतर नववी-दहावीच्या मुलांनी आता का शिकवत आहात? हा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावेळी त्यांना टीन-एज सेक्सचं प्रमाण भारतात आहे आणि त्यामुळे वैज्ञानिक माहिती असणं आवश्यक कसं आहे हे समजावून द्यावं लागलं. पालकांनीही आधी याबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र, त्यांच्या शंकांचं निरसन झाल्यावर त्यांनी मुलांना वर्गात बसण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

अर्थात कोणत्याही वर्गातल्या मुलांना यावेळी वर्गात बसण्याची सक्ती मात्र केली जात नाही.

पण मुलं आणि पालक या पातळीवरच्या अडचणी सोडवणं शाळेला सोपं गेलं. मुख्य प्रश्न आला तो शिक्षकांना तयार करण्याचा. मात्र, इतर विषयांइतकं हे सोपं नसल्याने शिक्षकांसंमोर आव्हान होतं. त्यामागची कारणं समजून घेण्यासाठी शिक्षकांनीच या विषयावर संशोधन केलं. आणि या संवादातून शिक्षकांच्या अडचणीही सोडवल्या गेल्या.

शिक्षकांना नेमकी काय अडचण वाटत होती?

कलमा निंबकर बालभवनच्या मुख्याध्यापिका गीता बोबडे यांनी वर्षभर एका फेलोशिपअंतर्गत शिक्षकांशी संवाद साधला.

शिक्षकांना नेमकी काय अडचण वाटत होती? याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मला अस वाटत होतं की, मुलं खूप बोलतात. त्यांना फक्त बोलायला जागा दिली पाहीजे. आणि मग मुलं बोलायची तर आधी शिक्षकांनी बोललं पाहिजे. शिक्षकच नाही बोलले तर मुलं काय बोलणार? जेव्हा रिसर्चचा विषय आला, तेव्हा डॉ. शिरीष दरक यांनी मला मार्गदर्शन केलं."

"जेव्हा मी संशोधन करताना शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. आपल्या जडणघडणीचा विषय आहे या हेतूने त्यांच्याशी संवाद साधला. मग शिक्षक सुद्धा बोलू लागले. मला लक्षात आलं की शिक्षकांची इच्छा आहे. फक्त त्यांना कसं आणि काय बोलायचं याचं मार्गदर्शन केल्यानंतर शिक्षक सुद्धा बोलायला लागले."

आता सात शिक्षकांचा एक गट या शाळेत शिकवण्यासाठी तयार झाला आहे.

या संवादाचा परिणाम आता विद्यार्थ्यांमधल्या बदलांतून दिसू लागलाय, असं शिक्षक आणि विद्यार्थी सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना शाळेतल्या विद्यार्थिनी म्हणाल्या, "आम्हाला आपल्या मर्यादा काय आहेत हे यातून स्पष्ट झालं. आणि त्यामुळे कोणी काही चुकीचं वागत असेल, तर ते सांगण्याचीही ताकद आली. मुळात हे समजलं की हे का होतं."

आता फलटणसह अहिल्यानगर, पुणे आणि इतर शहरांमधील शाळांमध्ये हे मॉड्युल राबवलं जात आहे. तेही 'सन्मान, हक्क आणि जबाबदारी' समजणारे उद्याचे नागरिक घडवण्यासाठी!

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)