पाण्यावर तरंगणारं गाव, जन्म-मृत्यू होडीतच; शबरी नदीवरील 11 कुटुंबांचा जगण्यासाठीचा संघर्ष

    • Author, लक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसीसाठी

त्या नदीवर एक गाव आहे. त्या गावातील घरं पाण्यावर तरंगताना दिसतात. त्या घरांना भिंती नाहीत, दारं नाहीत आणि पत्ता तर अजिबातच नाही.

पण तरीही तिथे जिवंत माणसं आहेत आणि आपलं आयुष्य पुढे ढकलत आहेत.

आंध्र प्रदेशातील पोलावरम जिल्ह्यातील चिंतूर भागात शबरी नदीवर तरंगणाऱ्या होड्याच या कुटुंबांची घरं आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतचं त्यांचं संपूर्ण आयुष्य या होड्यांवरच चालतं.

नदी, वाळूचे बेट, होड्या! यापलीकडे दुसरं जगच माहीत नसलेली काही कुटुंबं चिंतूरजवळील शबरी नदीवर आयुष्य जगत आहेत.

अनेक दशकांपूर्वी उपजीविकेसाठी हे लोक शेकडो किलोमीटर नदीतूनच प्रवास करत चिंतूरजवळील शबरी नदीकाठी आले.

आंध्र प्रदेशातील मारेदुमिल्ली जंगल ओलांडल्यानंतर असलेल्या चिंतूरमधील पुलाखाली होड्यांचं घरामध्ये रूपांतर करून राहणाऱ्या 11 मासेमार कुटुंबांची ही कहाणी आहे.

'होडीवर चालणारं आयुष्य'

होड्यांवर राहणाऱ्या या लोकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसीची टीम चिंतूरला पोहोचली.

शबरी नदीवरील पुलावरून पाहिलं तर वाळूच्या बेटाजवळ काही होड्या दिसत होत्या. त्या होड्यांमधून धूर येत होता. खूप थंडी होती.

पहाटेचे 5.45 वाजले होते. होड्यांजवळ पोहोचलो तेव्हा एका होडीवरचा कोंबडा आरवू लागला होता. एकामागोमाग एक होडीतील घरं हळूहळू जागं होत होते.

थोड्याच वेळात मासेमार उठले आणि त्यांनी चहासाठी चूल पेटवली. थंडीने आम्ही कुडकुडत असलेलं पाहून त्यांनी 'चहा घेता का?' असं विचारलं.

सिंहाद्री आणि वेंकटेश्वरराव हे जोडपं त्यांच्या दोन मुलांसह 'हरमथल्ली' नावाच्या होडीत (हाऊसबोट) राहतात. आम्ही तिथे गेलो. शेजारच्या इतर होड्यांमधील कुटुंबंही एकामागोमाग एक उठू लागली होती. ते त्यांचा दिनक्रम सुरू करत होते.

'हाऊसबोट नेमक्या कशा आहेत?'

होडीवर ठेवलेल्या तुळशीच्या रोपावर सूर्याची किरणं पडत होती. पांघरूणं घडी करून, लाकडी चूल पेटवण्यासाठी वेंकटेश्वरराव आपल्या पत्नी सिंहाद्रीला सरपण देत होते.

होडीच्या मधल्या भागात ताडपत्री घालून एक झोपडीसारखी जागा तयार केली आहे. तिच्या खाली पीठ, तांदूळ ठेवले आहेत. वरच्या भागात सजावटीच्या वस्तू, खाली तेल, भाजीपाला आणि घरासाठी लागणारे इतर सामान ठेवले आहे.

लहान मुले किनाऱ्यावरील वाळूवर खेळत असताना, महिला आणि पुरुष होड्यांमध्ये स्वयंपाकाच्या कामात एकमेकांना मदत करताना दिसले. काही होड्या दुसऱ्या किनाऱ्यावर साहित्य आणण्यासाठी निघाल्या होत्या. काही मुलं खूप थंडी असल्यामुळे त्यांच्या ताडपत्रीच्या झोपडीतच झोपलेली होती.

प्रत्येक होडीवर 'हरम्मा' किंवा 'पोलम्मा'सारखी नावं होती. ही नावेच त्या हाऊसबोटींची ओळख आहे. भिंती आणि पत्ता नसलेली ही घरं असली, तरी काही कुटुंबांसाठी या होड्याच त्यांचं संपूर्ण जग आहे.

'जन्म कुठेही झाला तरी, शेवटी तुम्हाला होडीवरच यायचंय'

धवलेश्वरम हे सिंहाद्री यांच्या कुंटुबाचे मूळ ठिकाण आहे. त्यांचं मूळ घर गोदावरीच्या काठावर आहे. तिथून ते इथे आले आहेत.

सिंहाद्री यांचा जन्म चिंतूरमध्ये झाला. त्या शबरी नदीवरील होड्यांवरच आयुष्य जगत आहेत. सध्या त्या 45 वर्षांच्या आहेत.

"माझे आई-वडीलही या होडीतून प्रवास करत. त्यांनीच ही होडी आम्हाला दिली. आम्हीही हेच जीवन सुरू ठेवलं आहे, असं त्या म्हणाल्या."

"माझ्या आईच्या बाळंतपणासाठी हीच होडी वापरून चिंतूरमधील रुग्णालयात नेलं गेलं. माझा जन्म रुग्णालयात झाला तरी त्यानंतर मला पुन्हा याच होडीने परत आणलं. इथेच मी मोठी झाले," असं सिंहाद्री सांगतात.

"माझी मुलंही इथेच जन्मली, इथेच मोठी होत आहेत", असंही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणतात, आमच्याकडे दुसरा मार्ग नाही. उपजीविकेसाठी आम्ही इथेच, आहे त्या परिस्थितीत आयुष्य जगत आहोत.

'शिक्षणासाठी नदी पार करणे आवश्यक'

सध्या या होड्यांवर जन्मलेल्या मुलांपैकी नऊ इथेच मोठी होत आहेत. आणखी दोन मुलं धवलेश्वरममध्ये शिक्षण घेत आहेत. मुलं होडीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन सरकारी शाळेत शिकतात.

मुलं शाळेत गेल्यावर पालक मासेमारीसाठी जातात. पकडलेले मासे लगेच विकतात. दरम्यान होड्यांवरच स्वयंपाक करून जेवतात. सायंकाळी मुलांच्या परत येण्याची वाट पाहतात. प्रत्येक टप्प्यावर होडीचं आयुष्य आहे, दुसरं जगच नाही.

"आमची मुलं आमच्यासारखी होऊ नयेत. माझा जीव गेला तरी त्यांचं शिक्षण थांबवणार नाही," असं सिंहाद्री म्हणतात.

"आमच्या वडिलांनी आम्हाला होड्या दिल्या. पण आम्ही आमच्या मुलांना नदीवरचं आयुष्य न देता, चांगलं आयुष्य द्यायचा प्रयत्न करत आहोत," असं महेश या मच्छिमाराने सांगितलं.

सध्या या 11 कुटुंबांचं आयुष्य शबरी नदीवरच आहे, पण मुलांचं भविष्य नदीच्या काठावर पोहोचावं असं त्यांना वाटतं.

'होडीच मंदिर आणि संपत्ती'

हे मच्छिमार होड्यांनाच मंदिर मानतात.

"होड्यांना देवांची नावं देतो. त्यावर ओढणी बांधतो," असं महेश म्हणतात.

50 वर्षीय वेंकटेश्वरराव यांच्याकडे तीन होड्या आहेत. "एक घरासाठी, एक मासेमारीसाठी, आणि एक मासेमारीची होडी बिघडल्यास वापरण्यासाठी. प्रत्येक होडीची किंमत एक लाख रुपये आहे. हीच आमची संपत्ती आणि वारसा आहे," असं ते म्हणतात.

"हीच आमची संपत्ती. हाच आमचा वारसा आहे. गेल्या 40 वर्षांपासून मासेमारी करत असलो तरी खूप काही कमाई झालेली नाही," असं ते सांगतात.

'ही सवय आहे आणि भीती देखील...'

उपजीविकेसाठी धवलेश्वरमहून आलेले मच्छीमार महेश यांच्या बोलण्यात प्रत्येक दिवस त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची भीती दिसून येत होती.

"आम्हाला रात्रंदिवस मासेमारी करायची सवय आहे, पण एक भीतीही असते. रात्री काही गरज भासली तर लगेच होडी बांधून समोरील किनाऱ्यावर असलेल्या डॉक्टरांकडे जातो. मोठी अडचण आली, तर देवावरच अवलंबून राहतो," असं महेश यांनी बीबीसीला सांगितलं.

"दिवसा मासेमारी सुरळीत आणि चांगली होते, पण अंधार पडल्यावर होड्यांमधील महिला आणि मुले घाबरतात. कारण दूरवरुन कोल्हा-लांडग्यांचं ओरडणं ऐकू येतं, आणि किंचाळण्याचे आवाज येत राहतात. त्यामुळे ते आम्ही येईपर्यंत घाबरलेले आणि अस्वस्थ असतात. काही वेळा मासेमारीसाठी आठवडाभर एकमेकांपासून वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं," असं महेश म्हणाले.

'तू घरी का जात नाहीस?'

सोनतूरपासून 130 किलोमीटर दूर राहत असलेली ही 11 कुटुंबं महिन्याला किंवा दोन महिन्याला एकदा धवलेश्वरमकडे जातात. चिंतूरहून धवलेश्वरमला एकदा जायला त्यांना हजार रुपयांचा खर्च येतो, असं ते सांगतात.

"फक्त रेशन आणण्यासाठीच जवळपास 1000 रुपये खर्च करून धवलेश्वरमला जातो आणि परत येतो. रेशनमधून मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत प्रवासाचा खर्च जास्त आहे. पण रेशन कार्ड सक्रिय राहावं यासाठीच हा प्रवास करावा लागतो," असं दुर्गम्मा म्हणाल्या.

"कारण रेशन कार्डच आमची ओळख आहे. ते रद्द होऊ नये म्हणूनच आम्ही धवलेश्वरमकडे जातो," असं दुसरा मच्छीमार बुझीबाबूने बीबीसीला सांगितलं.

म्हणजे सरकारच्या नोंदींमध्ये आपण असल्यासारखं दिसावं म्हणून पाण्यावरच आयुष्य जगणारी ही कुटुंबं महिन्याला किंवा दोन महिन्याला नदी पार करून प्रवास करतात.

"पण कार्यक्रम, वाढदिवस, लग्नासाठी धवलेश्वरमहून नातेवाईक आणि मित्र येतात. सर्व शुभकार्यं शबरी नदीच्या वाळूच्या बेटांवरच करतो. स्थानिक लोकांनाही आमंत्रित करतो," असं दुर्गम्मा म्हणाल्या.

'मासेमारीसाठी मासे सापडत नाहीत…'

"प्रत्येक वेळी मासेमारीत मासे मिळतील याची खात्री नसते. काही वेळा टाकलेलं जाळं रिकामंच परत येतं," असं मच्छीमार बुझीबाबू म्हणाला.

"कधी कधी करीसाठी पुरेसे मासेही मिळत नाहीत. एका ट्रीपसाठी फक्त डिझेलवरच किमान 700 ते 800 रुपये खर्च करावे लागतात. अशा वेळी तोटा होतो," असंही बुझीबाबूने सांगितलं.

"कधी मासे चांगले मिळाले तर त्यांचे फोटो काढून व्हॉट्सॲपवर टाकतो. आम्ही किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत ग्राहक तयार असतात. फारशी घासाघीस किंवा सौदेबाजी करत नाही, कारण स्थानिक लोकांकडून आम्हाला मदत मिळते आणि त्यांच्याशी आमची मैत्री आहे. बॅटरीच्या लाईट्स आणि मोबाइल चार्ज करण्यासाठीही आम्ही त्यांच्या घरी जातो," असं महेश म्हणाले.

"मासे खूप जास्त मिळाले, तर किनाऱ्यावर थोडे विकतो आणि उरलेले चिंतूरच्या बाजारात नेऊन विकतो. अशाच पद्धतीने आमचा रोजचा व्यवसाय चालतो," असं ते म्हणाले.

'आशा पूर्ण होईल का…'

काळानुसार ते होड्यांपासून इंजिन बोटींपर्यंत आले.

वीज आणि केबल नसली तरी मोबाइल फोन आहेत. होड्यांवरचं आयुष्य कठीण असलं, तरी मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

पाण्यावर तरंगत, पिढ्यांपिढ्या आयुष्य पुढे नेत असलेल्या या कुटुंबांची कथा शबरी नदीच्या प्रवाहासारखीच अजूनही पुढे वाहत आहे.

पुढच्या पिढ्यांचं भविष्य तरी होडीतच संपू नये, अशी त्यांची आशा आहे.

सध्या तरी त्यांच्या आशा आणि त्यांचं आयुष्यं पाण्यावरच तरंगत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)