You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वतःच्याच बँकेत चोरी करणारा आणि दरोडा टाकणारा असिस्टंट मॅनेजर; 'या' सिनेमाप्रमाणे घडला प्रकार
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
'लकी भास्कर' या चित्रपटासारखं प्रकरण भंडारा जिल्ह्यात घडलं आहे. बँकेच्या असिस्टंट बँक मॅनेजरनं बँक लुटली असून तुमसर तालुक्यातील एका बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला.
पोलिसांनी संबंधित असिस्टंट बँक मॅनेजर याला नागपुरातून अटक केली असून त्याच्याकडून 1 कोटी 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या आरोपी असलेला असिस्टंट बँक मॅनेजर न्यायालयीन कोठडीत आहे. पण, त्यानं स्वतःच्या बँकेत चोरी करण्यामागे नेमकं कारण काय? पोलिसांनी आरोपीचा शोध कसा घेतला? पाहूयात.
असिस्टंट मॅनेजरनं कशी केली चोरी?
भंडारा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी असिस्टंट बँक मॅनेजर हा मूळचा नागपूरचा आहे. घटनेच्या आदल्या दिवशी तो नागपुरात आला आणि त्यानं बॅग खरेदी केल्या. त्यानंतर तो 18 नोव्हेंबरला रात्री बँकेत गेला. त्याच्याकडे बँकेच्या सगळ्या चाव्या होत्या.
त्यानं लाईट बंद करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर काढले, स्वतःचे फिंगरप्रिंट साफ केले. तसेच ओळखू येऊ नये म्हणून स्वतःचा चेहरा देखील त्यानं झाकला होता. तिजोरीमध्ये एक अशी वायर असते जी अनोळखी व्यक्तीने चोरीचा प्रयत्न केला तर बँकेच्या प्रमुख प्रणालीला सूचना देते. त्यातून अलार्म वाजतो.
ही वायर देखील या आरोपीने हुशारीने कापली होती. आणि तिजोरीतून जवळपास 97 लाख रुपये बॅगेत भरले आणि तिथून पळ काढला. सोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर घेऊन गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी बँक उघडण्यासाठी गेला तेव्हाच बँक लुटल्याचं लक्षात आलं. लगेच गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. रक्कम मोठी असल्यानं भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन त्याठिकाणी पोहोचले.
पण, बाहेरच्या नाहीतर बँकेच्या माणसानं ही बँक लुटल्याचा केल्याचा संशय त्यांना आला.
कारण, बँकेत कोणत्या ठिकाणी कोणता कॅमेरा आहे, कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत हे इतकं चोखपणे एखादा बँकेत काम करणारा व्यक्तीला माहिती असू शकते. तसेच करन्सी चेस्टमधील अलार्म सिस्टमची वायर देखील त्या रुममध्ये नेहमी प्रवेश करणाऱ्या माहिती असू शकतो.
इतकंच नाहीतर बँकेचं कुलूप तोडलेलं नव्हतं, तर चावीनं उघडलं होतं. तसेच लॉकर सुद्धा बँकेच्या चावीनं उघडलं होतं. त्यामुळे एक तर हे काम बँकेचे मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर किंवा कॅशिअर या तिघांचं असू शकतं किंवा अशी कोणी व्यक्ती ज्यांच्या हातात बँकेची चावी लागली आहे, असं पोलिसांच्या लक्षात आलं.
स्कूटरमुळे पकडला गेला
पोलिसांनी शंभर पोलिसांच्या दहा टीम तैनात केल्या होत्या. यापैकी काही टीम नागपूरला सुद्धा तपासणीसाठी पाठल्या होत्या.
या प्रकरणात आरोपीनं चोरी करताना सगळी काळजी घेतली होती. पण, कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला होता. बाहेरच्या कॅमेऱ्यात एका स्कूटरवर रिकाम्या बॅग घेऊन आत जाताना आणि भरलेल्या बॅग घेऊन बँकेतून बाहेर निघताना दिसला. याच बॅगांची चौकशी देखील नागपुरात आलेल्या पोलिसांच्या टीमने केली.
तसेच असिस्टंट बँक मॅनेजरनं नागपूरला ट्रेनिंग आहे असं सांगून सुट्टी टाकली होती. पण, बँकेत चोरी झाली त्यासाठी त्याला तातडीनं भंडाऱ्याला बोलावण्यात आलं. त्यावेळी नेहमी कारने येणं-जाणं करणारा असिस्टंट मॅनेजर स्कूटरने भंडाऱ्याला पोहोचला.
ही तीच स्कूटर होती जी बँकेत दरोडा पडला त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तसेच नागपुरात आलेल्या पथकानं त्याच्या घरी झडती घेतली, तर त्याच्या कारच्या डिक्कीत जवळपास 97 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.
ही रोख रक्कम सीसीटीव्हीमध्ये ज्या बॅग होत्या त्याच बॅगेत होती.
सगळे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या असिस्टंट बँक मॅनेजरला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर आपणच हा गुन्हा केल्याची कबुली त्यानं दिली. बँकेतून चोरलेले पैसे त्यानं आपल्या कारच्या डिक्कीत ठेवलेले होते.
सोबत त्याच्याकडून 1 कोटी 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोबतच 27 हजार रुपये किमतीचे 9 सीसीटीव्ही कॅमेरे, सुमारे 4 हजार रुपये किमतीचे डीव्हीआर मशीन, सुमारे 4 हजार रुपये किमतीचे 1 मॉनिटर देखील जप्त करण्यात आलं.
याआधीची चोरी लपवण्यासाठी टाकला मोठा दरोडा
'लकी भास्कर' या चित्रपटात भास्कर नावाचं कॅरेक्टर जसं दररोज काही लाख रुपये चोरतो आणि आपल्या गरजा भागवतो अगदी तसंच या घटनेतील आरोपीने केलं.
बँकेच्या तिजोरीची चावी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरकडे होती. दोन्ही चावी लावल्याशिवाय बँकेचं करन्सी चेस्ट उघडत नाही.
पण, या असिस्टंट बँक मॅनेजरनं बँकेच्या मॅनेजरला इतकं विश्वासात घेतलं होतं की हाच दोन्ही चाव्या घेऊन जायचा आणि कुलूप उघडायचा.
त्याचाच फायदा घेत आरोपीने एक ते दोन लाख रोख रक्कम दररोज चोरायचा आणि आपल्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचा.
त्यानंतर गुपचूप बॅगेत भरून ती घरी न्यायचा. अशी त्यानं 61 लाख रुपयांची चोरी आधीच केली होती.
त्यानंतर इतकी मोठी चोरी लपवण्यासाठी त्यानं थेट बँकेत मोठा दरोडा टाकायचं ठरवलं.
कर्नाटकात बँकेच्या मॅनेजरच्या मदतीनं सोनं लुटल्याची घटना घडली होती ती घटना पाहून हे केल्याचं संबंधित आरोपीने पोलिसांना सांगितले.
आरोपीनं चोरी का केली?
आरोपी असिस्टंट बँक मॅनेजर हा युपीएससीचा अभ्यास करत होता.
पण, त्याला ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगचं व्यसन लागलं होतं. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं. त्यासाठी त्यानं आपल्या वडिलांची 80 लाख रुपयांची एफडी मोडली होती.
तसेच एका ग्राहकाकडून सुद्धा इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली 40 लाख रुपये घेतले होते.
इतकंच नाहीतर शेअर मार्केमुळे 12 लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. इतर लोकांकडून पण पैसे उसने घेतले होते.
इतके पैसे कसे फेडायचे असा प्रश्न होता. यासाठी त्यानं बँकेवर दरोडा टाकल्याची कबुली त्यानं दिली.
पण, चोरीत वापरलेली स्कूटर, बॅग आणि बाहेर लागलेला सीसीटीव्ही कॅमेरा यामुळे तो चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेला.
भंडारा पोलीस आरबीआयलाही लिहिणार पत्र
नुरूल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बँकेच्या तिजोरीत 35 लाख रुपये ठेवण्याची लिमिट आहे. पण, तिथं 1 कोटी 58 लाख रुपये कसे ठेवण्यात आले? यावर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नाही का?
यासाठी आरबीआयनं नियम आणखी कडक करून व्हिजिलन्स अधिकाऱ्यांच्या भेटी वाढवाव्या जेणेकरून जनतेचा पैसा सुरक्षित राहील असं पत्र भंडारा पोलीस आरबीआयला लिहिणार आहेत.
कारण, तपासादरम्यान या बँकेच्या शाखेत असिस्टंट बँक मॅनेजर दररोज करन्सी चेस्टमधून अधिकचे पैसे काढायचा आणि व्यवहारांमध्ये खाडाखोड करायचा. असंच झालं तर जनतेच्या पैशांची लूट होईल. त्यामुळे आरबीआयनं यावर कडक मॉनिटरींग करायला पाहिजे असं नुरुल हसन यांचं म्हणणं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.