You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वाराणसीच्या आश्रमात मराठी बोलली अन् पत्रकारानं फोन केला, मुंबईतून अपहरण झालेल्या चिमुकलीच्या शोधाची गोष्ट
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"ते दिवस लई बेक्कार गेले. ती कधी सापडेल असं वाटत होतं. आम्ही सगळीकडे तिला शोधलं. पोलीस पण पंधरा-वीस दिवस तिला वाराणसीत शोधत होते, पण ती काही सापडली नाही. मग 12 नोव्हेंबरला मला फोन आला की ती सापडली आहे."
"आम्हाला आता बरं वाटतंय. तीची वैद्यकीय तपासणी झाली आणि रिपोर्ट्सही नॉर्मल आले आहेत. ती फार काही सांगत नाही. तिकडे मी शाळेत जात होते इतकंच ती सांगत आहे," असं तिच्या आईने सांगितलं.
बरोबर सहा महिन्यांपूर्वी 20 मे 2025 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरून एका चार वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं.
ही मुलगी सहा महिन्यांनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या वारणसी इथं सापडली. पण हे जवळपास 180 दिवस या लहान मुलीच्या आई-वडिलांची झोप उडवणारे ठरले.
मुंबई पोलिसांनीही पाठपुरावा सोडला नाही आणि मुंबईपासून तब्बल 1500 किलोमीटरवर असलेल्या वारणासीतून या चिमुकलीला शोधून काढलं.
या सहा महिन्यांत नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी 'ऑपरेशन शोध' कसं राबवलं? जाणून घेऊया.
'काहीतरी घ्यायला गेली आणि अपहरण झालं'
मूळचं महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातलं असणारं हे मराठी कुटुंब जानेवारी 2025 पासून सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर राहत होतं.
मुलगी आजारी असल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते, असं तिच्या आईने सांगितलं.
यादरम्यान मुंबईत राहण्यासाठी जागा नसल्याने आणि रुग्णालयात जाणं सोयीचं व्हावं म्हणून चार वर्षांच्या मुलीसह रेल्वे स्थानकाबाहेर राहून ते दिवस काढत होते.
या काळात त्या चिमुकलीसाठी ती जागाच घर बनली. तिथल्या वातावरणाशी तिची ओळख झाली आणि ती हसत खेळत तिथे राहू लागली. पण 20 मे 2025 हा दिवस एक भयंकर घटना घेऊन आला.
मुलीच्या आईने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "20 मे रोजी संध्याकाळी साधारण पाच वाजता आम्ही वडा-पाव घेण्यासाठी गेलो, तेव्हा मुलगी अचानक कुठेतरी गेली.
आम्हाला वाटलं इथेच असेल म्हणून आम्ही शोधत होतो. पण रात्रीचे 12-1 वाजले तरी ती सापडली नाही. मग, आम्ही जवळच्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार नोंदवली."
"पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एक माणूस हाताला धरून तिला घेऊन चालला आहे असे फोटो पोलिसांनी आम्हाला दाखवले.
पण त्यावेळी ती सापडली नाही. आम्ही सोलापूरला गावी परत आलो. पण आम्ही सारखं साहेबांना फोन करायचो, ती सापडली का? असं विचारायचो.
आमची परिस्थिती खूप गरीब आहे. दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जातो. आम्ही इकडे आलो आणि काम शोधलं. तिकडे राहण्याची काहीच सोय नव्हती म्हणून स्टेशनला राहत होतो."
"पण सुरुवातीचे पंधरा दिवस बेक्कार गेले. ती कधी सापडेल असं वाटत होतं. आम्ही सगळीकडे तिला शोधलं. पोलीस पण पंधरा वीस दिवस तिला वाराणसीत शोधत होते पण ती काही सापडली नाही.
मग 12 नोव्हेंबरला मला फोन आला की ती सापडली आहे. आम्हाला आता बरं वाटतंय. तीची वैद्यकीय तपासणी झाली आणि रिपोर्ट्सही नॉर्मल आले आहेत," असं तिच्या आईने सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "लहान मुलगी काहीतरी घ्यायला गेली. त्यानंतर फुटेजमध्ये दिसून येत आहे त्यानुसार संशयित आरोपी ज्याने तिचं अपहरण केलं तो तिला खाण्याचं आमिष दाखवून घेऊन गेला.
त्याने तिला कडेवर उचलून घेतलं होतं. ती मुलगीही रडत नव्हती. कदाचित ती त्या वातावरणात सहज कोणासोबत तरी गेली असावी असा आमचा अंदाज आहे."
यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकाहून संशयित आरोपी रेल्वेने दादर याठिकाणी पोहचला.
पोलीस उप निरिक्षक सूरज देवरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "विदर्भ एक्सप्रेसमध्ये ते चढले आणि मुलीला दादरला उतरून फूल मार्केटला गेले. इथून तो तिला कुर्ला इथं घेऊन गेला आणि एलटीटी स्थानकावरून बनारस एक्सप्रेस पकडली."
यानंतर मुंबई पोलिसांनी मुलीला शोधण्यासाठी तीन पथकं बनवली. तीन पोलिस अधिकारी आणि 12 पोलीस कर्मचाऱ्यांनी बनारस एक्सप्रेसच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर पोहचून मुलीला शोधण्याचा प्रयत्न केल्याचं देवरे सांगतात. पण त्यावेळी पोलिसांना यश आलं नव्हतं.
या दरम्यान, संशयित आरोपी भूसावळ रेल्वे स्टेशनला उतरल्याचंही पोलिसांनी दिलं होतं. बनारस एक्सप्रेसमधून आरोपी वाराणसीला पोहचल्याचं पोलिसांना फूटेजमध्ये दिसून आलं.
पोलिसांची पथकं तत्काळ वाराणसीला पोहचली. वाराणसीत पोलिसांच्या टीमने हॉटेल्स, रेल्वे स्टेशन्स अशा सर्व ठिकाणी शोध घेतला. पण त्यांना आरोपी किंवा मुलीला शोधण्यात यश आलं नाही.
आम्ही ह्युमन ट्रॅफीकींगच्या दिशेनेही तिकडे तपास केला परंतु तसं काही आढळलं नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.
अखेर जवळपास 12 दिवसांनंतर पोलिसांच्या सर्व टीम मुंबईत परतल्या.
मराठी भाषा आणि स्थानिक रिपोर्टरचा पोलिसांचा फोन
चार महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी वाराणसी गाठलं.
यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेल्या ठिकाणांचा पुन्हा एकदा शोध घेतला. स्थानिकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
मुलीचा फोटो आणि संपर्क क्रमांकाचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले. स्थानिक पोलीस आणि स्थानिक पत्रकारांपर्यंतही पोलीस पोहचले.
काही लोकल चॅनेल्सलाही शोधण्यासाठी संपर्क केल्याचं पोलीस सांगतात.
पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "सप्टेंबर महिन्यात पोलिसांची टीम पुन्हा वाराणसीला गेली होती. पण त्यावेळी शोध मोहीम हाती घेतली.
बराच प्रयत्न केला. पण तेव्हाही मुलगी सापडली. यानंतर नोव्हेंबरमध्ये हरवलेल्या लहान मुलांना शोधण्यासाठी ऑपरेशन शोधअंतर्गत पुन्हा पोलिसांनी प्रयत्न केला."
पोलिसांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अचानक वाराणसीहून एक फोन कॉल आला. एका स्थानिक पत्रकाराचा हा फोन होता. मराठी बोलणारी एक लहान मुलगी वाराणसीच्या आश्रमात असल्याची माहिती त्याने दिली.
उपनिरीक्षक सूरज देवरे यांनी सांगितलं की, "संशयित आरोपी आणि मुलीची ताटातूट कशी झाली याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण एका महिलेने मुलगी बेवारस असल्याने वाराणसीमध्ये स्थानिक पोलिसांकडे जाऊन तिला सोडलं.
पोलिसांनी लहान मुलीला आश्रमात दाखल केलं. तिकडे ती शाळेतही जात होती. मराठी भाषेत बोलत होती.
आम्हाला तिथल्या रिपोर्टरचा फोन आल्यानंतर आम्ही त्याच्यासोबत व्हीडिओ कॉल केला आणि पालकांनाही मुलीला दाखवलं. ओळख पटल्यानंतर आम्ही पुन्हा वाराणसीत पोहचलो."
वाराणसीमध्ये चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुंबईतही चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर प्रक्रिया पूर्ण केली आणि काही दिवसांपूर्वी मुलीला पालकांच्या ताब्यात सुपूर्द केलं, असं पोलिसांनी सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.