'हे' 4 लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता, शास्त्रज्ञांचं दिवस-रात्र लक्ष, 'नासा'नं मोहीम आखली

फोटो स्रोत, SPL
- Author, येमिसी अडेगोके
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
जेव्हा अशी बातमी येते की, एखाद्या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता आहे किंवा जेव्हा तुम्ही एखादा विज्ञानपट किंवा सायन्स फिक्शन चित्रपट पाहत असता, कदाचित फक्त तेव्हाच तुम्ही लघुग्रहांबद्दल विचार करत असाल.
मात्र, जगभरातील अनेक संशोधन संस्था आणि वेधशाळा यांचं अंतराळावर, पृथ्वीशी निगडीत गोष्टींवर लक्ष असतं. असं करण्यामागे अनेक कारणं असतात.
आता प्रश्न उपस्थित होतो की, ॲस्टेरॉईड किंवा लघुग्रह म्हणजे काय? जवळपास 4.6 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्यमालेची निर्मिती झाली होती. त्यावेळेस काही लहान खडक किंवा धातू अंतराळात तसेच राहिले होते. त्यांना लघुग्रह म्हटलं जातं.
आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लघुग्रहांची ओळख पटवण्यात आली आहे.
यातील बहुतांश लघुग्रह, 'मेन ॲस्टेरॉईड बेल्ट' म्हणजे 'मुख्य लघुग्रह पट्ट्यात' आहेत. मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह यांच्या दरम्यान हा पट्टा आहे. हे सर्व लघुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.
मात्र, काही लघुग्रह पृथ्वीच्या जवळदेखील येतात. मोनिका ग्रेडी ब्रिटनच्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये प्लॅनेटरी अँड स्पेस सायन्सेसच्या प्राध्यापक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, या लघुग्रहांमुळे पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती कशी झाली, हे समजण्यास मदत होऊ शकते.
त्या म्हणतात, "यातील काही लघुग्रहांमध्ये बरेच ऑर्गेनिक कम्पाउंड (संयुगं) असतात. ही संयुगं जीवनाच्या निर्मितीचे स्त्रोत असू शकतात. एक संकल्पना अशीदेखील आहे की जीवनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले घटक लघुग्रहांद्वारे पृथ्वीवर पोहोचले, त्यामुळेच पृथ्वीवर जीवनाची सुरुवात झाली."

फोटो स्रोत, NASA/Ben Smegelsky
खरी चिंता नवख्या लघुग्रहांची
अर्थात बहुतांश लघुग्रहांमुळे पृथ्वीचं कोणतंही नुकसान होत नाही. ते कोणताही परिणाम न करता अंतराळात निघून जातात. मात्र, काही लुघग्रह असे आहेत, ज्यांच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक असतं.
अगाता रोझेक, ब्रिटनमधील एडिनबरा विद्यापीठातील स्कूल ऑफ फिजिक्स अँड ॲस्ट्रोनॉमीमध्ये रिसर्च फेलो आहेत. त्या म्हणतात, "पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या वस्तूंबद्दल अचानक रस वाढतो. जोपर्यंत त्यांच्या कक्षेबद्दल स्पष्ट माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं जातं."
"अंतराळातून येणारी त्या वस्तूची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता तर नाही ना आणि जर तशी शक्यता असेल तर त्याची संभाव्य वेळ कोणती असेल, या गोष्टींचा विचार केला जातो."
"ज्या वस्तू पृथ्वीपासून दूर अंतरावर आहेत, त्यांच्यात ज्या वस्तू, लघुग्रह यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवतो."
आकाराचा विचार केल्यास, मोठ्या लघुग्रहांबद्दल तुलनेनं कमी चिंता असते.
रोझेक म्हणतात, "आम्हाला हे निश्चित माहित असतं की मोठे लघुग्रह कुठे आहेत आणि ते कोणत्या दिशेनं जात आहेत. आम्हाला त्यांची गती चांगल्या प्रकारे लक्षात येते. तर जे लघुग्रह वैशिष्ट्यपूर्ण किंवा नेहमीपेक्षा वेगळे असतात, त्यांच्याबद्दल अधिक समजून घेण्यासाठी आम्ही त्यांचा अभ्यास करतो."
त्यांच्या मते, "खरी चिंता छोटे लघुग्रह आणि आतापर्यंत न पाहिलेल्या लघुग्रहांबद्दल असते. कारण या लघुग्रहांच्या कक्षेचं आतापर्यंत योग्य असं आकलन झालेलं नसतं किंवा त्याचा अंदाज बांधलेला नसतो."
वैज्ञानिक सध्या ज्या प्रमुख लघुग्रहांवर लक्ष ठेवून आहेत, त्यातील तीन लघुग्रहांबद्दल आपण जाणून घेऊया. याशिवाय एक चौथा लघुग्रह देखील आहे. या लघुग्रहाच्या बाबतीत नासानं एक विशेष मोहीम सुरू केली आहे.
1. अपोफिस - फुटबॉलच्या तीन मैदानांच्या आकाराचा
इजिप्तमधील पौराणिक कथांमध्ये अपोफिसला अराजकता आणि विनाशाची देवता मानलं जातं. त्याच्या नावावरूनच एका लघुग्रहाचं नावदेखील ठेवण्यात आलं आहे. या लघुग्रहाचा शोध 2004 मध्ये लागला होता.
सुरुवातीला असं मानलं गेलं होतं की, या अपोफिस नावाच्या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची थोडीफार शक्यता आहे. मात्र नंतर नासानं स्पष्ट केलं की 'अपोफिसची पृथ्वीशी टक्कर होण्याचा धोका पुढील किमान 100 वर्षे तरी नाही.'

फोटो स्रोत, NASA
अगाता रोझेक म्हणतात, "सध्या आम्हाला हे माहित आहे की, हा लघुग्रह 13 एप्रिल 2029 ला पृथ्वीच्या जवळून सुरक्षितपणे जाईल."
त्या म्हणतात, "या लघुग्रहाचा शोध लागल्यानंतर यावर अनेकदा बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलं. त्यातून ही माहिती मिळाली की हा लघुग्रह पृथ्वीच्या अतिशय जळवून जाईल."
"आपले जिओस्टेशनरी सॅटेलाईट म्हणजे कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून जितक्या अंतरावर असतात, जवळपास तितक्याच अंतरावरून हा लघुग्रह जाईल."
"आम्हाला वाटतं की पृथ्वीच्या इतक्या जवळ आल्यामुळे या लघुग्रहावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्याचा आकार देखील बदलू शकतो."
नासाच्या मते, अपोफिस सूर्याभोवती ज्या कक्षेतून प्रदक्षिणा घालतो, त्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पडू शकतो. या लघुग्रहाच्या पृष्ठभागावर छोट्या स्वरुपातील भूस्खलन होऊ शकतं.
अपोफिसचा सरासरी व्यास जवळपास 340 मीटर आहे. म्हणजेच फुटबॉलच्या तीन मैदानांइतका. हा लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास 32,000 किलोमीटर अंतरावरून जाईल. हे अंतर इतकं कमी असेल की हा लघुग्रह जाताना उघड्या डोळ्यांनी देखील पाहता येऊ शकेल.
2. 2024 वायआर-4 : चंद्राशी टक्कर होणार का?

फोटो स्रोत, ATLAS
नासाच्या अंदाजानुसार, '2024 वायआर-4' या लघुग्रहाचा आकार जवळपास 53 ते 67 मीटर दरम्यान आहे. म्हणजेच एखाद्या 15 मजली इमारतीएवढा. याचा शोध 2024 मध्ये लागला होता.
2032 मध्ये या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची थोडीशी शक्यता आहे, अशी चिन्हं दिसून आल्यानंतर हा लघुग्रह चर्चेत आला.
काही संशोधकांनी सुरुवातीच्या कॅल्क्युलेशनमध्ये अंदाज लावला होता की '2024 वायआर-4' ची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता 32 मध्ये एक असू शकते. अर्थात नंतर नासानं ही शक्यता नाकारली.
मोनिका ग्रेडी म्हणतात, "जर एखाद्या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता असेल तर त्यातील सर्वात मोठं आव्हान हे असतं की टक्कर होण्याची नेमकी किती शक्यता आहे याचा नेमका अंदाज बांधणं."
"त्यासाठी आम्हाला त्या लघुग्रहावर सातत्यानं लक्ष ठेवावं लागतं. त्यातून त्या लघुग्रहाची कक्षा आणि दिशा यांचं अधिक अचूकतेनं आकलन केलं जातं."
अर्थात, '2024 वायआर-4' या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची अजूनही 3.8 टक्के शक्यता आहे. मात्र नासाचं म्हणणं आहे की जर असं जरी झालं तरी त्यामुळे चंद्राच्या कक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही.
3. डिडिमॉस आणि डिमॉर्फोस : लघुग्रह आणि त्याचा चंद्र

फोटो स्रोत, NASA/Johns Hopkins APL/Steve Gribben
डिडिमॉस हा एक लघुग्रह आहे. ग्रीक भाषेत या शब्दाचा अर्थ 'जुळा' असा होतो. या लघुग्रहाला डिमॉर्फोस नावाचा एक छोटा चंद्रदेखील आहे. हा चंद्र या लघुग्रहाभोवती प्रदक्षिणा घालतो.
या दोन्ही खडक किंवा लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही असं मानलं जातं. मात्र ते अपेक्षेपेक्षा जवळून जातात.
या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी नासानं 2022 मध्ये 'डबल ॲस्ट्रेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट' (डार्ट) ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत एका प्रोब यानाची डिमॉर्फोसशी टक्कर झाली आणि ते यान नष्ट झालं.
भविष्यात जर एखाद्या लघुग्रहामुळे पृथ्वीला काही धोका निर्माण झाला, तर त्या लघुग्रहाचा मार्ग बदलता येऊ शकतो का, याचा अभ्यास करणं हे या मोहिमेचं उद्दिष्टं होतं.
या मोहिमेसाठी डिडिमॉस आणि डिमॉर्फोस यांची निवड खूप सावधगिरीनं करण्यात आली होती. मोहिमेच्या आधी हे लघुग्रह पृथ्वीच्या प्रदक्षिणेच्या कक्षेत येत नव्हते. त्यांच्या कक्षेत थोडा बदल केल्यास त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही.
अगाता रोझेक म्हणतात, "या मोहिमेमध्ये प्रोब यानानं डिमॉर्फोसला टक्कर देऊन डिडिमॉसभोवतीची त्याची कक्षा बदलून टाकली. ग्रहांच्या संरक्षणाशी संबंधित ही पहिली व्यावहारिक चाचणी होती."
या बदलाला मुख्यत: पृथ्वीवरून बारकाईनं मोजण्यात आलं. आम्ही अजूनही या प्रणालीवर लक्ष ठेवून आहोत. कारण, या टक्करचा काय परिणाम झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी पुढील वर्षी युरोपियन स्पेस एजन्सीचं (ईएसए) 'हेरा मिशन' तिथे पोहचणार आहे.
4. साइक : पृथ्वीच्या गाभ्याचं कोडं सोडवण्याची चावी

फोटो स्रोत, NASA
नासाच्या मते, 'साइक' लघुग्रहांच्या मुख्य पट्ट्यातील सर्वात रंजक वस्तूंपैकी एक मानलं जातं. याचा शोध 1852 मध्ये लागला होता. ग्रीक पौराणिक कथांमधील आत्म्याची देवी असलेल्या 'साइक' वरून या लघुग्रहाचं नाव ठेवण्यात आलं आहे.
साइक आपल्यापासून खूप दूर आहे. तो मंगळ ग्रह आणि गुरु ग्रहाच्या मधून सुर्याला प्रदक्षिणा घालतो. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की हा लघुग्रह मुख्यत: धातू आणि खडकांपासून बनलेला आहे.
असंही मानलं जातं की साइकमध्ये असलेला बहुतांश धातू बहुधा एका प्लॅनेटेसिमल म्हणजे ग्रहांच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या स्थितीत निर्माण झालेल्या खगोलशास्त्रीय खडकाच्या गाभ्यातून आला आहे.
साइकच्या अभ्यासातून, पृथ्वी आणि इतर ग्रहांचा गाभा कसा तयार झाला, हे समजण्यास मदत होऊ शकते.
2023 मध्ये नासानं या लघुग्रहावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष मोहिमेची सुरुवात केली होती.
अंतराळातील नवीन शोध

फोटो स्रोत, NSF-DOE Vera C. Rubin Observatory
या महिन्याच्या सुरुवातीला वेरा रुबिन वेधशाळेनं खुलासा केला की त्यांच्या नव्या दुर्बिणीनं फक्त दहा तासांमध्ये, पृथ्वीच्या जवळ असलेल्या दोन हजारांहून अधिक नवीन लघुग्रह आणि जवळपास सात खगोलीय खडकांचा शोध लावला आहे.
सर्वसाधारणपणे, जमिनीवर असलेल्या आणि अंतराळात असलेल्या सर्व वेधशाळा एकत्रितपणे दरवर्षी जवळपास 20,000 लघुग्रहांचा शोध लावतात.
प्राध्यापक मोनिका ग्रेड म्हणतात, "जर तुम्हाला संपूर्ण रात्रभर आकाशावर लक्ष ठेवायचं असेल, तर तुम्हा दृष्टीकोन खूपच व्यापक असला पाहिजे. वेरा रुबिन वेधशाळेची दुर्बीण हेच काम करते."
या वेधशाळेला आशा आहे की, या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच लाखो नवीन लघुग्रहांचा शोध लागू शकतो. यामुळे वैज्ञानिकांना आणखी खगोलीय खडक, लघुग्रहांवर लक्ष ठेवण्याची संधी मिळेल. त्यातून सूर्यमालेच्या निर्मितीचं गूढ उकलणारी नवीन माहिती समोर येऊ शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











