डायनासोरला नष्ट करणारा उल्कापात जेव्हा झाला होता, तेव्हा पृथ्वीवर काय घडलं होतं?

डायनासोरचे काल्पनिक चित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जॉर्जिना रॅनार्ड
    • Role, विज्ञान प्रतिनिधी

सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ज्या उल्कापातामुळे डायनासोरचा विनाश झाला, त्या घटनेत केवळ एकच अशनी नसावी असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. या अशनीबरोबरच एक आणखी अशनी पडली असावी असा अंदाज संशोधकांचा आहे.

संशोधक सांगतात की त्याच काळात पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर आणखीन एक आकाराने लहान असलेली अशनी समुद्रात कोसळली आणि त्यामुळे आणखी एक मोठं विवर तयार झालं.

शास्त्रज्ञांनी सांगितलं की पृथ्वीच्या इतिहासातली ही सगळ्यांत भयंकर घटना असू शकते. या उल्कापातामुळे अटलांटिक महासागरात किमान 800 मीटर उंच त्सुनामीच्या लाटा आल्याचंही शास्त्रज्ञ म्हणाले.

हेरियट-वॅट विद्यापीठातील डॉ. उइस्डियन निकोल्सन यांना 2022 मध्ये पहिल्यांदा या घटनेतील नादीर विवराचा शोध लागला. पण हे विवर नेमकं कसं तयार झालं याबाबत अनिश्चितता तयार झाली.

आता डॉ. निकोल्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री आहे की उल्कापाताच्या या घटनेमुळे समुद्राच्या तळाशी सुमारे 9 किलोमीटर मोठा खड्डा तयार झाला.

मेक्सिकोमधील 180 किलोमीटर रुंद असणारं चिक्क्सुलब विवर (Chicxulub Crater) तयार झाल्यानंतर पृथ्वीवरून डायनासोर नामशेष झाले होते.

डॉ. निकोल्सन आणि त्यांचे सहकारी ज्या उल्कापाताबाबत बोलत आहेत तो उल्कापात चिक्क्सुलब विवराच्या निर्मितीआधी झाला की नंतर याबाबत मात्र खात्रीशीरपणे सांगत नाहीत.

ज्या क्रेटेशियस युगाच्या शेवटी डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले, त्याच वेळी ही दुसरी पण आकाराने छोटी अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळलेली असू शकते असा अंदाज या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या उल्कापाताच्या वेळी एक मोठा आगीचा गोळा तयार झाला असण्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. निकोल्सन म्हणाले की, "अशी कल्पना करा की ग्लासगो शहरावर ही अशनी आदळली आहे आणि तुम्ही तिथून पन्नास किलोमीटर दूरवर असणाऱ्या एडिनबर्गमध्ये आहात. या उल्कापाताच्या वेळी तयार झालेला आगीचा गोळा हा आकाशात दिसणाऱ्या सूर्याच्या आकारापेक्षा 24 पटींनी मोठा होता. एडिनबर्गपर्यंतची सजीवसृष्टी नष्ट करण्याची क्षमता या गोळ्यात होती."

या घटनेनंतर एक हवेत एक प्रचंड मोठा स्फोट होऊन, 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले असतील. या भूकंपामुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीवर घुसलं आणि नंतर हे पाणी ओसरलं असेल, पण जमिनीवर या पाण्याचे ठसे निर्माण झाले असतील.

सौरमालेतून बाहेर पडून अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक अशनी पृथ्वीवर आदळण्याची घटना क्वचितच घडते. पण संशोधकांना ही घटना नेमकी का घडली हेच माहीत नाही.

ज्या उल्कापातामुळे नादीर विवर तयार झाले, ती अशनी सुमारे 450-500 मीटर रुंद असल्याचं आणि ती सुमारे 72,000 किमी/तास वेगाने पृथ्वीवर आदळल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

नादीर विवराचे कोणतेही फोटो नाहीत पण ऑस्ट्रेलियातील गॉसेस ब्लफ विवर त्यासारखेच आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नादीर विवराचे कोणतेही फोटो नाहीत पण ऑस्ट्रेलियातील गॉसेस ब्लफ विवर त्यासारखेच आहे.

1908 मध्ये सायबेरियाच्या आकाशात उल्कापातामुळे जो स्फोट घडला होता त्या घटनेला तुंगुस्का असं म्हणतात. नादीर विवर तयार करणाऱ्या उल्कापाताच्या जवळपास जाणारी तुंगुस्का ही एकमेव घटना आहे.

सध्या पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या बेन्नू या उल्केएवढा नादीर विवर तयार करणाऱ्या उल्केचा देखील आकार असल्याचं शास्त्रज्ञ म्हणाले.

नासाच्या म्हणण्यानुसार, बेन्नू पृथ्वीवर आदळण्याची सर्वांत संभाव्य तारीख 24 सप्टेंबर 2182 असू शकते. मात्र असं होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

धूमकेतू

फोटो स्रोत, Getty Images

मानवी इतिहासात एवढा मोठा स्फोट कधीच झालेला नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांना साधारणपणे पृथ्वीवरील पडलेल्या विवरांचा किंवा इतर ग्रहांवरील विवरांच्या फोटोचा अभ्यास करावा लागतो.

नादीर विवर अधिक समजून घेण्यासाठी, डॉ निकोल्सन आणि टीमने TGS नावाच्या भूभौतिकीय (जिओफिजिकल) कंपनीकडून मिळालेल्या हाय रिजोल्युशन 3D डेटाचे विश्लेषण केले.

बहुतेक विवर नष्ट होत आले आहेत परंतु नादीर विवराचं चांगल्या पद्धतीने जतन करण्यात आलं आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ यातील दगडांच्या विविध स्तरांचा अभ्यास करू शकतात.

डॉ. निकोल्सन म्हणतात की, “आम्ही पहिल्यांदाच एखाद्या विवराच्या मध्ये डोकावून पाहू शकत आहोत, हा अनुभव खरोखर रोमांचकारी आहे. डॉ निकोल्सन सांगतात की, जगात फक्त 20 सागरी विवर आहेत पण एकाही विवराचा अशा प्रकारे तपशीलवार अभ्यास केलेला नाही.

नेचर कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्न्मेंटमध्ये निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.