तुंगुस्का घटना: 'आभाळ दुभंगलं' असं वर्णन करण्यात आलेला सैबेरियातला 'तो' गूढ स्फोट

इतिहासात नोंदवल्या गेलेल्या या सर्वांत शक्तिशाली स्फोटाला 100 वर्षं उलटूनही त्याभोवतीचं गूढ अजूनही कायम आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इतिहासात नोंदवल्या गेलेल्या या सर्वांत शक्तिशाली स्फोटाला 115 वर्षं उलटूनही त्याभोवतीचं गूढ अजूनही कायम आहे.
    • Author, मेलिसा हॉगनबूम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

30 जून 1908. सैबेरियातल्या अगदी दुर्गम भागातल्या पोंडकामेनाया तुंगुस्का नदीजवळच्या जंगलावरचं आभाळ फाडत एक स्फोट झाला.

आगीचा तो गोळा 50 ते 100 मीटर रुंद असल्याचं मानलं जातं. या स्फोटाने 2,000 चौरस किलोमीटर परिसरातल्या तैगा अरण्यातले तब्बल आठ कोटी वृक्ष उन्मळून पडले.

अवघी धरणी हादली. 60 कि.मी.वर असलेल्या जवळच्या गावात घरांच्या खिडक्या फुटल्या. या स्फोटाची धगही इथल्या ग्रामस्थांना जाणवली, तर काही जण या हादऱ्यामुळे फेकले गेले.

ज्या भागात हा स्फोट झाला तिथे मात्र सुदैवाने अगदी विरळ वस्ती होती. त्यामुळे जीवितहानी झाल्याची तशी कुठलीही अधिकृत नोंद नाही. पण स्फोटामुळे झाडावर फेकलं गेल्याने एका हरणाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं. शेकडो रेनडियर्सचाही जळून कोळसा झाला.

इतिहासात नोंदवल्या गेलेल्या या सर्वांत शक्तिशाली स्फोटाला 115 वर्षं उलटूनही त्याभोवतीचं गूढ अजूनही कायम आहे. नेमकं काय घडलं असावं?

'आभाळ दुभंगलं'

ही घटना प्रत्यक्ष पाहणारा एकजण म्हणतो, "आभाळ दुभंगलं... जंगलावरचं उत्तरेकडचं सारं आकाश आगीच्या लोळाने व्यापलं होतं. त्याच क्षणी आकाशात मोठा स्फोट झाला आणि प्रचंड मोठा कडकडाट झाला! कडकडाटानंतर आकाशातून दगडधोंडे कोसळल्यासारखा किंवा अनेक बंदुकांमधून गोळीबार झाल्यासारखा आवाज आला."

भूकंपाचे हादरे दूरवर, म्हणजे अगदी ब्रिटनपर्यंत जाणवले.

फोटो स्रोत, LEONID KULIK

फोटो कॅप्शन, भूकंपाचे हादरे दूरवर, म्हणजे अगदी ब्रिटनपर्यंत जाणवले.

'तुंगुस्का घटना' म्हणून ओळखला जाणारा हा प्रसंग इतिहासात नोंदवण्यात आलेल्या अशाप्रकारच्या घटनांपैकी सगळ्यांत शक्तिशाली घटना आहे. हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या अणू बाँबपेक्षा या घटनेनंतर निर्माण झालेली उष्णता ही 185 पटींनी जास्त होती. (काही अंदाजांनुसार निर्माण झालेली उष्णता याही पेक्षा जास्त होती).

भूकंपाचे हादरे दूरवर, म्हणजे अगदी ब्रिटनपर्यंत जाणवले. आणि असं असूनही, या घटनेला 100 वर्षं उलटल्यावरही तेव्हा नेमकं काय घडलं, याविषयीचे प्रश्न संशोधकांना पडले आहेत.

ती एक महाकाय वीच होता अथवा एखादा धूमकेतू, आणि त्यामुळेच हा स्फोट झाला, यावर अनेकांचा विश्वास आहे. पण अवकाशातून एखादी गोष्ट येऊन आदळल्याचे फारसे पुरावे इथे आढळलेले नाहीत. त्यामुळे हा स्फोट नक्की कशामुळे झाला, या विषयीचे अनेक तर्कवितर्क लावायला इथे वाव आहे.

कुठेच काही छापून आलं नाही

सैबेरियातला तुंगुस्का प्रांत हा अतिशय दुर्गम आहे. इथला हिवाळा प्रदीर्घ असतो तर उन्हाळा अगदीच थोड्या कालावधीसाठी असतो. उन्हाळ्याच्या काळात इथल्या जमिनीचं रूपांतर, अशा दलदलीत होतं, जिथे कुणीच राहू शकत नाही. त्यामुळे या भागात पोहोचणं खूप कठीण आहे. म्हणून स्फोट झाल्यानंतर इथे जाऊन तपास करण्याची तसदीही कोणी घेतली नाही.

अॅरिझोनामधल्या टक्सन येथील Planetary Science Instituteच्या नतालिया अर्टेमिवा यांच्या मते, त्यावेळी वैज्ञानिक कुतूहल शमवण्यापेक्षा रशियन अधिकाऱ्यांसमोर भेडसावणाऱ्या इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी होत्या, हे देखील त्यामागचं एक कारण असू शकतं.

 लिओनिड कुलिक

फोटो स्रोत, SPUTNIK/SPL

फोटो कॅप्शन, या घटनेला काही दशकं उलटून गेल्यावर 1927मध्ये लिओनिड कुलिक यांच्या नेतृत्त्वाखालील एक रशियन पथक अखेरीस सैबेरियाच्या त्या भागात गेलं.

"फक्त स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या छापून आल्या. सेंट पीटर्सबर्ग अथवा मॉस्कोमध्ये काहीही छापून आलं नाही," अर्टेमिवा म्हणतात. देशामधला राजकीय संघर्ष वाढत होता. पहिलं महायुद्ध आणि रशियन राज्यक्रांती या घटनेनंतर काही वर्षांमध्येच घडली.

या घटनेला काही दशकं उलटून गेल्यावर 1927मध्ये लिओनिड कुलिक यांच्या नेतृत्वाखालील एक रशियन पथक अखेर या भागात गेलं. या घटनेविषयीची काही माहिती लिओनिड कुलिक यांच्या हाती सहा वर्षांपूर्वी लागली होती आणि या भागाचा दौरा केल्यास तो निष्फळ ठरणार नाही, हे रशियन अधिकाऱ्यांना पटवून देण्यात त्यांना यश आलं होतं.

ते या भागात पोहोचले तेव्हाही स्फोटाने झालेली हानी लगेच दिसून येत होती. स्फोटाला तेव्हा तब्बल 20 वर्षं उलटून गेली होती. सुमारे 50 किमी परिसरातले वृक्ष भूईसपाट झालेले होते आणि विचित्र गोष्ट म्हणजे, या भूभागाला एखाद्या फुलपाखरासारखा आकार आला होता.

दलदलीची जमीन

फोटो स्रोत, JOE TUCCIARONE/SPL

या भागावरच्या आकाशात अंतराळातून आलेल्या उल्केचा स्फोट झाल्याचा दावा त्यांनी केला. पण आघातानंतर होणारं विवर त्यांना तिथे सापडलं नाही, अगदी उल्केचे अवशेषही अजिबात न आढळल्याने ते बुचकळ्यात पडले.

जमीन दलदलीची असल्याने येऊन आदळलेली वस्तू पृष्ठभागावर राहू शकली नाही आणि या स्फोटाचे अवशेष दलदलीखाली गाडले गेले, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

स्फोटानंतर अवशेष न मिळण्यामागचं कारण?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गाडले गेलेले अवशेष उकरून बाहेर काढता येतील, अशी कुलिक यांना आशा होती. 1938 मध्ये त्यांनी लिहिलेल्या निष्कर्षात ते म्हणतात, "खोदकाम केल्यास 25 मीटरच्या खोलीमध्येच आपल्या हाती काही लागण्याची शक्यता आहे. निकेल धातू असलेले लोखंडी अवशेष यात असू शकतात. यातल्या काही अवशेषांचं प्रत्येकी वजन हे एक किंवा दोन मेट्रिन टनही असण्याची शक्यता आहे."

ही हानी ज्यामुळे घडली ती उल्का नसून एक धूमकेतू होता, असं नंतर रशियन संशोधकांनी म्हटलं.

उल्का किंवा अशनी हे दगडाचे असतात. पण धूमकेतू हे बहुतांश बर्फाचे असतात. त्यामुळेच स्फोटानंतर कोणत्याही प्रकारचे अवशेष न मिळण्यामागचं कारण हे मानलं जाऊ शकतं. पृथ्वीच्या कक्षेत शिरल्याबरोबर बर्फ वितळायला सुरुवात झाली आणि हा धूमकेतू जमिनीवर आदळल्यावर बर्फ पूर्ण वितळला.

पण हा वाद इथेच संपला नाही. कारण स्फोट नेमका कशामुळे झाला, हे नेमकं स्पष्ट न झाल्याने लवकरच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.

मॅटर आणि अँटीमॅटर एकमेकांवर आदळले असावेत, असं काहींचं म्हणणं आहे. जेव्हा असं घडतं तेव्हा त्या कणांमधून प्रचंड उष्णता निर्माण होते आणि ती संपूर्ण विनाश करणारी असते.

हा आण्विक स्फोट असल्याचं मानणारा ही एक मतप्रवाह आहे. तर बैकल तलावातल्या पाण्याच्या शोधात आलेलं परग्रह वासियांचं अंतराळ यान या ठिकाणी कोसळल्याचा विचित्र दावाही केला जातो.

पण अपेक्षेनुसार यातल्या कोणत्याच कहाण्या फार काळ तग धरू शकल्या नाहीत.

धूमकेतू हे बहुतांश बर्फाचे असतात.

फोटो स्रोत, ESA/ROSETTA

फोटो कॅप्शन, धूमकेतू हे बहुतांश बर्फाचे असतात.

958मध्ये या घटनास्थळाच्या मोह्मेवर असणाऱ्या संशोधकांना इथला मातीत सिलिकेट आणि मॅग्नेटाईटचे सूक्ष्म कण आढळले. यामध्ये मोठ्या प्रमाणात निकेल असल्याचंही पुढील संशोधनात आढळलं.

अशनीमध्ये मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचं निकेल आढळून येतं. त्यामुळेच या घटनेमागे एखाद्या उल्केचं वा अशनीचं कारण असणं संयुक्तिक होतं.

1963मध्ये के. फ्लोरेन्स्की यांनी हा निष्कर्ष काढत, इतर सर्व सनसनाटी कहाण्यांना पूर्ण विराम दिला - "एखाद्या घटनेकडे किंवा समस्येकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या सनसनाटी प्रसिद्धीचा फायदा काय असतो, याची मला जाणीव आहे. पण असं असलं तरी, चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे निर्माण झालेल्या कुतूहलाचा वापर हा वैज्ञानिक माहितीसाठीचा पाया म्हणून करणं चूक ठरेल."

'पृथ्वीवर एक कृष्ण विवर आदळल्यानं झाला स्फोट'

पण हा निष्कर्षही लोकांना काल्पनिक गोष्टी पसरवण्यापासून रोखू शकला नाही. 1973मध्ये Nature या नामांकित मासिकामध्ये एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. पृथ्वीवर एक कृष्णविवर (Black hole) आदळल्याने हा स्फोट झाल्याचा दावा या लेखात करण्यात आला. इतरांनी लगेचच यावर आक्षेप घेतला.

अशा प्रकारच्या कल्पना म्हणजे मानवी मानसिकतेतून जन्माला येत असल्याचं अर्टेमिवा यांचं म्हणणं आहे. "गुपितं आणि कहाण्या आवडणारे लोक सहसा वैज्ञानिकांचं ऐकत नाहीत," त्या म्हणतात.

कोणत्याही प्रकारचे अवशेष न आढळलेला एक प्रचंड मोठा स्फोट म्हणजे अशा प्रकारच्या तर्कविर्तकांसाठी खुलं कुरण.

त्या स्फोटाच्या जागेची पाहणी करण्यासाठी संशोधकांना बरीच वर्षं लागली होती.

फोटो स्रोत, SPUTNIK/ALAMY

फोटो कॅप्शन, त्या स्फोटाच्या जागेची पाहणी करण्यासाठी संशोधकांना बरीच वर्षं लागली होती.

पण अशा प्रकारच्या चर्चा व्हायला संशोधकही काही प्रमाणात जबाबदार असल्याचं त्या म्हणतात. कारण त्या स्फोटाच्या जागेची पाहणी करण्यासाठी संशोधकांना बरीच वर्षं लागली होती. चिक्शुलूब (Chicxulub) उल्केप्रमाणेच जगाचा विनाश करणारी दुसरी एखादी मोठी उल्का येऊन आदळेल का, याविषयीचं संशोधन करण्यात त्यांना जास्त रस होता. 6.6 कोटी वर्षांपूर्वी चिक्शुलूब उल्का पृथ्वीवर आदळल्याने डायनोसॉर नामशेष झाले होते.

2013मध्ये अखेरीस एका पथकाने आधीच्या दशकांतील या सगळ्या कहाण्यांना पूर्ण विराम दिला. स्फोटाच्या या ठिकाणावरून सन 1978मध्ये गोळा करण्यात आलेल्या सूक्ष्म नमुन्यांची पाहणी युक्रेनमधली नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या व्हिक्टर क्वास्निट्स्या यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी तपासणी केलेले नमुने हे 1908 मधील स्फोटानंतर कुजून रूपांतर झालेल्या मातीचे होते.

या अवशेषांमध्ये लॉन्सडलाईट (lonsdaleite) नावाच्या कार्बन खनिजाचे काही कण होते. याच्या स्फटिकाची रचना ही जवळपास हिऱ्यासारखीच असते. उल्केसारखी ग्राफाईट असणारी वस्तू जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा या लॉन्सडलाईट खनिजाची निर्मिती होती.

'तुंगुस्कात जगावेगळी घटना घडलेली नाही'

"तुंगुस्कामधील नमुन्यांचा आम्ही केलेला अभ्यास आणि इतरही अनेक संशोधकांनी केलेला अभ्यास यावरून हे सिद्ध होतं, की उल्केमुळेच तुंगुस्का येथील घटना घडली. तुंगुस्का येथे इतर कोणतीही जगावेगळी घटना घडलेली नाही," क्वास्नीट्स्या म्हणतात.

अशनीचे मोठे अवशेष शोधण्यात संशोधकांनी फारच जास्त काळ घालवल्याचं ते म्हणतात. "लहान अवशेष शोधणं हेच जास्त गरजेचं होतं."

मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यानच्या पट्ट्यामध्ये अनेक लघुग्रह आढळतात यातल्या बहुतेक लघुग्रहांची निश्चित अशी कक्षा असते.

फोटो स्रोत, NASA/JPL-CALTECH/UCAL/MPS/DLR/IDA

फोटो कॅप्शन, मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यानच्या पट्ट्यामध्ये अनेक लघुग्रह आढळतात यातल्या बहुतेक लघुग्रहांची निश्चित अशी कक्षा असते.

अशाच प्रकारच्या अगदी लहान कणांचा त्यांच्या पथकाने अभ्यास केला. पण तरीही हा निर्णायक निष्कर्ष नाही. उल्कावर्षाव अनेकदा होतात आणि म्हणूनच कोणाच्याही लक्षात न येता एखाद्या लहान उल्केचे अवशेष पृथ्वीवर विखुरले जाऊ शकतात. तपासण्यात आलेले नमुने हे अशा एखाद्या लहानशा उल्केचेही असण्याची शक्यता आहे. मातीचे गोळा करण्यात आलेले नमुने खरोखरच 1908 सालातले आहेत का, याविषयीही अनेक संशोधकांना शंका आहे.

अगदी अर्टेमिव्हा यांचंही असं म्हणणं आहे की अशनीचे कोणतेही अवशेष का सापडले नाहीत, हे समजून घेण्यासाठी त्यांनाही त्यांची संशोधन पद्धती सुधारण्याची गरज आहे.

लिओनिड कुलिक यांनी सुरुवातीला नोंदवलेल्या निरीक्षणांप्रमाणे आजही बहुतेकजण हेच मानतात की तुंगुस्कात झालेली घटना ही अंतराळातून आलेला लघुग्रह किंवा धूमकेतूसारखी एखादी मोठी गोष्ट पृथ्वीच्या वातावरणात शिरताना झालेल्या घर्षणामुळे घडली.

मंगळ आणि गुरू ग्रहादरम्यानच्या पट्ट्यामध्ये अनेक लघुग्रह आढळतात यातल्या बहुतेक लघुग्रहांची निश्चित अशी कक्षा असते. पण असं असलं तरी, "विविध गुरुत्वाकर्षण शक्तींमुळे या लघुग्रहांची कक्षा नाट्यमयरीत्या बदलू शकते," असं इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनचे गॅरेथ कॉलिन्स म्हणतात.

कधीकधी हे खडकाळ लघुग्रह आपली कक्षा सोडून पृथ्वीच्या कक्षेत शिरतात, ज्यामुळे पृथ्वीसोबत टक्कर होण्याची शक्यता निर्माण होते. ज्यावेळी एखादा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात शिरून त्याची शकलं होऊ लागतात, त्यावेळी त्याला उल्का म्हटलं जातं.

'मेगाटन' इव्हेंट

तुंगुस्का मधली घटना इतकी नाट्यमय होण्याचं कारण म्हणजे यामध्ये घडलेली एक अपूर्व गोष्ट. संशोधक याला "मेगाटन" इव्हेंट वा घटना म्हणतात. कारण या स्फोटादरम्यान उत्सर्जित झालेली ऊर्जा ही सुमारे 10 ते 15 TNT मेगाटन इतकी होती. यापेक्षा मोठे अंदाजही वर्तवण्यात आलेले आहेत.

कदाचित यामुळे तुंगुस्कातील घटनेचा संपूर्ण थांग अद्यापही लागलेला नाही. नजिकच्या इतिहासात घडलेली, इतक्या व्यापक स्वरूपातली ही एकमेव घटना आहे. "आपली आकलनशक्ती इथे अपुरी पडते," कॉलिन्स म्हणतात.

मेगाटन एव्हेंट

फोटो स्रोत, JON ARNOLD IMAGES/ALAMY

ही घटना घडताना टप्प्याटप्याने घडल्याचं अर्टेमिव्हा यांचं आता म्हणणं आहे. 2016च्या उत्तरार्धामध्ये प्रसिद्ध होऊ घातलेल्या Annual Review of Earमधील एका लेखामध्ये त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

सुरुवातीला अंतराळातील ही वस्तू 9 ते 19 मैल प्रति सेकंद (15-30 किमी प्रति सेकंद) या वेगाने वातावरणामध्ये शिरली.

सुदैवाने आपलं वातावरण हे आपलं चांगलं संरक्षण करतं, "वातावरणात जर फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची शिळा जरी शिरली तरी तिच्या ठिकऱ्या होतील," नासाचे संशोधक बिल कुक म्हणतात. कुक हे नासाच्या मिटिओराईड एन्व्हार्यन्मेंट ऑफिसचे प्रमुख आहेत."

बहुतेक लोकांना असं वाटतं की अवकाशातून वेगाने काहीतरी येतं आणि विवर तयार होतं आणि एक तापलेला भलामोठा दगड जमिनीवर सापडतो. पण सत्य याच्या बरोबर उलट आहे."

'एका मिलीमीटरचा लहानसा कण शोधून काढणं महाकठीण'

पृथ्वीच्या भूभागाच्या काही किलोमीटर वर असतानाच वातावरणामुळे या शिळेच्या ठिकऱ्या होतात. आणि म्हणूनच अनेकदा लहान लहान दगडांचा वर्षाव होतो. हे लहान दगड जमिनीवर कोसळेपर्यंत थंड झालेले असतात.

तुंगुस्का घटनेमधील उल्का ही एकतर अतिशय ठिसूळ असली पाहिजे किंवा तो स्फोट तितका शक्तिशाली होता. त्यामुळे जमिनीपासून 8 ते 10 किलोमीटर वर असतानाच या उल्केची सगळी शकलं नष्ट झाली.

या प्रक्रियेमुळे या घटनेचा दुसरा टप्पाही स्पष्ट होतो. वातावरणामुळे या अवकाशातून आलेल्या घटकाची वाफ होऊन लहान लहान तुकडे झाले. शिवाय प्रचंड गतीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेतूनही (कायनेटिक एनर्जी) प्रचंड उष्णता निर्माण झालेली होती.

रासायनिक स्फोटासारखी प्रक्रिया

अर्टेमिव्हा म्हणतात, "ही प्रक्रिया ही एखाद्या रासायनिक स्फोटासारखीच आहे. नेहमीच्या स्फोटामध्ये रासायनिक किंवा आण्विक ऊर्जेचं रूपांतर हे उष्णतेमध्ये होतं."

म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पृथ्वीच्या वातावरणात शिरलेला तो जो काही घटक होता त्याचं या प्रक्रियेदरम्यान मातीत (कॉस्मिक डस्ट) रूपांतर झालं.

जर अशाप्रकारे ही घटना घडली असेल तर मग अंतराळातून आलेल्या घटकाचे त्या ठिकाणी कोणतेही अवशेष का मिळाले नाहीत, हे स्पष्ट होतं. "इतक्या मोठ्या भूभागातून अगदी एखाद मिलीमीटरचा एवढासा कण शोधून काढणं महा कठीण असतं. अशावेळी जमिनीवरच्या मातीच्या थरांमध्ये शोध घेणं गरजेचं असतं," क्वास्निट्स्या म्हणतात.

हा घटक वातावरणामध्ये शिरल्याबरोबर त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. या दरम्यान निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे कंपनं निर्माण झाली जी शेकडो किलोमीटरवरही जाणवली. हवेत झालेल्या स्फोटाचे हे सगळे अवशेष ज्यावेळी जमिनीवर कोसळले तेव्हा या भागातली सगळी झाडं भुईसपाट झाली.

अर्टेमिव्हा यांच्या मते हवेत झालेल्या या स्फोटामुळे धुळीचा मोठा ढग तयार झाला, "ज्याचा व्यास हजारो किमोमीटरचा होता."

पण तुंगुस्काची कथा इथेच थांबत नाही. आताही इतर काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की ही घटना उलगडू शकणाऱ्या काही पुराव्यांचा अभ्यास अजूनही करण्यात आलेला नाही.

'स्फोटानंतरच हा तलाव निर्माण झाला'

हा स्फोट ज्या ठिकाणी झाला त्यापासून 8 किमी दूर वायव्य दिशेला असणारा तलाव हा स्फोटामुळे तयार झालेलं विवर असण्याची शक्यता 2007मध्ये एका इटालियन टीमने वर्तवली. या घटनेपूर्वी या चेको तलावाचा म्हणजे लेक चेकोचा उल्लेख कोणत्याही नकाशात करण्यात आल्याचं सापडलेलं नाही.

इटलीमधील बोलोना विद्यापीठाचे लुका गॅस्परिनी हे 1990च्या दशकाच्या अखेरीस या चेको तलावापाशी गेले होतो. या तलावाचा उगम इतर कोणत्याही कारणांमुळे झाला असल्याची शक्यता कमी असल्याचं ते म्हणतात. "स्फोटानंतरच हा तलाव निर्माण झाला याची आम्हाला खात्री आहे. तुगुंस्कावर येऊ घातलेल्या मुख्य घटकामुळे नाही तर, स्फोटानंतर या उल्केचे जे तुकडे झाले, त्यातल्या एकामुळे या विवराची निर्मिती झाली."

स्फोटानंतरचा तलाव

फोटो स्रोत, SPUTNIK/SPL

या लघुग्रहाचा एक मोठा अवशेष या तलावाच्या खाली 33 फुटांवर (10 मीटर) दबलेला असण्याची गॅस्परिनी यांना खात्री आहे. "तिथे पोहोचून खोदकाम करणं हे रशियन संशोधकांना सोपं जाईल."

त्यांच्या या मांडणीवर खूप टीका झाली असली तरी कुणीतरी नक्की या तलावातून अशनीचे अवशेष खोदून बाहेर काढेल, अशी त्यांना अजूनही आशा आहे.

पण हा चेको तलाव हे अशनी विवर असण्याची कल्पना फारशी लोकमान्य नाही. अर्टेमिव्हा यांच्या मते ही फक्त एक कथित थिअरी आहे. "हा तलाव तितकासा खोल नाही. त्यामुळे अगदी कमी प्रयत्नांमध्येही या तलावाच्या तळातून गूढ गोष्टी मिळवणं सहज शक्य आहे," त्या म्हणतात.

गॅस्परिनी यांची कल्पना कॉलिन्स यांनाही मान्य नाही. या सिद्धांताला विरोध करणारा एक प्रबंध त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2008मध्ये प्रसिद्ध केला. यामध्ये या तळ्याच्या जवळ "कोणताही परिणाम न झालेले प्राचीन वृक्ष" असल्याचं म्हटलं आहे. इथे जर जवळपास एखादी मोठी शिळा कोसळली असती तर हे वृक्ष असे राहिले नसते.

काहीही असलं तरी तुंगुस्का घटना अजूनही चर्चेत आहे. या घटनेवरील प्रबंध अजूनही प्रसिद्ध होत असतात.

तुंगुस्कासारख्या घटना 1,000 हजार वर्षांमध्ये एकदाच घडतात?

आता खगोलशास्त्रज्ञ अतिशय शक्तिशाली दुर्बिणींमधून आकाशाची टेहाळणी करतात. या तुंगुस्कासारखाच परिणाम करू शकणारी इतर कोणती उल्का पुन्हा येण्याची शक्यता आहे का, आणि त्यापासून किती धोका निर्माण होऊ शकतो का, याचा अभ्यास ते करतात.

2013मध्ये रशियातील चेल्याबिंस्क मध्ये तुलनेने लहान असलेली उल्का कोसळली. सुमारे 62 फूट (19 मीटर) रुंदीच्या या उल्केने लक्षणीय प्रमाणात हानी केली होती. कॉलिन्ससारखे संशोधक यामुळे चकीत झाले, कारण प्रत्यक्षात जितकी हानी झाली, त्यापेक्षा कमी हानी होण्याचा अंदाज त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार वर्तवला होता.

"एखादा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात शिरणं, त्यानंतर त्याचा वेग मंदावणं, त्याची वाफ होणं आणि नंतर ही सगळी ऊर्जा हवेत पसरणं ही सगळीच प्रक्रिया गुंतागुंतीची आणि अंदाज वर्तवण्यासाठी कठीण आहे. अशा घटनांचे परिणाम काय होतील हे भविष्यात वर्तवता यावं यासाठी त्याचा अधिक अभ्यास करावा लागेल."

सैबेरियात झालेला 'तो' गूढ स्फोट

फोटो स्रोत, SPUTNIK/SPL

फोटो कॅप्शन, सैबेरियात झालेला 'तो' गूढ स्फोट

चेल्याबिंस्कमध्ये ज्या आकाराची उल्का पडली तशा उल्का सहसा दर 100 वर्षांनी कोसळत असल्याचं यापूर्वी मानलं जात होतं. तर तुंगुस्काच्या भव्यतेच्या घटना या एक हजार वर्षांमध्ये एकदाच घडत असल्याचं मानलं जातं. पण आता मात्र अंदाजातली ही आकडेवारी बदलण्यात आलेली आहे. चेल्याबिंस्कच्या आकाराएवढ्या उल्का कोसळण्याची शक्यता 10 पटींनी वाढल्याचं कॉलिन्स म्हणतात. तर तुंगुस्कासारखी घटना ही दर 100 ते 200 वर्षांनी घडू शकते.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव करण्याचा कोणताच पर्याय आपल्याकडे यापूर्वी नव्हता आणि यानंतरही नसेल, असं क्वास्निट्स्या यांचं म्हणणं आहे. तुंगुस्का घटनेमध्ये झालेल्या स्फोटाच्या क्षमतेचा स्फोट जर आज एखाद्या मोठ्या लोकवस्तीच्या शहरावर झाला तर लाखो नाही पण हजारो लोकांचा जीव जाईल. तो स्फोट नेमका कुठे होतो, यावर हे प्रमाण अवलंबून असेल.

पण यातही काही आशादायी बाबी आहेत.

पृथ्वीवरचा पाण्याने व्यापलेला मोठा पृष्ठभाग पाहता अशी घटना पुन्हा घडण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचं कॉलिन्स म्हणतात. "तुंगुस्कासारखी घटना जर पुन्हा घडलीच तर ती अशा भागात घडण्याची शक्यता आहे जिथे जवळपास मनुष्यवस्ती नाही."

तुंगुस्कामधली घटना ही उल्केमुळे घडली की धूमकेतूमुळे हे आपल्याला नेमकं कदाचित कधीच कळू शकणार नाही. पण एका अर्थी आता त्याने काही फरक पडत नाही. यामागे या दोन्हींपैकी काहीही कारण असलं तरी त्यामुळे मोठी हानी घडली असती. ज्याबद्दल 100 वर्षं उलटूनही आपण चर्चा करत आहोत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)