दिसायला बेडकांसारखा, आकारानं गव्याएवढा, 'हा' डायनासोरहून भयंकर प्राणी नष्ट कसा झाला?

सुरवातीच्या इतर सायनॅप्सिड्सप्रमाणे, डायमेट्रोडॉनची चाल मगरींसारखी होती

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

फोटो कॅप्शन, सुरवातीच्या इतर सायनॅप्सिड्सप्रमाणे, डायमेट्रोडॉनची चाल मगरींसारखी होती
    • Author, झारिया गोर्व्हेट
    • Role, @ZariaGorvett

टी. रेक्स या महाकाय मांस भक्षक डायनासोरच्या खूप आधी पृथ्वीवर अति-मांसाहारी प्राण्यांचं वर्चस्व होतं. हॉलीवूडच्या चित्रपटांमधूनही ज्यांची कल्पना करता येणार नाही, इतके ते भयंकर, आक्रमक प्राणी होते.

हे प्राणी कसे होते हे समजून घेण्यासाठी एक दृश्य डोळ्यासमोर आणा.

दोन प्राणी समोरांसमोर आले आहेत आणि प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेत आहेत.

त्यांना एखाद्या मोठ्या चाकूसारखे मोठाले दात, धारदार मोठाली नखं असणारे पंजे आणि गेंड्यांच्या कातडीसारखी जाड त्वचा आहे.

या सर्व शस्त्रांनिशी सज्ज असलेल्या प्राण्यांनी त्यांचे मोठाले जबडे जवळपास 90 अंशांमध्ये उघडले आणि ते एकमेकांवर तुटून पडले.

एका प्राण्याच्या उजव्या बाजूनं, दुसऱ्या प्राण्याचे दात त्याच्या शरीरात घुसले. एका क्षणातच ती लढाई संपली.

त्या दुसऱ्या प्राण्यानं त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या जाड, मोठ्या नाकात त्याचे 5 इंच (12.7 सेमी) लांबीचे सुळे घुसवले. जणूकाही मेणात एखादी गरम सुई शिरावी तसे ते शिरले.

आक्रमण करणाऱ्या प्राण्याचा विजय झाला होता. हे प्रत्यक्षात घडलं होतं का? तर अगदी असंच घडलं हे म्हणता येणार नाही पण असंच काहीतरी घडलं होतं.

दक्षिण आफ्रिकेत सापडले महत्त्वाचे अवशेष

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जवळपास 25 कोटी वर्षानंतर, 2021 च्या मार्च महिन्यातील एका प्रसन्न दिवशी, जुलियन बेनॉईट यांना एक बॉक्स देण्यात आला आणि तो पाहण्यास सांगण्यात आलं.

ज्युलियन दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमधील इझिको म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील एका छान ऑफिसमध्ये काम करत होते.

तिथे त्यांना विद्यापीठाच्या जीवाश्म संग्रहांना भेट देण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. तो बॉक्स खूपच जुना आणि साध्या कार्डबोर्डपासून बनलेला होता.

"तो बॉक्स गेल्या किमान 30 वर्षांपासून उघडण्यात आला नव्हता," असं ज्युलियन बेनॉईट म्हणाले. ते जोहान्सबर्गमधील विटवॉटर्सरँड विद्यापीठात उत्क्रांती अभ्यासाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

त्या बॉक्समध्ये अनेक हाडं होती, असंख्य कवट्या होत्या. त्यापैकी अनेकांवर चुकीचं लेबल लावण्यात आलं होतं. ज्युलियन त्यांना वेगवेगळं करत होते आणि त्यांची वर्गवारी करत होते.

ते त्या हाडांचा समावेश दीर्घकाळापासून नामशेष झालेल्या प्रजातींमध्ये करत होते. तितक्यात त्यांना एक छोटा, चमकदार पृष्ठभाग दिसला.

"तो एक रोमांचक क्षण होता. ते पाहिल्याबरोबर मला लगेचच लक्षात आलं की, मी काय पाहतो आहे," असं ज्युलियन बेनॉईट म्हणाले.

चेहऱ्यावर एक मोठ्या हास्यासह ते त्यांच्या सहकाऱ्याकडे गेले आणि त्या अवशेषाचं बारकाईनं निरीक्षण करण्यासाठी त्यांनी तिच्याकडे सूक्ष्मदर्शक मागितला. तो चमकदार पृष्ठभाग एका दाताचा भाग होता.

तो दात टोकदार आणि गोलाकार होता. तो दुसऱ्या प्राण्याच्या कवटीत शिरलेला होता. कदाचित तो दुसरा प्राणी देखील त्याच प्रजातीचा असावा.

बेनॉईट यांना वाटलं की, दोन लांडग्याच्या आकाराचे प्राणी वर्चस्वासाठी लढत होते. तेव्हाच त्यांचा एक लहान दात तुटला होता.

मात्र, तो दात कोणत्याही डायनासोरचा नव्हता. ती एका विस्मृतीत गेलेल्या जगातील कलाकृती होती. टी. रेक्स, स्पायनोसॉरस किंवा व्हेलोसिराप्टर पृथ्वीवर येण्यापूर्वी दगडांमध्ये, जमिनीत गाडले गेलेल्या जगाचा.

ती कवटी गोर्गोनोप्सियनच्या एका अज्ञात प्रजातीची होती. गोर्गोनोप्सियन हा एक चतुर शिकाऱ्यांचा एक गट होता. जे इतरांची शिकार करायचे, मात्र सहसा त्यांची शिकार होत नसे.

हे प्राणी पृथ्वीवर जवळपास 25 ते 26 कोटी वर्षांपूर्वी होऊन गेले. ते मोठ्या भक्ष्यांचा पाठलाग करायचे आणि त्यांचं मांस फाडून ते संपूर्ण गिळायचे.

ते पर्मियन युग होतं. पृथ्वीच्या भूशास्त्रीय इतिहासातील ते एक अस्पष्ट युग आहे. जेव्हा पृथ्वीवर महाकाय, थरकाप उडवणारे भयावह प्राणी, शरीर हलवत धावायचे. ते कधीकधी शार्क देखील खात होते.

त्या भयावह काळात, कधीकधी जमिनीवर खाण्यासाठी जितकी शिकार होती, त्यापेक्षा जास्त मांसाहारी प्राणी होते.

एक विचित्र जग

पर्मियन युगाची सुरुवात साधारण 29.9 ते 25.1 कोटी वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा पृथ्वीवरील सर्व जमीन सशाच्या आकारासारख्या खंडात गोळा झालेली होती. तो, पँजिया नावाचा एकच प्रचंड महाखंड होता. या खंडाभोवती, पँथलासा नावाचा एक विशाल, जागतिक महासागर होता.

ते एक टोकाच्या गोष्टींचं युग होतं. त्याची सुरुवात एका हिमयुगानं झाली. ज्यामुळे या खंडाचा दक्षिणेकडील अर्धा भाग कायमस्वरुपी बर्फाच्छादित झाला.

त्यात इतकं पाणी साठलं की, त्या विशाल जागतिक महासागराची पातळी तब्बल 120 मीटर (394 फूट) पर्यंत खाली गेली होती. हे बर्फ संपल्यानंतर तो प्रचंड खंड हळूहळू गरम होत गेला आणि कोरडा झाला.

जमिनीच्या इतक्या मोठ्या प्रमाणातील एकसलग विस्तारामुळे, त्या खंडाच्या आतल्या भागाला समुद्रामुळे निर्माण होणाऱ्या थंडाव्याचा किंवा आर्द्रतेचा फायदा झाला नाही. त्यामुळे तिथली जमीन पडीक झाली.

पर्मियन युगाच्या मध्यापर्यंत, पँजिया खंडाचा मध्यवर्ती भाग बहुतांश प्रमाणात वाळवंटी झालेला होता. त्यात शंकूच्या आकाराची झाडं होती. तिथे अधूनमधून पूर यायचे.

सुरवातीच्या इतर सायनॅप्सिड्सप्रमाणे, डायमेट्रोडॉनची चाल मगरींसारखी होती

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

त्यातील काही भाग जवळपास निर्जन होता. तिथलं तापमान कधीकधी 73 अंश सेल्सिअसवर (163 फॅरनहाईट) पोहोचायचं. बदक किंवा कोंबडीसारखा प्राणी हळूहळू भाजण्यासाठी जितकी उष्णता आवश्यक असते इतकी ती उष्णता होती.

"त्या खंडात खूपच कोरडेपणा होता. मात्र त्याच्या किनारपट्टीचा भाग ओलसर किंवा आर्द्र होता. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात भरपूर वनस्पती, झाडी, हिरवळ होती," असं पॉल विग्नॉल म्हणतात. ते यूकेतील लीड्स विद्यापीठात प्राचीन पर्यावरणाचे (पॅलिओएनव्हायर्नमेंट्स) प्राध्यापक आहेत.

नंतर पर्मियन युगाच्या शेवटी, संपूर्ण पृथ्वीचं तापमान अचानक जवळपास 10 अंश सेल्सिअसनं (60 फॅरनहाईट) वाढलं. जर आजच्या काळात हरितगृह वायूंचं उत्सर्जन अनियंत्रितपणे वाढत राहिलं, तर जी भीषण परिस्थिती निर्माण होईल, त्याच्या दुप्पट वाईट स्थिती तेव्हा निर्माण झाली होती.

वातावरणातील या बदलामुळे पृथ्वीच्या इतिहासात विविध प्रजाती सर्वाधिक प्रमाणात लुप्त झाल्या. याच परिस्थितीतून डायनासोरांची वाढ झाली.

प्राण्यांच्या विविध प्रजाती

मात्र त्या कालखंडात, टी. रेक्सची उक्रांती व्हायला अजून खूप काळ बाकी होता. किंबहुना, आज आपल्याला जे बरेचसे डायनसोर परिचित आहेत, जे आपल्याला माहीत आहेत, ते त्यांच्या काळात होते, तितकेच ते पर्मियन युगात देखील होते.

त्यावेळेस, सायनॅप्सिड हे जमिनीवरील सर्वात मोठे प्राणी होते. तो शरीरांचे विविध विचित्र आकार आणि वैशिष्ट्यं असलेला प्राण्यांचा एक विचित्र गट होता.

त्यांचं शरीर अतिशय छोटं होतं आणि त्याचं वस्तुमान एखाद्या लहान काळवीट किंवा हरणासारखं होतं. एखाद्या पाणघोड्यानं एखादी गोलाकार, फुगीर हॅट घातल्यावर जसं दिसेल तसा तो दिसायचा.

त्यावेळेस सायनॅप्सिड्सबरोबर इतर विविध विचित्र वन्यजीवांचं अस्तित्वं होतं. ड्रॅगनफ्लायसारखे कीटक, बदकांसारख्या आकाराचे कीटक, मेगनान्युरोप्सिस यांचं तेव्हा आकाशावर वर्चस्व होतं.

गोड्या पाण्यात, 33 फूट (10 मीटर) लांब मांसाहारी उभयचर प्राणी होते. त्यांचं लांब नाक मगरींसारखं होतं. दरम्यान, महासागरात शार्क माशासारख्या रहस्यमयी माशांचं वर्चस्व होतं. या माशांच्या तोंडाला दात असलेली गोलाकार 'करवत' होती. त्यांना हेलिकॉप्रियॉन म्हणतात.

हे हेलिकॉप्रियॉन त्यांच्या या क्रूर करवतीसारख्या दातांचा वापर करून अमोनाईट्सचं कवच फोडून उघडण्यासाठी आणि वेगानं फिरणाऱ्या, मोठ्या भक्ष्यांच्या शरीराचे तुकडे करायचे.

"म्हणजेच मला म्हणायचं आहे की, त्या काळात पृथ्वीवर खूप विचित्र प्राणी, प्रजाती होत्या. मला वाटतं की, तो काळ कसा सक्रिय, ऊर्जामय होता, ते यातून दिसून येतं," असं सुरेश सिंह म्हणतात. ते यूकेतील ब्रिस्टॉल विद्यापीठात स्कूल ऑफ अर्थ सायन्समध्ये व्हिजिटिंग रिसर्च फेलो आहेत.

हा तोच काळ होता, जेव्हा पृथ्वीवर चार पायाच्या प्राण्यांनी पहिल्यांदाच पूर्णपणे जमिनीवर राहण्याचं कौशल्यं मिळवलं होतं. पर्मियन युगाच्या आधी उभयचरांचा काळ होता. तेव्हा बहुसंख्य प्रजाती त्यांच्या आयुष्यातील किमान काही काळ पाण्यात घालवत असत, असं सुरेश सिंह सांगतात.

मात्र सायनॅप्सिड्स यांना या उभयचर प्राण्यांपेक्षा एक मोठा फायदा होता. ते त्यांच्या पिल्लांना स्वत:च्याच शरीरात उबवू शकायचे किंवा स्वत:चा ओलावा टिकवून ठेवू शकणारी मोठाली अंडी घालू शकत होते.

एकप्रकारे त्यांचे स्वत:चे तात्पुरते 'खासगी तलाव' होते. त्यामुळे प्रजननासाठी त्यांना तळी किंवा नद्यांची आवश्यकता नव्हती.

प्राण्यांच्या या गटानं त्यांचं वॉटरप्रूफ शरीर विकसित केलं होतं. त्यामुळे ते वेगवेगळ्या वातावरणात राहू शकायचे. सुरुवातीच्या काही सायनॅप्सिसना अंगावर खवले होती. तर काहींची त्वचा कडक, उघडी असायची.

सर्वसाधारणपणे, ते हळू चालणारे, शीत रक्ताचे प्राणी होते. मात्र तरीदेखील त्यांना त्यांचं आवडतं मांस मिळवण्यासाठी पंजे वापरण्याचा मार्ग सापडला.

दहशत निर्माण करणारे, महाकाय, भयंकर प्राणी

पर्मियन काळात, सायनॅप्सिड हे पूर्वीच्या कोणत्याही गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

इतर प्रजातींबरोबरच्या स्पर्धेत त्यांना वेगळं करणारं एक वैशिष्ट्यं म्हणजे त्यांचे तोंडभर असलेले दात. अन्न किंवा मांसाचा चोथा करण्यासाठी, चावण्यासाठी, फाडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी दात आवश्यक होते.

हे प्राणी अशा कामांसाठी आवश्यक असलेल्या दातांनी सुसज्ज होते. त्यांच्या पूर्वजांप्रमाणे समान आकाराचे अनेक दात असण्याऐवजी, त्यांच्या तोंडात संपूर्ण स्विस आर्मी चाकूच होता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दात होते.

"त्यामुळे, शाकाहारी प्राणी अधिक पोषक तत्वं देणाऱ्या विविध वनस्पती भरपूर प्रमाणात खातात," असं सिंह म्हणतात. यामुळे त्यांच्या शरीराचा आकार मोठा होणं शक्य झालं. त्यामुळे मांसाहारी प्राण्यांना अधिक मांस, अधिक पोषण उपलब्ध झालं. त्यामुळे हे मांसाहारी प्राणी महाकाय झाले.

"सायनॅप्सिड्स, खूप लवकर आकारानं मोठे झाले," असं सिंह म्हणतात. त्यामुळे लवकरच पँगिया खंडांवर भक्षकांची गर्दी झाली.

Emmanuel Lafont/ BBC)

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

फोटो कॅप्शन, पर्मियन युगात पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात विचित्र प्राणी होते, उदाहरणार्थ, सुरकुत्या असलेले शाकाहारी मॉशॉप्स - ते दिसायला बेडकांसारखे होते, मात्र आकारानं याक किंवा मोठ्या गव्याएवढे होते

कोमोडो ड्रॅगनला पर्मियन युगातील उत्तर म्हणजे डायमेट्रोडॉन. हे प्राणी आजच्या काळातील त्यांच्या समकक्ष प्रजातीपेक्षा साडेतीन पट मोठे होते. त्यांचं वजन 250 किलोपर्यंत (551 पौंड) होतं. ते अधिक प्रभावी होते.

त्यांच्या संपूर्ण पाठीवर बोटीच्या 'शिडा'सारखं आवरण होतं. हे महत्त्वाचे शिकारी लाखो वर्षांपासून पॅंगिया खंडाच्या दलदलीच्या भागात फिरत होते.

त्यांच्या दातांचा वापर करून त्यांना खाता येईल असं सर्वकाही खात होते. त्यात सरपटणारे लहान प्राणी, उभयचर ते कोटिलॉरिनकस सारख्या सायनॅप्सिडचा समावेश होता.

टेक्सासमधील एका ठिकाणी, जीवाश्मशास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, त्या काळात असलेल्या मोठ्या शिकारी प्राण्यांपेक्षा डायमेट्रोडॉन 8.5 पट अधिक होते.

या गुणोत्तरातून, आजच्या काळातील अन्नसाखळीशी तुलना करता तुम्हाला त्या काळात असणारी भक्षकांची प्रचंड संख्या लक्षात येते. (उदाहरणार्थ, आज दक्षिण आफ्रिकेत असलेल्या एका खासगी अभयारण्यात, एक सामान्य सिंहीण दरवर्षी जवळपास 16 मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते.)

मात्र जेव्हा वैज्ञानिकांना झेनॅकॅन्थस शार्कच्या सांगाड्यात, पाठीवर बोटीच्या शिडासारखं आवरण असलेल्या शिकारी प्राण्याचे दात आढळले, तेव्हा जमिनीवरील या तथाकथित 'मांसाच्या कमतरते'विषयीचं गूढ दूर झालं.

डायमेट्रोडॉन त्याच्या आहाराची पूर्तता करण्यासाठी गोड्या पाण्यातील मोठ्या माशांची शिकार करत होते आणि त्याच्या उलटं देखील होत होतं. झेनॅकॅन्थस शार्कच्या अवशेषांजवळ, संशोधकांना डायमेट्रोडॉनची हाडं सापडली. ती हाडं झेनॅकॅन्थसनं चावलेली होती.

डायमेट्रोडॉनच्या रचनेमागचं गूढ

मात्र डायमेट्रोडॉनच्या एका वैशिष्ट्यामुळे वैज्ञानिक शतकानुशतकं बुचकळ्यात पडले आहेत किंवा गहन विचारात पडले आहेत. तो म्हणजे या प्राण्यांच्या पाठीवर तो बोटीच्या 'शिडासारखा' काटेरी भाग कशासाठी होता?

1886 मध्ये जीवाश्मशास्त्रज्ञ एडवर्ड ड्रिंकर कोप यांनी सूचवलं की, या प्रजातीच्या जवळच्या प्रजातीचं समान वैशिष्ट्यं कदाचित बोटीच्या शिडासारखंच प्रत्यक्षात काम करत असावं.

कोप यांनी अंदाज लावला होता की, हे प्राणी पाठीवरील या शिडासारख्या भागाचा वापर तलावांमध्ये फिरण्यासाठी, हवेचा वापर करण्यासाठी करत असावेत. मात्र कोप यांची ती मोठी चूक होती.

यासंदर्भातील पुढील कल्पना अशी होती की, डायमेट्रोडॉनच्या पाठीवरील तो शिडासारखा भाग सौर पॅनेलसारखा काम करायचा. यामुळे या प्राण्याला लवकर उबदार होण्यास मदत व्हायची आणि त्यामुळे तो भक्षाचा पाठलाग करू शकायचा. मात्र भौतिकशास्त्राच्या नियमांनी हा सिद्धांतदेखील चुकीचा ठरवला.

डायमेट्रोडॉनच्या आकारावरून संशोधकांनी त्याच्या चयापचयाच्या दराचा अंदाज लावला. त्यांनी कॅल्क्युलेशन केलं की त्यांच्या गटातील छोट्या प्राण्यांमध्ये थर्मोरेग्युलेशनसाठी हा भाग निरुपयोगी ठरला असता. तरीदेखील त्यांनी शरीरातील हा मोठा भाग तयार केला होता.

खरं तर, पाठीवरील या शिडासारख्या भागामुळे डायमेट्रोडॉनच्या काही प्रजातींना हापोथर्मियाचा धोका निर्माण होऊ शकला असता. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता दूर झाली असती.

त्याऐवजी, असं मानलं जातं की, या महाकाय प्राण्यांना जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी या शिडासारख्या भागानं मदत केली होती.

पर्मियन युग जसंजसं पुढे सरकलं, तसतशी डायमेट्रोडॉनची चांगल्या अन्नाबाबतची आवडदेखील वाढत गेली. सुरुवातीच्या काळात ते आकारानं त्यांच्या एवढ्या किंवा त्यांच्यापेक्षा लहान प्राण्यांची शिकार करत असतं.

मात्र नंतर त्यांनी अधिक मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यास सुरुवात केली. इथेही पुन्हा, दातांचीच भूमिका सर्वांत महत्त्वाची होती. नंतरच्या काळात डायमेट्रोडॉनचे दात अधिक टोकदार आणि वक्र झाले होते.

ते संपूर्ण गिळता न येणारी शिकार पकडण्यासाठी आणि त्यांचे तुकडे करण्यासाठी योग्य होते. जर त्यांचे दात तुटले, तर त्याऐवजी नवीन दात येऊ शकत होते. कठीण मांसाचे तुकडे करताना त्याचा मोठा फायदा होता.

मात्र डायमेट्रोडॉनचे दात धारदार असूनही, त्यांच्या शरीरात कधीही मोठ्या शिकारीच्या प्रचंड उपलब्धतेचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रं किंवा अवयव विकसित केले नाहीत, असं सिंह म्हणतात.

ते म्हणतात की, पर्मियन युगातील प्रचंड मांसाहारी प्राण्यांना खरोखरंच आवश्यकता होती ती रुंद जबड्यांची. यामुळे स्नायूंना जोडण्यासाठी अधिक जागा निर्माण व्हायची. त्यामुळे अधिक ताकदीनं चावा घेता यायचा.

यामुळे त्या अन्नसाखळीत एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी इतर मांसाहारी प्राण्यांनी सहजपणे भरून काढली.

चतुर, शक्तिशाली शिकारी

पर्मियन युगातील सर्वात मोठा भक्षक होता, अँटिओसॉरस. वाघ आणि पाणघोड्याच्या जनुकीय बदलांतून निर्माण झालेल्या संततीप्रमाणे, ते जवळपास 6 मीटर (19.7 फूट) लांबीचे होते. त्यांची भूकदेखील तशीच होती.

"जेव्हा तुम्ही उत्खनन करता आणि त्यांचे अवशेष जेव्हा सापडतात, तेव्हा ते एक प्रकारचं बक्षीसच असतं. कारण ते फारसे सापडत नाहीत," असं बेनॉईट म्हणाले.

स्नायू असलेले जबडे, शक्तिशाली पाय आणि कठीण हाडं चावणारे दात, ही अँटिओसॉरसची वैशिष्ट्ये होती. या वैशिष्ट्यांनिशी हे वर्चस्व गाजवणारे मांसाहारी प्राणी जवळपास 26 ते 26.5 कोटी वर्षांपूर्वी पँजियावर राज्य करत होते.

अँटिओसॉरस दिसायला अतिशय भयावह होते. तसंच त्यांचे दात आकारानं मोठे होते. याच्या जोडीला त्यांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला कवटीवर हाडांच्या कडा होत्या. त्या मार्जार जातील मोठ्या प्राण्यांच्या कानांसारख्या दिसायच्या.

बेनॉईट यांना वाटतं की अँटिओसॉरस हे त्यांच्या काळातील चित्ते होते

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

फोटो कॅप्शन, बेनॉईट यांना वाटतं की अँटिओसॉरस हे त्यांच्या काळातील चित्ते होते

"ते दिसायला अत्यंत भयानक होते. याबाबतीत ते पर्मियन युगातील टी. रेक्सच्या सर्वात जवळ जाणारे प्राणी होते. सर्वसाधारणपणे मोठ्या प्राण्यांना मारण्यासाठी आणि त्यांची हाडं मोडून चावण्यासाठी त्यांच्या डोक्याची रचना चांगल्या प्रकारे विकसित झालेली होती," असं ते म्हणतात.

हे प्राणी आश्चर्यकारकपणे वेगवान होते. 2021 मध्ये बेनॉईट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अँटिओसॉरसच्या कानाच्या आतील भागाचं तपशीलवारपणे निरीक्षण केलं.

एक किशोरवयीन प्राण्याची कवटी त्यांनी सीटी स्कॅनरमध्ये पाहिली. चपळ शिकाऱ्यांमध्ये शरीराचा हा भाग संतुलन राखण्यासाठी अनेकदा सुव्यवस्थित स्थितीत असतो.

संशोधकांना असं आढळून आलं की, इतर सायनॅस्पिड्सपेक्षा हा नमुना पूर्णपणे वेगळा होता. ते या भक्षकाच्या बदलांशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची तुलना चित्ता किंवा व्हेलोसिरेप्टर या प्राण्यांशी करतात.

ते म्हणतात, "तो खूप खूप खास आहे. तो पूर्णपणे विकसित झालेला आहे."

संशोधकांच्या टीमला त्या प्राण्याच्या मेंदूमध्येदेखील काही वैशिष्ट्यं आढळून आली. ज्यातून दिसून आलं की, अँटिओसॉरसमध्ये त्याची नजर स्थिर करण्याची प्रभावी क्षमता होती.

"याचा अर्थ, त्यांनी एकदा शिकार निश्चित केली की, ते त्याचा पाठलाग थांबवत नव्हते," असं बेनॉईट म्हणतात.

मात्र अँटिओसॉरसचं हे वर्चस्वं फार थोडा काळ टिकलं. जवळपास 26 कोटी वर्षांपूर्वी ते मोठ्या प्रमाणात नामशेष झाले. त्यानंतर गॉग्रोनोप्सियन्सचा काळ आला. त्यांच्यात सर्वात शक्तिशाली होते, इनोस्ट्रेन्सेव्हिया.

लांब सुळे आणि 70 सेमीपर्यंत (2.3 फूट) लांब कवट्या असलेले इनोस्ट्रेन्सेव्हिया, ध्रुवीय अस्वलांसारखी ठेवण असलेले खूपच जलद, गतिमान शिकारी होते.

"जर तुम्ही मुळांपासून मोजले तर 20-30 सेमी लांब (8-12 इंच) दात दिसतात," असं क्रिस्तियन कॅमेरर म्हणतात. ते नॉथ कॅरोलिना म्युझियम ऑफ नॅचरल सायन्सेसमधील जीवाश्म विज्ञानात रिसर्च क्युरेटर आहेत.

त्यांची त्वचा नेमकी कशी दिसत असेल याबद्दल फार थोडे पुरावे आहेत. मात्र इतर सायनॅप्सिड्सच्या जीवाश्म त्वचेच्या तुकड्यांच्या आधारे, त्यांना वाटतं की, त्यांची त्वचा जाड, गेंड्याच्या कातडीसारखी होती.

या पर्मियन युगातील भक्षकांपैकी एकानं खाणं ही अचानक घडणारी आणि भयानक बाब ठरली असती.

कारू खोरं आणि प्राण्यांची मोठी संख्या

बेनॉईटच्या गोर्गोनोप्सियन कवटीप्रमाणे, इनोस्ट्रेन्सेव्हिया हे कारू खोऱ्यात सापडले आहेत. हे उत्खनन स्थळ, दक्षिण आफ्रिकेत कालाहारी वाळवंटाच्या दक्षिणेस आहे. तिथे पर्मियन युगातील हजारो जीवाश्म मिळाले आहेत.

आज कारू हा कोरड्या, खुल्या मैदानांचा एक मोठा भाग आहे. तो आकारानं जर्मनीएवढा आहे. तो 'लँड ऑफ थर्स्ट' म्हणजे 'तहानेची जमीन' म्हणून ओळखला जातो.

मात्र 25 कोटी वर्षांपूर्वी, हा प्रदेश तुलनेनं हिरवागार होता. तो जमिनीच्या आतल्या बाजूला असलेल्या समुद्राभोवती केंद्रीत होता. त्या समुद्राला नद्यांच्या जाळ्यातून पाणी मिळायचं.

"तिथे फर्न आणि हॉर्सटेल, पाईनची झाडं, गिंगकोस यासारख्या जिम्नोस्पर्म्स प्रजातीतील सुरुवातीच्या काळातील वनस्पती, झाडं असायची. तोपर्यंत, तिथे कोणतीही फुलं असणाऱ्या वनस्पती किंवा झाडं नव्हती. त्यामुळे फुलं नव्हती, कोणत्याही प्रकारचं गवत नव्हतं," असं कॅमेरर म्हणतात.

या प्रागैतिहासिक वातावरणात, मोठ्या आकाराची शिकार विपुल प्रमाणात होती. डायसिनोडोन्टचे मोठाले कळप, पेरियासॉर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाय, प्रचंड मजबूत सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर या प्रदेशात फिरत होते. डायसिनोडोन्ट हे कासवांसारखं तोंड असलेले, पाणघोड्यासारखे शाकाहारी प्राणी होते.

इनोस्ट्रेन्सेव्हियामध्ये कासवांप्रमाणे वाढीचा एक अनिश्चित पॅटर्न होता - ते जिवंत असेपर्यंत आकारानं मोठे होत राहायचे

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

फोटो कॅप्शन, इनोस्ट्रेन्सेव्हियामध्ये कासवांप्रमाणे वाढीचा एक अनिश्चित पॅटर्न होता - ते जिवंत असेपर्यंत आकारानं मोठे होत राहायचे

वनस्पती खाणाऱ्या या प्राण्यांसाठीचा पहिला धोका म्हणजे कदाचित झाडीतून किंवा टेकडीच्या मागून उडी मारणारा इनोस्ट्रेन्सेव्हिया हा प्राणी असेल, असं कॅमेरर म्हणतात.

कॅमेरर यांना वाटतं की, त्यांच्या शरीराच्या प्रमाणानुसार किंवा आकारानुसार, ते लपून अचानक हल्ला करणारे शिकारी असावेत.

कॅमेरर सूचवतात की, भक्ष्याचा थोडावेळ पाठलाग केल्यानंतर इनोस्ट्रेन्सेव्हिया त्यांचा पुढच्या पायांनी भक्ष्याला झडप घालत असावेत. त्यानंतर ते त्यांच्या शक्तीशाली जबड्यानं आणि मोठ्या सुळ्यांनी भक्ष्याला मारत असावेत.

कदाचित ते या सुळ्यांचा आणि जबड्याचा वापर करून भक्ष्याचं पोट फाडायचे. त्यानंतर ते त्याच्या मांसाचे तुकडे तोडून संपूर्ण गिळून टाकायचे.

"त्यांना मांस किंवा अन्न चावता येत नव्हतं," असं कॅमेरर म्हणतात.

इनोस्ट्रेन्सेव्हिया थोडेसे निष्काळजीपणे राहू शकत होते. जगात अलीकडच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या आणि आधुनिक मानवाबरोबर पृथ्वीवर वास्तव्यं असणाऱ्या मोठे सुळे असणाऱ्या मार्जार कुळातील प्राण्यांना त्यांचे दात काही कारणास्तव पडले किंवा तुटले की त्या जागी नवीन दात येत नाहीत.

इनोस्ट्रेन्सेव्हियाच्या बाबतीत मात्र तसं नव्हतं. शार्क आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे त्यांच्या तुटलेल्या किंवा पडलेल्या दातांऐवजी सहजपणे नवे दात येत होते.

"तुटलेल्या दातांच्या मार्जार कुळातील प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. त्यांचा मृत्यू उपासमारीनं झाल्याचं मानलं जातं," असं कॅमेरर म्हणतात.

मात्र, उत्तम शिकारी म्हणून विकसित झालेल्या इनोस्ट्रेन्सेव्हियांची दक्षिण आफ्रिकेतील उपस्थिती हे एक अशुभ चिन्हं होतं. पृथ्वीच्या इतिहासात एखादी प्रजाती मोठ्या प्रमाणात लुप्त होण्याची पूर्वसूचना त्यातून मिळते. कारण ते तिथे अजिबात नसायला हवे होते.

अगदी अलीकडेपर्यंत, इनोस्ट्रेन्सेव्हियाचा एकमेव अवशेष रशियात सापडला होता. पर्मियन युगामध्येही ते जगाच्या दुसऱ्या टोकाला कारू प्रदेशात होता.

पँजियाच्या वास्तव्य करण्यास कठीण असलेल्या केंद्रापासून हा प्रदेश 7,000 मैल (11,265 किमी) अंतरावर होता. त्याऐवजी दक्षिण आफ्रिकेत फक्त इतर छोट्या गोर्गोनोप्सियनचीच वस्ती असल्याचं मानलं जात होतं.

मग जवळपास एक दशकापूर्वी, एका जीवाश्म संशोधकाला कारूमध्ये एक इनोस्ट्रेन्सेव्हिया सापडला. कॅमेरर याबद्दल उत्सुकता होती. "माझ्या मनात लगेच विचार आला की, हा इथे कसा काय आला?" असं ते म्हणतात.

पृथ्वीवरचा महाविनाश (ग्रेट डाईंग)

आज सैबेरियातील अवशेषांच्या रूपात एक सुगावा शिल्लक आहे. सैबेरिया हा जवळपास 50 चौ. किमी (19 लाख चौ. मैल) विस्ताराचा प्रदेश आहे. तो पूर्णपणे बेसाल्टिक खडकानं बनलेला आहे.

या प्रदेशाची निर्मिती पर्मियन युगाच्या अखेरीस झाली होती. त्यावेळेस ज्वालामुखींचे प्रचंड उद्रेक झाले होते. त्यातून 10 ट्रिलियन टन लाव्हा बाहेर पडला होता.

असं मानलं जातं की, ज्वालामुखीच्या या भीषण उद्रेकामुळे पृथ्वीच्या वातारवणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी जवळपास 8,000 पीपीएमपर्यंत वाढली होती.

आज कार्बन डायऑक्साईडची पातळी जवळपास 425 पीपीएम इतकी असते. यावरून किती प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात असेल याची कल्पना येते.

लवकरच, जागतिक तापमानात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे जमीन आणि महासागरातील हजारो प्रजाती नष्ट झाल्या.

या महाविनाशाच्या (ग्रेट डाईंग) वेळेस किंवा पर्मियन युगाच्या शेवटी आणि ट्रायसिक युगाच्या सुरुवातीला, अनेक वनस्पती, प्राणी, सजीव नष्ट किंवा लुप्त होण्याच्या काळात, पृथ्वीवरील जवळपास 90 टक्के जीवसृष्टी नष्ट किंवा नामशेष झाली होती.

"त्यामुळे आम्हाला वाटत की, जगाचं तापमान प्रचंड वाढलं होतं. बहुधा गेल्या 1 अब्ज वर्षांमधील ते पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान असावं," असं विग्नॉल म्हणतात.

इतक्या प्रचंड तापमानामुळे फक्त जमिनीवरील जीवांसाठी जगणं कठीण झालंच, पण जलचरांसाठी तर ते खूप विनाशकारी ठरलं.

"पृथ्वी अत्यंत तापल्यामुळे, महासागरांच्या प्रवाहाचा वेग कमी झाला किंवा ते स्थिर झाले. त्यामुळे त्यांच्या पाण्यातील मोठ्या भागातील ऑक्सिजन नष्ट झाला. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा अभाव असल्यास अनेक जीव नष्ट होतात," असं ते म्हणतात.

मात्र चित्रपटांमध्ये दाखवतात, त्याप्रमाणे जगांचा अंत होण्याची घटना लगेच घडली नाही.

कॅमेरर म्हणतात, "मला वाटतं की, जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात जीव नष्ट होण्याबद्दल विचार करतात, तेव्हा ते अनेकदा डायनासोर नष्ट होण्याबद्दल किंवा लुप्त होण्याबद्दल विचार करतात. त्यानुसार एक लघुग्रह पृथ्वीवर आदळतो. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टींचं बाष्पीभवन होतं आणि मग धुळीचे ढग निर्माण होतात. त्यानंतर पृथ्वीवर प्रदीर्घ काळ आण्विक हिवाळा असतो."

मात्र दुसऱ्या बाजूला पर्मियन युगात सजीव नष्ट होण्याची किंवा लुप्त होण्याची प्रक्रिया हजारो वर्षांच्या कालावधीत झाली आहे, असं ते म्हणतात.

आता असं दिसून आलं आहे की, मूलत: कारू प्रदेशात वास्तव्य करणारे गॉर्गोनोप्सियन प्राणी या महाविनाशाचा काळ त्याच्या शिखरावर पोहोचण्याआधीच नामशेष झाले होते.

ते लुप्त झाल्यामुळे शिकाऱ्यांची जी पोकळी निर्माण झाली होती, ती भरून काढण्यासाठी इनोस्ट्रेन्सेव्हियांनी पँजिया ओलांडला.

कॅमेरर नमूद करतात की, महाविनाशाच्या बरंच आधी कारू खोऱ्यातील सजीवसृष्टी अस्थिर होत होती. भक्षक किंवा शिकारी प्राणी लुप्त होत होते आणि त्यांची जागा इतर प्राणी घेत होते.

त्यांना वाटतं की, यातून आजच्या काळात आपल्याला एक धडा मिळतो. तो म्हणजे आपण कबूल करू त्यापेक्षा लुप्त किंवा नामशेष होण्याच्या टप्प्यात आपण बरंच पुढे आहोत.

"त्याबाबत आपण उत्तर अमेरिकेत आधीच एक उदाहरण पाहिलं आहे. ते म्हणजे, ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याकडे अस्वल, प्युमा आणि लांडगे यांच्यासारख्या शिकारी सस्तन प्राण्यांचा मोठा समूह होता," असं कॅमेरर म्हणतात.

आता त्यांच्या अनुपस्थितीत, कोल्ह्यांसारखे मधल्या स्तरातील शिकारी प्राणी प्रबळ होत आहेत.

"ते आक्रमकपणे त्यांच्या क्षेत्राचा विस्तार करत आहेत. पूर्वी ते राहत नव्हते अशा भागात आता ते राहू लागले आहेत. एकप्रकारे ते सर्वात मोठ्या शिकारी प्राण्याच्या भूमिकेत आहेत," असं ते पुढे म्हणतात.

अखेरीस, इनोस्ट्रेन्सेव्हियादेखील त्या परिस्थितीत तग धरू शकले नाहीत. 25.1 कोटी वर्षांपूर्वी ते नामशेष झाले. त्यांच्याबरोबरच इतर गॉर्गोनोस्पियन प्राणी आणि त्यांच्या जवळच्या बहुतांश सायनॅप्सिड प्रजातीही नामशेष झाल्या.

मात्र काही मूठभर प्रजातींना त्यांचं अस्तित्व टिकवण्यात यश आलं. या प्रजातींनी ट्रायसिक युगातील वन्यजीवांमध्ये दहशत निर्माण केली होती.

आज, सायनॅप्सिड प्रजातीतील शिकारी प्राणी अजूनही आपल्याबरोबर आहेत. अखेर, पर्मियन युगातील त्या महाविनाशात लुप्त होण्यापासून बचावलेल्या काही प्रजातींनी त्यांच्या शरीरातील तापमान, तसंच त्यांच्या पिल्लांना दूध पाजून पोषण देण्याची क्षमता विकसित केली.

पर्मियन युगातील ते विचित्र भयावह, महाकाय प्राणी आजच्या काळात अस्तित्वात असलेल्या सस्तन प्राण्यांचे पूर्वज आहेत. अर्थात त्या मानवाचाही समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)