You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जग्गी वासुदेवांनी स्वतःच्या मुलींचे लग्न लावले मग इतरांच्या मुलींना संन्यास घ्यायला का लावतात', न्यायालयाचा सवाल
- Author, सारदा व्ही
- Role, बीबीसी तामिळ
जग्गी वासुदेव आणि त्यांचं ईशा योग केंद्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यामागे कारण आहे तामिळनाडूतील दोन महिला. या महिलांच्या वृद्ध वडिलांनी ईशा योग केंद्रात त्यांच्या मुलींना जबरदस्तीनं ठेवल्याची तक्रार करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रकरणाचा हा सविस्तर वृत्तांत...
तामिळनाडूतील कोईम्बतूर जिल्ह्यात वेलियांगिरीच्या पायथ्याशी असलेल्या ईशा योग केंद्रामध्ये कोईम्बतूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 150 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि समाजकल्याण अधिकारी शोध घेत आहेत.
मद्रास उच्च न्यायालयानं ईशा योग केंद्रावरील लैंगिक आरोपांसह असलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांची हा छापा टाकला आहे.
निवृत्त प्राध्यापक कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली आहे. ही याचिका त्यांच्या दोन मुलींना ईशा योग केंद्रातून परत आणण्यासाठी आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला आहे.
या याचिकेत कामराज यांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलींना ब्रेनवॉश करण्यात आलं आणि या केंद्रात बंदिस्त करण्यात आलं. कामराज यांच्या मुलींनी मात्र न्यायालयाला सांगितलं की त्या स्वत:च्या इच्छेनंच ईशा योग केंद्रात राहत होत्या.
या आरोपांना उत्तर देताना ईशा योग केंद्रानं म्हटलं आहे की 'त्यांच्या केंद्रात कोणालाही लग्न करण्यासाठी किंवा तपश्चर्या करण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही.'
या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासाचा 4 ऑक्टोबरला मद्रास उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी काय?
जग्गी वासुदेव (सदगुरू) यांनी 1992 मध्ये तामिळनाडूतील कोईम्बतूर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वेलियांगिरी मध्ये ईशा योग केंद्राची स्थापना केली होती.
ईशा योग केंद्राचा दावा आहे की तिथे हजारो विवाहित आणि अविवाहित लोक राहतात आणि त्यातील काही ब्रह्मचार्याचे पालन करतात.
कामराज हे कोईम्बतूर जिल्ह्यातील वडवल्ली भागातील रहिवासी आहेत. त्यांनी ईशा योग केंद्राविरोधात मद्रास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
कोईम्बतूरमधील ईशा योग केंद्रातून आपल्या दोन्ही मुली परत आणाव्यात यासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली होती.
कामराज निवृत्त प्राध्यापक असून ते तामिळनाडू कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख होते. त्यांच्या अनुक्रमे 42 आणि 39 वर्षांच्या दोन मुली आहेत.
त्यांच्या मोठ्या मुलीनं इंग्लंडमधील एका नामांकित विद्यापीठातून मेकॅट्रॉनिक्स विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या नोकरी करत होत्या आणि त्यांना उत्तम पगार होता.
त्यांचं लग्न झालं होतं आणि 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्या ईशा योग केंद्राशी जोडल्या गेल्या.
कामराज यांची धाकटी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. नंतर त्या देखील ईशा योग केंद्रात दाखल झाल्या. सध्या दोन्ही बहिणी ईशा योग केंद्रात वास्तव्यास आहेत.
कामराज यांनी त्यांच्या याचिकेत आरोप केला होता की त्यांच्या मुलींच्या "मेंदूचं कार्य मंदावण्यासाठी त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले, त्याचा परिणाम होत त्या कुटुंबापासून दुरावल्या गेल्या. कुटुंबातील कोणाशीही त्यांचे संबंध राहिले नाहीत."
कामराज यांचं म्हणणं होतं की ईशा योग केंद्रात येणाऱ्या काही लोकांचं ब्रेनवॉश करून त्यांना संन्यासी बनवलं जातं. या लोकांना त्यांच्या पालकांना भेटूदेखील दिलं जात नाही.
त्यांनी असंही सांगितलं होतं की ईशा योग केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टरवर पोक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामराज यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केलं होतं की 15 जूनला संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या मोठ्या मुलीनं त्यांना फोन केला आणि सांगितलं की ईशा योग केंद्रावरील खटले मागे घेईपर्यंत त्यांची धाकटी मुलगी उपोषण करणार आहे.
कामराज यांच्या मुलींचं काय म्हणणं आहे?
कामराज यांच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होत असताना त्यांच्या दोन्ही मुली न्यायालयात हजर होत्या. याचिकेत कामराज यांनी आरोप केला आहे की त्यांच्या दोन्ही मुलींना ईशा योग केंद्रात बंदिस्त करून ठेवण्यात आलं आहे.
तर त्याउलट त्यांच्या मुलींचं म्हणणं आहे की त्या तिथे राहत आहेत आणि यासाठी त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही.
अॅडव्होकेट के राजेंद्र कुमार यांनी ईशा योग केंद्राच्या वतीनं न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी युक्तिवाद केला की वयस्क व्यक्तींना त्यांच्या स्वत:च्या आयुष्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
ते पुढे म्हणाले की या मुलींच्या वैयक्तिक निर्णयांमध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करणं अनावश्यक आहे. मात्र न्यायमूर्तींनी त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही.
कामराज यांची काय मागणी आहे?
कामराज म्हणतात की त्यांची धाकटी मुलगी चेन्नईतील एका प्रतिष्ठित खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयातील एका कार्यक्रमात जग्गी वासुदेव यांच्या कामगिरीनं प्रभावित झाली होती.
नोकरी करत असलेली पदवीधर आता ईशा योग केंद्रात रुजू झाली आहे. कामराज यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांच्या मुलीसह त्यांच्या महाविद्यालयात शिकलेल्या 20 महिलांनी नोकरी सोडली आणि त्या ईशा योग केंद्रात दाखल झाल्या.
कामराज पुढे सांगतात, "2016 मध्ये माझ्या दोन्ही मुली ईशा योग केंद्रात दाखल झाल्या होत्या. त्याच वर्षी, एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि न्यायालयानं त्यांच्या मुलींना भेटण्याची परवानगी दिली होती."
"2017 मध्ये त्यांनी (ईशा योग केंद्र) माझ्या मुलींना जिल्हा न्यायालयात माझ्याच विरोधात एक खटला दाखल करायला लावला. 'मी ईशा योग केंद्राची बदनामी करतो आहे,' असं त्यांनी माझ्या मुलींना सांगितलं होतं."
"हा खटला सहा वर्षे चालला. त्यादरम्यान मला माझ्या मुलींना भेटता आलं नाही. त्यानंतर गेल्या वर्षी मद्रास उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मला माझ्या मुलींना भेटण्याची परवानगी देण्यात आली," असं कामराज पुढे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं की "ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार पालक त्यांचं कर्तव्य बजावण्यास कसूर करत असल्याची तक्रार मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती."
ते म्हणाले, "त्यानंतर माझ्या तक्रारीवरून महसूल आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला आणि मला सांगण्यात आलं की पालक ईशा योग केंद्रात आले तर ते त्यांची काळजी घेतील."
न्यायालय काय म्हणालं?
कामराज यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस एम सुब्रमण्यम आणि व्ही यांनी ईशा योग केंद्रात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला की, "जग्गी वासुदेव (ज्यांना सदगुरू म्हणून ओळखलं जातं) यांनी त्यांच्या मुलीचं लग्न केलं आहे. मात्र ते इतर महिलांना मुंडन करून संन्यासी बनण्यास सांगतात, असं का?"
याशिवाय न्यायमूर्तींनी न्यायालयात हजर असलेल्या महिलांना प्रश्न विचारला की, "तुम्ही अध्यात्मिक मार्गावर असल्याचा दावा करता. मात्र असं करताना तुम्ही तुमच्या पालकांना सोडलं आहे, हे एकप्रकारे पाप आहे असं तुम्हाला वाटत नाही का?"
न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशात, आम्ही याचिकाकर्त्याची आणि ईशा योग केंद्रात असलेल्या दोन महिलांची चौकशी केली आहे. ईशा योग केंद्रावर लावण्यात आलेल्या आरोपांचं गांभीर्य लक्षात घेता, तसंच "ज्या पद्धतीनं ईशा केंद्राच्या ताब्यात असलेल्या महिला" त्यांच्यासमोर बोलल्या ते लक्षात घेता, या प्रकरणात करण्यात आलेल्या "आरोपांसंदर्भातील सत्य शोधण्यासाठी पुढील तपास करणं आवश्यक आहे," असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.
मद्रास उच्च न्यायालयानं या खटल्याची सुनावणी 4 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. त्याचबरोबर ईशा योग केंद्रा विरोधातील आरोपांचा तपास करून त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश न्यायालयानं कोईम्बतूर उपनगर पोलिसांना दिले.
आरोपांबाबत ईशा योग केंद्राचं काय म्हणणं आहे?
बीबीसीनं या प्रकरणासंदर्भात ईशा योग केंद्राशी संपर्क साधला. ईशा योग केंद्राच्या एका प्रवक्त्यानं बीबीसीला एक लेखी वक्तव्यं दिलं आहे.
त्यात म्हटलं आहे की, "ईशा योग केंद्रात कोणालाही लग्न करण्यासाठी किंवा संन्यास घेण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही."
"दोन ब्रह्मचारी महिलांच्या पालकांनी मागील 8 वर्षात आमच्याविरोधात विविध खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत. काही लोकांच्या चिथावणीवरून ते आमच्याविरोधात निदर्शनं करत आहेत आणि अनावश्यक वाद निर्माण करत आहेत. अलीकडेच कामराज यांनी ईशा योग केंद्रात जाऊन त्यांच्या मुलींची भेट घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज पुरावे म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले आहेत."
तसंच, "2016 मध्ये कामराज यांनीच दाखल केलेल्या याचिकेची चौकशी करणाऱ्या कोईम्बतूर जिल्हा न्यायाधीशांच्या समितीनं ईशा योग केंद्रात जाऊन कामराज यांच्या दोन्ही मुलींची भेट घेतली होती आणि न्यायालयीन चौकशी केली होती."
त्या निकालात न्यायमूर्तींनी म्हटलं होतं की "पालकांनी दाखल केलेली तक्रार खरी नाही. आम्ही स्पष्टपणे सांगतो की ज्या मुलींना जबरदस्तीनं तिथं ठेवण्यात आलं आहे असं सांगितलं जात आहे, त्या ईशा योग केंद्रात स्वत:च्या मर्जीनं राहत आहेत."
ईशा योग केंद्रातील तपास
मंगळवारी (1 ऑक्टोबर) कोईम्बतूर आणि तिरुपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 150 पोलिस कर्मचारी आणि समाजकल्याण अधिकारी अंबिका यांच्या नेतृत्वाखाली 50 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी ईशा योग केंद्रात जाऊन तपास केला.
या महिला कोणत्या परिस्थितीत या केंद्रात आल्या आणि तिथे त्यांची जीवनशैली कशी आहे याची चौकशी ते करत आहेत. या तपासाचा सविस्तर अहवाल पोलीस न्यायालयात सादर करणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)