माती वाचवण्याचे अभियान सुरू केलेले सद्गुरू म्हणाले, सर्व मंदिरांना पुन्हा बांधणं व्यवहार्य नाही परंतु...

    • Author, विनीत खरे, के. शुभगुणम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भूतकाळात जमीनदोस्त केलेली सर्व मंदिरं पुन्हा उभी करणं व्यवहार्य नाही असं मत आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी मांडलं आहे.

आपल्या अनुयायांमध्ये सद्गुरू नावाने ओळखले जाणारे जग्गी वासुदेव यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं, "भारत असा देश आहे जिथे एका रस्ते मार्गावरही एकापेक्षा जास्त मंदिरं होती. आक्रमणादरम्यान ही मंदिरं पाडली का? तर पाडली होती. पण म्हणून तुम्ही सर्व मंदिरांची पुनर्बांधणी करणार का? हे अशक्य आहे कारण यासाठी तुम्हाला संपूर्ण देश पुन्हा खोदावा लागेल. हे व्यवहार्य नाही."

काही प्रतिष्ठित ठिकाणांच्या बाबतीत लोकांनी चर्च करून मार्ग काढला पाहिजे असंही ते सुचवतात.

ते म्हणाले, "मी अशा काही कुटुंबांना ओळखतो ज्यांनी त्या काळी खूप सहन केलं आणि त्यांना आजही आठवतं की त्यांच्या पूर्वजांनी किती त्रास सहन केला. त्यांनी जे अनुभवलं त्याची ते आपापसात चर्चा करतात. दिल्लीत औरंगजेब रस्ता पाहिल्यानंतर त्यांना दु:ख होतं. हे म्हणजे इस्रायलमध्ये एडोल्फ हिटलरचा रस्ता बनवण्यासारखं आहे. यामुळे त्यांना अतीव वेदना होतील. याचा अर्थ आपण इतिहास पुन्हा लिहायचा का? हिटलरला विसरुन जायचं का?"

ते पुढे सांगतात, "तुम्ही हिटलरला विसरू शकत नाही कारण तो आपल्या मनात आहे. त्याचप्रमाणे औरंगबजेबाचं नाव आणि त्याने काय केलं हे आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असू शकतं. तुम्हाला दिल्लीत त्याला श्रद्धांजली देण्याची गरज नाहीय. यामुळे लोकांना दु:ख होतं. या गोष्टी तुम्ही सुधारल्या पाहिजेत. कारण बाकी गोष्टींच्या बाबतीत तुम्ही काही करू शकत नाही. हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली होती. तुम्ही सर्व मंदिरं पुन्हा बांधणार का? ती पुन्हा उभी करणं योग्य आहे का? आवश्यक आहे का? नाही. आयुष्य असं चालत नाही. तुमच्यासोबत भूतकाळात काही वाईट गोष्टी घडल्या. तुम्हाला त्या मागेच ठेवेव्या लागतील."

जग्गी वासुदेव यांना त्यांच्या या भूमिकेवर काही प्रतिक्रिया मिळाल्या. यासंदर्भात ते सांगतात, "नेहमीप्रमाणे मला ते शीव्या देत आहेत..."

दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया दिल्या जातायत का?

याविषयी बोलताना जग्गी वासुदेव म्हणाले, "खूप सारे हिंदू मला शिव्या देत आहेत कारण त्यांच्या मते मी पूर्ण हिंदू नाही. त्यांनी हे समजून घ्यावं की मी भारताच्या भविष्याबद्दल बोलतोय."

"तुम्ही व्यवहार्य बाजू मांडली नाही, तुम्हाला एक व्यवहार्य तोडगा काढता आला नाही तर तुम्ही काय भांडत बसाल. कोणत्याही समाजात सततच्या संघर्षामुळे काहीच चांगलं घडत नाही कारण सार्वजनिक ठिकाणी कायम सर्वात बेशिस्त लोकांचा दबदबा असतो."

माती वाचवण्याचं भव्य अभियान

मातीच्या घसरत जाणाऱ्या गुणवत्तेकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मार्च महिन्यात लंडनहून मोटरसायकलवर 100 दिवसांचा प्रवास सुरू केला. या अभियानाचं नाव आहे 'सेव्ह सॉईल' म्हणजे 'माती वाचवा'

यूरोप आणि पश्चिम आशियातील अनेक देशांमधून प्रवास करत ते आता भारतात परतले आहेत. ते सांगतात, मातीतच आपलं जीवन आहे. मातीची गुणवत्ता टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यात खनिजांचं प्रमाण कमी होऊ नये. कारण असं झाल्यास उत्पन्नावर आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नपदार्थांच्या उपलब्धतेवर परिणाम होईल.

वैत्रानिकांचं म्हणणं आहे की मानवी कृत्यांमुळे मातीच्या सुपीत थराची गुणवत्ता घसरत आहे आणि यामुळे जागतिक उत्पन्नाला धोका आहे.

या अभियानानुसार, मोठ्या प्रमाणाच सुपीक जमिनीचे नुकसान होत आहे. अभियानानुसार, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत 3-6 टक्के ऑर्गेनिक कंटेंट असणं गरजेचं असतं. परंतु जगभरात एका मोठ्या भागात असं नाहीय.

विरोधाभासाच्या टीकेला काय उत्तर दिलं?

बीबीसी तामीळला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्या या मोहिमेबद्दल आणि अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर बोलले. एका प्रश्नावर मात्र त्यांनी त्यांच्या अनुयायांना बीबीसीचे कॅमेरे बंद करण्यास सांगितलं.

पाहा त्यांच्या यामुलाखतीचा हा अनुवादित आणि संपादित अंश -

"सेव्ह सॉईल" या उपक्रमासाठी तुम्ही 27 देशांचा प्रवास केला आहे. तुम्ही भेट दिलेल्या देशांतील जनतेने तुमचे स्वागत कसे केले? तुम्ही संबंधित देशांच्या धोरणकर्त्यांशी बोललात का? ते मृदा संवर्धनाच्या त्यांच्या योजनांबद्दल बोललेत का?

सर्व देशातील लोक अद्भुत होते. सर्व देशातील धोरणकर्त्यांसोबत बैठका झाल्या. कृषी मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालयांसोबत बैठका झाल्या. त्यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आतापर्यंत 74 देशांनी घोषणा केली आहे की ते आमच्या सेव्ह सॉईल हँडबुकनुसार पुढे जातील.

हे एका दिवसाचे काम नाही. सध्या आम्ही फक्त एक उद्दिष्ट तयार केलं आहे. अजून बरंच काम बाकी आहे.

'सेव्ह सॉईल'चा एक भाग म्हणून तुम्ही जी सर्वांत महत्त्वाची गोष्ट बोलत आहात ती म्हणजे अन्न सुरक्षा. तुम्ही सांगत आहात की अन्न उत्पादनाच्या सुरक्षिततेसाठी जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे महत्त्वाचं आहे. त्यापलीकडे जैवविविधता संवर्धन आणि वन्यजीवांची कमी होत चाललेली संख्या. यासाठी तुमच्या काही योजना आहेत का?

हे फक्त अन्नाबद्दल नाही. माती हा जीवनाचा आधार आहे, फक्त अन्नासाठी नाही. केवळ आपलेच नाही तर सर्व सजीवांचं शरीर मातीतून तयार झाले आहे.

जीवनाचा आधार असलेल्या त्या मातीला जगण्याची संधी नसेल, तर इथे जीवनाला वाव नाही. जर तुम्ही मूठभर माती घेतली तर त्यात अंदाजे 80 लाख ते 1 कोटी जीव असतील. सध्या दरवर्षी 27,000 प्रजातींमध्ये नष्ट होत आहेत. जर आपण त्याच गतीने गेलो तर सृष्टी अस्तित्वात राहणार नाही. कारण आपल्या शरीराचा 60% भाग देखील यापासून बनलेला आहे.

जेव्हा ते मातीत ओसरतील, तेव्हा या शरीरातील जीवन देखील पूर्ण राहणार नाही. हे मी म्हणत नाही, सर्व संवर्धन संस्था, महत्त्वाचे मृदा शास्त्रज्ञ हे सांगतात. आपण थोडे निष्काळजी झालो आहोत. मातीकडे लक्ष वेधणं, सरकारमध्ये आवश्यक निधी जमा करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, हा या चळवळीचा उद्देश आहे.

हे फक्त शेतीपुरतंच नाही. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. एवढीच माती ही आपली संपत्ती नाही, तर आपल्याला आपल्या पूर्वजांकडून जिवंत माती मिळाली आहे. म्हणूनच आपण इतके चांगले जगत आहोत. पुढच्या पिढीला चांगलं जगायचं असेल तर आपण त्यांना जिवंत माती दिली पाहिजे. ही आपली मूलभूत जबाबदारी आहे.

या मोहिमेसाठीच्या 30,000 किमीच्या प्रवासात आपण जीवाश्म इंधन वापरून 2,000 किमी पेक्षा जास्त प्रवास केला आहे, जो विरोधाभास आहे अशी टीका होत आहे. तसंच, जर तुम्ही सामान्य लोकांबरोबरच साध्या मार्गाने हवाई प्रवास निवडला असता तर तुम्ही तुमच्या 'सेव्ह सॉईल' मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित करता आलं असतं, असं तुम्हाला वाटत नाही का?

मोटारसायकलपेक्षा विमानात 100 पट जास्त कार्बन फूटप्रिंट असतो. आपल्या देशात काही लोक आहेत ज्यांच्याकडून काहीच चुका होत नाही कारण त्यांनी आयुष्यात काहीच केले नाही. त्यांनी काही केले तर त्यांना त्यांच्या आयुष्यात शंभर चुका दिसतील. कुणी काही केलं तरच त्यात शंभर चुका सापडतात.

मी विमानात असतो तरी ते असंच म्हणाले असते जर कारने गेलो असतो तर ते म्हणाले असते की मी फक्त गाडी चालवत आहे. आता ते मोटरसायकलसाठी हेच म्हणत आहेत. आम्ही काय करू? त्यांना दुसरं काम नाही, म्हणून त्यांना बोलू द्या.

शा फाऊंडेशन ही पर्यावरणाची काळजी घेऊन काम करत आहे, परंतु बांधकामापूर्वी पर्यावरणविषयक मंजुरी न मिळाल्यासारखे पर्यावरणाशी संबंधित आरोपही आहेत. त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ?

हाच प्रश्न किती वेळा विचाराल? पर्यावरण मंजुरी न घेता? तुम्हाला कोणी सांगितलं?

तुम्ही बातम्या पाहता की सरकारी विभागाचं म्हणणं ऐकता? तुम्ही न्यायालयाचं म्हणणं ऐकाल की अर्धवट ज्ञान असलेल्या शेजाऱ्याचं?

माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आम्ही कोणतेही अतिक्रमण केलेलं नाही, सरकारी विभाग सर्व काही ठीक असल्याचे सांगत आहेत.

पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या संस्थेला बांधकामापूर्वी पर्यावरण मंजुरी का मिळाली नाही?

देशात सरकार आहे ना? कायदा आहे ना? त्यांना त्यांचे काम करू द्या, तुम्ही का करत आहात. पुरे आता. चला थांबवू.

शाच्या पत्रातच म्हटलं आहे की, "आम्ही पर्यावरण मंजुरी न मिळवून नियमांचे उल्लंघन केलं आहे," आणि मंजुरीसाठी अर्ज केला होता. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?

...

(या टप्प्यावर जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या स्वयंसेवकांना बीबीसीचा कॅमेरा बंद करण्याची सूचना केली, "त्याचा कॅमेरा बंद करा, पुरे." त्यानंतर स्वयंसेवकांनी बीबीसीचे तीनही कॅमेरे बळजबरीने बंद केले.)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)