You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रेनमधल्या पेटीत मृतदेह, समुद्रात सापडलेलं मुंडकं आणि एका हत्येचं कोडं
- Author, मुरलीधरन काशी विश्वनाथन
- Role, बीबीसी तमीळ प्रतिनिधी
सूचना- या बातमीतले काही तपशील विचलित करू शकतात.
1950 च्या सुरुवातीचा काळ होता. तामिळनाडूमधून एक ट्रेन धावायची. तिचं नाव होतं इंडो-सिलोन एक्स्प्रेस. चेन्नईतल्या एग्मोर स्टेशनपासून धनुषकोडी पर्यंतचा प्रवास यातून करता यायचा. तिथून पुढे श्रीलंकेतील थलाईमन्नार इथे जाण्यासाठी चेन्नईतून तिकीट काढता यायचं.
चेन्नईच्या एग्मोरहून धनुषकोडीपर्यंत जाण्यासाठी 19 तास लागयाचे.
धनुषकोडी इथे आल्यानंतर प्रवासी तिथे उतरायचे. तिथून फेरी बोटीने श्रीलंकेतील थलाईमन्नार येथे जायचे. त्यासाठी साडेतीन तास लागायचे. बोलीभाषेत या ट्रेनला ‘बोट मेल एक्स्प्रेस’ म्हणायचे.
सुमारे 70 वर्षांपूर्वी या बोट मेलमध्ये सापडलेल्या मुंडकं नसलेल्या मृतदेहाने तामिळनाडू हादरलं होतं.
हा खून ज्या पद्धतीने केला होता आणि त्या हत्येचं कारण या दोन्हीची तामिळनाडूत अनेक दिवस चर्चा सुरू राहिली.
ट्रेनमधील पेटीत डोकं नसलेला मृतदेह सापडला
तो 29 ऑगस्ट 1952 चा दिवस होता. आदल्याच रात्री आठ वाजता एक्स्प्रेस ट्रेन चेन्नईहून निघाली आणि सकाळी 10 वाजता मनमदुराईला पोहोचली.
तेव्हा एका डब्यातील पेटीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यानंतर पोलीस आणि रेल्वे पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
मनमदुराई इथं ट्रेन थांबल्यावर पोलिसांनी पेटी उघडताच त्यात डोकं नसलेला मृतदेह आढळला.
मृतदेहाच्या पायात हिरवे मोजे होते. पण मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी काहीही न मिळाल्याने मृतदेह मदुराईच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.
तिथं त्याचं पोस्टमार्टम केलं. तो मृतदेह 25 वर्षांच्या व्यक्तीचा असल्याचा अंदाज डॉक्टरांनी बांधला.
त्याची 'सुंता' झाली होती. त्यामुळे तो मुस्लीम धर्माचा असावा असं पोलिसांनी सांगितलं.
पण या केसचा छडा लागला, तेव्हा हे दोन्ही निष्कर्ष चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले.
चेन्नईत FIR दाखल झाली.
त्याच दरम्यान एक महिला आपल्या पतीचा शोध घेत होती. तिने चेन्नईच्या रायपुरम इथल्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घराचा दरवाजा ठोठावला.
ती तिथे देवकी नावाच्या महिलेच्या शोधात आली होती. पण देवकी तिथे नव्हती. त्याऐवजी देवकीचे पती प्रभाकर मेननने तो दरवाजा उघडला.
कालपासून माझे पती घरी आले नाहीत. त्यांना लोकांनी देवकीसोबत पाहिलं होतं, असं या महिलेने प्रभाकरनला सांगतलं.
त्यामुळे ती तिच्या पतीला शोधण्यासाठी तिथे आली होती. पण अशी कोणी व्यक्ती आमच्याकडे आलीच नाही, असं प्रभाकर मेननने सांगितले.
त्या महिलेचा गायब झालेला पती हा एक व्यापारी होता. त्याचं आळवंदार असा नाव होतं. पती रात्री घरी न परतल्याने दुसऱ्या दिवशी सकाळपासून महिला त्याचा सगळीकडे शोध घेत होती.
शेवटी काहीही पत्ता न लागल्याने त्या महिलेने आळवंदार यांच्या जवळच्या मित्राला घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली.
महिलने सांगितल्या प्रमाणे पोलिसांनीही देवकीच्या घरापासून तपासाची सुरुवात केली.
पण पोलीस देवकीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराला कुलूप होते.
शेजारी चौकशी केल्यावर देवकी-प्रभाकर दाम्पत्य मुंबईला गेल्याचं कळलं.
समुद्र किनाऱ्यावर पिशवीत आढळलं डोकं
दरम्यान आदल्या दिवशी प्रभाकर मेनन हातात पिशवी घेऊन समुद्रकिनाऱ्याकडे जाताना दिसला होता, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी काही दिवस रायपुरम बीचवर शोध घेतला.
तिसऱ्या दिवशी रहिवाशांनी रायमपूरमधील समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या पिशवीतून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी जाऊन त्या पिशवीची झडती घेतली असता त्यांना तपकिरी शर्टमध्ये गुंडाळलेले डोकं आढळलं. ते सडलं होतं. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी आली आणि चेन्नईत खळबळ उडाली.
ते डोकं तपासणीसाठी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.
दरम्यान, मदुराईतून एक डोकं नसलेला मृतदेह चेन्नईला पाठवण्यात आला होता.
या दोन्ही गोष्टींचा तपास प्रसिद्ध फॉरेन्सिक प्रोफेसर सी.पी. गोपालकृष्णन करत होते.
त्यांनी तपासणी केल्यानंतर मृतदेहाचे वय 42 ते 45 असावे असं सांगितले.
चेन्नईत सापडलेल्या डोक्याच्या कानाला दोन छिद्रे होती. जेव्हा चेन्नईतल्या त्या महिलेला हे डोकं दाखवलं तेव्हा तिनेही कानातलं छिद्र आणि दातांची रचना पाहून तो आपल्या पत्नीचं असल्याचं तात्काळ सांगितलं.
आळवंदार कोण होता?
1952 मध्ये आळवंदार यांची हत्या झाली तेव्हा तो बहुधा 42 वर्षांचा होता.
तो लष्करी कार्यालयात उपविभागीय अधिकारी होता. पण दुसऱ्या महायुद्धानंतर सैन्यातून निवृत्त होऊन घरी आला होता
इकडे आल्यानंतर त्याने प्लास्टिकच्या वस्तू विकण्याचे काम सुरू केलं. चेन्नईतील एस्प्लेनेड इथं त्याचे मित्र कुनम चेट्टी हे पेन विकण्याचा व्यवसाय करायचे. त्यांच्या गाळ्यात आळवंदारने आपलं छोटसं दुकान सुरू केलं.
याशिवाय तो ग्राहकांकडून हप्त्याने पैसे घेत साड्या विकण्याचा व्यवसायही करायचा. त्या वेळी हप्त्याने विक्री करणं नवीन असल्याने या व्यवसायाने त्यांना चांगलाच फायदा झाला होता.
आळवंदार दाम्पत्याला दोन मुले होती तरीही त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं.
शिवाय तो अफूसारखे अमली पदार्थांचं सेवन करायचा.
एका रात्री आळवंदार घरी न परतल्याने त्याची पत्नी दुकानात गेली आणि पतीविषयी चौकशी केली. तेव्हा तो शेवटी देवकी नावाच्या महिलेला भेटण्यासाठी गेला, असं सांगण्यात आलं.
देवकी - प्रभाकर दाम्पत्याने रचला हत्येचा कट
देवकी मूळची केरळची होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने चेन्नईतील एका भाषा संवर्धन संस्थेत काम सुरू केलं.
देवकी आणि आळवंदार यांची ओळख एका दुकानात झाली. तिथे ती स्टेशनरी घ्यायला नेहमी येत असत.
ऑगस्ट 1951 मध्ये सुरू झालेल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. देवकीचं त्यावेळी लग्न झालं नव्हतं. पण आळवंदार विवाहित होता.
आळवंदारने देवकीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले. ते काही दिवस चालले. पण 1952 मध्ये देवकीचं प्रभाकर मेनन याच्याशी लग्न झालं.
प्रभाकर आधी खाजगी विमा कंपनीत काम करत होता. नंतर तो 'स्वातंत्र्य' मासिकाचा संपादक झाला.
प्रभाकर त्यांच्या नियतकालिकाच्या प्रसिद्धीसाठी धडपडत होते. तेव्हा देवकी प्रभाकरनला आळवंदरच्या दुकानात घेऊन गेली. आळवंदार आपल्या मासिकाला जाहिराती मिळवून देईल, असं देवकीने प्रभाकरनला सांगितलं.
या केसचा तपास करणारे पोलीस अधिकारी एम. सिंगारवेलू यांच्या म्हणण्यानुसार आळवंदार लग्नानंतरही देवकीचा छळ करत होता.
ज्या अधिकाऱ्याने ही केस हाताळली त्यांच्या मते आळवंदर देवकीला तिच्या लग्नानंतरही छळत होता. त्यातूनच तिने आळवंदारचा काटा काढल्याचं त्यांनी सांगितलं.
1955 मध्ये मद्रास पोलीस जर्नलमध्ये IPS एम सिंगारावेलू यांनी यावर एक सविस्तर लेख लिहिला आहे.
एम. सिंगारावेलू लिहितात, की आळवंदार याने प्रभारकरनची एकदा भेट घेतली. आपण एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला भेटणार आहोत. जर देवकी माझ्यासोबत आली तर आपण मासिकासाठी मोठी जाहिरात मागू शकू असं सांगितलं. त्याप्रमाणे देवकी आळवंदार सोबत गेली. पण आळवंदारचा हेतू वेगळाच होता. त्याने देवकीला थेट हॉटेलला नेले. तिथे आळवंदारने तिच्यावर जबरदस्ती केली. देवकी रडत रडत घरी आली आणि संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला.
झालेला प्रकार ऐकल्यानंतर प्रभाकरने देवकीला एक प्रश्न विचारला, “तुझे आळवंदार सोबत कधी संबंध होते का?”
त्यावर देवकीने ‘हो’ अशी कबुली दिली. आपण दबावाखाली कधीतरी संबंध ठेवल्याचे देवकीने सांगितले.
तेव्हा प्रभाकरने तिला धीर दिला पण दोघांनी मिळून आळवंदारला संपवल्याचा कट केला. देवकीनेही ते मान्य केलं.
घरी बोलावून आळवंदारला संपवलं
28 ऑगस्ट 1952 रोजी दुपारी देवकी आळवंदारच्या दुकानात आली. आळवंदारला घरी येण्याचं आमंत्रण दिलं.
तो येण्यापूर्वी देवकीने घरात काम करणाऱ्या नारायणला थोडे पैसे देऊन बाहेर जायला सांगितले आणि संध्याकाळीच परत येण्यास सांगितले.
आळवंदार घरी आल्यानंतर देवकी बाहेर गेली आणि रस्त्यावर देखरेख करू लागली. आळवंदारची हत्या केली, त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं.
त्याने मृतदेह एका पेटीत ठेवला. त्याचं डोकं एका पिशवीत भरले आणि ते रायपुरमच्या समुद्रात फेकले.
पण काही वेळातच लाटांनी पिशवी पुन्हा किनाऱ्यावर आणली. नंतर पिशवीत थोडी माती टाकून परत पाण्यात टाकली. तोपर्यंत काही लोक आले आणि प्रभाकर तिथून निघून गेला.
घरी माघारी आल्यावर देवकी आणि प्रभाकरने तो मृतदेह एका पेटीत भरला. ती पेटी रिक्षातून चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावर घेऊन गेले.
पण तिथे पोलीस असल्याचं लक्षात येताच त्यांनी रिक्षा एग्मोर रेल्वे स्थानकावर नेली.
प्रभाकरने ती पेटी बोट-मेलच्या डब्यात कुलीच्या मदतीने लोड केली आणि पुन्हा घरी गेला.
दुसऱ्या दिवशी आळवंदारची पत्नी त्याला शोधण्यासाठी देवकीच्या घरी आली. पोलिसांनी आपल्याला पकडू नये म्हणून दोघेही ताबडतोब मुंबईला निघून गेले.
आळवंदारची हत्या आणि या दाम्पत्याचं कनेक्शन लावण्यात पोलिसांना जास्त वेळ लागला नाही.
त्याचं कारण म्हणजे अनेकांनी आळवंदारला प्रभाकरच्या घरात शिरताना पाहिलं आहे. पण त्याला परत येताना कोणीच पाहिले नाही.
मद्रास पोलिसांनी मुंबईला जाऊन देवकी आणि प्रभाकर मेनन यांना अटक केली. तिथं ते एका नातेवाईकाच्या घरी राहत होते.
त्यांची चेन्नईत आणल्यावर चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी हत्येचा आरोप फेटाळला केला. पण त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे होते.
पेटी घेऊन जाणारा रिक्षाचालक आणि ट्रेनमध्ये ठेवणारा कुली यांनी प्रभाकर मेननला ओळखले.
देवकीच्या घरी काम करणाऱ्या नारायणन यांनीही अनेक गोष्टी सांगितल्या.
फॉरेन्सिक तपासात ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध झाले.
पण न्यायाधीशांचा आळवंदारबाबत अत्यंत नकारात्मक दृष्टिकोन होता. त्यामुळे न्यायाधीशांनी मारेकऱ्याला (देवकी आणि प्रभाकर) यांना किमान शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार प्रभाकर मेननला 7 वर्षांची, तर देवकीला 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
तुरुंगवास पूर्ण केल्यानंतर प्रभाकर मेनन आणि देवकी पन्नाशीच्या उत्तरार्धात चांगल्या वागणुकीमुळे शिक्षा पूर्ण करून तुरुंगाबाहेर आले.
त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी केरळला गेले. तिथे त्यांनी नवीन दुकान सुरू केले.
या हत्येचा तपास तामिळनाडू पोलिसांच्या तपास इतिहासातील सर्वात महत्त्वाचा मानला जातो.
कारण ही हत्या सिद्ध करण्यात फॉरेन्सिक सायन्सने अभूतपूर्व भूमिका बजावली.
पुढे या हत्येबाबत तामिळनाडूत अनेक पुस्तके लिहिली गेली.
एवढंच नाही तर 1995 मध्ये या केसचे रुपांतर दूरदर्शन मालिकेत करण्यात आले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)