'मला हा मुलगा नको होता, असं वाटायचं; रात्री दूध पाजताना तर तो सैतान वाटायचा'

- Author, कर्स्टीन ओ सुलिवॅन
- Role, बीबीसी न्यूज
कल्पना करा. एका बाईनं मुलाला जन्म दिलाय आणि आपल्याच मुलाबद्दल तिच्या मनात भयंकर विचार येत असतील तर?
आता आई म्हटल्यावर सगळ्यांना वाटतं की, जन्म देताच तिच्या मनात वात्सल्य आणि प्रेमाचा उमाळा आला पाहिजे. आपल्या बाळावर तिने सतत सुखाचा, प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे. हे सगळं योग्य आणि अपेक्षित वाटत असलं तरी सर्वच महिलांच्या बाबतीत प्रसूतनंतरचा काळ असा सारखा नसतो.
अनेक महिलांना थोड्या फार प्रमाणात प्रसूतीनंतर नैराश्याशी लढावं लागतं.
बाळंतपणानंतर घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. हा काळ कुटुंबाच्या आयुष्यातला चांगला काळ समजला जातो. पण आजूबाजूला असं आनंदाचं वातावरण असूनही नवीन आईला मात्र निराश वाटत असतं. वेगवेगळे विचार मनात यायला लागतात. आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटतं. काही करू नये असं वाटायला लागतं किंवा आजूबाजूच्या माणसांवर चिडचिड होऊ लागते. झोपेवर परिणाम होतो. भुकेवर परिणाम होतो.
काही वेळा त्यातून टोकाच्या भावना डोक्यात येतात. स्वतःचा जीव द्यावा किंवा बाळाचा जीव घ्यावा असे विचार डोकावू लागतात.
ही गोष्ट आहे हॅम्पशायरमधील बेसिंगस्टोक इथं राहाणाऱ्या तीस वर्षीय कॅरिस यांची.
प्रसूतीनंतर त्यांनाही नैराश्य आलं होतं. त्यांनी नोहा नावाच्या बाळाला जन्म दिला. मला या बाळाची आई व्हावं असं वाटतच नव्हतं असं त्या सांगतात.
या भावनेमुळे त्यांच्या मनात अपराधीभाव यायचा. आता त्या यातून पूर्णपणे बाहेर आल्या आहेत. आपल्यासारखाच त्रास होणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी त्या पुढे आल्या आहेत. या प्रकारच्या नैराश्याला 'पेरिनॅटल डिप्रेशन' म्हणजे प्रसूतीपूर्वीचा थोडा काळ आणि प्रसूतीनंतरचा थोडा काळ या कालावधीत येणारं नैराश्य.
कॅरिस सांगतात, बहुतांश महिला याकडे दुर्लक्ष करतात.
आपला मुलगा नोहाशी नातं जुळायला फारच त्रास झाला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या तर त्याला आपल्यापासून दूर केलं जाईल अशी भीती त्यांना वाटायची.
त्या म्हणतात, "माझं त्याच्यावर प्रेम आहे असं मला वाटायचंच नाही. मला त्याची आई व्हायचंच नव्हतं, मला तो नकोच होता, अशा भावना मनात यायच्या."
"रात्री स्तनपानाच्यावेळेस तो एक सैतान आहे असं वाटायचं आणि त्याच्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं."
हे सगळे विचार फारच त्रासदायक होते. एकदा मला त्याच्याशी काहीतरी घातपात करावा, असा विचार मनात आला, मग मात्र आता मदत मागायची वेळ आली असं मला वाटलं.
कॅरिस यांची वैद्यकीय तपासणी करायला येणारे जे आरोग्यसेवक येत असत त्यांच्या कानावर ही समस्या घालण्यात आली. त्यानंतर त्यांनी पेरिनॅटल मेंटल हेल्थ टीमशी संपर्क करावा असं सुचवण्यात आलं.
कॅरिस सांगतात, "या टीमच्या संपर्कात आल्यावर त्यांची एकदम चांगल्याप्रकारे काळजी घेण्यात आली. पेरिनॅटल डिप्रेशन, ओसीडी (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर) अशा आजाराचं निदान झालं आणि त्यावर मात करण्यासाठी मदत करण्यात आली."

त्या म्हणतात, "महिलांनी यावर अधिकाधिक बोललं पाहिजे, आपल्याला कसं वाटतंय यावर मोकळेपणानं बोलावं यासाठी त्यांना उद्युक्त केलं पाहिजे."
त्या सांगतात, "गरोदरपणात तुम्ही तपासण्या करुन घेत असता पण त्या पुरेशा नसतात. जर प्रत्येक तपासणीवेळी मला कोणी तुम्हाला कसं वाटतंय असं विचारलं असतं, तर कदाचित मी जरा लवकर मोकळेपणाने यावर बोलू शकले असते.
"साधारणपणे पंचवीस टक्के महिलांना पेरिनॅटल मानसिक आरोग्य समस्या भेडसावतात तसेच 50 टक्के महिलांचं कधीच निदान केलं जात नाही", असं मॅटर्नल हेल्थ अलायन्स चॅरिटीचे अध्यक्ष डॉ. ॲलन ग्रेगरी सांगतात.
ते म्हणतात, "आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जे या गरोदर महिलांच्या संपर्कात येतात त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या कशा हाताळायच्या याबाबत मार्गदर्शन करण्याचंही शिकवलेलं असतं."
ते सांगतात, "बऱ्याचदा मानसिक आरोग्याबाबत वैद्यकीय व्यवसायिकांना मदत करण्याची नक्कीच इच्छा असते पण तशी व्यवस्था आणि ट्रेनिंग नसतं."
एनएचएस फाऊंडेशनच्या हॅम्पशायरमधील रुग्णालयात पेरिनॅटल क्लिनिकल नर्स म्हणून कार्यरत असलेल्या कॅरेन सिम्स सांगतात, "बहुतांशवेळा नवमातांना गरोदरपण आणि लगेचच येणारं पालकत्व हे हाताळणं फार जड जातं."
पण या समस्येला सामोऱ्या जाणाऱ्या तुम्ही एकट्याच नाहीत.
पोस्ट-पार्टम डिप्रेशन (प्रसूतीनंतरचं मानसिक नैराश्य)
त्रास होणाऱ्या महिलांपैकी 50% जणींना त्यापूर्वी कधीही कोणताही मानसिक विकार झालेला नसतो.
प्रसूतीनंतर मानसिक आजार वा नैराश्य येण्यासाठी कारणीभूत होणाऱ्या घटना - पहिलं बाळंतपणं, बाळाचा वेळेपूर्वी झालेला जन्म (Pre-Mature), डिलिव्हरीत आलेल्या अडचणी, फोरसेप्स वा सिझेरियन डिलिव्हरी.
अशा महिलांच्या पुढच्या बाळंतपणातही याच अडचणी येण्याची शक्यता असल्याने अशा जोडप्यांनी पुढच्या गर्भधारणेच्या आधी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











