'माझ्याच बाळाला इजा करण्याचे भयानक विचार मनात यायचे'; बाळंतपणानंतर काही महिलांना हा प्रश्न का सतावतो?

बाळंतपणानंतर काही महिलांना नैराश्य का येतं?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मॅथ्यू हिल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आई होणं हा एका आनंदाचा क्षण असतो, पण काही महिलांसाठी हा काळ मानसिकदृष्ट्या खूप कठीण ठरतो.

गरोदरपणात आणि बाळ जन्मल्यानंतर काही नवमातांना नैराश्य, भीती किंवा चिंतेचे झटके येतात.

इंग्लंडमधील बेकी नावाच्या एका आईनं अशाच आपल्या अनुभवांबद्दल उघडपणे बोलून दाखवलं आहे.

त्यांनी सांगितलेल्या अनुभवांमुळं असं लक्षात आलं की, अशा प्रकारचे त्रास अनेक नवमातांना होतात, पण त्या वेळेवर मदत मागत नाहीत. कारण समाज काय म्हणेल, याची त्यांना भीती असते.

बेकी यांना स्वतःला आणि आपल्या नवजात बाळाला इजा करण्याचे विचार सातत्यानं सतावत होते.

आपले हेच अनुभव त्यांनी सर्वांसमोर मांडले.

बेकी
फोटो कॅप्शन, 36 वर्षीय बेकी यांना प्रसूतीनंतरचं नैराश्य आणि चिंता असल्याचं निदान झालं.

सध्या मानसिक आरोग्यासाठी मदत मागणाऱ्या नवमातांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत.

महिला रुग्णांमध्ये तब्बल 80 टक्क्यांची वाढ

इंग्लंडच्या पश्चिम भागात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या महिला रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यावर उपचार करणाऱ्या एका विशेष सेवा देण्याऱ्या संस्थेकडे गेल्या 3 वर्षांत असा त्रास होत असलेल्या महिलांवर उपचार करावेत, अशा शिफारशींमध्ये (रेफरल्स) तब्बल 80 टक्के इतकी वाढ झाली आहे.

बाथ येथील बेकी म्हणाल्या की, त्यांच्या मनात आपल्या मुलाला त्रास देण्याचे अतिशय भयानक विचार यायचे.

बेकी इव्हा
फोटो कॅप्शन, सध्या मानसिक आरोग्यासाठी मदत मागणाऱ्या नवमातांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत.

मदतीची मागणी करण्यापूर्वी त्या स्वतःचं आयुष्य संपवण्याचा किंवा कुटुंबाला सोडून जाण्याचा विचार करत होत्या.

36 वर्षीय बेकी म्हणाल्या, "समुपदेशन देणारे लोक माझ्यावर रागावले नाहीत, उलट त्यांनी खूप समजावून घेतलं आणि सहानुभूतीनंही वागवलं."

"माझ्या डोक्यात येणारे विचित्र आणि घाबरवणारे विचार नवमातांमध्ये खरं तर खूप सामान्य असतात, हे मला तेव्हा कळलं."

महिलांना त्वरित उपचार मिळावेत हेच उद्दिष्ट

ब्रिस्टल, बाथ, नॉर्थ ईस्ट सॉमरसेट, साउथ ग्लॉस्टरशायर आणि विल्टशायर या भागांमध्ये काम करणाऱ्या दोन प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्यासंदर्भातील सेवा देणाऱ्या मदत केंद्रांकडे 2024-25 मध्ये 4,816 महिलांनी संपर्क केला.

2022-23 मध्ये ही संख्या 2,668 इतकी होती. म्हणजेच यात मोठी वाढ झाली आहे.

हे मदतकेंद्र एव्हॉन आणि विल्टशायर मेंटल हेल्थ पार्टनरशिप (एडब्ल्यूपी) चालवत आहे. बेकी इव्हा या मदतकेंद्राच्या क्लिनिकल डेव्हलपमेंट लीड आहेत.

त्या म्हणाल्या की, त्यांच्या सेवांची अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आणि प्रसूतीपूर्व व नंतरच्या मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढणं यामुळेच मदत मागणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात 'मातृ आत्महत्या' हे महिलांच्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारणं असल्याचं बेकी इव्हा सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

इव्हा म्हणाल्या की, बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात 'मातृ आत्महत्या' हे महिलांच्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारणं आहे.

"ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना योग्य मानसोपचार व वैज्ञानिक आधार असलेला उपचार मिळावा. हेच आमच्या सेवेमागचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं", त्यांनी म्हटलं.

2023 मध्ये प्रसूतीनंतर नैराश्य आणि तीव्र चिंता वाटू लागल्यानंतर बेकीला यांच्याकडून मदत मिळाली.

प्रसूती किंवा बाळंतपणातून सावरत असलेल्या बेकी म्हणाल्या की, त्यांना अंघोळ करणं, जेवणं आणि झोपणं सुद्धा खूप कठीण जात होतं. त्याचवेळी त्यांना बाळाला दूध पाजणं आणि त्याची काळजी घेणंही करावं लागत होतं.

त्या पुढे म्हणाल्या, "त्यातच माझ्या मनात मुलाला दुखापत करण्याचे खूपच घाबरवणारे आणि विचित्र विचार येत होते."

'अन् मला घृणा वाटू लागली'

सुमारे सहा महिन्यांपर्यंत ही लक्षणं अनुभवल्यानंतर, बेकी म्हणाल्या की एका संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्या ड्रेसिंग गाऊनमध्येच घरातून पळून गेल्या.

त्या म्हणाल्या, "मी अंधारात जवळच्या बागेत गेले आणि तिथं फिरत राहिले. 'मी माझ्या मुलाची काळजी घेऊच शकत नाही', हेच विचार माझ्या मनात सतत येत होते."

त्या म्हणाल्या, "सगळे मला सांगत होते की, हा आनंद घेण्याचा काळ आहे. तू हा काळ एन्जॉय कर, ही वेळ खूप लवकर निघून जाते आणि तू खूप नशीबवान आहेस... पण खरं सांगू मी खूप त्रासात होते."

बेकी म्हणाल्या की, "माझं स्वतःवर थोडंसं नियंत्रण शिल्लक होतं, म्हणून मी घरी परत गेले आणि माझ्या हेल्थ व्हिजिटरकडे यासाठी मदत मागितली."

त्यावेळी लगेचच त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आलं.

मुलाचा पहिला वाढदिवस होईपर्यंत मानसिक आरोग तज्ज्ञांची टीम त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर नियमित मदत आणि उपचार करत होती.

बेकी
फोटो कॅप्शन, मुलाचा पहिला वाढदिवस होईपर्यंत मानसिक आरोग तज्ज्ञांची टीम बेकी यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर नियमित मदत आणि उपचार करत होती.

त्या म्हणाल्या की, त्या त्रासदायक विचारांमुळे माझी मलाच प्रचंड घृणा वाटायची आणि मला कधीच त्या विचारांप्रमाणे काही करायचं नव्हतं.

म्हणूनच डॉक्टरांनी असं ठरवलं की, त्या स्वतःसाठी किंवा बाळासाठी धोका नाही, आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये न ठेवता घरीच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले.

बेकी बीबीसीला म्हणाल्या की, 'असं होणं काही आश्चर्याची गोष्ट नाही' कारण आता अधिकाधिक महिला अशी मदत आणि उपचार घेत आहेत, हे अत्यंत नैसर्गिक आहे.

त्या म्हणाल्या, "माझ्या मते यामागचं मोठं कारण म्हणजे आपल्या समाजात योग्य मदतीचा आणि पाठबळाचा अभाव आहे."

त्या म्हणाल्या, "हल्ली आपण अधिकाधिक एकटे पडत चाललो आहोत आणि आपल्याकडून अपेक्षा केली जाते की, आपली मुलं आपणच एकट्यानं वाढवावीत. पूर्वीच्या पिढ्या मात्र मुलांना कुटुंबात आणि समाजाच्या मदतीनं वाढवत होत्या."

तर मी आत्महत्याच केली असती...

त्या पुढे म्हणाल्या, "मला आजूबाजूच्या लोकांची आणि मानसिक आरोग्य टीमची मदत मिळाली नसती, तर मी कदाचित आत्महत्येचा प्रयत्न केला असता किंवा माझं कुटुंब सोडून दिलं असतं."

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स (एनआयसीइ) म्हणते की, मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक वेळा लक्षात येत नाहीत आणि त्यावर योग्य उपचारही होत नाहीत.

काही महिला मदत मागतच नाहीत, कारण त्यांना समाज काय म्हणेल याची भीती वाटते किंवा 'सोशल सर्व्हिस'कडून काही कारवाई होईल याची चिंता असते.

त्यांनी असंही सांगितलं आहे की, गरोदरपणात आणि बाळंतपणानंतरच्या मानसिक आरोग्याच्या समस्या महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम करू शकतात.

याचा परिणाम मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासावरही होऊ शकतो.

बेकी
फोटो कॅप्शन, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स (एनआयसीइ) म्हणते की, मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक वेळा लक्षात येत नाहीत आणि त्यावर योग्य उपचारही होत नाहीत.

इव्हा म्हणाल्या की, एडब्ल्यूपी संस्थेनं डॉक्टर आणि नवमातांना मदत करणाऱ्या लोकांना मानसिक आरोग्याची लक्षणं ओळखता यावीत म्हणून विशेष प्रशिक्षण दिलं आहे.

त्या म्हणाल्या, "मानसिक आरोग्य अनेक कारणांमुळे बिघडू शकतं, त्यात आर्थिक तणाव आणि नातेसंबंधांमधले त्रास ही मोठी कारणं असू शकतात."

त्या म्हणाल्या, "आमचे मॅटर्निटी आणि हेल्थ व्हिजिटिंग कर्मचारी नियमित तपासण्या करतात. आम्ही एक विशेष व्यवस्था तयार केली आहे, ज्यामुळे सगळी प्रकरणं थेट तज्ज्ञांच्या टीमपर्यंत पोहोचतात."

"ही एकच संपर्क व्यवस्था असल्यानं, गरज असलेल्या महिलांसाठी एक मजबूत सुरक्षा व्यवस्था तयार होते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)