चेहरा लक्षात न राहाणं हा आजार आहे की फक्त एक मानसिक स्थिती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पायल भुयन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
“काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात एक अनोळखी चेहरा माझ्यासमोर आला. त्या माणसानं माझ्याकडे पाहिलं आणि तो मनापासून हसला. त्याला बघून मी खूप घाबरले. मला तिथून बाहेर पडावं वाटलं.”
बीबीसी प्रतिनिधी नतालिया ग्युरेरो या त्यांच्या 'स्थिती'बद्दल सांगतात की लोक त्यांना अनोळखी वाटतात. चेहरे ओळखणं त्यांच्यासाठी रोज एक आव्हानासारखं असतं.
त्या सांगतात, "वर्षानुवर्षे एक गोंधळ आहे, एक कोडं आहे, जे एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटताच, मी विचार करायला लागते की ही व्यक्ती कोण आहे? मी त्यांना ओळखते का? मी विचार करते ते माझ्याबरोबर काम करतात का? जर ते माझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करत असतील आणि मी त्याला ओळखत नसेल तर ते काही योग्य नाही.”
प्रोसोपॅग्नोसिया म्हणजे काय?
आपण याला असं समजू की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला चेहरे आठवत नाहीत, तेव्हा मेंदूच्या या अवस्थेला ‘फेस ब्लाइंडनेस’ म्हणतात.
मानसोपचाराच्या भाषेत याला प्रोसोपॅग्नोसिया असं म्हणतात. ही मेंदूची अशी अवस्था आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या ओळखीच्या लोकांचे चेहरेदेखील ओळखू शकत नाही.
नोएडा येथील मेट्रो हॉस्पिटल आणि हार्ट इन्स्टिट्यूटच्या सीनिअर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. सोनिया लाल गुप्ता म्हणतात, "कधीकधी प्रोसोपॅग्नोसिया जन्मजात असू शकतो."
“प्रोसोपॅग्नोसियाची इतर कारणं आहेत. उदाहरणार्थ, कधीकधी एखादी व्यक्तीच्या मनावर झालेला आघात किंवा मेंदूच्या गंभीर दुखापतीमुळं या अवस्थेत जाऊ शकतं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
दिल्लीच्या सेंट स्टीफन हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. रुपाली शिवलकर म्हणतात, "मेंदूच्या उजव्या खालच्या भागात जेथे चेहरा ओळखण्याची क्षमता असते, तिथं जर रक्तपुरवठा कमी झाला तर प्रॉसोपॅग्नोसिया होऊ शकतो."
"जे लोक प्रोसोपॅग्नोसियासह जन्माला आलेले नाहीत आणि काही कारणास्तव तो नंतर विकसित झाला असेल तर एमआरआयद्वारे ते शोधलं जाऊ शकतं. एमआरआय अहवालात तुम्हाला मेंदूच्या त्या भागात फरक दिसेल, परंतु जन्मजात प्रोसोपॅग्नोसियामध्ये हा संरचनात्मक फरक दिसत नाही. कारण यात मुलांच्या मेंदूचा तो भाग विकसित होत नाही.”
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अलीकडील अहवालात असं म्हटलं आहे की प्रत्येक 33 पैकी 1 व्यक्ती काही प्रमाणात प्रोसोपॅग्नोसियानं प्रभावित आहे.
म्हणजेच 3.08 टक्के लोकसंख्या या समस्येनं त्रस्त आहे.
प्राइमेटोलॉजिस्ट जेन गुडॉल, अभिनेता ब्रॅड पिट, भारतीय अभिनेत्री आणि प्रभावशाली ट्रॅव्हल इनफ्लूएंसर शहनाज ट्रेजरीवाला यांसारख्या सेलिब्रिटींनी जगाला त्यांच्या स्थितीबद्दल उघडपणे सांगितलं आहे.
डॉ. रुपाली शिवलकर यांच्या मते, भारतात प्रोसोपॅग्नोसियाग्रस्त लोकांची संख्या 2 ते 3 टक्क्यांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
प्रोसोपॅग्नोसियाचे टप्पे
बीबीसी प्रतिनिधी नतालिया या त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगतात, "लोकांचे चेहरे न ओळखण्याची माझी स्थिती फारशी गंभीर नाही. "मी माझे कुटुंब, माझे बहुतेक मित्र आणि कामातील सहकारी यांना ओळखू शकते."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
डॉक्टरांच्या मते, प्रोसोपॅग्नोसियामध्ये विविध स्तर आहेत. डॉ. रुपाली शिवलकर सांगतात की, पूर्वी डॉक्टर मुलांमध्ये जन्मजात प्रोसोपॅग्नोसियाचा संबंध ऑटिझम स्पेक्ट्रमशी जोडत असत, परंतु आता खूप संशोधनानंतर हे समजलं आहे की दोन्ही भिन्न परिस्थिती आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक या अमेरिकन सरकारच्या वेबसाइटनुसार, प्रोसोपॅग्नोसियाचं मुख्य लक्षण म्हणजे पीडित व्यक्तीला चेहरा ओळखण्यात अडचण येते. वेगवेगळ्या चेहऱ्यांमध्ये फरक करणं त्यांना कठीण जात.
प्रोसोपॅग्नोसियाची लक्षणं
प्रोसोपॅग्नोसियाची अनेक लक्षणं आहेत-
- अनेकांना ओळखीच्या लोकांचे चेहरे ओळखण्यात अडचण येते.
- अपरिचित चेहऱ्यांमध्ये फरक करण्यास असमर्थता.
- एखाद्याचा चेहरा आणि वस्तू यांच्यात फरक न कळणं.
- स्वतःचा चेहरा ओळखता येत नाही.
- याशिवाय इतरही काही लक्षणे आहेत ज्यामध्ये या आजारानं ग्रस्त रुग्णांना लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्यास अडचण येणं, चित्रपट किंवा टीव्ही मध्ये दिसणारी पात्रं ओळखणं अशक्य होणं किंवा कथा लक्षात राहत नाही आणि मार्ग विसरणं इत्यादी.
सामाजिक जीवनावर परिणाम
नतालिया सांगतात की कधीकधी लोक तिला गर्विष्ठ समजतात.
त्या सांगतात की, पत्रकार म्हणून लोकांना भेटावं लागतं, तिथं खूप अडचण येते.
त्यांच्या एका असाइनमेंटची आठवण करून देताना त्या सांगतात की, "मी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका मोठ्या ड्रग स्मगलरशी संबंधित बातमी कव्हर करत होते. कोर्टरुममध्ये दररोज मी माझ्या सहकारी पत्रकारांना ओळखू शकले नाही. तिथं तीन जण बसले होते. या तिघांचंही वय अंदाजे 30 वर्षे असावं. तिघंही वेगळे होते. तिघांनीही वेगवेगळे कपडे घातले होते. पण मला ते तिघेही सारखेच दिसत होते. जसे की मी तीन एकसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीकडे पाहत आहे. मी लगेच तिथून निघाले.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
डॉक्टर रुपाली शिवलकर सांगतात, " ‘फेस ब्लाइंडनेस’ या स्थितीमुळं एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर परिणाम होतो. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळं तुम्हाला सामाजिक चिंता आणि ‘डिप्रेशन’ देखील येऊ शकतं.”
डॉक्टर सोनिया लाल गुप्ता म्हणतात की प्रोसोपॅग्नोसियावर कोणताही उपचार नाही. त्यांच्या उपचाराचा उद्देश हा अशा लोकांनी चेहरे ओळखण्यासाठी स्वतःचे मार्ग विकसित करावेत हा असतो.
त्या असंही म्हणतात, "त्याच्या उपचारांमध्ये, तुम्हाला प्रोसोपॅग्नोसिया कशामुळं झाला हे पाहणं महत्त्वाचं आहे." जर ही स्थिती कोणत्याही स्ट्रोक, आघात किंवा दुखापतीमुळं असेल तर तुम्हाला त्याच्या मूळ कारणासाठी औषध दिलं जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सूज आली असेल तर तुम्हाला सूज कमी करण्यासाठी औषध दिलं जाईल.
काय करायचं?
प्रोसोपॅग्नोसियासाठी कोणताही इलाज नाही, परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं या स्थितीनं ग्रस्त लोकांचं जीवन थोडं सोप करू शकतात.
डॉ. रुपाली शिवलकर यासाठी सुचवतात-
- लोकांना भेटण्याआधी तुमच्या स्थितीबद्दल त्यांना माहिती द्या.
- तुमच्या मित्रांना तुमची ओळख करून देण्यास सांगा.
- जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा त्यांना स्वतःची ओळख सांगा.
- लोकांना त्यांच्या आवाजानं आणि देहबोलीवरून ओळखा.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
शेवटी नतालिया सांगतात, "लोकांकडे दुर्लक्ष करणं खूप वाईट आहे. "लोकांना जेव्हा दुर्लक्ष केलं असं वाटत तेव्हा मलाही आवडत नाही. पण मी लोकांना सांगू इच्छितो की माझ्यासारखे काही लोक अशा समस्यांशी झगडत असतात. त्यामुळं आमच्या विषयी लोकांचा गैरसमज होतो आणि त्यामुळं आमचं दैनंदिन जीवन कठीण होतं. मला सर्वांशी मैत्रीपूर्ण वागायचं आहे आणि तुम्ही कोण आहात हे संकोच न करता विचारायचं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








