'जे हॉस्पिटल स्वच्छ करायचो, तिथेच माझ्या पतीनं जीव सोडला', मुंबईत सफाई कर्मचाऱ्याचा पैश्यांअभावी मृत्यू

- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"ऑपरेशनंतर डॉक्टर म्हणाले विनोदसाठी लाल आणि पांढरं रक्त घेऊन या. डॉक्टरांच्या हातापाया पडून ऑपरेशन तर केलं, पण या नवीन खर्चासाठी मी पैसे कुठून आणणार होते? जिथे ऑपरेशन झालं, तिथेच आम्ही मागच्या तीन वर्षांपासून राबत आहोत. 4 मार्चला सकाळी हा अपघात झाला आणि 22 मार्चला विनोदचा मृत्यू झाला, आम्ही खूप प्रयत्न केले साहेब, पण मी विनोदला वाचवू शकले नाही."
जुहू पोलीस ठाण्याच्या बाहेर हताश होऊन बसलेल्या सुमित्रा दुरिया सांगत होत्या. सुमित्रा आणि त्यांचे पती विनोद कुमार दुरिया मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होते.
हॉस्पिटलमध्ये असलेली कचऱ्याची लोखंडी गाडी ढकलत नेत असताना विनोद कुमार दुरिया यांचा अपघात झाला. थोड्याशा गंजलेल्या अवस्थेतील ही गाडी त्यांच्या छातीवर उलटली आणि विनोद यांच्या पोटाला छिद्र पडलं.
अपघात झाला त्यावेळी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लक्ष्मी मुरुगन म्हणतात, "लाल आणि पिवळ्या पिशव्या भरून विनोद ती गाडी ओढत होता. अचानक त्याचा हात निसटला आणि गाडी उलटली. कचऱ्याच्या गाडीचं चाक विनोदच्या छातीवर चढलं आणि त्याच्या पोटाला छिद्र पडलं. त्यातून रक्त वाहू लागलं. विनोदच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचं टोक तुटलं होतं. डॉक्टरांनी मलमपट्टी करून त्यादिवशी त्याला घरी पाठवून दिलं."
विनोद कुमार दुरिया आणि सुमित्रा त्यांच्या अकरा वर्षांच्या मुलासोबत माहीम येथील झोपडपट्टीत राहत होते.
विनोदच्या मृत्यूमुळे जौनपूरहून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेलं ही कुटुंब आता उघड्यावर पडलं आहे.

ज्या हॉस्पिटलमध्ये काम करताना विनोदचा अपघात झाला, त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार करायला पैसे नसल्याने विनोदचा मृत्यू झाला.
याबाबत बोलताना कूपर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर म्हणाले, "या अपघाताची माहिती मला नुकतीच कळली आहे. यासंदर्भात मी काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. यासाठी तुम्ही मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवू शकता."
बीबीसी मराठीने याबाबत मुंबई महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, "आम्ही कोणत्याही कंत्राटदाराचे पैसे रोखलेले नाहीत, तरीही या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, असं आश्वासन कूपर हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांनी आम्हाला दिलं आहे."
कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना दिली जाणारी वागणूक, त्यांचे थकवले जाणारे पगार, कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता असे अनेक प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत. दुर्दैवाने विनोद कुमार दुरियाच्या मृत्यूमुळे या प्रश्नांची आपल्याला चर्चा करावी लागत आहे.
'तीन महिन्यांपासून पगार मिळाला नाही, उपचाराला पैसे नव्हते'
कूपर हॉस्पिटलमध्ये साफसफाईच काम करणाऱ्या वॉर्ड बॉय, नर्स आणि काही कर्मचाऱ्यांनी परिसरातील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. 22 मार्च रोजी या कर्मचाऱ्यांचा तक्रार अर्ज स्वीकारला गेला आहे. याप्रकरणी अजूनही एफआयआर मात्र दाखल करण्यात आलेली नाही.
जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव म्हणाले की, "तक्रार अर्ज आला म्हणून लगेच एफआयआर दाखल केली असं होत नाही. विनोद कुमार दुरिया हा नियमित दारू पित होता आणि दारूच्या नशेत हा अपघात झाल्याचं देखील बोललं जात आहे. आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षकांना याप्रकरणी नीट चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विनोद दारू पीत होता का? दारू पिऊन त्याचा अपघात झाला का? या प्रश्नांची चौकशी कारण आम्ही पुढे योग्य ती कारवाई करणार आहोत."
बीबीसी मराठीने याप्रकरणी एफआयआर दाखल केली जाणार आहे का? असा प्रश्न देखील जाधव यांना विचारला पण त्यांनी यावर मौन बाळगत 'आम्ही योग्य ती कारवाई करणार असल्याचं' सांगितलं.

पोलिसांनी विनोद दारूच्या नशेत होता का? याची चौकशी करणार असल्याचं म्हटलं. बीबीसी मराठीने अपघाताच्या वेळी उपस्थित असणाऱ्या लक्ष्मी मुरुगन यांना विनोद यांच्या दारू पिण्याबाबत विचारलं.
लक्ष्मी म्हणाल्या की, "अपघात झाला त्यावेळी आम्ही एकत्र कामावर आलो होतो. विनोद दारू प्यायलेला नव्हता. हे लोक चुकीचे आरोप लावत आहेत. मागच्या चार दिवसांपासून आम्ही दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहोत. आमची तक्रार दाखल करून घेतली जात नाहीये."
विनोद आणि सुमित्रा यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या या दाम्पत्त्याकडे पैसे नव्हते.
सुमित्रा म्हणतात, "साहेब तीन महिन्यांपासून आमचा पगार झाला नाही . डिसेंबर महिन्याचा पगार 24 फेब्रुवारीला झाला. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा एकही रुपया मिळालेला नाही. घरभाडं भरलं नाही म्हणून घरमालक रोज शिव्या देत असतो. त्यातच विनोदचा अपघात झाला."
सुमित्रा पुढे म्हणाल्या, "त्यांना चार दिवस बरं वाटत होतं. पण आठ तारखेला पोटात दुखू लागलं. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. म्हणून मग आम्ही जे हॉस्पिटल रोज स्वच्छ करतो तिथेच उपचार करायला घेऊन आलो. डॉक्टर म्हणाले, त्यांच्या पोटात रक्ताची गाठ तयार झाली आहे. आतून खोल जखम झाली आहे. ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी चाळीस हजार रुपये लागतील. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मी इतर महिलांना घेऊन डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या हातापाया पडलॆ आणि डॉक्टरांना ऑपरेशन करायची विनंती केली."
"डॉक्टरांनी ऑपरेशन तर केलं पण पुढच्या खर्चाचं काय? विनोदसाठी कधी सात हजार, कधी आठ हजाराचं इंजेक्शन लागत होतं. महागडे पाईप लागत होते, मी एवढे पैसे कुठून आणणार होते? डॉक्टर म्हणाले विनोदसाठी पांढरं आणि लाल रक्त घेऊन या, वेगवेगळी औषधं वस्तू घेऊन या. मी डॉक्टरांना म्हणाले,, 'साहेब माझ्याकडे पैसेच नाहीत, हे सगळं मी कुठून आणू? नुसतं ऑपरेशन करून जीव वाचतो का? त्या पांढऱ्या रक्तासाठी पैसे लागतात, ते मी आणू शकले नाही," सुमित्रा हताश होऊन सांगत होत्या.
'चार दिवस उलटले तरी पोलिसांनी तक्रार घेतली नाही'
मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यातून सुमित्रा, त्यांच्या सहकारी लक्ष्मी आणि रजती देवेंद्र हताश होऊन घरी परत जात होत्या.
26 तारखेला दिवसभर जुहू पोलीस ठाण्यात बसून शेवटी पोलिसांनी एफआयआर दाखलच केली नाही असं त्या म्हणत होत्या.
सुमित्रा म्हणाल्या, "माझ्या नवऱ्याने दारू पिलेली नव्हती. पोलीस चुकीचं सांगत आहेत. आम्ही दोघे एकत्र दवाखान्यात यायचो,दिवसभर काम करायचो आणि संध्याकाळी मिळून परत जायचो. आता मी कुणासोबत काम करू? कुणासोबत माझ्या मुलाचा सांभाळ करू?"
कूपर हॉस्पिटलमध्ये मागच्या काही वर्षांपासून काम करणाऱ्या लक्ष्मी मुरुगन म्हणाल्या, "आमच्या दवाखान्यात सफाई , वॉर्डबॉय आणि आयाबाईच्या कामासाठी एकूण तीनशे लोक काम करतात. सगळे नियम कायदे धाब्यावर बसवून आमच्याकडून काम करून घेतलं जातं. कायद्याप्रमाणे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचं काम कंत्राटी कामगारांकडून करवून घेता येत नाही, पण आम्ही सगळी कामं करतो."

कंत्राटी पद्धतीवर सफाईचं काम करणाऱ्या या कामगारांबाबत बोलताना महाराष्ट्र म्युन्सिपल कामगार युनियनचे पदाधिकारी गोरख आव्हाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "नियमानुसार या कंत्राटी कामगारांचा पगार महिन्याला 46 हजार रुपये असला पाहिजे. ते तर सोडाच यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे साधे 21 हजारही मिळत नाहीत. पगाराच्या नावाखाली कधीतरी 10 हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले जातात. कूपर हॉस्पिटलचा कंत्राटदार (KHFM)ने डिसेंबरपासूनच पगार दिलेला नव्हता. अखेर कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यावर आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर 24 फेब्रुवारी 2025रोजी त्यांना डिसेंबर महिन्याचा पगार दिला गेला. विनोदचा मृत्यू हा पैसे नसल्यामुळे झाला आहे आणि यासाठी महानगरपालिका आणि कंत्राटदार दोघे जबाबदार आहेत."
बीबीसी मराठीने यासंदर्भात कूपर हॉस्पिटलला कामगार पुरवणाऱ्या केएचएफएम या कंत्राटदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाली की इथे अपडेट करण्यात येईल.
गोरख आव्हाड यांनी दिलेल्या माहितीला या रुग्णालयात काम करणाऱ्या इतर कामगारांनी दुजोरा दिला. रजती देवेंद्र म्हणाल्या, "जानेवारीपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. त्यामुळे आमच्याकडे पैसे नव्हते. विनोदच्या उपचारांसाठी आम्ही सगळे प्रयत्न करूनही पैसे जमले नाहीत. विनोद ऑन ड्युटी होता. कामावर असताना त्याला अपघात झाला, पण तरीही कुणीच उपचार केले नाहीत."
विनोद कुमार दुरिया यांच्या मृत्यूमुळे असंघटित क्षेत्रात कंत्राटी कामगारांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही बातमी प्रकाशित होईपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई किंवा अधिकृत तक्रार देखील दाखल करण्यात आलेली नाही. विनोद कुमार दुरिया यांच्या पत्नी सुमित्रा दुरिया आणि इतर कर्मचारी न्यायाची मागणी करत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











