सफाई कर्मचारी चेंबरमध्ये पडला, त्याला वाचवायला गेलेल्याचाही गुदमरून मृत्यू

- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईतील मालाडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चेंबरमध्ये श्वास गुदमरून एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या सफाई कर्मचाऱ्याला वाचवायला गेलेल्या व्यक्तीचाही गुदमरून मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे.
या प्रकरणामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
“माझा नवरा गेल्यामुळे माझ्या मुलांच्या डोक्यावरील छप्पर गेलंय. सासू-सासरे आजारी असतात. माझा दीर व्हेंटिलेटरवर आहे. अशा घटना घडत राहतात, असं बिल्डरांचं म्हणणं आहे, पण माझा नवरा त्यांचा कामगार नव्हता. मग माझ्या घरातल्यांना मदतीसाठी का बोलवून घेतलं आणि जो बोलवायला आला होता त्याला अंडरग्राऊंड करून टाकलेलं आहे.
"माझ्या नवऱ्याच्या मृत्यूची भरपाई म्हणून बिल्डरने आमच्यासमोर एक लाख रूपयांचा प्रस्ताव ठेवलाय. त्या लाखभरात माझ्या दीरावर उपचार होतील का? मुलांचं शिक्षण होईल का? सासू-सासऱ्यांच्या औषधांचा खर्च भागेल का?”
हे हतबल आणि अस्वस्थ करणारे शब्द आहेत शबनम यांचे. शबनम या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जावेद शेख यांच्या पत्नी आहेत.
आम्हाला योग्य भरपाई दिल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, यावर शबनम ठाम आहेत.
नेमकं काय घडलं?
मालाड पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील 18-20 फूट खोल चेंबरमध्ये बुधवारी (24 एप्रिल) दुपारी 3 वाजताच्या सुमारास 68 वर्षीय रघू गोविंद सोलंकी चेंबर साफ करण्यासाठी उतरले. चेंबरमधील गॅसमुळे त्यांना भोवळ आली.
त्यावेळी कुठलीही ओळख नसताना आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील अधिकृत कामगार नसतानाही केवळ माणुसकीच्या नात्याने त्याला वाचवण्यासाठी एकामागोमाग तिघेजण त्याच चेंबरमध्ये उतरले. आकिफ, हुसेन शेख आणि जावेद अशी या तिघांची नावं.
यातील रघू सोळंकींचा गुदमरून मृत्यू झाला, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या जावेद शेख यांचाही मृत्यू झाला. तर आकिफ आणि हुसेन शेख यांची प्रकृती गंभीर आहे.

चेंबरची सफाई करण्यासाठी उतरलेल्या रघू सोलंकी यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप माहित नाहीय. गुरूवारी सोलंकी कुटुंबियांकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रघू यांना वाचवायला गेलेला आकिफ शेख (वय 20 वर्षे) या तरूणाची प्रकृती गंभीर असून सध्या तो जोगेश्वरी येथील महानगरपालिकेच्या ट्रॉम केअर रूग्णालयात दाखल आहे.
आपला लहान भाऊ आकिफला वाचवाला गेलेले जावेद शेख (वय 39 वर्षे) यांचा गुदमरून मृत्यू झाला असून त्यांच्या मागे आई-वडिल, भाऊ, बायको आणि दोन मुलं असा परिवार आहे.
तर आपले भाऊ आकिब आणि जावेद यांना वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या हुसेन शेख यांच्या पाठीला इजा झाली असून ते गेले तीन दिवस रुग्णालय, पोलिस स्टेशन आणि घर अशा फेऱ्या मारत आहेत.
मुख्य म्हणजे चेंबर साफ करून घेण्याची जबाबदारी असलेला सुपरवाझर मनोहरन नाडर (वय 51 वर्ष) याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता जामिनावर बाहेर आहे.

'माझा भाऊ आत पडल्याचं पाहून मीही उतरलो'
या संपूर्ण घटनेचा साक्षीदार आणि मृत जावेद यांचा भाऊ हुसेन शेख यांने बीबीसी मराठीला संपूर्ण हकीकत सांगितली.
हुसेन म्हणाला की, “शांतीनगरच्या आमच्या वस्तीसमोर रहेजा बिल्डरच्या इमारतीचे काम सुरू आहे. दुपारी तिथला राजू नावाचा सुरक्षा कर्मचारी धावत माझ्या भावाला बोलवायला आला. माझ्या लहान भाऊ आकिफ तिथे होता.
“एका माणूस चेंबरमध्ये अडकल्याचे त्याने आकिफला सांगितलं. त्याला चेंबरमधल्या परिस्थितीची कल्पना नव्हती. आकिफने माणुसकीच्या नात्याने त्याला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उडी घेतली. आतमध्ये गेल्यावर गॅसमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले, तो वर चढायचा प्रयत्न करू लागला आणि अयशस्वी प्रयत्नानंतर बेशुद्ध पडला. त्याच्यासोबत असलेला एक मुलगा धावत आम्हाला घरी बोलवण्यासाठी आला. आम्ही धावत घटनास्थळाकडे धाव घेतली.
“माझा भाऊ आत पडल्याचं पाहून मी देखील आतमध्ये उतरलो. परंतु आतमध्ये गेल्यावर मलाही श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला.
“लोकांच्या मदतीने मी कसाबसा वर आलो आणि बेशुद्ध झालो. त्यानंतर तिथे असलेला माझा मोठा भाऊ जावेद चेंबरमध्ये वाकून लहान भावाला हाक मारत असताना कदाचित तोल जाऊन तो देखील आतमध्ये पडला."

स्थानिकांनी बीबीसीला सांगितलं की, "या घटनेनंतर अग्निशमन दल तिथे दाखल झालं. अग्निशमन दलाचा जवान ऑक्सिजन मास्क घालून चेंबरच्या आत उतरला होता. मात्र मास्क घातल्यानंतरही त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला बाहेर काढलं गेलं. नंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं. चेंबरमधील लोकांना बाहेर काढेपर्यंत एक तास उलटून गेला होता तरी तिथे रूग्णवाहिका आलेली नव्हती. तीसुद्धा स्थानिक रहिवाश्यांनीच बोलवली होती."
रूग्णवाहिका येईपर्यंत चेंबरमधून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना स्थानिक लोकं रिक्षात टाकून रूग्णालयात घेऊन गेले होते.
जोगेश्वरीच्या ट्रॉम केअर रूग्णालयात गेल्यावर रघु सोलंकी आणि जावेद शेख यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आकिफ शेख याची प्रकृती गंभीर असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

'माझ्या वडिलांच्या मृत्यूचं कारणही सांगितलं गेलं नाहीय'
आम्ही रघु सोलंकी यांच्या घरी भेट दिली असता त्यांच्या कुटुंबियांना रघु यांचा मृत्यू नेमका कसा झाला हेच अद्याप माहित नसल्याचे त्यांचा मोठा मुलगा भगवान सोलंकी यांनी सांगितलं.
"मला थेट पोलिसांकडून वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाली. ते चेंबरमध्ये कसे पडले, ते किती खोल होतं आणि घटनास्थळ नेमकं कुठे आहे, याची आम्हाला काहीच माहिती नाही”, असं ते म्हणाले
भगवान यांनी सांगितलं की, “माझ्या वडिलांना महानगरपालिकेत सफाईचं काम केलेलं आहे. पण कधीच चुकीचं काम केलं नाही. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत. आम्ही सर्वप्रथम सुरक्षेची काळजी घेतो. पण हे कसं घडलं हे आम्हाला माहित नाही.”
रघु सोलंकी यांचा भाचा विजय सोलंकी म्हणाले की, “या कामाचा त्यांना 20-25 वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यताच नाही.
“ते सर्वात आधी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायचे. अशाप्रकारचं काम करताना ते आधी 1-2 तास चेंबरचं झाकण उघडून ठेवायचे. त्यांनी अशाप्रकारची कामं आधीही केली होती, मात्र या बिल्डरकडे यापूर्वी त्यांनी अशाप्रकारचं काम केलं होतं का याची मला कल्पना नाही.”

घटनेची माहिती देताना दिंडोशी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “रघु सोलंकी हे रहेजाच्या साईटवर नियमितपणे काम करायचे. पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे ते तपासण्याचं काम ते करत होते.
“सध्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून मागच्या तीन इमारतींच्या मल:निस्सारणाच्या पाईपलाईन देखील जातात. त्यातून अचानक गॅस बाहेर आल्याने रघु सोलंकी यांचा श्वास कोंडला. तिथे उपस्थित असलेला सुपर वायझर मनोहर नाडर यांनी ताबडतोब तिथल्या सुरक्षा रक्षकाला सांगून मदतीसाठी कुणालातरी बोलवून आणायला सांगितलं."
"अशाप्रकारचं काम करताना सुरक्षेची कुठलीही खबरदारी घेतलेली नसल्याने मनोहर नाडर यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 304-अ, 336, 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती देत, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचं इरफान शेख यांनी सांगितलं.

या संपूर्ण प्रकरणात आम्ही बिल्डरची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.
घटनास्थळी आत जाण्याच्या गेटला बाहेरून टाळे लावण्यात आले असून पत्र्याच्या गेटमधून आतलं काही दिसू नये म्हणून हिरव्या रंगाचं कापड लावण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे गेटच्या बाहेर असलेली सुरक्षा रक्षकाची जागा रिकामीच आहे. सध्या तिथे कुणीही बसत नाही.
सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत प्रकाशित झालेल्या ‘ईपीडब्लू’च्या संशोधन अहलावानुसार, ‘काम करताना सफाई कामगारांसोबत घडणाऱ्या अपघातांच्या घटना अनेकदा नोंदवल्याच जात नाहीत.'
‘खाजगी बिल्डरकडून अशा प्रकारची कामं करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर नेमले जातात आणि कमीत कमी पैशात ही कामं करून घेण्याकडे त्यांचा कल असतो. स्वच्छता कर्मचा-यांच्या सुरक्षेबाबत कायदे असतानाही त्यांना हरताल फासला जातो.‘
‘या कामगारांची कुणाकडेच नोंद नसते, सुरक्षेची साधनं नसल्याने कामगारांना इजा होणे किंवा जीव जाण्याच्या घटना घडत असतात.’
‘पावसाळ्यापूर्वी दरवर्षी गटार, पाईपलाईन, नालेसफाईची कामं केली जातात. या कामांसाठी यंत्रणा बसवायला हवी. अशी कामं मशीनच्या साहाय्याने करून घ्यावीत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र कामांचे वर्गीकरण करणे कठीण असल्याने आणि या कामात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत व असंघटीत मजुरांना समावेश असल्याने हे दृष्टचक्र थांबत नाही,‘ असंही या अहवालात म्हटलं आहे.











