श्रेयस अय्यर उत्तम फॉर्ममध्ये, मग त्याची आशिया कपमध्ये निवड का झाली नाही?

आशिया कप 2025 साठीच्या भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असून निवड समितीनं शुभमन गिल याची संघाचा उप-कर्णधार म्हणून केली आहे.

मात्र, आता संघात निवड झालेल्या खेळाडूंबद्दल बोललं जाण्याऐवजी श्रेय अय्यरला संघात स्थान न मिळाल्याचीच चर्चा सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून श्रेयस अय्यर उत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या 2024 च्या मोसमात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता, तर 2025 च्या आयपीएलमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाकडून खेळला होता.

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबूधाबीमध्ये होणार आहे.

अजित आगरकर श्रेयस अय्यरबद्दल काय म्हणाला?

संघाच्या निवडीनंतर, भारतीय संघाच्या निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर म्हणाला की, श्रेयस अय्यरच्या कामगिरीत कोणताही दोष नव्हता.

"यात श्रेयस अय्यरची चूक नाही. त्याला संधी मिळेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. तुम्हीच सांगा, त्याला संघात स्थान देण्यासाठी कोणाला बाजूला काढायचं," असा प्रश्न आगरकरनं विचारला

"यशस्वी जयस्वालची देखील संघात निवड झालेली नाही. अभिशेष शर्मा चांगला खेळतो आहे. तो चांगली गोलंदाजी करू शकतो. त्यांच्यापैकी फक्त एकालाच संघात स्थान मिळू शकतं. श्रेयस अय्यरच्या बाबतीत देखील तेच झालं. त्याला संघात स्थान न मिळण्यामागे त्याची काही चूक आहे किंवा तो चांगला खेळत नाही असं नाही," असं आगरकर म्हणाला.

श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही. मात्र कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलची मात्र संघात निवड झाली आहे. इतकंच नाही, तर शुभमन गिल टी20 संघाचा उप-कर्णधारदेखील होता.

शुभमन गिल शेवटचा टी20 सामना 2024 मध्ये श्रीलंकेत खेळला होता.

अक्षर पटेलऐवजी तो संघाचा उपकर्णधार असणार आहे.

"आम्हाला वाटलं होतं की शुभमन गिल इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करेल. मात्र त्यानं आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला खेळ करून दाखवला आहे," असं आगरकर म्हणाला.

श्रेयस अय्यरची संघात निवड का झाली नाही, असं विचारला असता आगरकरनं स्पष्ट केलं की, "मला श्रेयस अय्यरविषयी आदर आहे. मात्र त्याच्याऐवजी इतर कोणाला वगळता येणार नाही. ही आमची चूक नाही."

'प्रचंड प्रतिभा दाखवूनही संघात स्थान नाही'

यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरनं 17 डावांमध्ये 50.33 च्या सरासरीनं 604 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 175 हून अधिक आहे.

या स्पर्धेत त्यानं सहा अर्धशतकं केली होती. 2011 मध्ये क्रिस गेल आणि 2023 मध्ये सूर्यकुमार यादव यांच्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम श्रेयसनं केला.

सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे मधल्या फळीत फिट आहेत. तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्यासाठी श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्या चुरशीची स्पर्धा आहे.

तिलक वर्मानं दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी केली होती.

त्यानं दोन शतकांसह 280 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 198.48 चा होता.

तर आयपीएलमध्ये तिलक वर्माची कामगिरी साधारणच होती. त्यानं 13 डावांमध्ये 31.18 च्या सरासरीनं 343 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 138.30 चा होता.

सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया

आशिया कपसाठी श्रेयस अय्यरचा भारतीय संघात समावेश न झाल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानं एक्स या सोशल मीडियावर म्हटलं आहे की, "श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला नाही. हा धक्कादायक निर्णय आहे."

कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रशिक्ष संघाचे सदस्य असलेल्या अभिषेक अय्यर यांनी संघ निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

"मला विचारायचं आहे की, जर श्रेयस अय्यर चांगला खेळतो आहे, तर मग राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड का करण्यात आली नाही? त्याला 20 जणांच्या चमूमध्ये स्थान का देण्यात आलं नाही, हे मला समजत नाही. या 20 जणांच्या चमूमध्ये निवड न करून श्रेयस अय्यरला काय संदेश दिला जातो आहे," असं अभिषेक यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितलं.

"आयपीएलसह, पांढऱ्या चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये श्रेयसपेक्षा चांगलं कोणीही खेळलेलं नाही. तरीदेखील त्याची आशिया कपसाठी संघात निवड करण्यात आलेली नाही. हे सर्व लक्षात घेता, श्रेयस अय्यरचा चेहरा कोणालाही आवडत नाही, असं दिसतं," असं पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे.

क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी लिहिलं आहे, "निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर म्हणाले की निवड न होणं यात श्रेयस अय्यरची चूक नाही. मात्र त्यांना फक्त 15 खेळाडूच निवडायचे होते. तिसरा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलसह आणखी पाच खेळाडूंची निवड करण्यात आली."

"तीन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी संघात तिसऱ्या यष्टीरक्षकाची निवड करणं ही अपूर्ण बाब आहे. श्रेयससारख्या उत्तम फलंदाजाकडे दुर्लक्ष करणं हे मूर्खपणाचं ठरेल."

"श्रेयस अय्यरसाठी संघातून कोणाला वगळण्यात यावं, हा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे की संघातून कोणाला वगळण्यात आलं आणि त्याच्याजागी कोणाला घेण्यात आलं? हाच खरा प्रश्न आहे," असं क्रिक्रेट विश्लेषक रमेश श्रीवास्तव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

युएईमध्ये स्पर्धा का होते आहे?

आशिया कपचं आयोजन भारत अधिकृतपणे करतो आहे. मात्र बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळातील करारानुसार, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये स्पर्धा आयोजित केली जाते, तेव्हा तीन वर्षांसाठी ती स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाते. त्यामुळे यावेळेस स्पर्धेचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं आहे.

या स्पर्धेत 19 सामने खेळले जाणार आहेत. यापैकी 11 सामने दुबईत होतील तर अबु धाबीमध्ये 8 सामने होणार आहेत.

स्पर्धेचा पहिला सामना 9 सप्टेंबरला अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांमध्ये खेळला जाणार आहे.

भारतीय संघ:

सुर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, जितेश शर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, हर्षित राणा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

आशिया कपमधील भारतीय संघाचं वेळापत्रक

  • 10 सप्टेंबरला स्पर्धेचा भाग म्हणून भारतीय संघाचा सामना युएईशी होईल.
  • 14 सप्टेंबरला दुबईमध्ये भारत-पाकिस्तानमधील अत्यंत चुरशीचा आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना होईल.
  • 19 सप्टेंबरला साखळी टप्प्यातील भारताचा शेवटचा सामना ओमानविरुद्ध अबु धाबीमध्ये होईल.
  • साखळी टप्प्यानंतर प्रत्येक गटातील टॉप दोन संघ सुपर 4 मध्ये जातील.
  • 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरदरम्यान सुपर-4 चे सामने होतील.
  • जर भारताला ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळालं, तर त्याचे सुपर-4 मधील सर्व सामने दुबईमध्ये होतील.
  • जर ग्रुप ए मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आला, तर सुपर-4 मधील त्याचा एक सामना अबु धाबीमध्ये होईल.
  • तर उर्वरित दोन सामने दुबईमध्ये होतील.
  • 28 सप्टेंबरला आशिया कपचा अंतिम सामना दुबईत होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)