You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तू फक्त ग्राऊंड्समन, त्यापेक्षा काहीच नाही' ; गौतम गंभीर आणि क्युरेटरच्या व्हीडिओमुळे पेटला वाद
- Author, फिऑन विन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अपेक्षेपेक्षा जास्तच रोमहर्षक ठरली आहे.
दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला या कसोटी मालिकेत संघर्ष करावा लागेल असं वाटत होतं. परंतु, नव्या दमाच्या खेळाडूंनी सर्वांचे अंदाज फोल ठरवत जबरदस्त कामगिरी केली आहे.
ही मालिका इंग्लंड जिंकणार की भारत हा सामना जिंकून तो अनिर्णित ठेवणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष द ओव्हल स्टेडियमवर होणाऱ्या पाचव्या कसोटीकडे लागलं आहे.
याचदरम्यान, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चर्चेत आले आहेत. इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे होणाऱ्या या अखेरच्या कसोटीसाठीच्या सरावादरम्यान सरेच्या ग्राऊंड स्टाफशी गंभीर यांचा वाद झाला आहे.
सरावाच्या वेळी घेतलेल्या व्हीडिओमध्ये गौतम गंभीर सरेचे ग्राऊंड स्टाफ प्रमुख ली फोर्टिसकडे बोट दाखवत बोलताना दिसतात.
"तुम्ही आम्हाला काय करायचं ते सांगू शकत नाही," आणि "तुम्ही फक्त ग्राउंड्समन आहात, त्यापेक्षा काहीच नाही," असं म्हणताना गौतम गंभीर व्हीडिओत दिसतात.
'ली फोर्टिसची सांगण्याची पद्धत अत्यंत विचित्र'
घटनेनंतर पत्रकार परिषदेत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक त्या प्रसंगावेळी उपस्थित होते.
त्यांनी सांगितलं की, "टीममधील सर्व प्रशिक्षक कसोटीसाठी खेळपट्टीची पाहणी करत होते आणि त्यांना तिथून दूर होण्यास सांगितलं गेलं."
कोटक म्हणाले, "आम्ही खेळपट्टीवर उभं राहून ती पाहत होतो, तेव्हा ग्राऊंड स्टाफपैकी एक जण तिथे आला आणि म्हणाला, 'इथून अडीच मीटर लांब उभं राहा.' माझ्या क्रिकेट कारकीर्दीत आजवर असं कुणी म्हणताना कधीच पाहिलं नाही."
कोटक म्हणाले, "तो अक्षरशः असं म्हणत होता की 'तुम्ही रोपच्या बाहेरून जाऊन खेळपट्टी पाहा' तेही मुख्य प्रशिक्षकाला, मला समजत नाही, असं बाहेरून खेळपट्टी कशी पाहायची?"
"जर कोणी त्याचे बूट तिथं घासत असेल किंवा खेळपट्टीवर काहीतरी टाकत असेल किंवा स्पाइक्स घालून फिरत असेल तर क्युरेटरला वाटलं तर तो सांगू शकतो, हे ठीक आहे. परंतु, सांगण्याची पद्धत अतिशय विचित्र होती," असं कोटक यांनी म्हटलं.
ते पुढे म्हणाले, "क्युरेटर लोक खेळपट्टी आणि मैदानाबाबत थोडे जास्तच काळजी घेणारे किंवा मालकी हक्क दाखवणारे असतात. पण त्यांनी हेही समजून घ्यायला हवं की, जे लोक त्यांच्या समोर आहेत, ते खूप अनुभवी, कुशल आणि समजूतदार आहेत."
कोटक म्हणाले, "जेव्हा तुम्ही खूप अनुभवी आणि समजूतदार लोकांसोबत काम करत असता, तेव्हा तुमचं बोलणं थोडंसं अहंकारी वाटलं तरी चालतं. कारण तुम्ही मैदानाची काळजी घेत असता. परंतु, शेवटी ती एक क्रिकेटची खेळपट्टी आहे. ती काही 200 वर्ष जुनी मोडकळीला आलेली वस्तू नाही की, जिच्याकडे फक्त पाहायचं आणि स्पर्शही करू नये. मला तर असं वाटतं."
मैदानावर सरावासाठी वेगळं क्षेत्र नसल्यामुळे, भारताने कसोटी सामन्याच्या मुख्य खेळपट्टीजवळच जाळ्यांनी वेढलेल्या तीन सराव खेळपट्ट्यांचा वापर केला आणि ही नेहमीची एक प्रक्रिया आहे.
ली फोर्टिस म्हणतो, 'बोलण्यासारखं काही नाही आणि लपवण्यासारखंही.'
'बीबीसी स्पोर्ट'ने यावर सरे क्लबची प्रतिक्रिया विचारली, पण क्लबने बोलण्यास नकार दिला. मात्र नंतर एका व्हीडिओमध्ये ली फोर्टिसने हा प्रकार काही विशेष नाही असं सांगितलं आणि भारतीय माध्यमांना म्हणाला की, "याबद्दल बोलण्यासारखं काही नाही आणि लपवण्यासारखंही काहीच नाही."
ही घटना या दोन्ही संघांमधील रंगलेल्या आणि तणावपूर्ण मालिकेतील आणखी एक प्रसंग ठरली आहे.
याआधी चौथ्या कसोटीत ओल्ड ट्रॅफर्डवर सामना बरोबरीत सुटला तेव्हा रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने शतकं झळकावली होती पण त्यापूर्वी सामना अनिर्णित होण्यासाठी शेकहँड करण्यास भारताने नकार दिला होता.
भारताचा कर्णधार शुभमन गिलने, इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर वेळ वाया घालवण्याचे प्रकार केला, जे 'क्रिकेटच्या भावनेविरुद्ध' वागत आहेत, असं म्हटलं होतं.
इंग्लंड पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मँचेस्टर येथील बरोबरीनंतर केवळ तीन दिवसांत पुढचा सामना असल्यामुळे, बेन स्टोक्सच्या संघात विशेषतः गोलंदाजीच्या विभागात काही बदल होण्याची शक्यता आहे.
बेन स्टोक्सला किरकोळ दुखापतींचा सामना करावा लागत असल्यामुळे संघात जेमी ओव्हर्टन, गस अॅटकिन्सन आणि जोश टंग हे राखीव जलद गोलंदाज आहेत. ख्रिस वोक्स आणि ब्रायडन कार्स यांनी आतापर्यंत सर्व चार सामने खेळले आहेत, तर जोफ्रा आर्चरने चार वर्षांच्या दुखापतीनंतर पुनरागमन करत सलग दोन सामने खेळले आहेत.
दरम्यान, सध्या फॉर्मात असलेला भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत पाय फ्रॅक्चर असल्यामुळे अखेरच्या कसोटीत खेळणार नाही.
त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबतही निर्णय घ्यायचा आहे, कारण मालिकेपूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याने तीन कसोटी सामने खेळले आहेत.
बीबीसी स्पोर्टचे मुख्य क्रिकेट प्रतिनिधी स्टीफन शेमिल्ट यांचं विश्लेषण
गौतम गंभीर आणि ली फोर्टिस हे दोघंही थेट बोलणारे, ठाम स्वभावाचे आणि स्पष्ट भूमिका असलेले आहेत. कोणताही वाद किंवा मतभेद झाला, तरी दोघंही एक इंचही माघार घेण्यास तयार नसतात.
ही मालिका किती भावनांनी भरलेली आहे, याचं हे आणखी एक उदाहरण आहे. सुरुवातीला लॉर्ड्सवर चिडचिड झाली, मग ओल्ड ट्रॅफर्डवर 'हँडशेक'वरून वाद आणि आता ही घटना.
ओव्हलमधल्या अखेरच्या सामन्यापर्यंत तणाव सतत वाढतच गेला आहे. हे उच्च पातळीचं स्पर्धात्मक क्रिकेट आहे. इथं परिणाम महत्त्वाचे असतात आणि प्रत्येकाला त्याचं पूर्ण भान किंवा काळजी असते.
त्यामुळे कधी कधी गोष्टी मर्यादेबाहेर जातात, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
आता ओव्हलची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरणार आहे. पूर्वी इथे फिरकी गोलंदाजांना खूप संधी मिळायची, परंतु अलीकडच्या काही सामन्यांमध्ये तसं दिसलेलं नाही.
इंग्लंडकडून लियाम डॉसनला डच्चू मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने बहुतांश वेळा मुख्य फिरकी गोलंदाजाशिवाय कसोटी खेळलेली नाही. स्टोक्सने नेतृत्व स्वीकारल्यानंतर फक्त एकदाच असं घडलं आहे.
हे सगळं कदाचित स्टोक्सवरच अवलंबून असेल. ओल्ड ट्रॅफर्डमधल्या सामन्यानंतर तो थोडा थकलेला आणि जायबंदी आहे, त्यामुळे या आठवड्यात तो काय भूमिका बजावू शकेल, यावर प्रश्न आहे.
जर स्टोक्स चार सीम जलद गोलंदाजांच्या संघात गोलंदाजी करू शकला, तर डॉसनला संधी मिळू शकते. पण जर स्टोक्सची गोलंदाजी मर्यादित राहिली, तर मात्र इंग्लंडला आणखी एक वेगवान गोलंदाज घ्यावा लागेल, त्यामुळे डॉसनला संघाबाहेर बसाव लागण्याची शक्यता आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.