You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहम्मद सिराजची चूक आणि नंतरची कमाल, ओव्हल टेस्टमधील 5 खास क्षण
ओव्हल कसोटीचा थरार असा काही रंगला की, शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही नक्की सांगू शकत नव्हतं की कोणता संघ जिंकेल. एका क्षणी इंग्लंडचं पारडं जड तर दुसऱ्या क्षणी भारताचा कमबॅक!
सिराजची चूक, त्याचा भरपाई करणारा जिद्दीने टाकलेला स्पेल आणि ख्रिस वोक्ससारख्या जखमी खेळाडूचा मैदानात उतरलेला शेवटचा प्रयत्न. एकंदर हा सामना सर्वांसाठी एका ऐतिहासिक आठवणीचा ठरला.
सामना संपल्यानंतर भारताचा सलामीचा फलंदाज के. एल. राहुलने जे सांगितलं, त्यावरूनच लक्षात येतं की, हा कसोटी सामना क्रिकेटप्रेमींना का कायम लक्षात राहील.
के. एल. राहुल म्हणाला, "कसोटी क्रिकेट टिकेल का? असा प्रश्न अनेकदा विचारला जात होता. पण या मालिकेत दोन्ही संघांनी ज्या पद्धतीने खेळ दाखवला, त्यावरून या प्रश्नाचं उत्तर आता स्पष्ट झालं आहे."
सामन्याच्या चौथ्या दिवशी मोहम्मद सिराज त्याच्या एका 'चुकी'मुळे ट्रोल होत होता, पण पाचव्या दिवशी तोच सिराज सामन्याचा हिरो ठरला.
या सामन्यात असे अनेक क्षण आले, जे एकतर टर्निंग पॉइंट ठरले किंवा ठरू शकले असते. चला तर पाहूया अशाच पाच लक्षात राहणाऱ्या संस्मरणीय क्षणांवर एक नजर.
1. जयस्वाल-आकाशदीपची भागीदारी
पहिल्या डावात 23 धावांनी पिछाडीवर राहिल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला, तेव्हा तो संकटात सापडला होता. एक वेळ अशी होती की दोन गडी बाद होऊन फलकावर फक्त 70 धावा लागल्या होत्या आणि संघ प्रचंड अडचणीत आला होता.
भारताला एका मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. अशावेळी टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वाल आणि नाइट वॉचमन आकाशदीप हे संकटमोचक ठरले.
दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावा जोडल्या. टीम इंडियाच्या कोसळलेल्या डावाला त्यांनी सावरलं. आकाशदीपने 66 धावांची खेळी केली.
यशस्वी जयस्वालनं दमदार शतक ठोकून भारताला सन्मानजनक स्थितीत पोहोचवण्यास मदत केली. दुसऱ्या डावात शुभमन गिल, करुण नायर आणि के. एल. राहुल हे अनुभवी फलंदाज अपयशी ठरले, तेव्हा खालच्या फळीतील अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबरदस्त अर्धशतकं झळकावली.
त्यांच्यामुळे भारताची धावसंख्या 396 पर्यंत पोहोचली आणि भारत इंग्लंडसमोर 374 धावांचं मोठं लक्ष्य ठेवण्यात यशस्वी झाला.
2. हॅरी ब्रूकचा 'तो' झेल, सामन्याचा थरार वाढवणारा क्षण
ओव्हल कसोटी सामना जिंकल्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजकडून अशी 'चूक' झाली की काही भारतीय क्रिकेटप्रेमींनी त्याच्यावर टीका सुरू केली. ही चूक टीमसाठी महागात पडू शकली असती.
जेव्हा इंग्लंडचा संघ तीन गडी बाद 137 धावांवर होता, तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 34वं षटक टाकण्यासाठी आला.
प्रसिद्ध कृष्णाने पहिला चेंडू शॉर्ट टाकला, ज्यावर हॅरी ब्रूकने पुल शॉट मारला आणि चेंडू थेट हवेत डीप फाइन लेगच्या दिशेने गेला. तिथे मोहम्मद सिराज उभा होता. मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या सिराजनं तो झेल सहज पकडला. झेल पूर्णपणे नियंत्रणात होता आणि कृष्णाने तर विकेटचा आनंद साजरा करायलाही सुरुवात केली होती.
पण त्याच वेळी सिराजकडून एक चूक झाली. झेल घेतल्यानंतर त्याचं लक्ष मागे सीमारेषेकडे गेलंच नाही. तो बाउंड्रीपासून किती अंतरावर आहे, याचा अंदाज घेण्यास तो चुकला. त्यामुळेच त्याचा पाय सीमारेषेला लागला.
याचा अर्थ असा की, हॅरी ब्रूक फक्त बाद होण्यापासूनच वाचला नाही, तर त्याच्या आणि संघाच्या खात्यात सहा धावाही जमा झाल्या.
हॅरी ब्रूकला हे जीवदान त्याच्या वैयक्तिक 19 धावांवर मिळाले होते.
इंग्लंडने लंच आणि टी ब्रेकच्या दरम्यान 153 धावा केल्या. हॅरी ब्रूक खूप आक्रमक खेळला आणि त्याने फक्त 91 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. ब्रूक आणि जो रुट यांनी चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली.
हॅरी ब्रूकने 111 आणि जो रुटने 105 धावा केल्या.
3. ...अखेर हॅरी ब्रूकचा मोठा अडथळा दूर
जेव्हा हॅरी ब्रूक आणि जो रुट खेळपट्टीवर स्थिरावले, तेव्हा इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित वाटू लागला होता.
जेव्हा इंग्लंडला विजयासाठी फक्त 73 धावांचा गरज होती, तेव्हा हॅरी ब्रूक आकाशदीपच्या चेंडूवर शॉट मारण्यासाठी पुढे आला. चेंडू त्याच्या बॅटला लागला खरा, पण त्याच वेळी त्याची बॅट हातातून सुटली. त्यामुळे शॉटमध्ये ताकदच राहिली नाही आणि चेंडू थेट मोहम्मद सिराजकडे गेला.
काही तासांपूर्वी सिराजकडून जी चूक झाली होती, तिची भरपाई करत त्याने हा सोपा झेल सहज पकडला आणि हॅरी ब्रूकच्या खेळीला पूर्णविराम दिला.
ब्रूक बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या विकेट्स एकापाठोपाठ एक पडत गेल्या.
4. सिराजचा तो स्पेल अन् जिंकवणारा क्षण!
ओव्हल कसोटी सामना जिंकल्यानंतर अखेरच्या दिवशीचा खेळ जेव्हा सुरू झाला तेव्हा इंग्लंडच्या 6 विकेटवर 339 धावा झाल्या होत्या.
चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं होतं, तरीही सामन्यावर इंग्लंडचंच वर्चस्व दिसत होतं. परंतु, मोहम्मद सिराज काहीतरी वेगळंच ठरवून मैदानात उतरला होता. सिराजच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.
सिराजनं जेमी स्मिथ, ओव्हर्टन आणि गस अॅटकिन्सन यांचे बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
5. वोक्स मैदानात परतला... पण इंग्लंडचं नशीब बदललं नाही!
इंग्लंडसाठी हा सामना किती महत्त्वाचा होता, हे यावरून समजतं की जेव्हा संघाच्या धावा 9 बाद 357 होत्या आणि विजयासाठी फक्त 17 धावा उरल्या होत्या, तेव्हा दुखापतग्रस्त ख्रिस वोक्स मैदानात उतरला.
त्याचा एक हात पूर्णपणे जायबंदी होता आणि तो त्यानं स्वेटरखाली झाकला होता.
तो फलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हता. तरीही त्यानं मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या जिद्दीमुळे स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं.
क्रिजवर असलेल्या गस अॅटकिन्सनने वोक्स स्ट्राइकवर येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली.
परंतु, शेवटी सिराजच्या एका शानदार चेंडूनं अॅटकिन्सनचे स्टम्प उडवले आणि वोक्सची जिद्द असूनही इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.