गिरिजा ओकने इन्टिमसी सीनबाबत काय म्हटलं? 'इन्टिमसी को-ऑर्डिनेटर'ची नेमकी भूमिका काय असते?

फोटो स्रोत, Getty Images/Instagram
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज
अभिनेत्री गिरिजा ओक ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
गिरिजाच निळ्या साडीतील एक फोटो खूप व्हायरल झाला आहे. गिरिजा लवकरच 'थेरेपी शेरेपी' नावाच्या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
या सीरिजमध्ये अभिनेता गुलशन देवैया यांच्यासोबत तिने काही इंटिमेट सीन्स केले आहेत.
'द लल्लनटॉप' ला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल बोलताना, गिरिजा ओकने इन्टिमसी को-ऑर्डिनेटरचा उल्लेख केला आहे.
तिने म्हटलं आहे की, "सिरिज किंवा चित्रपटात म्हणजेच स्क्रिनवर जेव्हा कधी इन्टिमसीवाले सीन्सचं शूटींग होतं, तेव्हा बऱ्याचदा इन्टिमसी को-ऑर्डिनेटर सेटवर उपस्थित असतात. तुमच्याशी तो सीन शूट होण्याआधी चर्चा केली जाते. आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत, काय दिसेल, काय नाही याची तुम्हाला पूर्ण कल्पना दिलेली असते."
मात्र, अशा प्रकारच्या सीन्सचं शूट होत असताना इन्टिमसी को-ऑर्डिनेटरची नेमकी काय भूमिका असते, ते या लेखातून समजून घेऊयात. बीबीसी न्यूजच्या गीता पांडे यांनी हा लेख काही वर्षांपूर्वी लिहिला होता. तो इथे पुन्हा देत आहोत.
1992 साली प्रदर्शित झालेल्या 'बेसिक इन्स्टिंक्ट' या चित्रपटामध्ये अंडरवेअर काढण्याचं दृश्य आपल्याला फसवून चित्रित झाल्याचा गौप्यस्फोट हॉलिवूडमधील अभिनेत्री शेरॉन स्टोन यांनी अलीकडेच केला होता.
या विशिष्ट दृश्यामध्ये पोलीस चौकशी करत असताना शेरॉन यांचं पात्र ही कृती करताना दाखवलं आहे.
शेरॉन स्टोन यांचं आत्मचरित्र काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालं. त्यात त्यांनी लिहिल्यानुसार, 'पांढऱ्या रंगावरून लाईट रिफ्लेक्ट होतोय, त्यामुळे अंडरवेअर काढून ठेवावी आणि प्रेक्षकांना काहीच दिसणार नाही,' असं चित्रीकरणावेळी शेरॉन यांना सांगण्यात आलं.
परंतु, नंतर त्यांना आणि जगभरातील सगळ्याच प्रेक्षकांना या दृश्यामध्ये बरंच काही पाहायला मिळालं.
या चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल वर्होवन यांनी शेरॉन यांचा दावा फेटाळून लावला आहे. चित्रीकरणावेळी काय सुरू होतं हे शेरॉन यांना माहीत होतं, आता त्या खोटं बोलत आहेत, असं वर्होवेन म्हणाले.
परंतु, 'या सर्व घटनाक्रमामध्ये आपली फसवणूक झाली आणि मी मनातून कोसळून पडले होते', असं शेरॉन यांचं म्हणणं आहे.
ही कटुकहाणी टाळता आली असती का?
"अगदी सहज टाळता आली असती," असं आस्था खन्ना म्हणतात. त्या भारतातील पहिल्या आणि एकमेव प्रमाणित 'इन्टिमसी कोऑर्डिनेटर' (शारीरिक जवळीक असलेल्या दृश्यांसाठीच्या संयोजक) आहेत.
त्या म्हणतात, "मी तिथे असते तर शेरॉन स्टोन यांना त्यांच्या त्वचेच्या रंगाची अंतर्वस्त्रं दिली असती."
'बेसिक इन्स्टिंक्ट'च्या चित्रीकरणाची सुरुवात 1990 साली झाली, तेव्हा कोणी 'इन्टिमसी कोऑर्डिनेटर' हे शब्दही ऐकलेले नव्हते. त्यामुळे नग्न दृश्यांचं किंवा लैंगिक वर्तनाशी निगडीत दृश्यांचं चित्रण करताना अधिक आश्वासक वातावरण निर्माण करण्याचा प्रश्नही नव्हता.

फोटो स्रोत, Aastha Khanna
परंतु, 2017 साली #MeToo आंदोलनानंतर आता अशा संयोजकाची सेवा घेण्याची मागणी वाढू लागली आहे. यापूर्वी मात्र जगभरातील विविध मनोरंजन क्षेत्रांमध्ये लैंगिक छळाचे प्रकार झाले आहेत.
1970 सालच्या न्यूयॉर्कमधील सेक्स व पॉर्न उद्योगावर आधारित 'द ड्यूस' या मालिकेसाठी अभिनेत्री एमिली मीड यांच्या मागणीनुसार आपण इन्टिमसी कोऑर्डिनेटरची नेमणूक केल्याचं एचबीओ (HBO) वाहिनीने 2018 साली जाहीर केलं होतं.
आपल्या सर्वच कार्यक्रमांमधली शारीरिक जवळीक दाखवणारी दृश्यं इन्टिमसी कोऑर्डिनेटरच्या देखरेखीखाली चित्रित केली जातील, असं HBO नेटवर्कने नंतर स्पष्ट केलं. त्यानंतर नेटफ्लिक्स व अमेझॉन यांसारख्या वेब-प्लॅटफॉर्म कंपन्यांनीही हे धोरण स्वीकारलं.
आता अनेक स्टुडिओ, निर्माते व दिग्दर्शक आपल्या सेटवर इन्टिमसी कोऑर्डिनेटरचा वापर करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातही हे बदलाचे नवे वारे वाहताना दिसत आहेत.
इन्टिमसी कोऑर्डिनेटरचं काम काय असतं?
26 वर्षांच्या आस्था खन्ना सांगतात, "माझ्या कामाची तुलना अॅक्शन डायरेक्टर किंवा नृत्यदिग्दर्शिकेशी करता येऊ शकते, पण माझं काम केवळ शारीरिक जवळकीच्या दृश्यांपुरतं असतं."
मुंबईहून फोनवरून बोलताना त्या म्हणाल्या, "साहसी दृश्यं वा स्टंट असतीलल तेव्हा अॅक्शन डायरेक्टर सुरक्षिततेची खातरजमा करतो, तसंच खोटा सेक्स सीन, किंवा नग्न दृश्य किंवा लैंगिक हिंसेचं दृश्य असेल, तर सुरक्षिततेजी खातरजमा करणं हे इन्टिमसी कोऑर्डिनेटरचं काम असतं."
प्रणय दृश्यांदरम्यान दिग्दर्शक व कलाकार यांच्यात ताळमेळ राखण्याचं काम इन्टिमसी कोऑर्डिनेटर करत असते, असं त्या म्हणाल्या.
"कलाकारांचं शोषण होऊ नये आणि स्टुडिओत ते सुरक्षित राहील याची खात्री करणं, हे माझं काम आहे. मला अमुक एका दृश्याच्या चित्रीकरणावेळी वाईट अनुभव आला, असं कोणा कलाकाराला पाच वर्षांनी म्हणायची वेळ येऊ नये."
कलाकार व्यक्तीची सहमती व मर्यादा या संदर्भात आस्था त्या व्यक्तीशी चर्चा करतात आणि त्यानुसार आवश्यक पोशाखांची तजवीज करतात.
आस्था यांच्या कीटमध्ये क्रॉच गार्ड, निपल पेस्टीस, बॉडी टेप व डोनट पिलो अशी साधनं असतात. या साधनांचा वापर करून दोन कलाकार-व्यक्ती लैंगिक दृश्याचं चित्रीकरण करताना एकमेकांपासून आवश्यक अंतर राखू शकतात, त्यांच्या गुप्तांगांचा परस्परांशी संपर्क होत नाही.

फोटो स्रोत, Hitesh Mulani
मासिक पाळीसंबंधीच्या लघुपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या निर्मात्या मंदाकिनी काकर यांचा पुढचा प्रकल्प 'पूर्णतः शारीरिक जवळिकीशी संबंधित आहे.' यासाठी त्यांनी आस्था खन्ना यांची मदत घेतली आहे.
मंदाकिनी सांगतात की, भारतातील मुख्यप्रवाही चित्रपटांमध्ये सेक्स किंवा नग्नतेकडे सर्वसाधारणतः दुर्लक्ष केलं जातं. अगदी चुंबनदृश्यही टाळण्याकडे कल असतो. आपल्याला कौटुंबिक मर्यादेपलीकडे जाणारा चित्रपट नको आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं असतं.
इन्टिमसी कोऑर्डिनेटरचा फायदा काय?
कडक सरकारी नियम व सेन्सॉर बोर्ड यांमुळे बॉलिवुडमधील चित्रपटांना सेक्स सीन किंवा शारीरिक जवळीक दाखवणाऱ्या दृश्यांबाबत खूपच सर्जनशील खटपट करावी लागत आली आहे. पूर्वी दोन फुलं एकमेकांना चिकटल्याचं दाखवलं जात असे, किंवा दोन पक्षी एकमेकांचं चुंबन घेतायंत किंवा दूध उतू जातंय, किंवा पलंगावरची चादर चुरगळली आहे, अशा प्रकारच्या क्लृप्त्या वापरल्या जात.
परंतु गेल्या एक-दोन दशकांच्या काळात चित्रपटांमध्ये चुंबनदृश्यं दिसू लागली आहेत आणि अनेक स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मांवर तर सेक्स व नग्नताही दाखवली जाते.
पण कलाकारांसाठी विशेषतः नवख्या तरुणींसाठी अशी दृश्यं करणं अतिशय अवघड असतं आणि यावेळी त्यांची पिळवणूक होण्याची शक्यता असते.
पूर्वी फॅशन मॉडेल म्हणून काम केलेल्या अभिनेत्री अंजली शिवरमन सध्या नेटफ्लिक्सच्या 'एलिट' या नवीन मालिकेचं चित्रीकरण करत आहेत. आस्था खन्ना सेटवर असल्यामुळे आपल्याला खूप आश्वस्त वाटतं, असं अंजली सांगतात. "माझ्यासाठी सेटवर कोणी तरी आहे, यामुळे मला दिलासा मिळतो."

फोटो स्रोत, Anjali Sivaraman
"मला एक सेक्स-सीन करावा लागणार होता. यापूर्वी कधीच मी असं काही केलेलं नाही. शिवाय, मी आधी कधीच ज्या अभिनेत्याला भेटलेलेही नव्हते अशा अभिनेत्यासोबत या दृश्याचं चित्रीकरण होणार होतं. मला स्पोर्ट्स ब्रा आणि अंडरवेअर घालून हे दृश्य करायचं होतं. मला आपण पूर्णच नग्नावस्थेत आहोत, असं वाटून खूप अस्वस्थ व्हायला झालं.
सहकलाकार पूर्णतः अनोळखी असल्यामुळे त्याला किस करणंही मला अवघडल्यासारखं वाटत होतं. दिग्दर्शकही पुरुष असल्यामुळे त्यांच्याशीही हे बोलणं सोपं नव्हतं."
"पण आस्थाने माझ्यासाठी सगळं सोपं करून टाकलं. माझी अडचण तिने दिग्दर्शकाच्या कानावर घातली आणि त्यांनी किस-सीन काढून टाकला. सेक्स-सीनच्या वेळी त्यांनी आमच्या दोघांमध्ये डोनट-कुशन ठेवलं, त्यामुळे आमची गुप्तांगं एकमेकांना स्पर्श करत नव्हती. हे थोडं विचित्र असलं, तरी तिथे ते कुशन असल्यामुळे मला बरं वाटलं," असं त्या सांगतात.
आई किंवा व्यवस्थापक - पूर्वीच्या काळचे इन्टिमसी कोऑर्डिनेटर
सुरुवातीच्या काळात अभिनेत्रीची आई किंवा व्यवस्थापक त्यांच्या सोबत सेटवर जात असत आणि अनौपचारिकरित्या तेच इन्टिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका निभावायचे, असं बॉलिवूडमधील अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या पूजा भट्ट म्हणतात.
अभिनेत्री म्हणून आलेल्या अनुभवांमुळे पूजा भट्ट यांनी दिग्दर्शक व निर्माती म्हणून काम सुरू केल्यावर स्वतःला इन्टिमसी कोऑर्डिनेटर म्हणूनही तयार केलं होतं.
"शारीरिक जवळिकीची दृश्यं असतील, तेव्हा अभिनेत्रीला अस्वस्थ वाटणार नाही अशा रितीने क्रूमधील निवडक सदस्यांनाच मी सेटवर हजर राहायची परवानगी देत असे. 2002 साली मी 'जिस्म' हा इरॉटिक थ्रिलर चित्रपट तयार करत होते, तेव्हा मी बिपाशा बसूला सांगितलं होतं की, अस्वस्थ वाटणारं कोणतंही दृश्य तू करावंस असं मी एक स्त्री व कलाकार म्हणून सांगणार नाही."
"त्या चित्रपटात नग्नता नव्हती, पण कामुकता होती. बिपाशाचं पात्र जॉन अब्राहमच्या पात्राला आकर्षून घ्यायचा प्रयत्न करत असतं. हे सगळं खरं वाटेल असं आपल्याला करायचं आहे, इथे अडाणीपणे किंवा संदिग्धतेने काम होऊन चालणार नाही, त्यामुळे कुठवर जायचं ते तूच ठरवायचं आहे, असं मी तिला सांगितलं."
नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'बॉम्बे बेगम्स' या मालिकेत पूजा भट्ट यांनी एक भूमिका केली आहे. त्या सांगतात की, या मालिकेच्या सेटवर इन्टिमसी कोऑर्डिनेटर नव्हती, पण दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव यांनी कलाकारांना अस्वस्थ वाटणार नाही याची तजवीज केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणतात, "शारीरिक जवळिकीच्या दृश्यांबाबत अलंक्रिता आणि मी खूप चर्चा केली. आमचा एकमेकींवर विश्वास होता. दिग्दर्शकांवर आणि सहकलाकारांवर विश्वास होता. या मालिकेच्या चित्रीकरणानंतर मी व्यथित होऊन घरी परतत नसे."
पण सेटवर इन्टिमसी कोऑर्डिनेटर असल्याने खूप मदत होते, हे पूजा मान्य करतात.
"सेटवर इन्टिमसी कोऑर्डिनेटर असायला हवी, याचा आग्रह धरणं स्वागतार्हच आहे. बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही भेदभाव झाला किंवा लैंगिक छळ झाला तर तक्रार करणं शक्य आहे. ही बरीच चांगली गोष्ट आहे."
परंतु, प्रत्येक वेळी सेटवरची आपली हजेरी स्वागतार्ह मानली जात नाही, असं आस्था खन्ना म्हणतात.
या सगळ्यामुळे खर्च वाढतो, हे यामागचं एक मुख्य कारण आहे. पण काही चटकन न दिसणारी कारणंही यामागे असल्याचं आस्था म्हणतात. "प्रत्येक वेळी कलाकार आमच्यावर विश्वास ठेवतीलच असं नाही आणि अनेकदा निर्माता-दिग्दर्शकांनाही चिंता असते की, आम्ही त्यांच्या पसंतीहून वेगळं काहीतरी केलं तर काय," असं त्या सांगतात.
"एकदा एका दिग्दर्शकाने मला सांगितलं की, मी माझ्या कलाकारांना खूप चांगलं ओळखतो, ते सगळे माझे चांगले मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांच्याशी बोललोय आणि त्यांच्या कुटुंबियांची परवानगी घेतली आहे. हे सगळं माझ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी होतं.
त्या दिग्दर्शकाने मला सेटवर येण्यापासून प्रतिबंध केला नाही, कारण स्टुडिओ आणि निर्मात्यांनी मला कामावर ठेवलेलं होतं. चित्रीकरणासाठी ते मला बाहेरच्या लोकेशनवरही घेऊन गेले, पण पूर्ण वेळ मला व्हॅनमध्येच बसवून ठेवलं."
आस्था सांगतात, "सेटवर चाकू वापरायचा असेल तर स्टन्ट डायरेक्टरची गरज पडते, तसंच पटकथेत शारीरिक जवळिकीची दृश्यं असतील तर त्यासाठी माझी गरज आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवं."
पूजा भट्ट सांगतात की, यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण बहुतांश प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांना स्वतःच्या मर्जीने काम झालेलं हवं असतं, पण त्यांना कालोचित राहायचं असेल, तर काही बदल स्वीकारावे लागतील.
"बदल होतायंत, फक्त त्यांची गती संथ आहे. चित्रपटउद्योगातील काही लोक मूर्ख, संकुचित व मागासलेले आहेत, त्यांना बदल नको आहेत. पण अशा शक्तिशाली लोकांच्या रोषाची जोखीम पत्करून आपण एकमेकांसाठी व एकमेकांसह उभं ठाकण्याची गरज आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











