सेक्स सरोगेट म्हणजे काय? जखमी इस्रायली सैनिकांना त्या कशी मदत करतात?

अनेक देशांमध्ये सरोगेट सेक्स उपचारपद्धती (संबंधित रुग्णाची लैंगिक साथीदार म्हणून एखाद्या व्यक्तीला भाडोत्री ठेवलं जातं ती उपचारपद्धती) वादाचा विषय ठरली आहे आणि तिचा मोठ्या प्रमाणावर वापरही होत नाही.
परंतु, इस्रायलमध्ये गंभीर दुखापत झालेल्या व लैंगिक पुनर्वसनाची गरज असलेल्या सैनिकांना सरकारी खर्चाने असे उपचार उपलब्ध करून दिले जातात.
इस्रायली सेक्स थेरपिस्ट रोनित अलोनी यांची तेल अव्हीवमधील कन्सल्टेशन रूम अपेक्षेप्रमाणेच आहे. या खोलीत ग्राहकांसाठी एक छोटासा आरामदायक कोच आहे आणि पुरुष व स्त्रियांच्या जननेंद्रियांच्या जैविक आकृत्या आहेत. यांचा वापर करून त्या समजावून सांगतात.
पण शेजारच्या खोलीत घडतं ते अधिक आश्चर्यकारक आहे. या खोलीत एक सोफा आहे व मेणबत्त्याही आहेत.
शारीरिक जवळीक कशी साधावी आणि अखेरीस संभोग कसा करावा, हे अलोनी यांच्या पेशंट्सना शिकवण्यासाठी भाडोत्री साथीदार आणल्या जातात आणि त्या या खोलीमध्ये काम करतात.
"हे हॉटेलसारखं दिसत नाही- हे बरंचंसं घरासारखं, सदनिकेसारखं दिसतं," अलोनी सांगतात. त्या खोलीत एक बेड, एक सीडी-प्लेअर, आणि शेजारी शॉवरची सोय आहे. भिंतींवर कामुक कलात्मक चित्रं आहेत.
"सेक्स थेरपी ही अनेक अर्थांनी जोडप्याशी निगडित उपचारपद्धती असते आणि कोणाला साथीदार नसेल, तर ही प्रक्रिया पूर्ण करता येत नाही," त्या सांगतात. "अशा वेळी जोडप्यातील साथीदाराची भूमिका निभावण्यासाठी तो अथवा ती सरोगेट म्हणून काम करतात."
टीकाकारांनी या उपचारपद्धतीची तुलना वेश्याव्यवसायाशी केली असली, तरी इस्रायलमध्ये याला बऱ्याच प्रमाणात स्वीकार लाभलेला आहे. संभोगक्षमतेवर परिणाम करणारी इजा झालेल्या सैनिकांच्या बाबतीत अशा उपचारपद्धतीचा खर्च सरकार भागवतं.
"आपण दुसऱ्या कोणाला तरी आनंद देऊ शकतो आणि त्यांच्याकडून आनंद मिळवू शकतो, हे लोकांना जाणवण्याची गरज असते," असं लैंगिक पुनर्वसनामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवलेल्या अलोनी सांगतात.
"इथे लोक उपचारांसाठी येतात. लैंगिक सुख मिळवायला नव्हे. त्यामुळे यात आणि वेश्या व्यवसायात काही सारखेपणा नाही," त्या ठामपणे म्हणतात.
"शिवाय, आमची 85 टक्के सत्रं शारीरिक जवळीक, स्पर्श, देणं व घेणं, संवाद साधणं याच्याशी संबंधित असतात. व्यक्ती म्हणून आपण इतर लोकांशी कसं जोडून घेतो ते शिकण्यासंदर्भात बरंच काम होतं. आणि अखेरीस लैंगिक संबंध घडतात तोवर ही प्रक्रिया समारोपाकडे आलेली असते."
सुमारे 30 वर्षांपूर्वी मिस्टर ए (संबंधित व्यक्तीला नाव उघड करायचं नसल्यामुळे अद्याक्षर वापरलं आहे) इस्राएली सैन्यात राखीव सैनिक म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांना आयुष्य बदलून टाकणाऱ्या अपघाताला सामोरं जावं लागलं. त्यानंतर इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयाच्या खर्चाने सेक्स सरोगेट उपचारपद्धती करवून घेणाऱ्या पहिल्या काही सैनिकांमध्ये त्यांचा समावेश होता.
उंचावरून खाली पडल्यामुळे त्यांचं कंबरेखालचं शरीर विकलांग झालं आणि आधीप्रमाणे त्यांना संभोग करणं शक्य उरलं नाही.
"जखमी झालो तेव्हा 'या गोष्टी करायच्या आहेत' अशा मथळ्याखाली मी एक यादी तयारी केली होती. स्वतःची स्वतः आंघोळ करणं, स्वतःचं स्वतः खाणं, स्वतःचे स्वतः कपडे घालणं, स्वतःची स्वतः गाडी चालवणं आणि स्वतंत्रपणे सेक्स करता येणं, अशी ती यादी होती."
मिस्टर ए यांचं अपघाताआधी लग्न झालेलं होतं आणि त्यांना मुलंबाळंही होती. पण त्यांच्या पत्नीला सेक्सबद्दल डॉक्टरांशी किंवा थेरपिस्टांशी बोलणं अवघडल्यासारखं वाटायचं, त्यामुळे त्यांनी ए यांना अलोनींचं सहकार्य घेण्यास सुचवलं.

अलोनी यांनी मार्गदर्शन व प्रतिसाद देऊन प्रत्येक सत्रापूर्वी व सत्रानंतर सरोगेट साथीदार उपलब्ध करून दिल्याचं मिस्टर ए सांगतात.
"आरंभापासून सुरुवात केली जाते: इथे स्पर्श करणं, तिथे स्पर्श करणं, असं टप्प्या-टप्प्याने पुढे जात अखेरच्या टप्प्यावर ऑरगॅझम जाणवतो," असं ते सांगतात.
आपल्या इतर पुनर्वसनासाठी सरकारने खर्च केला त्याप्रमाणे दर आठवड्यातील या सत्रांसाठीही सरकारी पैसा वापरला जाणं योग्य आहे, असं मिस्टर ए म्हणतात. आज तीन महिन्यांच्या या उपचार कार्यक्रमाचा खर्च 5400 डॉलर इतका आहे.
"भाडोत्री साथीदाराकडे जाणं हे काही माझ्या जीवनाचं ध्येय नव्हतं. मी जखमी झालो आणि मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक बाजूचं पुनर्वसन करायचं होतं," व्हिलचेअरवर बसलेले मिस्टर ए सांगतात. त्यांनी ट्रॅकसूट घातलाय आणि ते टेबल-टेनिस खेळायला निघाले आहेत.
"माझ्यासाठी सरोगेट म्हणून आलेल्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडलो नाही. माझं लग्न झालेलं होतं. उद्दिष्टापर्यंत कसं पोचायचं याचं तंत्र शिकवण्यापुरता तो भाग होता. मला ही एक अतिशय तर्कशुद्ध गोष्ट करावी लागणार आहे, असं मी त्याकडे पाहिलं."
या संदर्भात काही गैरसमजुती असतील, तर त्याला पाश्चात्त्य पूर्वग्रह कारणीभूत असल्याचा ठपका ते ठेवतात.
"सेक्स हा जीवनाचा भाग आहे, त्यातून जगताना समाधान मिळतं," ते म्हणतात. "स्त्रीलंपट होण्याचा मुद्दा इथे लागू नाही."
वेगवेगळ्या वयातील व वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक अलोनी यांच्या क्लिनिकला छुप्या पद्धतीने भेट देत राहतात.
अनेकांना जवळीक साधताना अडचणी येतात किंवा काहींनी लैंगिक अत्याचार भोगलेला असतो, त्यामुळे शरीरसंबंध ठेवताना त्यांना संघर्ष करावा लागतो. इतर काहींना शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या असतात.
अलोनी यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून विकलांग ग्राहकांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांच्या अनेक जवळच्या नातेवाईकांना शारीरिक अपंगत्व होतं- त्यांचे वडील वैमानिक होते, आणि एकदा विमान कोसळल्यानंतर त्यांच्या मेंदूला इजा झाली.
"आयुष्यभर मी विविध प्रकारच्या अपंगत्वाला सामोरं जाणाऱ्या व त्यावर मात करणाऱ्या लोकांसोबत राहिले," त्या सांगतात. "या सर्व लोकांचं चांगल्या तऱ्हेने पुनर्वसन झालं. त्यामुळेच माझा दृष्टिकोन अत्यंत आशावादी आहे."
न्यूयॉर्कमध्ये शिक्षण सुरू असताना अलोनी यांची गाठ अपंग लोकांसाठी सरोगेट म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीशी पडली.

1980 च्या दशकाअखेरीला त्या इस्राएलला परत आल्या तेव्हा सेक्स सरोगेटच्या वापरासंबंधी अग्रगण्य ज्यू धर्मपीठांची परवानगी घेऊन त्यांनी एका धार्मिक ग्रामसमुदायामध्ये पुनर्वनसन केंद्र उभारून उपचार करायला सुरुवात केली.
कोणत्याही विवाहित पुरुषांना व विवाहित स्त्रियांना सरोगेट म्हणून काम करता येणार नाही, असा एक नियम धर्मपीठांनी केला होता. अलोनी यांनी पहिल्यापासून या नियमाचं पालन केलं आहे.
कालांतराने त्यांना इस्रायली प्रशासनाचाही पाठिंबा मिळाला. त्यांच्या क्लिनिकमध्ये सरोगेट सेक्स उपचारपद्धती करवून घेतलेल्या सुमारे एक हजार लोकांपैकी डझनावारी रुग्ण सैन्यातील अनुभवी जवान होते- त्यातील अनेकांच्या मेंदूवर आघात झाला होता किंवा पाठीच्या कण्याला इजा झाली होती. या सैनिकांच्या उपचाराचा खर्च सरकारने केला.
इस्राएलमधील कुटुंबकेंद्री संस्कृती व सैन्याकडे पाहण्याचा या संस्कृतीचा दृष्टिकोन, हे सर्व आपल्यासाठी उपकारक ठरल्याचं अलोनी यांना वाटतं. बहुतांश इस्रायलींना 18व्या वर्षी सैनिकी सेवेसाठी बोलावलं जातं आणि मध्यम वयापर्यंत ते राखीव सैनिक म्हणून काम करू शकतात.
"हा देश स्थापन झाल्यापासून आम्ही युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये आहोत," अलोनी म्हणतात.
"जखमी झालेल्या किंवा मरण पावलेल्या लोकांना इस्राएलमध्ये प्रत्येक जण ओळखतो आणि या लोकांची नुकसानभरपाई करून देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक जण दाखवतो. आम्हाला त्यांच्याबद्दल दायित्वाची भावना असते."
इस्रायलच्या मध्य भागात एका उद्यानात सुमारे 40 वर्षांचा एक उंच माणूस ब्लॅन्केट मांडीवर पसरून बसला आहे. तो एक माजी राखीव सैनिक आहे आणि 2006 साली लेबनान युद्धाने त्याच्या आयुष्याच्या चिंधड्या केल्या.
डेव्हिड (नाव बदललं आहे) यांना आता बोलता अथवा चालता येत नाही.
त्यांना केवळ त्यांच्या थेरपिस्टच्या मदतीने संवाद साधणं शक्य आहे- तिने त्यांच्या हाताला आधार दिला व त्यांच्या हातात पेन धरून ठेवलं, तर ते व्हाइटबोर्डवर लिहू शकतात.
"मी एक सर्वसामान्य व्यक्ती होतो. दूर पूर्वेच्या मोहिमेवरून मी नुकताच परत आलो होतो. विद्यापीठात शिकत होतो आणि बारमॅन म्हणून नोकरीही करत होतो. मला खेळायला नि मित्रांसोबत वेळ घालवायला खूप आवडायचं," डेव्हिड सांगतात.
त्यांच्या सैन्यपथकावर हल्ला झाला, तेव्हा त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांना तीन वर्षं रुग्णालयात काढावी लागली.
या वेळी आपण जगण्याची इच्छाशक्ती गमावली असं ते सांगतात.

त्यांच्या थेरपिस्टने त्यांना सरोगेट सेक्स उपचारपद्धती सुचवल्यावर मात्र गोष्टी बदलू लागल्या.
"मी सरोगेट थेरपी सुरू केली, तेव्हा मला हताश वाटायचं, निरर्थक वाटायचं. थेरपीदरम्यान मला तरुण व सुंदर पुरुष असल्याची जाणीव झाली," असं डेव्हिड सांगतात.
"मी जखमी झालो त्यानंतर पहिल्यांदाच अशी काही भावना मला जाणवत होती. त्यातून मला बळ मिळालं, आशा मिळाली."
डेव्हिड यांनी हे एक जवळकीचं नातं विकसित करायला सुरुवात केली होती आणि ते संपुष्टात येणार असल्याचं त्यांना माहीत होतं. यात भावनिक पातळीवर दुखावलं जाण्याची जोखीम होती का?
"सुरुवातीला मला सगळं अवघड गेलं, कारण मला सरोगेट माझ्यापाशीच हवी असं वाटत होतं. पण आम्ही एकमेकांचे सोबती नसलो, तरी चांगले मित्रमैत्रिणी राहू शकतो, हे माझ्या लक्षात आलं. आणि ते तितकं मल्यवान होतंसुद्धा. तुम्हाला पुन्हा नव्याने जगायला शिकण्यासाठी याची मदत होते."
सरोगेट व ग्राहक यांना उपचारांव्यतिरिक्त संपर्क ठेवता येत नाही, असा सर्वसाधारण नियम आहे. पण डेव्हिड व त्यांची सरोगेट असलेली महिला- ती सेराफिना असं टोपणनाव वापरते- यांना डॉ. अलोनी यांच्या क्लिनिकने विशेष परवानगी दिली होती. त्यामुळे उपचाराचं सत्र संपल्यानंतरही त्यंना संपर्कात राहता आलं.
त्या उपचारानंतर डेव्हिडमध्ये परिवर्तन झाल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. ते आता भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
लैंगिक जीवनानुभव कायम ठेवणं अतिशय अवघड असलं, तरी कोव्हिड-19चा आघात होण्यापूर्वी ते अधिकाधिक समाजात मिसळू लागले होते आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांच्या मदतीने बाहेर जाऊ लागले होते.
सेराफिना दशकभराहून अधिक काळ रोनित अलोनी यांच्यासोबत सरोगेट म्हणून काम करत आहेत. सेराफिना शिडशिडीत आहेत, केस वर बांधलेले आहेत आणि त्यांचं बोलणं स्नेहशील व गोळीबंद आहे.
अलीकडेच त्यांनी स्वतःच्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिलं आहे. 'मोअर दॅन अ सेक्स सरोगेट' असं शीर्षक असलेल्या या पुस्तकाचं वर्णन प्रकाशकांनी पुढीलप्रमाणे केलं आहे- 'शारीरिक जवळीक, गुपितं व आपल्या प्रेम करण्याच्या रीती यांबद्दलचं अनन्यसाधारण अनुभवकथन.'
तेल अव्हीव क्लिनकमधील सर्व सरोगेट साथीदारांप्रमाणे सेराफिना यांची दुसरी नोकरी आहे. त्या कलाप्रांतामध्ये नोकरी करतात. आपण परोपकारासाठी सरोगेटची भूमिका स्वीकारल्याचं त्या सांगतात.
"या सर्व लोकांची दुःखं असतात आणि आत ही प्रचंड गुपितं लपलेली असतात, त्यांची मदत करायची क्षमता माझ्यात होती म्हणून मी मदत करायला हवी असं मला वाटलं," ते म्हणतात.
"उपचारप्रक्रियेदरम्यान माझी लैंगिकता किंवा माझं शरीर किंवा स्पर्श वापरण्याबद्दल मला काही अडचण नव्हती. हा विषय माझ्यासाठी मोहक होता, लैंगिकता मला मोहक वाटत होती."
सेराफिना स्वतःचं वर्णन 'टूर गाइडसारखी' असं करतात. त्या आपल्या ग्राहकांना एका प्रवासावर घेऊन जातात आणि तिथल्या वाटा सेराफिना यांना माहीत असतात.
त्यांनी सुमारे 40 ग्राहकांसोबत काम केलं आहे, त्यात आणखी एका सैनकाचाही समावेश होता. पण डेव्हिड यांना झालेली इजा अत्यंत अनन्यसाधारण आव्हान उभं करणारी होती. खाजगीत बोलता यावं यासाठी डेव्हिड यांना लिहायला कशी मदत करायची हे सेराफिना यांनी शिकून घेतलं.
"डेव्हिड यांची केस माझ्या माहितीतली सर्वांत टोकाची केस होती. एका अर्थी वाळवंटात चालत असल्यासारखा तो प्रकार होता. आपण कुठल्या दिशेने जातो आहोत त्याची काहीच कल्पना येत नव्हती," असं त्या म्हणतात.
"मला खूप, खूपच सर्जनशीलता दाखावावी लागली, कारण त्यांना अजिबातच हलता येत नाही. त्यांना शक्य असतं तर त्यांनी स्वतःचं शरीर कसं हलवलं असतं, याची कल्पना करून मी त्यांचं शरीर हलवायचे. त्यांना स्वतःचं शरीर जाणवायचं, पण हलवता यायचं नाही.
"ते कायम म्हणायचे: 'मला काय हवंय ते तिला अचूक कळतं, मी काहीही बोललो नाही तरीही कळतं.' याने स्वाभाविकपणे समाधान वाटतं."
सरोगेट म्हणून सेवा देत असतानाही सेराफिना यांच्या आयुष्यात प्रियकरही येऊन गेले आहेत आणि त्यांची ही सेवा देण्याची निवडही त्यांनी स्वीकारली होती. पण आपल्या आयुष्यातील जोडीदाराने सांगितल्यामुळे किंवा लग्न झाल्यामुळे सरोगेट म्हणून काम करणं सोडून दिलेल्या स्त्रिया व पुरुष त्यांच्या माहितीत आहेत.
जवळीक साधल्यानंतरही ग्राहकांचा निरोप घेणं आवश्यक आहे, पण ते अवघड होऊ शकतं, असं त्या म्हणतात.
"हे एका अर्थी सुट्टीवर जाण्यासारखं असतं. एका विशिष्ट छोट्या कालावधीसाठी खूप चांगले संबंध ठेवायची संधी आपल्याला मिळालेली असते. आपण ती संधी स्वीकारायची की नाकारायची?"
"आणि हे सुखाने संबंध तोडण्यासारखं असतं. चांगल्या कारणांसाठीच हे केलं जातं. काही वेळा मला रडायला येतं, पण त्याच वेळी मला आनंदीही वाटतं.
"कोणीतरी एखाद्या नात्यात आहे किंवा कोणाला बाळ झालंय किंवा कोणाचं लग्न झालंय, असं ऐकल्यावर मला अकल्पनीय पातळीवर आनंद होतो आणि मी जे काही करतेय त्याबद्दल अत्यंत समाधानी वाटतं."
संध्याकाळी उशीर झालेला असूनही रोनित अलोनी अजूनही काम करतायंत. युरोपातील व दक्षिण अमेरिकेतील काही सेक्सॉलॉजिस्टांसमोर त्यांचं ऑनलाइन व्याख्यान सुरू आहे.
लैंगिक समस्यांवर उपचार करण्यासाठी रूढ मानसिक उपचारांपेक्षा सरोगेट सेक्स उपचारपद्धती अधिक परिणामकारक ठरते, असं सुचवणाऱ्या रुग्णांचे अनुभव व विविध संशोधनं यांचे दाखले त्या देतात.
"आधी सरोगेटची सेवा वापरलेल्या सर्व थेरपिस्टांनी सांगितलं की, आपण पुन्हा या उपचारांचा वापर करू, ही अत्यंत रोचक बाब म्हणावी लागेल," त्या व्याख्यान ऐकणाऱ्यांना सांगतात.
गंभीर दुखापत झालेल्या सैनिकांना जगणं सुरू ठेवण्यासाठी आधुनिक शस्त्रक्रिया मदत करत असताना सरोगेट उपचारांचा वापर अधिक व्यापक स्तरावर होऊ शकतो, असं त्या मानतात.
"एकाद्या व्यक्तीच्या स्वाभिमानाचं, त्या व्यक्तीच्या पुरुष अथवा स्त्री असण्यासंदर्भातील दृष्टिकोनाचं, पुनर्वसन केल्याशिवाय त्या व्यक्तीचं पुनर्वसन होऊ शकत नाही," त्या म्हणतात.
"आपल्या जगण्याचा तो भाग दुर्लक्षिता येणार नाही. तो अतिशय महत्त्वाचा व ताकदीचा भाग आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचं ते केंद्र असतं. आणि त्याबद्दल फक्त बोलून उपयोग नाही. सेक्शुआलिटी ही डायनॅमिक गोष्ट आहे, त्यात आपण आणि इतर लोक यांचा समावेश असतो."
अलोनी यांच्या मते, आधुनिक समाजाने सेक्सबद्दल रोगट मनोवृत्ती जोपासली आहे.
"आपल्याला लैंगिकतेबद्दल विनोद करायचं कळतं. लोकांची मानखंडना कशी करायची, अत्यंत रूढीवादी कसं वागायचं किंवा खूप टोकाला कसं जायचं, हे आपल्याला कळतं," त्या म्हणतात.
"पण त्यात खऱ्या अर्थाने समतोल ठेवला जात नाही. आपल्या जीवनात हा धागा गरजेचा असतो तसा विणला जात नाही. लैंगिकता हे जीवन आहे. आम्ही अशा उपचाराद्वारे जीवन परत मिळवून देतो. यालाच निसर्ग म्हणतात!"
रेखाटनं- केटी हॉरविच.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








