'ते प्रेमाच्या शोधात असतात, पण वाट्याला येतं शोषण, लूट, ब्लॅकमेलिंग अन् प्रसंगी रेपही'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नीलेश धोत्रे
- Role, प्रतिनिधी, बीबीसी मराठी
- Reporting from, नवी दिल्ली
(सूचना- या लेखातील काही वर्णन तुम्हाला विचलित करू शकतं. तसंच शारीरिक संबंध, लैंगिक हिंसा आणि मारहाणीचे काही संदर्भ या लेखात आहेत. तसंचपीडित व्यक्तींच्या विनंतीवरून त्यांची नावं आणि शहरं बदलण्यात आली आहेत.)
"आजही मी झोपेत ओरडत उठतो, 'मला सोड, मला जाऊ दे, मी मरून जाईन." आजही माझे आई-वडील विचारतात असं का होतं तुला आणि मी फक्त एकच उत्तर देतो ते म्हणजे 'मला पण माहिती नाही."
"पण खरंतर त्याचं कारण मलाच माहिती आहे आणि मी ते कुणालाच सांगू शकत नाही. कारण मला भीती आहे की माझे घरचे त्यावर नेमकं कसं रिअॅक्ट करतील. हा समाज माझ्याकडे कसा पाहील."
फक्त घरच्यांना समजू नये, आईवडिलांनी धसका घेऊन त्यांना काही होऊ नये म्हणून 22 वर्षांच्या अर्णवने 2 वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेला बलात्कार अजूनही सर्वांपासून लपवून ठेवला आहे.
पण त्यामुळे आलेला ब्रेन स्ट्रोक, अशक्तपणा आणि आजारपण तो एकटाच भोगत आहे.
संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या अर्णवला एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने पुढच्या शिक्षणासाठी पैसे जमवायला सुरुवात केली. त्याला एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा मिळाली. पैसे साठवून हॉस्पिटॅलिटीचा कोर्स करायचं त्याने ठरवलं होतं.
ऐन तारुण्यात आपलं कुणीतरी असावं ही प्रत्येकाला वाटणारी भावना त्याच्याही मनात होती. संभाजीनगरसारख्या शहरात ती पूर्ण होणं त्यासाठी थोडं कठीण होतं. म्हणून मग त्याने गे डेटिंग अॅपचा वापर केला.
पहिल्याच चॅटमध्ये त्याची ओळख 25 वर्षांच्या ऋषभशी झाली. दोघांमध्ये चांगला संवाद झाला. एकमेकांसोबत नंबर शेअर केले. एके दिवशी भेटायचं ठरलं. दोघेही संध्याकाळी एका कॅफेत भेटले. चांगल्या गप्पा झाल्या. अर्णवला मनात आनंद वाटून गेला.
ऋषभ बरोबरच्या चर्चेत त्याला तो एक चांगला मुलगा वाटला. काही तासांच्या गप्पाटप्पांनंतर दोघांनी ऋषभच्या एका मित्राच्या फ्लॅटवर जायचं ठरवलं. ऋषभच्या गाडीतून दोघे निघाले. जाताना गाडीत प्रेमगीतं ऐकून अर्णव हुरळून गेला होता.
"आपण चाललो आहे तो माझ्या मित्राचा फ्लॅट आहे. त्यामुळे तिथं मी दिवे लावणार नाही. तुला शांत राहावं लागेल. कसलाही आवाज करू नकोस," असं ऋषभनं सांगितल्याची आठवण अर्णव सांगतो.
"आम्ही फ्लॅटवर पोहोचताच त्याचं वेगळंच रूप मला दिसलं. संपूर्ण अंधाऱ्या घरात तो मला थेट बेडरुमध्ये घेऊन गेला आणि मला बेडवर जोरात धक्का दिला. मी पडलो. माझ्या डोक्याला लागलं. मी ओरडलो. त्याने लगेचच माझं तोंड दाबलं आणि आवाज करू नकोस असं म्हटलं. माझं तोंड दाबून ठेवत त्याने माझ्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. त्याने लगेच माझे हातपाय बांधले. कापडाचा बोळा आणि दोरी त्याने तयारच ठेवली होती. मी ओरडण्याचा आणि सुटका करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याने माझं तोंड दाबून ठेवलं आणि मला आणखी घट्ट बांधलं."
"त्याच अवस्थेत ऋषभने माझे कपडे फाडले आणि माझ्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. संपूर्ण कृत्य तो मोबाईलवर शूट करत राहिला. त्याने मला एवढं मारलं की माझ्या अंगावरच्या जखमा मी आजही पाहू शकत नाही."
हे सांगताना अर्णवचा गळा भरून आला होता. त्याने रडायला सुरुवात केली होती.
रडतरडत त्याने सांगितलं, "2 तास तो हे सर्व करत राहिला. रडूनरडून माझा गळा पूर्णपणे सुकला होता. आता मी मरून जाणार असं मला वाटत होतं. शेवटी मी अंग टाकल्यानंतर त्याने सर्व थांबवलं."
"मला शुद्ध होती, पण ना मी चालण्याच्या स्थितीत होतो ना बोलण्याच्या. माझे कपडे पूर्णपणे फाटून गेले होते. आता काय करावं हेच मला सुचत नव्हतं."
"आता ऋषभला काहीही करून माझ्यापासून सुटका करून घ्यायची होती. त्याने मला त्याच्याकडचे कपडे घालायला दिले आणि त्याच्या गाडीत बसवून शहराबाहेरच्या निर्जन ठिकाणी सोडून दिलं. तिथं गेल्यानंतर माझ्या मनात विचित्र विचार आले. मी मोठ्या हिंमतीनं माझ्या एका जवळच्या मित्राला फोन करून तातडीनं मदतीसाठी बोलावलं. तोपर्यंत त्याला माझ्या गे असण्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण तो साथ देईल याची मला खात्री होती."

फोटो स्रोत, Getty Images
"मित्र येताच मी त्याला सर्व घटना सांगितली. पण पोलिसांत गेलो तर घरच्यांना सर्व समजेल. या भीतीने मग आम्ही फक्त डॉक्टरकडे जायचं ठरवलं. कारण मला तातडीनं उपचारांची गरज होती. ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन सर्व खरं सांगितलं पण घरी सांगितलं तर मोठा अनर्थ होईल, त्यामुळे कृपया घरी काहीच सांगू नका अशी विनंती माझ्या मित्राने डॉक्टरांना केली. त्यांनी मान्य केलं. पण काही झालं तर त्याची सर्व जबाबदारी तुमची असेल असंही बजावलं."
अर्णवला शरीरात अंतर्गत जखमादेखील झाल्या होत्या. एका अपघातात पोटाला मार लागल्यामुळे त्रास होत असल्याचं त्याच्या घरच्यांना सांगण्यात आलं. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर अर्णव घरी आला. तोच ऋषभने त्याला मेजेस करून त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हीडिओ पाठवून पैशांची मागणी केली. भीतीपोटी अर्णवने लगेच देऊन टाकले.
पुढे सहा महिने तो अर्णवला ब्लॅकमेल करत राहिला. एकदा पैसे दिले नाही म्हणून ऋषभने थेट अर्णवच्या आईच्या फोनवर मेसेज करून तुमच्या मुलाने माझ्याकडून पैसे घेतलेत आणि ते परत करत नसल्याचं सांगितलं.
भीतीपोटी पुन्हा एकदा अर्णवने त्याला पैसे पाठवले. पण, त्याने या गोष्टीचं एवढं टेन्शन घेतलं होतं की त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. परिस्थिती फारच गंभीर झाली होती. शेवटी अर्णवला सर्व प्रकार त्याला चुलत भावाला सांगावा लागला. पोलिसात गेलं तर बदनामी होईल या भीतीनं भावानेसुद्धा धीराने घ्यायचं ठरवलं.
शेवटी भावानं त्याच्या एका मित्राच्या मदतीनं ऋषभचं घर शोधून काढलं आणि त्याच्या घरी जाऊन सर्व प्रकार सांगितला. आधी ऋषभ, त्याची पत्नी आणि त्याच्या पालकांनी सर्व प्रकरण नाकारलं. पण पैशांचं ट्रान्झॅक्शन आणि इतर पुरावे दाखवल्यानंतर मात्र त्यांना विश्वास बसला.
गेल्या 2 वर्षांमध्ये या बलात्कारामुळे अर्णवच्या शरीरावर झालेल्या जखमा भरून आल्या आहेत. पण त्याच्या मनावर झालेली जखम अजूनही ओली आहे.
ही गोष्ट एकट्या अर्णवची नाहीये.
गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या डेटिंग अॅपच्या माध्यमातून समलिंगी व्यक्तींना लुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही वेळा ब्लॅकमेलिंग आणि गोष्टी आत्महत्येपर्यंतसुद्धा गेल्या आहेत.
गे डेटिंग ऍपच्या माध्यमातून लोकांना लुटलं जाणं, ब्लॅकमेलिंग करणं, धमक्या देणं आणि लैंगिक अत्याचार करणं हे सर्रास घडताना दिसतंय. मीडियामध्ये सातत्याने या संदर्भातल्या बातम्या येत असतात. तसंच त्या LGBTQ+ समाजापर्यंतसुद्धा पोहोचत असतात.
मग तरीही या अशा लुटीच्या घटना का घडतात? आपल्याला लुटलं जाऊ शकतं, मारहाण केली जाऊ शकते, लैंगिक हिंसा होऊ शकते हे माहिती असतानासुद्धा समलिंगी समुदायातली मंडळी सतत रिस्क का घेत असतात?
या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजांचा घेतलेला धांडोळा.
....आणि तो लुटला गेला
गुरुवारचा दिवस गिरीशसाठी तसा फार कामाचा नव्हता. ऑफिसात फारसं काम नव्हतं म्हणून त्या दिवशी तो अगदी वेळेत घरी निघाला. नरिमन पॉइंटवरून बसने त्याने मुंबईचं सीएसएमटी स्थानक गाठलं. ठाण्याला जाण्यासाठी त्याने स्लो ट्रेन पकडली.
प्रवासादरम्यान त्याने मोबाईल फोनवर गे डेटिंग अॅप उघडलं आणि काही लोकांशी चॅटिंग सुरू केली. त्याचवेळी त्याची ओळख यश नावाच्या मुलाशी झाली. एकमेकांचे फोटो शेअर केले. आवडीनिवडींची चर्चा केली आणि यशने त्याला आता लगेच भेटतो का असं विचारलं. त्यातच आज माझ्याघरी कुणी नाही असंसुद्धा सांगून टाकलं.
गिरीशकडेही वेळ होता म्हणून मग त्याने यशला भेटण्यासाठी विक्रोळी स्थानकावर उतरण्याचा निर्णय घेतला. गिरीश तिथं पोहोचताच आधीपासून त्याची वाटत पाहत असलेल्या यशची आणि त्याची भेट झाली. तेव्हा संध्याकाळचे साधारण साडेसहा वाजले होते. दोघांचा जुजबी संवाद झाला आणि दोघांनीही यशच्या टू व्हिलरवरून त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.
दोघांचं गे डेटिंग अॅपवर भेटणं, एकमेकांना पसंत करणं, तत्काळ भेटण्याचा निर्णय घेणं आणि गिरीशचं लगेचच यशच्या घरी जायला तयार होणं, हे सर्व काही भराभर घडत होतं. त्याचं कारण 32 वर्षांच्या गिरीशला हाती आलेली 'इंस्टट डेटिंग'ची संधी जाऊ द्यायची नव्हती.
टू व्हिलरवरून जात असताना यशनं त्याची गाडी भलत्याच दिशेला वळवली. त्यावेळी गिरीशनं त्याला हटकलं. पण आपल्या घरी ऐनवेळी पाहुणे आले आहेत. त्यामुळे आपण माझ्या मित्राच्या घरी जाऊया तिथं कुणी नाही असं यशनं त्याला सांगितलं. गिरीशनंही त्यावर विश्वास ठेवला. पण त्याचवेळी यशच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं.
प्रत्यक्षात मात्र यशनं टू व्हिलर मध्येच बांधकाम बंद पडून ओसाड पडलेल्या एका इमारतीच्या आवारात घातली. तोपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते आणि बऱ्यापैकी अंधार झाला होता.
इथं कुणी येणार नाही, इथं आपण सेक्स करू शकतो असा विश्वास देत 19 वर्षांचा यश गिरीशला पाचव्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला.

फोटो स्रोत, Getty Images
फ्लॅटमध्ये सर्वत्र काळोख होता. आता आलोच आहे तर सेक्स करू या अशी रिस्क घेत गिरीशनं कपडे काढायला सुरूवात केली. यशनेही कपडे काढले. एकमेकांना मिठ्या मारल्या आणि तोच मागून एक लाईट आपल्या दिशेने चालत येत असल्याचं गिरीशला दिसलं. यशने आपणही घाबरलो आहोत असं दाखवलं.
मोबाईलची लाईट लावून चित्रीकरण करत त्यांच्या दिशेने 4 तरुण येत होते. सर्वजण साधारण 24-25 वर्षांचे होते. दोघांनी "तुम्ही इथं असं कृत्य करता का थांबा आता हा रेकॉर्ड केलेला व्हीडिओ आम्ही व्हायरल करतो" अशी धमकी देऊन त्यांना मारहाण सुरू केली.
भेदरलेल्या यश आणि गिरीशनं माफी मागायला आणि विनवण्या करायला सुरुवात केली. पण ते चौघेही काही ऐकत नव्हते. त्या तीन तरुणांनी मारहाण करत यश आणि गिरीशला खाली इमारतीच्या आवाराच्या मागच्या बाजूला आणलं. आता रस्त्यावर तुमची धिंड काढतो अशी धमकी द्यायला लागले. गिरीश विनवण्या करत राहिला. त्यावेळी मात्र त्यातल्या एकानं एक लाख रुपयांची मागणी केली.
"एक लाख दे मी तुला सोडून देतो," असं तो बोलू लागता. त्यावर गिरीशनं त्याच्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं. त्यावेळी त्या चौघांनी गिरीशला आणखी मारलं. इमारतीच्या गच्चीवर नेऊन खाली फेकून देण्याची धमकी दिली. तसंच इथं लोक आत्महत्या करण्यासाठी येतात त्यामुळे तू सुद्धा आत्महत्या केल्याचंच लोकांना वाटेल असं धमकावू लागले.
त्या चौघांनी त्याची बॅग, लॅपटॉप आणि मोबाईल आधीच हिसकावून घेतला होता. त्यातल्या एकानं गिरीशला जबरदस्ती त्याचा मोबाईल उघडायला लावला. त्याला त्याचं मोबाईल बँकिंग अॅप ओपन करायला लागलं. त्यात 13 हजार रुपयांचा बॅलन्स होता. नंतर गुगल पेवर जाऊन जबरदस्ती एका मोबाईलनंबरवर सर्व पैसे ट्रान्सफर करायला लावले.
भीतीपोटी गिरीशनं ते बोलतील तसं सगळं केलं. त्यांच्यापैकी एकानं फोन करून एका व्यक्तीकडे पैसे आल्याची विचारणा केली.
फोनवरून जसं कन्फर्मेशन आलं तसा चारही जणांनी तिथून बाईकवरून पळ काढला आणि जाता जाता गिरीशचे कपडे, बॅग, लॅपटॉप आणि मोबाईल त्याच्या अंगावर फेकून दिला.
भेदरलेल्या गिरीशनं भराभर कपडे घातले, सर्व साहित्य गोळा केलं आणि तिथून पळ काढायला सुरुवात केली. पण त्याच्या लक्षात आलं आपण इथं एकटे नव्हतो आलो. त्याला यशची आठवण झाली. त्याने यशला शोधण्याचा प्रयत्न केला. पाचव्या माळ्यावर जाऊन तो पुन्हा तिथंच लपला आहे का याचा शोध घेतला.
त्याला फोन लावला. त्याचा फोन बंद आला. त्याला शोधत शोधत गिरीश खाली आला, जिथं बाईक पार्क केली होती तिथं गेला. पाहतो तर काय बाईकसुद्धा तिथं नव्हती. त्याने वारंवार यशला काळजीपोटी फोन केले. पण त्याचा फोन सतत बंद आला.
शेवटी भेदरलेल्या गिरीशनं घरी जायचं ठरवलं. पण अशा अवस्थेत घरी जाणं म्हणजे गोंधळ होईल म्हणून मग त्याने त्याच्या एका जवळच्या मित्राला फोन केला. दोघेही ठाणे स्टेशनला भेटले. हॉटेलमध्ये एक रुम घेऊन गिरीशनं आंघोळ करून स्वतःची स्थिती ठीक केली. तिथून मित्राच्या घरी गेला. त्याने दिलेले कपडे घातले आणि मग घरी गेला.
"रस्त्यात येता येता मित्राच्या घरा जवळच्या एका गटारात पडलो," असं खोटं सांगून गिरीशने वेळ मारून नेली. पण ती आणि पुढच्या कित्येक रात्री गिरीशला झोप लागली नाही. बदनामी होईल, घरी माहिती पडलं तर काय होईल या भीतीपोटी तो काहीही करायला धजावत नव्हता.
दोन-तीन दिवसांनी त्यांने मोठ्या हिंमतीनं ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करायला लावले गेले होते त्या नंबरवर फोन केला. कुणीच उचलला नाही. बँकेत जाऊन आपल्याकडून जबरदस्ती पैसे काढून घेतल्याची तक्रार दिली. पण, बँकेनं मात्र सर्व नियमांनुसार पैसे ट्रान्सफर झाले आहेत, असं सांगून हात वर केले.
त्याने महिनाभरानं पुन्हा एकदा यशच्या नंबरवर फोन केला तेव्हा मात्र त्याचा फोन लागला आणि उचललासुद्धा गेला. तेव्हा मात्र यशनं त्याला ओळखण्यास नकार दिला. त्याने सर्व घडलेला प्रसंग त्याला सांगितला त्यावेळी असं काही घडलंच नसल्याचं म्हणत यशनं त्याचा नंबर कायमचा बंद केला.
आपली कशी फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर गिरीश अणखी डिप्रेशनमध्ये गेला. शेवटी त्याला मनोविकार तज्ज्ञाकडे जावं लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील सांताक्रुझमध्ये राहाणाऱ्या 32 वर्षांच्या राज मोरे नावाच्या चार्टड अकाउंटटने मात्र अशा छळाला कंटाळून आत्महत्या केली होती.
त्याच्याबरोबर शरीर संबंध ठेवलेल्या एका तरुणानं त्याच्याच एका मैत्रिणीच्या मदतीनं त्याला ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळले. शरीर संबंधांची चित्रफित प्रसारित करण्याची धमकी ते राजला देत होते. शेवटी कंटाळून राजने आत्महत्या केली.
ते हा धोका का पत्करतात?
क्वीअर असलेल्यांना असं लुबाडलं का जातं? त्यांना ब्लॅकमेल का केलं जातं? त्यांचा गैरफायदा का घेतला जातो? तसंच LGBTQ+ समुदायतले लोक अशा घटनांना बळी का पडतात, असे प्रश्न मी अॅक्टिविस्ट, मानसोपचार तज्ज्ञ् आणि समुदायातल्या काही लोकांना केले. त्यांची उत्तरं समाज म्हणून आपल्याला विचार करायला लावणारी तर आहेतच पण त्याचबरोबर आपण कुठे चुकतोय आणि कुठे सुधारू शकतो हेसुद्धा दर्शवणारी आहेत.
पुण्यातल्या मानसोपचार तज्ज्ञ शिल्पा तांबे गेली अनेक वर्षं समुपदेशनाचं काम करत आहेत. क्वीअर समुदायातली मंडळी डेटिंगसाठी रिस्क का घेतात? या प्रश्नाला उत्तर देताना त्या सांगतात, "त्यामागे अनेक कारणं आहेत. स्वत:च्याच कुटुंबाने, समाजाने आपला स्वीकार केला नाही तर काय? 'या भीतीने LGBT कम्युनिटीतील व्यक्ती आतून फार एकट्या पडलेल्या असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी सेफ स्पेसेस सहजपणे उपलब्ध नसतात. त्या कोंडमाऱ्यात त्यांना जवळचं, हक्काचं कुणीतरी हवंहवंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मग नकळतपणे सिक्रेटिव्हली ह्या भावनिक गरजेच्या शोधात ते असतात.
"अर्थात, इंटिमेट रिलेशनशिप ही माणसाची मुलभूत गरज आहे. कुणालाही नैसर्गिकरीत्या असं वाटतंच की माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं आणि मीही कोणावर तरी प्रेम करावं. माझं हक्काचं कुणीतरी असावं. त्याच्या शोधात अनेकदा अनेकांची 'काय सुरक्षित आहे आणि काय असुरक्षित आहे' यात भेद करताना गल्लत होते. त्यांना ते पटकन लक्षात येत नाही. जराही कुणी प्रेमाची फुंकर घातली, गोड बोललं, स्तुती केली, प्रेम भावना व्यक्त केली तर ते त्याला लगेच बळी पडण्याची शक्यता असते," शिल्पा सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
गुरुग्राममध्ये राहणाऱ्या अखिलेशची कहाणी अशीच काहीशी आहे. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून त्याची ओळख शक्ती सिंगशी झाली होती. डेटिंगसाठी ते सतत भेटत राहिले. एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या अखिलेशला अनेक दिवसांपासून प्रेमाच्या नात्याचा शोध होता.
शक्तीच्या रुपानं तो संपल्याचं त्याला वाटलं होतं. उंच राजबिंडा आणि जिम बॉडीवाला शक्ती त्याच्या स्वप्नातला पुरूष होता. काही दिवस लंच आणि डिनरसाठी (ज्याचे पैसे अखिलेशच भरत होता सतत) बाहेर भेटल्यानंतर अखिलेशने शक्ती सिंगला त्याच्या गुरुग्राममधल्या अलिशान घरी भेटण्यासाठी बोलावलं.
शक्ती सिंगने त्या ठिकाणी आपल्या दोन साथीदारांना बोलवलं. ते घरी येताच शक्ती सिंगनं स्वतः जाऊन दार उघडलं तोच दोन हट्टेकट्टे तरुण घरात घुसले. त्यांनी अखिलेशला मारहाण करत पैसे मागण्यास सुरुवात केली. प्रसंगावधान राखत अखिलेशने पैसे देण्याच्या निमित्ताने बेडरूम गाठत दार बंद केलं आणि सोसायटीच्या सिक्युरिटीला फोन केला.
पण, ते तिघे बेडरुमचं दार तोडून आत घुसले. त्यांनी अखिलेशला पैसे दे नाही तर तुला बाल्कनीतून खाली फेकतो अशा धमकी दिली. पण अखिलेशच्या प्रसंगावधानामुळे सिक्युरिटी गार्ड त्याच्या घरात पोहोचले होते. त्यामुळे शक्ती सिंगसह तिघांनी पोबारा केला. पण बदनामीमुळे चांगला फ्लॅट विकण्याची वेळ त्याच्यावर आली.
अनिल उकरंडे पुण्यात युतक LGBTQ+ ट्रस्ट नावाची संस्था चालवतात. ते अशा प्रकारे फसवणुकीला बळी पडणाऱ्या समलिंगी व्यक्तींना मदत करतात. ते एक फार महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतात तो म्हणजे क्वीअर व्यक्तीच्या मनात असलेला न्यूनगंड आणि पूर्णवेळ नातं जोपण्याची न मिळणारी संधी.
त्यांचा मुद्दा आणखी स्पष्ट करतना अनिल सांगतात, "बरेचदा आपण गे आहोत हे मान्य करायलाच अनेकांना उशीर होतो, मग त्यानंतर ते आपलं कुणाशीतरी भावनिक नातं असावं यासाठी शोधाशोध सुरू करतात. त्यात अशा नात्यांना सामाजित मान्यता नसल्यामुळे सर्व काही लपूनछपून करावं लागतं. परिणामी अनेकदा पूर्णवेळ नातं जोपासता येणं अशक्य असतं. अशावेळी मानसिक आणि शारीरिक गरज त्यांना अशा अॅपवर आणते. त्यामुळे अशा अॅपच्या वापराचे दुष्परिणाम त्यांना माहिती असूनही ते रिस्क घ्यायला तयार असतात. ज्या दिवशी समलिंगी जोडप्यांना सामाजिक आणि कायदेशीर मान्यता मिळेल त्यादिवशी या गोष्टी कमी होतील.
"याला आपण गे आहोत हा न्यूनगंडसुद्धा कारणीभूत आहे, त्याचाच गैरफायदा ही लुटणारी मंडळी घेतात. पण अशा प्रकारची हिंसा ही एक शक्यता आहे, ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असंही नाही, काही दुर्दैवी लोकांच्या वाट्याला ती येते, पण त्यांना त्यांच्या या भावना योग्यवेळी योग्य ठिकाणी व्यक्त करता आल्या नाही तर मात्र त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो.
"मीडियानं अशा प्रकारच्या हिंसेच्या आणि लुटीच्या बातम्या अधिकाधिक दाखवल्या तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि क्वीअर कम्युनिटितील लोक अशा रिस्क घेणं कमी करतील," असं अनिल सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण तरीही पुण्यातल्या सर्वेशनं रिस्क घेतलीच. पुण्यातल्या सर्वेशला तर त्याला डेटसाठी भेटायला आलेल्या तरुणानं त्यांच्या घराखालूनच पिक केलं होतं. त्याची गाडी आणि त्याचा पेहराव पाहाता तो चांगल्या घरातला दिसत होता. लाँग ड्राईव्हला जाऊ असं सागून तो सर्वेशला निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याच्या गाडीत आधीच लपून बसलेल्या मित्राच्या मदतीने त्याने सर्वेशवर लैंगिक अत्याचार केले.
सर्वेशच्या फोनमधून त्याच्या घरच्यांचे नंबर घेतले. तसंच त्याच्या गुगलपेवरून असलेले सर्व पैसे स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. याबाबत कुणाला सांगितलं तर तुझे व्हीडिओ घरच्या लोकांच्या मोबाईलवर पाठवेन अशी धमकी देऊन परत घरी आणून सोडलं.
त्यानं याबद्दल कुणालाच सांगितलं नाही की पोलिसात तक्रार केली नाही त्याचं कारण म्हणजे त्याच्या मनातला न्यूनगंड आणि भीती.
याबाबत चर्चा करताना मानसोपचार शिल्पा तांबे एक महत्त्वाचं निरिक्षणसुद्धा नोंदवतात. त्या सांगतात, "महत्त्वाचं म्हणजे हेट्रोसेक्शुल रिलेशनशिपमध्ये जेवढं आजकालच्या मुलामुलींना त्यांच्या आईवडिलांशी किंवा मित्रमैत्रिणींशी उघडपणे बोलता येतं. तेवढी सोय क्वीअर कम्युनिटीमधल्या मुलांना नाही. त्यांना ना आईवडिलांशी बोलता येतं ना त्यांच्या मित्रमैत्रिणींशी, त्यामुळे ते कुठे डेटवर चालले आहेत आणि कुणाबरेबर चालले आहेत, ते जे करत आहे ते सुरक्षित आहे की असुरक्षित ही चर्चा करायलाही कुणी नसतं. त्यांचं तेच ठरवत असतात.
"त्यात कधीकधी उत्पन्नाची साधनं नसलेल्या, किंवा 'फास्ट अँड ईझी मनी' मिळवण्याच्या नादात असलेल्या काही जणांचा डेटिंग अॅपमध्ये नसलेल्या पुरेशा सेफ्टीचा गैरवापर करण्याकडे कल असतो. मग त्यांच्या जाळ्यात चांगलं कमावणारे लोक ज्यांना साथीदाराची किंवा जोडीदाराची गरज आहे ते त्या जाळ्यात अडकण्याची जास्त शक्यता असते," असं शिल्पा सांगतात.
गेल्या 30 वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मृदुला आपटे यांचंसुद्धा असंच काहीच मत आहे. पण त्या आणखी एक मोठा मुद्दा अधोरेखित करतात तो म्हणजे डेटिंगसाठी पुरेसे ऑप्शन उपलब्ध नसणं.
त्या सांगतात, "क्वीअर लोकांना डेटिंग अॅपशिवाय दुसरे फारसे ऑप्शन नाहीत. काही संस्थांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पण तिथं त्यांना मनासारखा साथीदार मिळेलच असं नाही. त्यामुळे त्यांना डेटिंग अॅप सोपे वाटतात. गे आणि लेस्बियन्ससाठी रिलेशनशिपसाठीचा अॅक्सेस आणि उपलब्धता हा सर्वांत मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांना रिस्क घ्यावी लागते."
मुंबई राहणारा नक्षत्र बागवे प्रसिद्ध गे अॅक्टिविस्ट आहे आणि आपल्या व्हीडिओंच्या माध्यमातून LGBTQ+ समुदायातल्या लोकांना छळणाऱ्यांना समोर आणण्याचं काम तो करत असतो. शिवाय अशा प्रकराच्या छळांना बळी पडू नये म्हणून काय काय करावं हेसुद्धा तो त्यांच्या व्हीडिओंच्या माध्यमातून सतत सांगत असतो.

फोटो स्रोत, Getty Images
छोट्या शहरांमध्ये आता असे प्रकार जास्त वाढत असल्याचं निरीक्षण तो नोंदवतो.
बीबीसी मराठीशी बोलताना त्याने सांगितलं, "आजकाल सर्वच शहरात अशा घटना घडत आहेत. एकदा एखादी व्यक्ती अशा घटनेला बळी पडली की ती डिप्रेशनमध्ये गेल्याचंही मी पाहिलं आहे. छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये आता असे प्रकार वाढले आहेत कारण त्यांच्याकडे मोठ्या शहरांप्रमाणे LGBTQ+ कम्युनिटीमध्ये वावरण्याचे पर्याय नसल्यामुळे त्यांना रिस्क घ्यावीच लागते."
तो पुढे सांगतो, "शिवाय प्रत्येकवेळी गे व्यक्तीला सेक्ससाठीच ब्लॅकमेल केलं जातं असं नाही, नुसतं व्यक्ती समलैंगिक आहे असं कळलं तरी ब्लॅकमेल करणारे आहेत. 'पैसे दे नाही तर तुझ्या घरी सांगू' असं ब्लॅकमेल केल्याच्या केसेससुद्धा खूप आहेत. क्वीअर कम्युनिटीमध्येसुद्धा दोन प्रकार आहेत. एक खुलेपणानं आयुष्य जगतात, दुसरे जे अत्यंत गुप्तता बाळगून समाजात वावरत असतात. हे असे दुसऱ्या प्रकारातले लोक ब्लॅकमेलिंगला लवकर बळी पडतात."
दुसऱ्या प्रकारात वावरणाऱ्या गे लोकांची संख्या आपल्याकडे जास्त असल्याचं निरीक्षण नक्षत्र नोंदवतो.
मग मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे –आपल्याला लुटलं जाऊ शकतं या बातम्या गे कम्यिनिटीतील लोकांना माहिती असूनही ते रिस्क घेतात. तेव्हा त्यांना लुटणाऱ्यांना या बातम्या माहिती नसतात का? तर त्याचं उत्तर आहे त्यांना या बातम्या माहिती असतात पण तरीही ते असं कृत्य करण्यास पुढे सरसावतात.
त्याचं कारण समजावून सांगताना डॉ. मृदुला आपटे सांगतात, "आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला त्रास दिला की बरं वाटेल किंवा स्वतःचा आत्मसन्मान त्यामुळे उंचावेल असा विचार करणारे हे लोक असतात आणि क्वीअर समुदाय त्यांना सहज टार्गेट वाटत असतो. ते अन्याय किंवा अत्याचार करत आहेत याची त्यांना जाणीव असूनही ते असं करत असतात कारण त्यांच्याकडे त्यासाठीचं जस्टिफिकेशन असतं. बरेचदा त्यांचे स्वतःचे मानसिक आरोग्याचे प्रश्न असू शकतात." शिवाय या छळणाऱ्या मंडळींनासुद्धा अशा प्रकारे कुणीतरी त्रास दिलेला असू शकतो. त्यामुळे ते असं करत असावेत," अशी शक्यता त्या बोलून दाखवतात.




पण डॉ. आपटे इथं एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतात तो म्हणजे होमोफोबिक मंडळींना LGBTQ+ समुदायाबद्दल असलेला राग. हेसुद्धा या अशा प्रकारच्या घटनांमागचं मुख्य कारण असू शकतं, असं त्यांना वाटतं.
आयुष्यात सुखाचे दोन क्षण मिळवण्याचा, प्रेम करण्याचा आणि आपलेपणाची भावना जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मानवी अधिकारांचा तो एक भाग आहे. पण, अनेकांना आजही त्यासाठी कोंडमारा सहन करावा लागत आहे. त्यावर मात केली तर आत्मसन्मान गमावण्याची भीती वाटते. त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला तर लूट, ब्लॅकमेल आणि रेपची भीती आहेच.
अशा घटना घडू नये यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी?
डेटिंग अॅपवरून फसवणूक होऊ नये यासाठी अनेक गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. अनिल आणि नक्षत्र याबाबत काही सल्ले दिले आहेत. ते तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर वाचू शकता.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत.
यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाईन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











