अश्लील व्हीडिओ काढून ठेवायचा शारीरिक संबंध, आरोपीची पत्नीच आली पीडितेसाठी धावून

तोंड झाकलेली महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

ओळख लपवून महिलांसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्याचे आक्षेपार्ह फोटो, व्हीडिओ काढण्याचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे या आरोपीची पत्नीच पीडित मुलीसाठी धावून आली. तिनेच हे प्रकरण समोर आणलं आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं? आरोपींनी पीडित मुलीची फसवणूक कशी केली? पत्नीनं प्रकरण कसं समोर आणलं? जाणून घेऊयात.

नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अब्दुल शरीफ कुरेशी (वय 33) असं आरोपीचं नाव आहे. तो टेका-नाका परिसरात पानटपरी चालवतो. त्याचं चार वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे. त्याला तीन वर्षांची मुलगी सुद्धा आहे.

असं असलं तरी, आरोपी स्वतःची ओळख, वय आणि लग्नाबद्दलची माहिती लपवून इतर महिला आणि मुलींसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत होता. त्या महिलांना लग्नाचं खोट आश्वासन द्यायचा.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

या आरोपीनं चार ते पाच महिलांची अशी फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. पण, सध्या 19 वर्षांची एक पीडित मुलगी समोर आली आहे. तिनं पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अब्दुलला 29 मार्चला अटक केली.

त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 64, 69 या कलमानुसार बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.

नाव, वय खोटं सांगून वारंवार संबंध ठेवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 19 वर्षीय मुलगी ही भंडारा जिल्ह्यातली रहिवासी आहे.

तिची सप्टेंबर 2024 मध्ये आरोपी अब्दुलसोबत ओळख झाली. एका महाप्रसादाच्या कार्यक्रमात अब्दुल तिला भेटला. पण, यावेळी त्यानं स्वतःचं नाव बदलून सांगितलं. तसेच वय सुद्धा केवळ 24 वर्षे सांगितलं. त्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं.

दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तसेच त्यानं तिला लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. पण, हा आपल्यासोबत खोटं बोलतोय असं तिला चार महिन्यानंतर समजलं.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

या व्यक्तीनं वय, नाव सगळं खोट सांगून आपली फसवणूक केली असल्याचं तिच्या लक्षात आलं.

या चार महिन्याच्या काळात या आरोपीनं हॉटेल, लॉजमध्ये पीडित मुलीशी वारंवार संबंध ठेवले. तसेच तिच्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकायची धमकीही तिला दिली. त्यामुळे मुलीनं या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नव्हती.

मुलगी नागपुरात शिकायला राहत असल्यानं आणि कोणाचा पाठिंबा नसल्यानं शांत होती. पण, या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेच या पीडित मुलीची मदत केली. तसेच तिला पोलीस ठाण्यापर्यंत आणण्याचं काम केलं. आरोपीच्या पत्नीमुळेच हे प्रकरण समोर आलं.

आरोपीच्या पत्नीनं कसं समोर आणलं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल हा पॉर्न व्हीडिओ बघून स्वतःच्या पत्नीकडेही तशीच मागणी करायचा.

तिनं मागणी पूर्ण केली नाही, तर तिला मारहाण करून तिचा शारीरिक छळ करायचा. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती.

पतीच्या या त्रासाला कंटाळून ती 6 महिन्यांपासून माहेरी राहत आहे. तिनं पोलिसांत शारीरिक छळाबद्दल तक्रार दाखल केली होती.

असले प्रकार करणाऱ्या पतीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं तिनं ठरवलं. यानंतर पतीच्या व्हॉट्सअप चॅट आणि फोटोंवरून तो इतर महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं तिला दिसलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तो या महिलांसोबत फक्त ओळख लपवून बोलतच नाही, तर त्यांच्यासोबत संबंध ठेवून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. तसेच त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचंही तिला व्हॉट्सअपर दिसलं.

त्यानंतर तिनं सगळे पुरावे गोळा करून पीडित महिलांना फोन केले. पण, महिला भीतीपोटी तक्रार द्यायला तयार नव्हत्या. यापैकी फक्त एक 19 वर्षीय पीडित मुलगी समोर आली.

तिनं आरोपीच्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात जात ओळख लपवून आणि लग्नाचं खोट आश्वासन देऊन वारंवार बलात्कार झाल्याची तक्रार पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल केली.

आरोपीनं तिला फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटकही केली.

आरोपीनं आणखी 4-5 महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता पोलीस त्यादृष्टीनं तपास करत असून या प्रकरणात आणखी किती महिलांना आरोपीनं ब्लॅकमेल केलं याचा शोध घेतला जाईल, असं पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)