चीनमध्ये शी जिनपिंग यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं

फोटो स्रोत, Getty Images
चीनमध्ये सध्याच्या घडीला अभुतपूर्व विरोध प्रदर्शन आणि आंदोलनं सुरू आहेत. चीनची राजधानी बिजिंग, शांघाय, चेंगडू, वुहान आणि शिआन सारख्या शहरांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला लोकांचा तीव्र विरोध आहे. चीनच्या उरुमकी शहरात 2 दिवसांपूर्वी एका इमारतीला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला.
शी यांच्या कडक लॉकडाऊनच्या धोरणांमुळे इथं मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा ठपका आंदोलकांनी ठेवला आहे. याच आंदोलनाचा लोण आता देशभरात पसरताना दिसत आहे. मात्र, प्रशासनानं हा आरोप फेटाळून लावला आहे.
चीनमधील नागरिक राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधातही घोषणा देत आहेत. चीनमध्ये असं विरोध प्रदर्शन असामान्य बाब आहे.
गेल्या आठवड्यात ऍपलसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. तर गेल्या महिन्यात जेव्हा शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष घोषित करण्यात आलं तेव्हासुद्धा बिजिंगमधल्या एका ब्रिजवर विरोधाचे फलक झळकावण्यात आले होते.
चीनमध्ये अशा प्रकारची आंदोलनं खूपच दुर्मीळ आहेत. 1989 च्या तियानानमेन चौकातल्या आंदोलनानंतर चीनमध्ये कुठलंही मोठं आंदोलन आतापर्यंत झालेलं नाही.

फोटो स्रोत, Reuters
शांघायमध्ये हजारो लोकांनी एकत्र येत कोव्हिडच्या कठोर निर्बंधांचा निषेध केला. काहींनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना पायउतार होण्याचं आवाहन केलं.
येथीन नागरिक फ्रँक त्साई यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी इथं 15 वर्षांपासून वास्तव्यास आहे. या संपूर्ण 15 वर्षांमध्ये शांघायमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शन मी पाहिलेलं नाही."
बीबीसीच्या पत्रकाराला अटक आणि मारहाण
शांघाय येथील निषेध आंदोलन कव्हर करताना चीनच्या पोलिसांनी बीबीसीच्या पत्रकाराला अटक करून मारहाण केली आहे.
बीबीसीनं याविषयी पत्रक जारी करत म्हटलंय, “बीबीसीचे पत्रकार एड लॉरेन्स यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली, त्याबाबत बीबीसी चिंता व्यक्त करत आहे. शांघाय येथे निषेध आंदोलन कव्हर करत असताना लॉरेन्स यांना अटक करण्यात आली. त्यांना काही तास अटकेत ठेवून मग सोडण्यात आलं. या अटकेदरम्यान, पोलिसांनी त्यांना मारहाण केली. लाथही मारली. एक अधिकृत पत्रकार म्हणून काम करत असताना हे घडलं आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
“आपलं कर्तव्य पार पाडत असताना आमच्या एका पत्रकारावर याप्रकारे हल्ला करण्यात आला, हे चिंताजनक आहे. याविषयी चीनच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा माफीही मागितलेली नाही. तर ज्या अधिकाऱ्यांनी लॉरेन्स यांना अटक केली होती त्यांनी दावा केलाय की, या पत्रकाराला गर्दीत कोव्हिड होऊ नये म्हणून अटक करण्यात आली होती. पण, हे विश्वाससार्ह स्पष्टीकरण नाहीये, असं आम्हाला वाटतं,” असंही या पत्रकात म्हटलंय.
'झिरो कोव्हिड पॉलिसी'ला विरोध
चीनमध्ये सरकारच्या 'झिरो कोव्हिड पॉलिसी' विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत आहेत.
सोशल डिन्टन्सिंगसाठी लागू केलेले निर्बंध आता लोकांनी तोडले आहेत आणि मोठ्या संख्येनं लोक शहरं आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये रस्त्यावर उतरले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
चीनमध्ये कठोर निर्बंधांनंतरही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं नोंदवले जात आहेत. बुधवारी चीनमध्ये कोरोनाचे 31 हजार 527 नवीन रुग्ण आढळले. चीनच्या झिरो कोव्हिड धोरणामुळे कोरोना मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे, पण यामुळे अर्थव्यवस्था आणि सामान्य लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम झाला, असं म्हटलं जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









