नितू, निलू प्रचंड आगाऊ लेकरं आहेत, वळण लावायला आमचा भाऊ कमी पडला - सुषमा अंधारे

फोटो स्रोत, Facebook
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1.नितू, निलू प्रचंड आगाऊ लेकरं आहेत, वळण लावायला आमचा भाऊ कमी पडला - सुषमा अंधारे
निलू, नितू हे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यांना वळण लावायला आमचा भाऊही कमी पडला, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणेंवर हल्लाबोल केला. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.
सुषमा अंधारे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करतानाचा जुना व्हीडिओ भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली आहे. त्या नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
ी सुषमा अंधारे म्हणाल्या, “नितू आणि निलू हे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यांना वळण लावण्यात आमचा भाऊही कमी पडला. ते माझा महाविद्यालयातील एका वादविवाद स्पर्धेतील व्हीडिओ दाखवत आहेत. 20 वर्षांपूर्वीचा तो व्हिडिओ आहे. एखाद्या मुद्द्याच खंडन-मंडन करताना आपण असे बोलतोच."
“मी कणकवलीत जाऊन राणेंचा जो काही होमवर्क घेतला आहे, त्यामुळे त्यांची कानशिलं लाल झालीयेत. त्यामुळेच ते आता अस्थिर बोलत आहे. माझे जुने व्हीडिओ दाखवत आहे. हरकत नाही. त्यांची स्थिती आपण सजून घेऊयात,”असंही अंधारे म्हणाल्या.
2.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे.
शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील निवडणुका रखडलेल्या आहेत. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखा सातत्यानं पुढे ढकलण्यात येत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
3.म्हशीच्या मांस निर्यातीत भारत जगात चौथा; इजिप्तला सर्वाधिक निर्यात
देशातून होणाऱ्या मांस निर्यातीत म्हशीच्या मांसाचा वाटा वाढला आहे. म्हशींच्या जागतिक मांस बाजारात देशाचा वाटा 43 टक्के असून, मांस निर्यातीत देशाचा चौथा क्रमांक लागतो. चालू आर्थिक वर्षांत इजिप्तला सर्वाधिक मांस निर्यात झाली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2021-22मध्ये आजवर जगातील एकूण 66 देशांना 24,613 कोटी रुपये किमतीच्या 11 लाख 75 हजार 193 टन म्हशीच्या मांसाची निर्यात झाली आहे.

फोटो स्रोत, STALIC.LIVEJOURNAL.COM
एकूण निर्यातीपैकी इजिप्तला सर्वाधिक 5508 कोटी रुपये किमतीच्या 2 लाख 88 हजार 609 टन मांसाची निर्यात झाली आहे. त्या खालोखाल व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, इराक, हाँगकाँग, सौदी अरेबिया, फिलिपिन्स, अरब अमिराती आणि जॉर्डन या प्रमुख दहा देशांचा क्रमांक लागतो.
भारतातून सर्वाधिक म्हशीच्या मांसाचे निर्यात करणारे राज्य उत्तर प्रदेश आहे. त्या खालोखाल आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
4. उठाव होणारच! संभाजीराजेंचा इशारा
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यावर शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच," असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही, याचा अर्थ राज्यपालांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का,” असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे.
संभाजीराजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजे यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं आहे.
5.मराठवाड्यात कर्जपुरवठ्याची गती संथच
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रब्बीसाठी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्या अखेर केवळ 17.20 टक्केच पुरवठा झाला आहे. अॅग्रोवननं ही बातमी दिली आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात 4337 कोटी 28 लाख 20 हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या उद्दिष्टाचा पाठलाग करताना मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी, व्यापारी तसेच ग्रामीण बँक मिळून सर्व बँकांनी 21 नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ 78523 शेतकऱ्यांना 745 कोटी 80 लाख 17 हजार रुपये कर्ज कर्जपुरवठा करत उद्दिष्टाच्या तुलनेत 17.20 टक्केच उद्दिष्ट पूर्ती केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








