बारसू रिफायनरीला जमीन द्यायला स्थानिकांचा जोरदार विरोध का होतोय?

- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, बारसू, रत्नागिरी
"पोलीस, यंत्रणा आणत आहेत. बंदुका दाखवत आहेत. या गोष्टींनी आम्ही घाबरणार नाही. कधीही येऊ दे त्यांना. ते हजार लोक आणतील तर दहा, वीस हजार लोक आणण्याची आमची ताकद आहे,"
23 वर्षांच्या प्रतीक्षा कांबळेचा सूर आक्रमक दिसत होता.
नाणारमध्ये रद्द झालेल्या रिफायनरीसाठी पर्यायी जागा म्हणून बारसू, सोलगाव, धोपेश्वर, गोवळ, शिवणे-खुर्द, देवाचे गोठणे ही गावं सुचवण्यात आली. पण, इथेही प्रशासनाला लोकांच्या जनप्रक्षोभाचा सामना करावा लागतोय.
रिफायनरी विरोधातील आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि युवा वर्ग सहभागी होताना दिसून येतोय. प्रसंगी पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेताना दिसून येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात बारसू या गावात प्रस्तावित रिफायनरी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. त्यासाठी 6200 एकर संपादित करायची आहे. त्यापैकी 2900 एकर जमिनीसाठी लोकांनी परवानगी दिली आहे, असा दावा सरकारने केलाय.
या प्रकल्पातून 1 लाख रोजगार निर्मिती होईल आणि कोयनाचं पाणी या रिफायनरीसाठी वापरावं असा तत्वता निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितली.
पण या रिफायनरीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा विरोध आहे.
राज्यात रिफायनरीवरून राजकारण रंगू लागलंय. पण या राजकारणात स्थानिक कोकणी जनतेला काय वाटतं? हे आम्ही या गावात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
महिला रिफायनरीविरोधात आक्रमक
राजापूर शहरापासून साधारण: नऊ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत गोवळ गाव वसलेलं आहे. गावाच्या डाव्या बाजूने अर्जुना नदी वाहते तर दुसऱ्या बाजूला कातळ आहे. या कातळाला स्थानिक गावकरी सडा असं म्हणतात.
सरकारने रिफायनरीसाठी पर्यायी जागा म्हणून सूचित केलेल्या गावांपैकी गोवळ एक. याच सड्यावर (कातळावर) रिफायनरी होऊ घातलेली. त्यामुळे स्थानिक गावकरी प्रचंड आक्रमक झालेत. यात खासकरून महिलांची संख्या लक्षणीय आहे.

आम्ही गावात पोहोचलो. 100 पेक्षा अधिक महिला देवळात जमा होत्या. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या मनातली सरकार विरोधातील चिड स्पष्ट दिसत होती. सीताबाई बणबे म्हणतात, "पिढ्यान-पिढ्या आम्ही या गावात रहातोय. आम्हाला प्रकल्प नको. आमची साधी शेतीवाडी बरी. या प्रकल्पामुळे गोरगरीबांचे नुकसान होईल. पाणी दुषित होईल."
गोवळ गावाला जैविक गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात सेंद्रिय खतापासून शेती होते. गावात काजू आणि आंब्याची लागवडही आहे. गावाची लोकसंख्या हजारावर आहे. बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत.
‘आमचं स्थलांतर होईल आणि...’
मार्च महिन्यापासून गावात रिफायनरीला विरोध सुरू आहे. 23 वर्षांची प्रतीक्षा कांबळे रिफायनरी विरोधातील आंदोलनात हिरीरीने सहभाग घेते. बीए झालेली प्रतीक्षा सांगते, "पोलीस, यंत्रणा आणत आहेत. बंदूका दाखवत आहेत. यांनी आम्ही खरचं घाबरत नाही. कधीही येऊ दे. ते हजार लोक आणत असतील तर दहा-वीस हजार लोक आणण्याची आमच्यात ताकद आहे."
काही दिवसांपूर्वी रिफायनरीला विरोध करणाऱ्या गावात पोलिसांनी लॉंगमार्च केला होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या बोलण्यात पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी दिसून येत होती.

प्रतीक्षा आपल्या आई-वडीलांसोबत रहाते. त्यांची भात शेती आहे. ती पुढे म्हणते, "हा प्रकल्प आमची घरं नष्ट करेल. पुढे स्थलांतर करावं लागलं तर सर्व शून्यातून उभं करावं लागेल. गावाला मिळणारे पाणी दुषित होईल. आम्हाला आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे."
जमिनीचा सर्व्हे करण्याला विरोध
ग्रामस्थांनी अनेकवेळा रिफायनरी विरोधात मोर्चा, आंदोलनं केली. स्थानिक महिला आक्रमक सूरात म्हणाल्या, यापुढेही शांततेत आंदोलन करू. पण गरज पडल्यास घरातील पोरं घेऊन सड्यावर जाण्याची आमची तयारी आहे. जेव्हा-जेव्हा सर्व्हे करायला येतील घरातील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील.
जून आणि ऑगस्ट महिन्यात गोवळ गावात रिफायनरीच्या सर्व्हेचं काम सुरू करण्यात आलं. पण ग्रामस्थांनी काम बंद पाडलं. त्यावेळी हजारो ग्रामस्थ कातळावर जमा झाले होते.
ग्रामस्थ सांगतात, एका आंदोलनात गावकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता.

गावचे रहिवासी दीपक जोशी सांगतात, "माहिती अधिकारात समोर आलं की भू सर्व्हे, आणि ड्रोन सर्वेक्षणाला कोणतीही परवानगी नाही. हा सर्व्हे अवैध पद्धतीने करण्यात येतोय."
ज्या ज्यावेळेस सर्व्हे करण्याच्या प्रयत्न झाला. गावकऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता. दीपक जोशी यांनाही काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती.

गावकरी सांगतात, काहींनी जमीन शेती आणि बागायतीसाठी घेतो असं कारण सांगून जमिनी घेतल्या. तर, जमीन सरकारजमा होईल अशी भीती घालून लोकांना फसवून जमिनी खरेदी करण्यात आल्या.
एव्हाना दुपार झाली होती. गोवळ गावच्या बाजूने अर्जुना नदी वाहते. नदी काठावर शेतात गणपत राऊत काम करताना दिसले. रिफायनरी झाली तर रोजगार येईल मग विरोध का. याबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले, "गावात शिकलेले लोक कमी आहेत. फारतर ग्रॅज्युएट. मग रोजगार कसा मिळणार? या रिफायनरीमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांनाच काम मिळेल."
'नाणार विनाशकारी मग हा चांगला कसा?'
नाणारमध्ये होणारा रिफायनरी प्रकल्प जनप्रक्षोभामुळे रद्द झाला. पण, राज्य सरकारने प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेली पर्यायी जागा नाणारपासून जवळच काही किलोमीटर अंतरावर आहे.
रिफायनरी प्रकल्प परिसरातील दुसरं गाव म्हणजे देवाचे गोठणे. सोड्येवाडीत आमची भेट 82 वर्षांच्या पांडुरंग सोड्येंशी झाली. त्यांचा जन्म याच गावातला. ते व्यवसायाने शिक्षक होते. काहीकाळ मुंबईत राहिल्यानंतर ते गावी परतले. रिफायनरीबाबत अत्यंत पोटतिडकीने बोलताना ते म्हणाले, "आमच्या समोरच्या डोंगरावर एक-दोन किलोमीटरवरचा प्रकल्प रद्द होतो. मग हा प्रकल्प इथे का येतो?." हा प्रकल्प लोकांचा नाश करेल म्हणून आम्ही याला विरोध करतोय, ते पुढे सांगत होते.

भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर, देवाचे गोठणे गाव अर्जुना नदीच्या काठावर वसलेलं आहे. तर, खाडीच्या (नदी) दुसऱ्या बाजूला म्हणजेच समोरच्या बाजूला नाणारचा परिसर आहे. रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केलाय. "नाणार इथून 3 हवाई किलोमीटर अंतरावर आहे. नदीच्या पलिकडे हा प्रकल्प प्रदुषणकारी, विनाशकारी ठरवण्यात आला. मग आमच्या गावात चांगला असं कसं असू शकतं?"
आम्ही लोकांशी चर्चा करत असताना काही महिला पुढे आल्या. ऐश्वर्या सोड्ये म्हणाल्या, "या प्रकल्पामुळे कोकणचा ऱ्हास होईल." तर, अश्विनी सोड्ये सांगतात, "या प्रकल्पामुळे शेती संपून जाईल. लोकांना याचा त्रास होईल. त्यामुळे सरकारने काहीही केलं तरी आम्ही प्रकल्प होऊ देणार नाही."
कातळशिल्पांचं काय होणार?
देवाचे गोठणे गावात डोंगरावर पुरातन कातळशिल्प आहेत. ही कातळशिल्पं हजारो वर्षांचा ठेवा आहेत. भारताने युनेस्कोच्या "जागतिक वारसा यादी" म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये प्रस्तावित केलेल्या यादीत देवाचे गोठणे परिसरालाही स्थान मिळालं आहे.
गावकऱ्यांना भीती आहे की रिफायनरी झाल्यास या ऐतिहासिक ठेव्याचं नुकसान होईल. गावचे उपसरपंच कमलाकर गुरव आम्हाला सड्यावरील कातळशिल्प दाखवण्यासाठी घेऊन गेले. 15 मिनिटं चालल्यानंतर आम्ही पोहोचलो. साधारण सहा फुटांच्या माणसाचं दगडात कोरलेलं चित्र पहायला मिळालं.
ते म्हणाले, "रिफायनरीच्या प्रस्तावित भागात कातळशिल्प आहेत. पण सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. कधी कोणी येऊन पाहिलेलं नाही. कातळशिल्पांचं संवर्धन व्हावं अशी आमची मागणी आहे."
‘प्रकल्प दुसरीकडे हलवावा’
रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसूच्या सड्यावर 175 च्या आसपास कातळशिल्पं आहेत, असं अभ्यासक म्हणतात.
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे माजी उपकुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांना आम्ही कातळ शिल्पांबाबत विचारलं. डॉ. शिंदे आणि त्यांच्या टीमने काही दिवसांपूर्वी कोकणातील परिसराचा दौरा केला होता.
ते म्हणाले, "सायन्स एंड टक्नॉलॉजी मंत्रालयाचा Science Heritage Research Initiative नावाचा एक प्रोग्रॅम आहे. यातर्फे ही कातळशिल्पं नॅशनल प्रोजेक्ट म्हणून करता येतील का, हे पाहाण्यासाठी आम्ही गेलो होतो."

बारसू, देवाचे गोठणे भागातील कातळशिल्प असलेल्या परिसरात रिफायनरीसाठी जागा प्रस्तावित करण्यात आलीये. यावर बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, "ही कातळशिल्पं अत्यंत महत्त्वाची आहेत. या कातळशिल्पांचं महत्त्व पाहाता प्रकल्प दुसरीकडे हलवावा असं आमचं मत आहे." रिफायनरी दुसरीकडे हलवता येईल पण सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.
"सरकारने याच परिसरात रिफायनरी करणं ठरवलं तर सरकारला भेटून आम्हाला त्यांना याबाबत सांगणं भाग पडेल," डॉ. शिंदे पुढे म्हणाले.
सरकारविरोधात ग्रामस्थांची नाराजी
रिफायनरी प्रकल्प परिसरात शिवणे-खुर्द गावही येतं. रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे शिवणे-खुर्दमध्ये रहातात. या गावात आंब्याच्या बागा आहेत. तर, नदीकाठी मच्छिमारांच्या बोटी दिसून आल्या.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी रिफायनरीविरोधी संघटनेच्या सदस्यांना तडीपारीची नोटीस बजावली होती. अमोल बोळे सांगतात, "स्थानिक आमच्यामुळे नाहीत. तर पोलीस, राज्यकर्ते आणि दलालांमुळे भयभीत आहेत." अमोल आणि इतरांनी पोलिसांच्या या नोटीशीला उत्तर दिलं होतं.
स्थानिक गावकरी सांगत होते, या प्रकल्पाबाबत आमच्याशी कोणत्याही नेत्याने चर्चा केलेली नाही. या रिफायनरीला जवळपासच्या 20 गावातील 10 हजारपेक्षा जास्त गावकऱ्यांचा विरोध आहे. आमचा विकासाला विरोध नाही. सरकारने काजू, आंब्यावर प्रक्रिया करणारे इतर प्रकल्प आणावेत. पण, रिफायनरीला आमचा विरोध कायम राहिल.

रिफायनरीला विरोध करणाऱ्या गावात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मार्च केला होता. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत गावा-गावातून फिरत असल्याचं ग्रामस्थ सांगत होते. अमोल पुढे म्हणाले, "पोलिसांबाबतची भीती ग्रामस्थांच्या मनातून निघून गेली आहे. लोक कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार आहेत."
देवाचे गोठणे गावातील एक मुलगी सांगत होती, गावात लष्कर आलं. पोलीस भोंगे वाजवत गेले. त्यांच्या हातात बंदुकी होत्या. पण आम्ही घाबरणार नाही. प्रकल्प गावात होऊ देणार नाही.
ग्रामस्थांच्या मनातील भीती
गोवळ, शिवणे-खुर्द, देवाचे गोठणे या भागात फिरत असताना स्थानिक लोकांच्या मनात रिफायनरीबाबत असलेली भीती प्रकर्षाने जाणवून आली.
शेती, काजू, आंब्याच्या बागा नष्ट होतील. घरादाराचं नुकसान होईल. घरदार सोडून स्थलांतरीत व्हावं लागेल. रिफायनरीमुळे सड्यावरून मिळणारं पाणी प्रदुषित होईल. रोगराई पसरेल ही भीती स्थानिकांच्या मनात घट्ट बसलीये. गावागावात फिरताना रिफायनरी विरोधातील फलक दिसून येतात.
रत्नागिरी रिफायनरी एंड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर म्हणाले, "बारसूची जागा राज्य सरकारने प्रस्तावित केलीये. पण याबाबत अधिकृत बाउंड्री मार्किंग झालेलं नाही. या जागेची तपासणी करण्याची प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलीये."

"हवेची गुणवत्ता, सॉईल टेस्टिंग, पाणी याबाबत तपासणी अजून झालेली नाही. त्यामुळे जमीन प्रकल्पाला योग्य किंवा अयोग्य याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही," असं ते पुढे म्हणाले.
या प्रकल्पाला होणारा विरोध मोठा असला तरी, काही लोक याचं समर्थन करत आहेत राजापुरच्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर सांगतात, "हा प्रकल्प गेल्या 50 वर्षात कोकणाचं न झालेला विकास भरून काढू शकतो. लोकांना रोजगार मिळेल आणि आरोग्य सुविधा मिळतील." यामुळे हा प्रकल्प व्हावा अशी आमची मागणी आहे.
राजापुरातील बहुसंख्य नागरिक जरी या प्रकल्पाला विरोध करत असले तरी सरकारकडून या प्रकल्पासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राजापूर शहरात सौदी राजे मोहम्मद बिन सलमान यांचे पोस्टर्स झळकलेले पहायला मिळतायत. 2018 मध्ये भारत आणि सौदी अरेबिया मध्ये झालेल्या करारानुसार भारतात या रिफायनरी प्रकल्पाचा प्रस्ताव आला होता आणि जगातली सर्वात मोठ्या ऑइल रिफायनरीचा दावा करत प्रकल्पासाठी रत्नागिरीचा समुद्रपट्टा प्रस्तावित करण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









