You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निगार शाजी कोण आहेत, ज्यांच्या खांद्यावर आहे सूर्याचं रहस्य उलगडण्याची जबाबदारी
- Author, डॉ. अनुभा जैन
- Role, बीबीसी हिंदीसाठी
भारताचं 'आदित्य एल-1' मिशन या देशातील पहिलं महत्त्वाकांक्षी सौर मिशन आहे. अतिशय महत्वपूर्ण अशा या मोहिमेचं संचालन करतेय एक खंबीर महिला नेतृत्व.
निगार शाजी असं त्यांचं नाव. त्याइस्रोच्या वरिष्ठ महिला शास्त्रज्ञ असून या प्रकल्पाच्या संचालकपदाची धुरा त्यांच्याकडे आहे.
निगार शाजी यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी केवळ इस्रोमध्येच आपलं वेगळं स्थान निर्माण केलं नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांसाठी एक आदर्श निर्माण केलाय.
निगार शाजी यांच्याशी आदित्य एल-1 मिशन, इस्रो, विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांसाठी नवे मार्ग आणि नव्या संधी उपलब्ध कशा होतील तसेच त्यात येणारी आव्हानं, अडचणी यासारख्या अनेक मुद्यांवर विशेष चर्चा करण्यात आली.
निगार शाजी यांचं बालपण प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मेरी क्युरी यांच्या कथा ऐकत गेलं. विज्ञान आणि गणिताची विशेष आवड असलेले त्यांचे वडील त्यांना या प्रेरणादायी कथा सांगत असत.
वडिलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन आणि समजावून सांगण्याच्या शैलीमुळं निगार शाजी यांची विज्ञानाशी गट्टी जमली.
सध्या त्या इस्रोच्या यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्ये असोसिएट डायरेक्टर या सर्वात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.
विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांनी मोठी प्रगती केली असून त्या जे काही करू इच्छितात ते सहज शक्य आहे, अशी भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली.
विज्ञानाच्या क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली?
निगार शाजी आपल्या करिअरच्या प्रेरणास्रोतांविषयी सांगताना म्हणल्या की, विज्ञान आणि गणिताविषयीची गोडी निर्माण होण्यात त्यांच्या वडिलांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
त्यांचे वडील गणितात पदवीधर होते आणि त्यांनी बालपणी ते निगार यांना मेरी क्युरीच्या गोष्टी सांगत असत, ज्यामुळे निगार यांना विज्ञानात रस निर्माण झाला.
निगार सांगतात, "माझ्या वडिलांना मला गणित आणि भौतिकशास्त्राच्या संकल्पना अशा पद्धतीनं समजावून सांगितल्या की माझी या विषयांतील गोडी वाढतच गेली आणि हे विषय मला सोपे आणि रोचक वाटू लागले. आणि एक वेळ अशी आली जेव्हा तंत्रज्ञानाच विकास झपाट्यानं व्हायला लागला, तेव्हा मी विज्ञानाऐवजी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. कारण तंत्रज्ञान हे एक उदयोन्मुख क्षेत्र होतं जिथं मी तंत्रज्ञानाद्वारे विज्ञानाला प्रत्यक्ष स्वरुप देऊ शकत होते."
निगार शाजी यांनी अभियांत्रिकीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. हे शिक्षण पूर्ण करून त्या इस्रो आणि इतर ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करू लागल्या.
दरम्यान त्यांची इस्रोमध्ये निवड झाली. पण इस्रोत आल्यानंतर त्यांना बराच संघर्ष करावा लागला, ही वाट सोपी नव्हती. दररोज नव-नवीन आव्हानं पुढ्यात होती. या सर्व आव्हानांवर मात करत मी पुढे जात राहिले, असं निगार सांगतात.
विज्ञान क्षेत्रात प्रवेश करताना महिलांना काय अडथळे येतात?
महिलांच्या विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात येण्याबाबत निगार शाजी म्हणतात, लोकांमध्ये अशी धारणा आहे की विज्ञान आणि गणित हे खूपच कठीण विषय आहेत. परंतु हे विषय निगार यांना सोपे वाटतात. कारण ते रटाळ पाठांतराऐवजी तर्क आणि निष्कर्षावर आधारित आहेत.
या क्षेत्रात महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज महिला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असून हे पाहुन आनंद होत असल्याचं त्या सांगतात.
अभियांत्रिकी क्षेत्रातील महिलांच्या स्थितीत झालेल्या बदलांबाबत बोलताना निगार शाजी म्हणाल्या, "जेव्हा मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला, तेव्हा हे क्षेत्र महिलांसाठी फारसे खुले नव्हते. मला यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) मध्ये रस होता, पण त्या वेळी महिलांसाठी हे क्षेत्र सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ही शाखा निवडली."
महाविद्यालयात जे ज्ञान मिळवलं होतं, ते इस्रोमध्ये आल्यावर प्रत्यक्ष अनुभवता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज, आर्टिफिशियल इंटेलिजंस आणि मशीन लर्निंग सारख्या तांत्रिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असंही त्या आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या.
'आदित्य L1' मिशन आणि उद्देश
5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 यशस्वीपणे उतरलं. या मोहिमेच्या अवघ्या एका आठवड्यानंतर भारतानं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-एल1 मिशन लाँच केलं.
या मिशनचे महत्त्व सांगताना निगार शाजी म्हणाल्या, "आदित्य-एल1 मिशनच्या माध्यमातून सूर्य आणि त्याच्या विविध पैलूंचा म्हणजेच सूर्याचे कण, सौर ज्वाळा आदि. घटकांचा अभ्यास केला जातोय.
त्या पुढे सांगतात, "या मिशनच्या मदतीने आपल्याला अंतराळातील हवामान (स्पेस वेदर) समजून घेण्यास तसेच भविष्यातील घटनांचा अंदाज घेण्यास मदत होईल. याद्वारे अंतराळ यानांना होणारे संभाव्य नुकसानदेखील टाळता येण्यास मदत होईल."
पुढे त्या म्हणाल्या, "इस्रोचे 50 हुन अधिक उपग्रह आणि अंतराळ यान अंतराळात कार्यरत आहेत. कधी कधी सौर उद्रेक (Solar Eruption) किंवा विस्फोटांमुळे उपग्रहांवर परिणाम होत असल्याचं आपण ऐकलं असेल.
आज विज्ञानाच्या मदतीनं पृथ्वीवरील हवामानाचा अचूक अंदाज लावता येतो, त्याचप्रमाणे अवकाशातील हवामानाचा अंदाज घेऊन, आपण अवकाशातील नुकसान टाळू शकतो.
तसेच, आदित्य-एल 1 मिशनच्या मदतीनं इस्रोला अधिक चांगलं स्पेस वेदर मॉडेल आणि अंजात घेणारं सिस्टिम विकसित करता येईल, ज्यामुळे अंतराळातील हवामानाची अधिक अचूक माहिती मिळू शकेल.
महिलांचं योगदान आणि समाजात झालेला बदल
महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली पार पाडलेल्या मोठ्या मोहिमांमुळे इस्रो याआधीही चर्चेत राहिले आहे. चंद्रयान मिशनपासून ते मंगळ मोहिमेपर्यंत महिला शास्त्रज्ञांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.
निगार शाजी म्हणतात की हे फक्त विज्ञानातीलच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील उदाहरण आहे. "महिलांना ज्या दिशेने जावंसं वाटतं, त्या दिशेने पूर्ण समर्पण आणि एकाग्रतेनं त्यांनी त्यांचं ध्येय साध्य केलं पाहिजे."
फक्त अंतराळ क्षेत्रच नव्हे, तर आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक मानलं जातं. अवकाशातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
स्त्रीला तिच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी पुरूषापेक्षा खूप जास्त संघर्ष करावा लागतो.
याबाबत बोलताना निगार म्हणतात, "महिलांना घर आणि काम यातं समतोल राखून पुढे जावं लागतं. माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या आईला देते, तिच्यामुळेच मी घर आणि नोकरी यांच्यात ताळमेळ साधू शकले."
आपण मुलांचं पालनपोषण अशा प्रकारे केलं पाहिजे की त्यांच्यात स्त्री-पुरुष समानतेची जाण आणि परस्पर आदराची भावना निर्माण होईल", असं निगार म्हणाल्या.
'वैज्ञानिक नसते तर खेळाडू किंवा फायटर पायलट झाले असते'
वाचन आणि बागकाम हे फावल्या वेळेतील त्यांचं आवडतं काम आहे. तुम्ही वैज्ञानिक बनल्या नसत्या तर काय व्हायला आवडलं असतं? या प्रश्नाचं उत्तर देताना निगार म्हणाल्या, "जर मी वैज्ञानिक नसते तर मी खेळाडू किंवा लढाऊ वैमानिक बनले असते."
इस्रोमध्ये 35 हून अधिक वर्षांच्या कार्यकाळात निगार शाजी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांचा भाग राहिल्या आहेत.
1987 मध्ये त्या इस्रोशी जुळल्या. यानंतर त्यांनी संप्रेषण उपग्रह आणि डिझाइन नियंत्रण प्रणालीसारख्या विविध क्षेत्रांमध्ये आपलं योगदान दिलं आहे.
त्या रिसोर्स सॅट-2ए असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर देखील राहिल्यात आहेत, तसेच इस्रोच्या सॅटेलाइट टेलिमेट्री सेंटरच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)